ख्रिश्चन धर्म

Print Friendly, PDF & Email
ख्रिश्चन धर्म

ख्रिश्चन धर्म हा महत्त्वाच्या धर्मांपैकी एक धर्म असून त्याचे सुमारे ८०० दशलक्ष अनुयायी आहेत. ख्रिश्चन धर्माचा सुद्धा इतर धर्मांप्रमाणेच आशिया खंडात आरंभ झाला. संपूर्ण जगात सगळ्या भागात ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आज पहायला मिळतात. ख्रिश्चन धर्म ख्रिस्ता भोवती केंद्रित झाला आहे. बायबल ह्या ग्रंथात न्यू टेस्टामेंटमध्ये ख्रिस्ताचे चरित्र बघायला मिळते. बायबल हे ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. हां ग्रंथ अध्यात्मिक मार्गाच्या प्रवाशांसाठी नकाशाचे काम करतो. यात्रेकरूंसाठी काठीसारखा आवश्यक आधार असतो. विमान चालवताना विमानचालकासाठी होकायंत्र जसे काम करते तशा प्रकारे मुक्तीच्या मार्गात ते मार्गदर्शक ठरते.

लोक मोझेसची शिकवण विसरले आणि परत एकदा समाजात गैरसमज, अंधश्रद्धा वाढल्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नितीमत्ता संपली होती. जेव्हा वाईट प्रवृत्ती डोके वर काढतात तेव्हा ईश्वर संतांना खाली पाठवतात. यावेळी ईश्वराचा मुलगा, डेव्हिड राजाचा मुलगा, जिझसला पाठवले. तो लोकांचा रक्षक होता तसेच त्याने नवीन ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. असे म्हणतात, ईश्वराचे जगातील लोकांवर अतिशय प्रेम होते म्हणून त्याने त्याचा लाडका एकुलता एक मुलगा पाठवला. जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांची अधोगती थांबते आणि ते अनंत काळ जगतात.

जीझसचे जीवन

जोसेफ आणि मेरी हे जीझसचे ज्यू मातापिता अतिशय पवित्र दंपती होते. व्यवसायाने सुतार असलेला जोसेफ गालिली प्रांतातील नाझरेथ गावी रहात होता. ख्रिस्त जन्मापूर्वी, कुमारी मेरीला गेब्रीएल देवदूताने सांगितले की ईश्वराच्या कृपेस तू पात्र ठरलेली असून ईश्वराचा पुत्र, तुझा पुत्र म्हणून जन्माला येईल. या वेळेपर्यंत जोसेफ आणि मेरीचे लग्न ठरले होते. जोसेफच्या स्वप्नात त्याला देवदूताकडून आदेश मिळाला की तू मेरीचा पत्नी म्हणून स्वीकार कर. आणि तिच्या मुलाचे नाव जीझस ठेव. त्या काळात इझरायल रोमन साम्राज्याच्या ताब्यात होते. लोकसंख्येच्या गणनेसाठी प्रत्येक नागरिकाला, कायद्याप्रमाणे त्याच्या नावाची त्याच्या गावात नोंदणी करावे लागे. म्हणून जोसेफ त्याच्या गरोदर पत्नीला मेरीला घेऊन नाव नोंदणीसाठी त्याच्या गाव बेथलेहेममध्ये (ज्युडीया) गेला. तिथे पोचला तर तिथे खूपच गर्दी होती आणि त्यांना रहायला जागा मिळाली नाही. शेवटी त्यांनी रात्री एका गोठ्यात आसरा घेतला. त्या रात्री जीझस लोकांचा रक्षक जन्माला आला. कित्येक शतके आधी जिझसच्या जन्माचे भाकित केले होते. पूर्वेकडे एक तारा दिसेल, तीन विद्वान माणसे पूर्वेकडून आली आणि ज्यूंच्या राजाकडे, हेरोडकडे चौकशी केली. त्यांनी आकाशवाणी सांगितली आणि बाळाबद्द्ल चौकशी केली. तो ज्यूंचा भविष्यकाळात राजा होईल असेही सांगितले. दुष्ट राजाने जेव्हा ऐकले की भविष्यात जीझस ज्यूंचा राजा होणार आहे तेव्हा त्याने धूर्तपणे त्यांना सांगितले आपण बाळाला शोधा आणि नंतर मला त्याचा ठावठिकाणा सांगा म्हणजे मला त्याची पूजा करता येईल. पूर्वेकडील चांदणीकडे बघत तीन विद्वान मार्गस्थ झाले. ते गोठ्याकडे आले. त्यांना दिव्य बालकाची झलक दिसली. बाळ गवतावर पहुडले होते, त्यातून शांत, सौम्य, दिव्य प्रकाशाची आभा पसरली होती. त्यांनी गुडघे टेकले, त्याला नमन केले. भक्तीचे प्रतिक म्हणून काही गोष्टी अर्पित केल्या. राजाच्या दुष्ट योजनेबद्दल देवदूताने त्यांना सूचित केले म्हणून त्याला बाळाचा ठावठिकाणा न सांगता ते निघून गेले. काही मेंढपाळांना देवदूताने चांगली बातमी सांगितल्यामुळे ते बेथलहेमला घाईघाईने बाळाच्या दर्शन, पूजनाला गेले. नंतर देवदूतांनी जोसेफला माता मेरी आणि बाळ जीझसला इजिप्तला ताबडतोब घेऊन जाण्यास सांगितले. त्याला बजावले की हेरोड त्याचा (बाळाचा) शोध घेऊन त्याला मारुन टाकेल. म्हणून लगेच इजिप्तला प्रयाण करा. जोसेफ त्याप्रमाणे वागला. क्रोधीत झालेल्या हेरोड राजाने दोन वर्षांखालच्या सगळ्या बालकांना यमसदनाला पाठवले. हेरोडच्या मृत्युनंतर देवदूताने त्यांना नाझरेथला परत जायला सांगितले.

