ज्योती ध्यान

Print Friendly, PDF & Email
ज्योती ध्यान

ध्यानाच्या पध्दतीच्या बाबतीत वेगवेगळे शिक्षक वा प्रशिक्षक वेगवेगळ्या प्रकारची पध्दत सांगतात. परंतु आता मी तुम्हाला ध्यानाची सर्वत्र अनुसरली जाणारी आणि अत्यंत प्रभावी पध्दत देत आहे. ध्यान ही आध्यात्मिक साधनेतील पहिली पायरी आहे. प्रथमतः ध्यानासाठी दररोज काही मिनिटे राखून ठेवा आणि जसा जसा त्यातून तुम्हाला आनंदाचा अनुभव येऊ लागेल तसा तुम्ही ध्यानाचा काळावधी वाढवत न्या.

शक्यतो ध्यानासाठी पहाटेची वेळ निवडावी ह्या वेळास प्राधान्य देण्याचे कारण झोप झाल्यामुळे त्यावेळेस आपले शरीर ताजेतवाने असते. दिवसभरातील कामेही सुरु झालेली नसतात. तुमच्या समोर निरांजन वा मेणबत्ती लावा. त्याची ज्योत ऊर्ध्वगामी व स्थिर असावी. त्या ज्योतीसमोर तुम्ही पद्मासनात वा सुखासनात बसा. थोडा वेळ त्या ज्योतीकडे एकटक पाहा व नंतर सावकाश डोळे मिटून तुमच्या दोन्ही भुवयांच्या ज्योतीच्या अस्तित्वाची कल्पना करा. त्यानंतर ती ज्योत खाली आणत तुमच्या हृदयामध्ये घेऊन जा. ज्योतीने हृदयामध्ये प्रवेश केल्यानंतर अशी कल्पना करा कमळाच्या पाखळ्या एकएक करून उमलत आहेत. त्या ज्योतीच्या प्रकाशात तुमचा प्रत्येक विचार, भाव आणि भावना न्हाऊन निघत आहेत. अंधःकार दूर झाला आहे. आता अंधःकाराला लपून बसायला जागाच नाही आहे. त्या ज्योतीचा प्रकाश अधिक प्रखर व व्यापक होतो आहे. तो प्रकाश तुमच्या अवयवांना व्यापून टाकू दे. आता ते अवयव कृष्णकृत्यांमध्ये, दुष्कृत्यांमध्ये आनंद घेणार नाहीत. आता ते प्रेमाचे आणि प्रकाशाचे साधन बनले आहेत. तो प्रकाश जिव्हेपर्यंत पोहोचल्यावर असत्य तेथून नाहीसे होते. आता ती ज्योत डोळे आणि कानापर्यंत आणल्यानंतर, त्यांना व्यापून टाकलेल्या दुर्वासनांचा नाश होतो ज्या तुम्हाला विकृत, पोरकट गोष्टींकडे आकर्षित करतात. तुमचे मस्तक त्या प्रकाशाने भरून जाऊ दे म्हणजे तेथील सर्व दुर्वासना गळून पडतील. आता अशी कल्पना करा की तो प्रकाश अधिकाधिक तीव्रतेने तुमच्यामध्ये भरून राहिला आहे. तो तुमच्या भोवती तळपत राहु दे. तुमच्यामधून पसरणाऱ्या व अधिकाधिक व्यापक होणाऱ्या प्रेमावर्तुळांमध्ये, तुमचे प्रियजन, आप्तस्वकिय, मित्रपरिवार, तुमचे शत्रू, प्रतिस्पर्धी, अपरिचित, सर्व प्राणिमात्र आणि समस्त विश्व सामावून जाऊ दे.

ह्या प्रकाशाने दररोज तुमची सर्व इन्द्रिये अंतर्बाह्य प्रकाशमान केली जात असल्यामुळे, लवकरच अशी वेळ येईल की वाईट गोष्टींमध्ये तुमचे मन रमणार नाही. अपायकारक, नीरस व विषारी द्रव्ये असणाऱ्या अन्नाचा वा पेयाचा आस्वाद तुम्हाला घ्यावासा वाटणार नाही. वाईट आणि हीन पातळीवरील गोष्टी तुम्ही हाताळणार नाही. दुर्लौकिक असणाऱ्या ठिकाणी जाणार नाही. कोणालाही इजा पोहोचवणार नाही तसेच कधीही कोणाविरुध्द कटकारस्थान रचणार नाही. सर्वत्र प्रकाशाच्या अनुभूतीचा आनंद घ्या. परमेश्वराच्या ज्या रूपाची तुम्ही भक्ती करता त्या रूपाचे कल्पनाचित्र, ह्या सर्वव्याप्त प्रकाशामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. कारण प्रकाश हाच परमेश्वर आहे आणि परमेश्वर हाच प्रकाश आहे.

मी सांगितल्यानुसार दररोज नियमितपणे ह्या ध्यानाचा सराव करा. इतरवेळी परमेश्वराचे सामर्थ्य, करुणा आणि औदार्य ह्यांची निरंतर जाण ठेवून, परमेश्वराच्या कोणत्याही एका नामाचा जप करा.

[श्री सत्यसाई बाबा. श्री सत्यसाई स्पीक्स व्होल्यूम X पेज ३४८-३५० शिवरात्री -1979]