मोठ्या आवाजात नामस्मरण
मोठ्या आवाजात नामस्मरण
“प्रेम आणि श्रद्धेने घेतलेल्या परमेश्वराच्या नामामध्ये, परमेश्वरी कृपेस उत्कंठित साधकाकडे खेचून आणण्याचे सामर्थ्य असते. नामामध्ये महासागरावरून झेप घेऊन प्रभुत्व मिळवण्याचेही सामर्थ्य असते. ते तुम्हाला अकल्पित शक्ती आणि धैर्य बहाल करते. हनुमानाला महासागर पार करण्याची शक्ती राम नामामुळे प्राप्त झाली का ह्या प्रश्नास उत्तर देताना रामाने म्हटले की जेव्हापासून हया देहाला शिव आणि विष्णू हया दोघांच्या बिजाक्षरांचा संयोग असलेले राम ह्या नामाने संबोधले गेले तेव्हापासून त्याला स्वतःला रावण आणि त्याच्या असूर वंशावर विजय संपादन करणे शक्य झाले. एवढे त्या नामाचे सामर्थ्य आहे. नामस्मरणाने, परमेश्वर आणि त्याचे गुणविशेष सहजतेने ओळखता येतात. नामस्मरणाने जिव्हा पुनीत केली पाहिजे.
[स्त्रोत – 23 नोव्हें. १९६९च्या दिव्य प्रवचनातून]
“ॐ श्री साईराम” ह्या जपमंत्राचे स्पष्टीकरण
आपल्या इष्टदेवतेचे अत्यंत प्रेमाने नामस्मरण करणे म्हणजेच जप. जप, ध्यानाच्या सरावास सहाय्य करतो. जप प्रभावी होण्यासाठी आपण उच्चारत असलेल्या जपाचा अर्थ माहित असणे आवश्यक आहे. जसे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस अत्यंत प्रेमाने व आपुलकीने त्याचे नाव घेऊन आपल्याकडे बोलावतो तसेच परमेश्वराचे नांव घेऊन त्याला आपण आवाहन करतो! आपल्या कोणत्याही इष्टदेवतेचे नाम आपण जपासाठी निवडू शकतो
उदा. आपण ‘ॐ श्री साईराम’ हा मंत्र घेऊ आणि त्याचा अर्थ समजावून घेऊ.
‘ॐ – ॐकार, प्रणवाकार ( प्रणव + अ – कार) अखिल विश्वाचे रूप
श्री – आदर वा पावित्र्य दर्शवण्यासाठी हा शब्द वापरला आहे.
साई – स + आई = स – सर्वश्रेष्ठ, आई – माता
राम – र + अ +म – ‘र’ अक्षर सूर्यदेवाचे प्रतिनिधित्व करतो. जेथे सूर्यप्रकाश असतो तेथे अंधःकारास स्थान नाही. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ‘राम’ शब्द उच्चारता तेव्हा त्याने अज्ञानाचा अंध:कार दूर होऊन, ज्ञानाचा प्रकाश पसरतो. ‘अ’ हे अक्षर अग्निचे प्रतिनिधित्व करते कोणतीही वस्तु अग्निच्या संपर्कात आली की अग्नी तिला जाळतो व त्यावरील मलिनता दूर करून तिचे पांढऱ्या शुभ्र भस्मामध्ये परिवर्तन करतो. त्याचप्रमाणे राममंत्र आपल्या मनातील आणि हृदयातील वाईट विचारांना जाळून त्यांना शुद्ध बनवतो.
‘म’ हे अक्षर चंद्राचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा आपण चंद्राचे दर्शन घेतो तेव्हा आपल्याला शीतल आणि आल्हाददायक वाटते. त्याचप्रमाणे, राममंत्रही आपाल्याला शीतलता व आल्हाददायक जाणीव प्रदान करतो.
म्हणून ‘ॐ श्री साईराम’ हया मंत्राचा सावकाशपणे जप केल्याने आपले सर्व अज्ञान नाहिसे होऊन ज्ञानाचा उदय होतो. आपल्या विचार, उच्चार आणि आचार हयांचे शुद्धीकरण होऊन आपोआपच आपल्याला मनःशांती लाभते.
जी आपल्याला आनंददायी, प्रफुल्लित, शांतीपूर्ण जीवनाकडे घेऊन जाते.
[स्रोत: श्री सत्यसाई बालविकास गुरु हँड बुक ग्रुप-१ वर्ष पाहिले]