या एका प्रसंगाव्यातिरिक्त जिझसच्या बालपणा बद्द्ल फारसे माहित नाही. तो बारा वर्षाचा झाल्यावर त्याच्या पालकांबरोबर एका मेजवानीत हजर राहण्यासाठी जेरुसलेमला गेला होता. पालक तिथून निघाले पण त्यांच्या नकळत तो कुठेतरी गेला. तीन दिवस शोधल्यानंतर त्यांना तो एका मंदिरात धर्मगुरुंशी, नियम आणि श्रद्धा- विश्वास यावर चर्चा करताना सापडला. त्यांना खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्याच्यासाठी विद्वान गुरु शोधला.

त्याच्या वयाच्या ३० वर्षापर्यंत कुठलीच माहिती कुणाला नव्हती. पण सेंट ल्यूक यांना वाटते की त्या काळापर्यंत एकांतात तो ईश्वराचे चिंतन करत होता.

त्याचा बाप्तिस्म

झचारिया आणि एलिझाबेथचा मुलगा जॉन जो बाप्तिस्ट होता. त्याने जॉर्डन नदीमध्ये जिझसचा बाप्तिस्ट विधी केला. बाप्तिस्ट म्हणजे शुद्ध करण्याचा विधी. ज्या क्षणी हा विधी संपन्न झाला त्याच क्षणी जीझसने बघितले की एका कबूतराच्या आकारात ईश्वरी आत्मा त्याच्याकडे येतो आहे आणि त्याने आकाशवाणी ऐकली “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्याकडे मी खूप आनंदी आहे.”

त्याचे कार्य

वयाच्या तिसाव्या वर्षी जीझसने मार्गदर्शनाला सुरुवात केली. त्याने त्याच्या भोवती १२ अनुयायी गोळा केले आणि त्यांच्या समवेत ईश्वराचा नवीन संदेश सांगायला सुरुवात केली. स्वतःच्या पापांचा पश्चाताप वाटणे जरुरीचे आहे आणि मानवाची ईश्वराप्रती आणि आपल्या समाजबांधवांप्रती कर्तव्य भावना असली पाहिजे. असे सांगताना मानव जातीला मुक्त करणारे प्रेम ईश्वराचे आहे असेही सांगितले. करुणेची वस्त्र परिधान केलेला प्रेमळ, दयाळू, कोमल, शांतीचा राजकुमार गावा गावातून फिरत होता. यहूदी मंदिरे, ग्रामीण भागात हिंडत होता. आजारी रुग्णांना बरे करत होता, संकटात सापडलेल्यांचे सांत्वन करत होता. काही वेळा मृतांनापरत जीवंत करत होता. त्या किर्तीमुळे धर्ममार्तंडांच्या मनात मत्सर निर्माण झाला. त्यांनी गुप्तपणे जिझसला अटक करुन मृत्युदंड देण्याची योजना आखली.

जिझस गालिलीहून जेरुसलेमला पासोवर उत्सवासाठी गेला. शेवटच्या जेवणानंतर त्याला अटक करण्यात आली. जीझसचा अनुयायी जुदास याने ३० चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याला धोका दिला आणि अधिकाऱ्यांना जीझसला पकडण्यासाठी मदत केली. ज्यू धर्मगुरुंनी त्याच्यावर खोटे आरोप लावले, अन्यायकारक पद्धतीने न्यायालयात आरोप सिद्ध करुन शेवटी अत्यंत क्रूर पद्धतीने मृत्यु दंड दिला. (क्रूस वर चढवले.) त्यावेळी जिझस फक्त ३३ वर्षाचा होता. जरी त्याला चाबकाचे फटकारे मारत होते आणि सुळावर टांगून अंगात खिळे ठोकत होते तरीही त्याचे हृदय मात्र दयेने तुडुंब भरून वहात होते. ज्यांनी त्याला मृत्युदंड दिला आणि क्रूसवर चढवले त्यांच्यासाठीसुद्धा तो प्रार्थना करत होता. त्याचे शेवटचे शब्द होते, ” हे पित्या कृपया त्यांना क्षमा कर कारण त्यांना माहित नाही ते काय करत आहेत.” प्रत्येक वर्षी ज्या दिवशी जीझसला सुळावर चढवले तो दिवस गुड फ्रायडे म्हणून शोक दिवस पाळतात. आधीच दिलेल्या शब्दाप्रमाणे जिझस सुळावर चढवल्याच्या दुसऱ्या दिवशी थडग्यातून बाहेर येऊन त्याच्या भक्तांसमोर प्रगट झाला. हा रविवार ईस्टर संडे म्हणून आनंदाने साजरा केला जातो. पुढे चाळीस दिवस तो त्यांना दिसत होता. चाळीसाव्या दिवशी तो त्यांना ऑलिव्हच्या डोंगरावर घेऊन गेला. तिथे त्यांना आशीर्वाद दिला अणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचा सर्व देशांमध्ये प्रसार करण्यास सांगितले. त्यानंतर या जगताच्या अंतापर्यंत मी तुमच्याबरोबर कायम राहीन असे आश्वासन दिले आणि तो स्वर्गाकडे वर निघून गेला.

