भाग एक
भाग एक
बाल सत्या प्राथमिक शिक्षणासाठी बुक्कापट्टनमच्या शाळेत दाखल तर झाले, परंतु घरी परतायच्या वेळेस शिकविलेल्या धड्यांबद्दल चर्चा फार थोडी करत, त्याऐवजी हे आवर्जून सांगत की माझ्या ज्येष्ठांना व माझ्या सहाध्यायींना मी काय ज्ञान दिलेय.
बाल सत्याबरोबर खेळण्यास जी मुले येत ती सारी पाच ते सात या वयोगटातील बालकेच असत. सत्याच्या बरोबरीने ती भजनेही म्हणू लागत तेव्हा ही बटुमूर्ती त्यांना सदाचरणाचे महत्त्व पटवून देत असे व समजावीत असे, “तुमच्या जन्मदात्री ने तुम्हाला या सुंदर जगात आणलंय आणि पित्याने तुमचे पालन पोषण केलय तेव्हा या दोघांच्याही त्यागाची जाणीव ठेवून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करायला हवे आणि त्यांचे आज्ञापालनही. हे तुमचे परम कर्तव्यच आहे. आईवडील रागवतील म्हणून कधीही आपल्या चुका लपवू नका. सत्य हे अत्यंत स्फोटक असते पण हेही लक्षात असावे की तुमच्या सत्याने कोणी दुखावला जाणार नाही.”
मुलं जेव्हा सत्याला सदाचरणासंबंधी विचारीत तेव्हा ते सांगत, “क्रोध, दंभ आणि ईर्षा या सारख्या दुर्गुणांचा त्याग करा. प्रेमाला तुमच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनवा की ज्या बळावर तुम्ही विश्वजित होऊ शकाल. सहाध्यायीचे एखादे पुस्तक वा पेन जरी तुम्हाला हवे असेल तर नम्रपणे मागा, परंतु विचारल्याशिवाय वा चोरून मात्र कधीही घेऊ नका,”
स्वामींना जसे मुलांविषयी अतीव प्रेम वाटे तसेच मुलांनाही त्यांच्याविषयी आणि त्यांच्या शिकवणीविषयी किती आत्मियता वाटे हे मुलांच्या आपापसातील चर्चेवरून सहज जाणावे. केशन्ना, रेगन्ना, सुवन्ना आणि रामन्ना यासारखी बाकी मुले आपसात बोलत की, “राजू किती छान बोलतो नाही? मला तर त्याच्याविषयी खूप प्रेम वाटतं!” दुसऱ्याने म्हणावे, “तूच नाही रे, आम्हा सर्वांचेच त्याच्यावर प्रेम आहे.” एखादा मुलगा म्हणे, “किती छान छान गोष्टी राजू आम्हाला सांगतो, त्यातील एकदोन तरी आपण आचरणात आणायला हव्यात.” कोणी म्हणे ‘मातापित्यातच ईश्वर पाहणे’ हेच खरे जीवन. तर एखादा प्रेरित होऊन खरं बोलण्याची खूणगाठ मनाशी बांधीत असे.
किती छोट्या वयात स्वामींनी वेगवेगळ्या जाती आणि धर्मात एकता स्थापित करण्याचे कष्ट घेतले ही त्यांच्या पुढील जगमान्यतेची नांदीच म्हणायला हवी. पुट्टपतींत अनेक मुस्लिम कुटुंबे मोहरम साजरा करीत, तेव्हा सत्या आपल्या मित्रांना म्हणे, “धर्म आणि कर्मकांड यापेक्षाही महत्त्व द्या ते नैतिकतेला. तीच आपल्या जीवनाचा आधारभूत पाया असते. तेव्हा धर्माच्या नावावर भेदभाव न करता मित्रत्वाचे आचरण ठेवून आपण सगळेच मोहरम साजरा करू या.”
एकदा गंगन्ना नावाच्या हरिजन बालकाने (आज ते नव्वदीत आले असून त्यांचे सुपुत्र प्रशांतीच्या प्रशासनिक कार्यालयात कार्यरत आहेत.) बाबांना भोजनासाठी बोलविले. सुबम्मा (बाबांचा प्रतिपाळ करणारी) पण त्यांच्याबरोबर गेली. ती ब्राह्मण असल्याने गंगन्ना थोडा घाबरला परंतु स्वामींनी समजावले, ‘अरे असे मनात सुद्धा आणू नकोस. भेदभाव सोडून मिळून मिसळून राहण्यातच खरे सुख आहे. विश्वात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे मानवता. तसेच खरा धर्म प्रेम हा होय.’
प्राथमिक शिक्षण तर झाले. आता माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ई.एस.एल.सी. ची परीक्षा द्यावी लागे, तीही पेनुकोंडा या गावी. तेव्हा बस किंवा रेल्वेचीही सोय नव्हती. प्रवासाचे एकमात्र साधन म्हणजे बैलगाडी. ज्या वेळी खरोखर रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांना ती एकच डोळा असलेली आणि सापासारखी सरपटणारी रहस्यमय वस्तू वाटली होती. पेनुकोंडाला जाणे म्हणजे एखाद्या दूरदेशाला गेल्यासारखे वाटे. शिकावयास निघालेल्या सत्याला ईश्वरम्माने मिठाई व इतर पदार्थ तयार करून कपड्यात बांधून दिले. कारण टिफिन कॅरियर ही सुविधा परवडणारी नव्हती, जाते वेळी साहजिकच मुलाच्या विरहाने आई वडिलांना रडू यायला लागले.
एकूण आठ मुले आणि शिक्षक असे बैलगाडीतून प्रवास सुरू झाला. वाट अशी खडकाळ की चढ़ आला की सर्व मुलांना खाली उतरावे लागे व पायी चालून परत थोड्या वेळाने बैलगाडीत बसावे लागे. असे करत पहाटे पाचला निघालेली ही मंडळी साडेतीन कि.मी. अंतर पार करून रात्री नऊ वाजता पेनुकोंडा येथे पोचली.
गावात राहण्याची काहीच सोय नसल्याने गावाबाहेरच मुक्काम ठोकावा लागला आणि तीन दिवस न्याहारी, माध्यान्ह भोजन आणि रात्रीचे जेवण सत्याने एकट्याने निभावून नेले.
मुलं तर या कष्टमय प्रवासाने आणि परिक्षेच्या प्रक्रियेने इतके हवालदील झाली की त्या आठापैकी फक्त सत्याच प्रथमश्रेणी मिळवून उत्तीर्ण झाला, हे जेव्हा लोकांना समजले तेव्हा सुंदरशा सजविलेल्या बैलगाडीत त्याला बसवून गावभर शोभायात्रा काढून गावकऱ्यांनी एक प्रकारे त्याचा गौरवच केला. स्वामींची पहिली शोभायात्रा ही पेनुकोंड्याला झाली म्हणायची.यानंतर सत्या आपले वडील बंधू शेषम राजू यांचे बरोबर कमलापुरम् येथे राहण्यास आले. हायस्कूल शिक्षण सुरू झाले.
येथे पिण्याच्या पाण्याची मोठीच समस्या होती. विहिरीतून पाणी काढून मोठ्या घागरीतून ते घरी घेऊन यावं लागे. सकाळचे नऊ यातच वाजून जात आणि शाळेत जाण्याची वेळ होत असे. तेव्हा बासीभात (रात्रीचा भात मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात) आणि लोणचे खाऊन सत्या धावतपळत शाळेत पोहचे.
शाळा नियमित सुरू झाली. एका बाकावर तीन मुले अशी आसन व्यवस्था असल्याने रमेश आणि सुरेश या दोघांच्या मधे सत्या बसत असे. एक दिवस त्यांच्या ड्रिल मास्तरानी फर्मान काढले की शाळेत स्काउट सुरू झाले आहे आणि प्रत्येक मुलाने त्यात सहभागी व्हायचे आहे. गणवेष पण एक आठवड्यात शिवून तयार हवा. (खाकी पँट, खाकी शर्ट, बिल्ला) कारण त्यांच्या पथकाला पुष्पगिरीच्या वार्षिकोत्सवात सेवेसाठी जायचे आहे.
आता काय करावे? सत्याजवळ तर एकही पैसा नव्हता. दरिद्रांना मनोरथम् उत्पद्यन्ते विलीयते ।
म्हणजे अकिंचनाचे मनोरथ उत्पन्न होतात आणि विरूनही जातात. त्यात राजूंचे कुटुंब संयुक्त व मोठे असल्याने परिवाराचा चरितार्थ चालवणारे वैंकप्पा राजू जास्त खर्च करू शकत नव्हते. पर्तीहून निघताना त्यांनी दोन आणे सत्याला दिले होते. (त्यावेळी हे सुद्धा खूप मोठे वाटत) पण आता सहा महिने होत आले होते आणि ते पैसे तर खर्च झाले. स्काउट व वर्ग दोन्हींचा प्रमुख असल्याने पुष्पगिरीला जाणे तर अनिवार्य होते, जवळ कपड्याचा फक्त एकच जोड, तोही रोज धुवून प्रेस करून घालावा लागे. पण हे सर्व शिक्षकांना कळू नये असेच सत्याला वाटे, कारण अशाने परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली असती तेव्हा आपण उत्सवात न गेलेलेच बरे. रमेशच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने आपल्याला स्काऊट युनिफॉर्म आवडतो असे सांगून वडिलांकडून दोन जोड करवून घेतले आणि एक दिवस त्यातील एक जोड कागदात गुंडाळून सत्याच्या बँकात एका चिठ्ठीसहित ठेवले.
त्यात त्याने लिहिले की, “राजू तू मला भावासारखाच आहेस, तेव्हा तुला हा गणवेष घ्यावाच लागेल, नाही घेतलास तर मला मरणप्राय वाटेल बघ!”
सत्याने चिठ्ठी फाडून दुसरी चिठ्ठी लिहिली, “खरंच जर तुला माझी मैत्री हवी असेल तर अशा भेटी देणे घेणे बंद कर. या देण्याघेण्यामुळे मित्रत्वात फूट पडते. असे जर मैत्र असेल तर तिथे भेटी आणि देणे घेणे यांची अपेक्षाच राहणार नाही. तीच खरी पवित्र मैत्री.” रमेशला गणवेष परत घ्यावाच लागला.
पुष्पगिरिच्या उत्सवासाठी आता तीनच दिवस राहिले होते. सगळे मित्र सत्याला आग्रह करीत होते की राजू तू जर जाणार नसशील तर आम्हीपण जाणार नाही. प्रत्येकाने बससाठी दहा रुपये आणि हातखर्चाला दोन रुपये जमवले कारण जेवणाचा खर्च त्यांचा त्यांनाच करायचा होता. सत्याजवळ तर पैसे नव्हतेच, तेव्हा बसने जाणे तर असंभवच, त्याने पोटदुखीचा बहाणा करून नंतर येईन असे सांगून वेळ निभावून नेली. मित्रांना त्याच्याशिवायच जावे लागले.
ते सगळे रवाना झाल्यावर सत्याने आपली मागील वर्षीची पुस्तके काढली. ती इतकी व्यवस्थित ठेवली होती की नवीच्या नवी दिसत होती, ती घेऊन तो एका हरिजन विद्यार्थ्याकडे गेला. त्याने त्याच वर्षी शाळेत प्रवेश घेतला होता. पण तो अर्ध्या किमतीतही पुस्तके घेण्यास असमर्थ आहे हे बघून त्याला शक्य होते त्या किमतीत सत्याने पुस्तके देऊन टाकली. तो मुलगाही खूष झाला.
कागदी नोटा नसल्याने सगळा चिल्लर खुर्दा होता. ज्यात काही तांब्याची नाणी वगैरे होती. ती एका धडप्यात बांधून घेणार, तोच तो कपडाही फाटला आणि सारे पैसे जमिनीवर पसरले.
पैशांचा आवाज ऐकून घरमालकीण बाहेर आली. त्याला वाटेल तसे बोलू लागली. त्याने परोपरीने आपण निर्दोष आहो हे सांगितले. तरीही तिने त्याच्यावर चोरीचा आळ घेऊन तीन दिवस उपाशी राहण्याची शिक्षा दिली.
आपण घरी जेवलो नाही तर लोकांना प्रश्न पडणार आणि ते याबद्दल विचारणार आणि तसे घडले तर प्रतिष्ठेचा प्रश्न येईल. ती तर जपायलाच हवी ना! म्हणून सत्याने लगेच पुष्पगिरीला जाण्याचे ठरविले.
पण ‘शुभस्य शीघ्रम्’ अंगाला टोचणारे ऊन, पिण्यायोग्य पाण्याची चणचण त्यामुळे एके ठिकाणी घाण पाणी सुद्धा त्याला प्यावे लागले तरीसुद्धा
अतीव कष्ट सोसून सत्या जत्रेत पोचला आणि आपल्या मित्रांबरोबर सेवाकार्यात गढून गेला. त्याच्या उत्साहाने प्रेरित होऊन त्याचे सहाध्यायी पण निस्वार्थ सेवेची भावना ठेवून कामात मग्न झाले. तिथे सुद्धा सत्याने तीन दिवस काहीही खाल्ले नाही. इतर कोणाच्या तर ही गोष्ट लक्षातही आली नाही, परंतु रमेशने मात्र सत्या जेवत नाही हे बरोबर ताडले. म्हणून तो कोणाला समजू न देता चुपचाप डोसा किंवा एखादा खाद्यपदार्थ आणून सत्याला खाऊ घाली. उरलेले दिवस पण असेच गेले.
निघतेवेळी सत्याने एक रुपया रमेशकडून उधार म्हणून घेतला. उपहार म्हणून नाही. त्यातून त्याने कुटुंबातल्या व्यक्तींसाठी फळे, कुंकू वगैरे प्रसाद म्हणून घेतले आणि पायीच पुन्हा परतीच्या वाटेला लागला.
इकडे आठ दिवस सत्याच्या गैरहजेरीत घरामधल्या लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. मुख्य म्हणजे पाणी भरण्याचे कष्टप्रद काम, तसेच घरच्या बाईनेही शेषम राजू खूप तक्रारी केल्या.
शेषम राजूच्या मनात तसेही राग होताच. तेव्हा आल्याआल्या सत्यावर सगळा काढण्यासाठी पट्टीने त्याच्या बोटांवर मारायला सुरुवात केली. इतके मारले की त्या पट्टीचे सुध्दा तुकडे झाले.
पाण्याच्या त्रासासाठी झालेल्या चिडचिडीमुळे शेषम राजूंचा सगळा राग सत्यावर निघाला, हे शेजाऱ्यांना जेव्हा माहीत झाले तेव्हा वेंकय्या राजू ज्यावेळी सत्याला भेटण्यासाठी तिथे आले तेव्हा हा सारा प्रकार त्यांनी राजूंना कथित केला. तेव्हासुद्धा सत्याचे हात सुजले होते व त्यावर पट्टी बांधली होती. पितृमन ते! ते व्यथित झाले आणि सत्याची काळजी वाटून त्याला पुट्टपतींला परत चलण्यासाठी त्यांनी सुचवले, परंतु सत्या होता तो. एखादा सामान्य मुलगा लगेच हो म्हणाला असता. आपल्या मधुर स्वरात त्याने वडिलांना समजाविले, ‘आताच या लोकांनी आपला मोठा मुलगा गमावलाय. आणि मी पण लगेच इथून निघून गेलो तर ते एकाकी पडतील आणि समाजात पण चांगले दिसणार नाही. तरी पण मी वचन की लवकरच पुट्टपर्तीला येईन.’
स्वामींची नेहमी हीच शिकवण असते की घरातल्या कुठल्याही गोष्टींची बाहेर वाच्यता करू नये की ज्यामुळे सन्मानाला ठेच पोचेल आणि घराची बदनामी होईल.
जेव्हा ते पुट्टपर्तीला परतले तेव्हा ईश्वरम्माने त्यांच्या डाव्या खांद्यावर एक काळा डाग बघितला व विचारले, हे काय आहे? आधी तर हसून त्याने उत्तर टाळले पण आईच्या सारखे विचारण्याने त्याला सांगावेच लागले की कावडीने पाणी भरल्याने तिथे घट्टा पडला आहे. त्याने आईला हे ही सांगितले की, ‘अम्मा हे तर माझे कर्तव्यच होते. इतके खारे पाणी मुले कस काय पिऊ शकतील. आणि मी हे खुषीने केलंय. हीच सेवा करण्यासाठी तर मी आलोय.’