जीझसचा उपदेश

जीझसने आपल्या शिष्यांना केलेला उपदेश गेली २० शतके सर्व जगावर प्रभाव पाडत राहिला आहे आणि तो तसा कायमच राहील.

त्याचा प्रमुख उपदेश असा :

  • ‘आपल्या शत्रूवरही प्रेम करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांच्याशीही चांगलेच वागा. जे तुम्हाला शाप देतील त्यांना आशीर्वाद द्या. तुमचा द्वेष तुमच्याशी जे वाईट वागतील त्यांच्यासाठी ही प्रार्थना करा.
  • तुमच्या शेजाऱ्यांवर तुम्हीच समजून प्रेम करा.
  • कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. तुम्ही देत राहा त्याचा मोबदला मागू नका. तुमचा स्वर्गातला पिता जसा दयाळू आहे तशी दया दुसऱ्यांवर करा. तुम्हाला दुसऱ्याकडून जे अपेक्षित नाही ती गोष्ट तुम्हीही करु नका. दुसऱ्यांवर टीका करू नका म्हणजे देवही तुमच्यावर टीका करणार नाही. दुसऱ्यावर टीका करण्यापूर्वी स्वत:चे परीक्षण करा. दुसऱ्यांना क्षमा करा म्हणजे देवही तुम्हाला क्षमा करील.’
  • आपला उपदेश सर्वांनी आचरणात आणावा असे त्याने सर्वांना सांगितले

जीझस लोकांना म्हणाला ‘खाणे पिणे, वस्त्र यांची चिंता करु नका. त्या स्वर्गातल्या देवाला तुमच्या गरजा माहित आहेत. तो त्या पूर्ण करील. त्याच्या राज्याला पहिला क्रम द्या, त्याला काय पाहिजे आहे ते जाणा म्हणजे मग तोही तुमची काळजी घेईल.’ जीझस नेहमी कथांमधून शीकवत असे व उदाहरणांमधून नीतीमूल्ये सांगत असे.प्रारंभी एकच ख्रिश्चन धर्म वैश्विक पातळीवर विकसित होत होता.नंतर तो दोन पंथांमध्ये विभागला गेला. १) कॅथलिक २) प्रोटेस्टंट

1. कॅथलिक 2. प्रोटेस्टंट

कॅथलीक पर्यायांसाठी रोम मधील वैटिकन येथील पोप हे मुख्य अधिकारी होत. तेच त्या धर्माचे प्रमुख मानले जातात. जीझसने आपल्याला नवीन माणूस बनायला सांगितले आहे. आपण आपला स्वार्थीपणा अहंकार यांचा त्याग केला पाहिजे. स्वर्ग ही अंतराळातील जागा नाही. ती आध्यात्मिक अवस्था असून स्वतःच्या अंतरंगात त्याचा अनुभव घेतला पाहिजे. ‘मानव सेवा हीच ईश्वराची सेवा’ यावर ख्रिस्ताने भर दिला. प्रत्येकाने एक चांगली व्यक्ती म्हणून जगले पाहिजे. कुणीही संकटात आहे तो आपला शेजारी आहे असे समजा. जसे ख्रिस्ताने स्वतःचे बलिदान केले तसे प्रेमासाठी करायची वेळ आल्यास करा.

थोडक्यात, हा प्रेमधर्म आहे. मानवजातीच्या सक्रिय व निष्ठापूर्वक सेवेची बांधिलकी असणारा धर्म आहे.

परमेश्वराची प्रार्थना :

प्रार्थना

आमचे वडील जे स्वर्गात आहेत,
तुझे नाव पवित्र असो.
तुझे राज्य येवो.
पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण होईल
जसे स्वर्गात आहे,
तशी रोजची भाकरी आम्हाला रोज दे.
तू आमच्या अपराधांना क्षमा कर.
जसं आपण आपल्याविरुद्ध अन्याय करणाऱ्यांना क्षमा करतो तशी
आम्हाला मोहात पाडू नको.
आम्हाला वाईटापासून वाचव.
कारण तुझे राज्य असून
ते शक्तीशाली आणि गौरवशाली आहे

चिन्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *