दिव्य प्रवचन
दिव्य प्रवचन: साई श्रुती, कोडाईकॅनल, २९ एप्रिल, २००९
निर्मिती सत्यातून प्रकट होते आणि सत्यात विलीन होते.
या विश्वात अशी जागा आहे का जिथे सत्य अस्तित्वात नाही?
या शुध्द आणि अबाधित सत्याचे कल्पनाचित्र उभे करा. (तेलगू कविता.)
तुम्ही विश्वास गमावलात की देवाला गमावता.
सर्वजण शांती आणि आनंदाची इच्छा करतात. कोणालाही दुःख आणि समस्या नको असतात. त्यांच्या भाषणात श्री पोपट म्हणाले की सर्वजण परमेश्वर स्वरुप आहेत. परमेश्वर एक आहे. दुसरे अस्तित्वच नाही. दुसरे अस्तित्व आहे असा विचार केलात, तर ते असत्य आहे म्हणून, दुसरे अस्तित्वच नाही.
सर्व एक आहेत!
अगदी लहानशा मुंगी, डास आणि पक्षापासून ते विशाल हत्तीपर्यंत, प्रत्येक जीव ही परमेश्वराची निर्मिती आहे. वृक्ष, पर्वत आणि डोंगर ही सुद्धा भगवंताची निर्मिती आहे. असे जर आहे, तर मग दुसरे अस्तित्वच कसे असेल? दुसरे अस्तित्व हे केवळ तुमची कल्पना आणि भ्रम आहे. हे तुम्ही स्वतः केलेले आहे. जरा विचार करा. तुमचे शरीर कुठून आले. तुम्ही म्हणाल की तुमच्या पालकांकडून आले. तुम्ही तुमच्यापासून आलात, फक्त एकच अस्तित्व आहे. दुसरे अस्तित्व आहेच कुठे? परंतु आज लोकं भिन्नत्वावर विश्वास करतात, आणि एकत्वावर नव्हे. ऐक्य म्हणजे काय? अनेकांचे एकत्र येणे नव्हे; तर एकाची अनुभूती होणे. तुमच्या भोवताली आरसे असतील तर त्यात तुमची अनेक रूपे दिसतात. ही तुमची विविध रूपे असतात. तथापि हे सत्य नाही. जो प्रश्न विचारतो आणि जो त्याचे उत्तर देतो, दोन्ही एकच आहेत. सर्व एकच आहेत. दैवं मनुष्य रूपेण (परमेश्वर मानवी रूपात आहे) तीच व्यक्ती अनेक रूपात दिसते. ही रूपे एक दुसऱ्याहून भिन्न आहेत असे मानणे ही चूक आहे. जेव्हा मी मायक्रोफोन वर बोलतो, तेव्हा तुम्ही माझा आवाज ऐकता. वक्ता एकच आहे तथापि आवाज अनेक कानांमध्ये ऐकला जात आहे. एकोहं सर्व भूतानां (सर्वांमध्ये मीच एक सत्य आहे) एकं सत् विप्रः बहुधा वदन्ति (सत्य एकच आहे, तथापि विद्वान त्याला अनेक नावांनी संबोधतात). आकाशात एकच सूर्य आहे, परंतु आपण अनेक नद्या, तळी आणि पात्रांमध्ये त्याचे प्रतिबिंब पाहतो. सूर्य एकच आहे. तथापि जिथे जिथे पाणी आहे, तुम्ही त्याचे प्रतिबिंब पाहता. एका ताटलीत पाणी असेल, तुम्हाला त्यातही सूर्याचे प्रतिबिंब दिसेल. याचा अर्थ असा होतो का की सूर्य ह्या पाण्यात आहे? नाही, नाही. ते सूर्याचे फक्त प्रतिबिंब आहे. तसेच आत्मा फक्त एकच आहे. मन, बुध्दी, अचेतन मन आणि अहंकार हे वेगवेगळ्या भांड्यांसारखे आहे. म्हणूनच देवत्व एकच आहे.
निर्मळ हृदयात परमेश्वर दृष्टीस पडतो.
सर्व काही परमेश्वर आहे. तसा विचार केला नाहीत, तर ती तुमची केवळ माया आहे. जेव्हा सूर्य वर तळपत असतो तेव्हा सर्व हौदांमध्ये तुम्हाला त्याचे प्रतिबिंब दिसते. जिथे घाण पाणी असते, तिथेही त्याचे प्रतिबिंब दिसते, तथापि, जेव्हा पाणी पूर्णपणे घाण आहे, तिथे त्याचे प्रतिबिंब दिसणार नाही. त्याचप्रमाणे, जेव्हा तुमचे हृदय स्वच्छ आणि निर्मळ असेल तेव्हा तुम्हाला लगेच परमेश्वराचे प्रकटीकरण दिसेल. परंतु तुमचे हृदय अस्वच्छ आहे. जेव्हा तुम्ही तुमचे हृदय व्यवस्थितपणे शुध्द कराल तेव्हा तुम्हाला परमेश्वराचे दर्शन होईल. परमेश्वर कायमच प्रत्येकात आहे. अगदी नवजात शिशुपासून ते थोर आणि वृध्द व्यक्तीपर्यंत, प्रत्येकात त्याचे अस्तित्व आहे. एक लहान मूल, मोठे होत होत म्हातारे होते. लहान बाळ, आणि वृद्ध स्त्री एकच व्यक्ति आहेत. लोक त्यांच्या विचारसरणीनुसार ते भिन्न रूप पाहतात. तथापि भगवंताला निरनिराळी रुपे नाहीत. खरं तर त्याला आकारच नाही. तरीही त्याला अनेक नावे आहेत. जरी त्याला अनेक नावे असली, तरी सर्व एका देवत्वाची अनेक प्रतिबिंबे आहेत. सूर्याचे प्रतिबिंब तुम्हाला वाहत्या पाण्यात दिसेल आणि साचलेल्या पाण्यातही. वाहत्या पाण्यातील प्रतिबिंब डगमगणारे भासते, पण शांत पाण्यात प्रतिबिंब पण स्तब्ध असते. तुमचे मन, मायेमुळे भौतिक आसक्तीत गुरफटत जाते. या जगात सर्वकाही मायेचे प्रक्षेपण आहे. हिरण्यकश्यपुने त्याच्या मुलास, प्रल्हादाला विचारले,”कुठे आहे देव?” तू नेहमी नारायण, नारायण जप करीत असतोस. कोण आहे नारायण? प्रल्हाद उत्तरला,” मानव हाच नारायण आहे. तुम्ही जिथे पहाल तिथे तुम्हाला फक्त नारायण दिसेल. तो माझ्यात आहे, तो तुमच्यात आहे, तो सर्वांमध्ये आहे.” हिरण्यकश्यपुने विचारले, “या खांबात तो आहे का?” प्रल्हाद म्हणाला,”नक्कीच तो खांबातही आहे.” हिरण्यकश्यपुने गदा घेतली आणि खांबावर आघात केला. तत्क्षणी त्याला विष्णु प्रकट झालेले दिसले. म्हणूनच तुम्ही कुठेही नजर टाका, तिथे परमेश्वर आहे. परंतु हिरण्यकश्यपुसारखे लोक परमेश्वर मानत नाहीत.
एकत्व पाहण्याची दृष्टी विकसित करा.
निर्मितीत पूर्णपणे एकत्व असूनही आपण त्याकडे भिन्नतेच्या दृष्टिकोनातून पाहतो. आपण म्हणतो, “ते माझे वडील आहेत, ती माझी आई आहे, ती माझी मोठी बहिण, ती लहान बहिण आहे.” आपण रुपानुसार नाती विकसित करतो. ही नाती कुठून आली? एकतत्त्वाविना कशाचेही अस्तित्व असू शकत नाही. उदाहरणार्थ -एक कुत्रा एका खोलीत जातो तिथे खूप आरसे बसवले असतात आणि तो आरशांमधे खूप कुत्रे पाहतो. त्या खोलीत इतक्या कुत्र्यांना पाहतो आणि आपल्या जीवाला धोका आहे असे समजून तो घाबरतो. तशा परिस्थितीत सुटका करून घेण्यासाठी, तो एका आरशावर उडी मारतो . त्याचे स्वतःचे प्रतिबिंब त्याला दुसरा कुत्रा भासते. तसे केल्याने तो बघतो की आरशातील कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली. या सर्व हालचालीमध्ये आरसा फुटतो . मग त्याला वाटते की आता तिथे दुसरा कुत्रा नाही आणि तो खोलीतून सुटका करून घेतो. इतक्या सर्व कुत्र्यांपासून स्वतःची सुटका झाली असे वाटून त्याला खूप हायसे वाटते. परंतु इतके कुत्रे होतेच कुठे? त्याने स्वतःचेच प्रतिबिंब अनेक आरशांमधे पाहिले होते. आज लोकांची हीच परिस्थिती आहे. जर प्रत्येकाने असा विचार केला की ही इतर रूपे म्हणजे जगाच्या आरशातील माझीच प्रतिबिंबे आहेत, तर त्याला एकतेच्या तत्त्वाचा उलगडा होईल. म्हणून वडील, आई, भाऊ आणि बहिणी अशी भिन्न अस्तित्वेच नाहीत. परंतु मनुष्य मायेमुळे भौतिक नाती निर्माण करतो आणि म्हणतो, “ती माझी बहिण, तो माझा भाऊ, ते माझे वडील, ती माझी आई.” ही सर्व केवळ शारीरिक नाती, या नात्यांना तुमच्या देवत्वाच्या सत्याचा आधार नाही. तोच आत्मा सर्वांमध्ये अस्तित्वात आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु तुम्ही आत्मतत्त्व विसरुन भौतिक नाती विकसित करता.
तुम्ही म्हणता, “ही माझी पत्नी,” परंतु लग्नाच्या पूर्वी ती वेगळी आणि तुम्ही वेगळे होता. फक्त लग्नानंतर तुम्ही म्हणता, “माझी पत्नी, माझी पत्नी.” हे पती-पत्नीचे नाते तुम्ही कसे निर्माण केले? हे केवळ तुमच्या मायेमुळे .या ममत्वामुळे मनुष्य अनेक चुका करतो आणि कित्येक अनिष्ट गोष्टी करतो.
तुम्ही जिथे पहाल तिथे परमेश्वर आहे आणि तो एक आहे. लोक म्हणतात, “तो राम आहे, तो कृष्ण आहे, तो विष्णु आहे, तो शिव आहे.” याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की विष्णु, शिव. राम आणि कृष्ण यांचे वेगळे अस्तित्व आहे? ही सर्व त्या एका परमेश्वराची वेगवेगळी नावे आहेत. तुमच्या स्वतःच्या कल्पनेच्या आधारावर भगवंत तुमच्यासमोर विशिष्ठ रुपात दिसतो. रवि वर्मा या चित्रकाराने काढलेल्या कृष्णाच्या रुपावर तुम्ही चिंतन करता तेव्हा भगवंत कृष्णाच्या रूपाने तुमच्यासमोर प्रकट होतो. त्याचप्रमाणे परमेश्वर रामाच्या रुपात तुम्हाला दर्शन देईल. तथापि, परमेश्वर राम नाही किंवा कृष्ण नाही. राम अणि कृष्ण दोन्ही तुम्हीच आहात. राम आणि कृष्ण यांची साकार रूपे ही केवळ तुमची स्वतःची प्रतिबिंबे आहेत. तुम्ही म्हणता, “मला राम हवा”. तेव्हा तो तुमच्यासमोर राम स्वरूपात प्रकट होतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही म्हणता, “मला कृष्ण हवा”. तेव्हा तो कृष्णरूपात तुमच्या समोर प्रकट होतो. ही सर्व रुपे म्हणजे तुमची स्वतःची प्रतिबिंबे होत.
तुमच्या वासनांची ओझी कमी करा.
जगामध्ये सुख आणि दुःख दोन्ही आहेत. तुम्ही अडचणीत असताना म्हणता, “अरेरे! परमेश्वराने का बर मला ह्या संकटात टाकल? मी अस काय पाप केल?” याच्या विरुध्द, तुम्ही संपत्ती गोळा करून सुखी झाल्यावर म्हणता, “माझे नशीब चांगले आहे”. तुमचे नशीब चांगले अथवा वाईट असे काही नसते. तुमचे विचार वाईट असतील तर परिणाम वाईट. चांगले अथवा वाईट असे काही नसते.
सर्व काही परमेश्वर आहे. विंचू पाहिल्यावर लोक धावतात कारण तो डंख मारु शकतो. परंतु खरं तर त्या विंचवामध्येही परमेश्वर आहे. असे कोणतेच अस्तित्व नाही ज्यात परमेश्वर नाही. तथापि तुम्हाला तुमचे ममत्व सोडायला हवे. लोकांना मर्यादा पलीकडे वासना असतात. या अतोनात वासनाच ममत्वाचे कारण असतात. म्हणूनच मनुष्याने इच्छा कमी कराव्या. हे कसे करता येईल? सर्व इच्छा या मनोनिर्मित असतात, जे अनियंत्रित मार्गाचे अनुसरण करतात. मनः एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः (मन हेच मनुष्याच्या आसक्ती आणि मोक्षाचे कारण आहे)
मोक्षाच्या मार्गावर जाण्याचे तुम्ही प्रयत्न करायला हवेत. मग तिथे ममत्वाला जागा राहणार नाही. परंतु लोकांच्या भरपूर इच्छा असतात आणि मन हेच सर्व इच्छांचे मूल कारण असते. म्हणूनच सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे. हे केलेत तर तुम्हाला एकही इच्छा राहणार नाही. म्हणूनच असे म्हटले आहे की कमी सामान, सुखद प्रवास. तुम्ही तुमच्या इच्छांचे ओझे कमी केलेत की परमेश्वर तुमच्यावर खुश होईल. अती वासना जीवनासाठी मोठे ओझे बनतात. कमी सामानानी तुम्ही अधिक सुखी व्हाल. जेव्हा एखाद्याचे लग्न झाले नसते, तेव्हा तो विचार करतो, “माझ्याजवळ जे काही आहे, त्यात मी माझ्या गरजा भागवू शकतो. अगदी एखादे वेळी मला उपाशी रहावे लागले तरीही ही हरकत नाही.” परंतु जेव्हा एखादा वैवाहिक जीवन जगतो, त्याला मुले बाळे असतात, तेव्हा त्याच्या डोक्यावर चिंतांचे किती ओझे असते. बायको, मुले कुठून आली? तुम्ही आलात, त्याच मार्गाने ते सुद्धा आले. तुम्ही जेव्हा विचार करता, ती तुमची पत्नी आहे, तेव्हा तुमचे तिच्याशी ममत्व विकसित होते. प्रत्येक स्त्रीला तुम्ही पत्नी म्हणू शकता का? नाही, नाही. तसे म्हणालात तर तुम्हाला मार बसेल. तसे तुम्ही बोलू शकत नाही. पती पत्नीचे नाते हे केवळ शारीरिक नाते आहे. शारीरिक नाते हे कित्येक समस्यांचे कारण होय.
ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याला श्रीमंत व्यक्ती म्हटले जाते. तथापि त्याने पैसा गमावला की तो भिकारी म्हटला जातो. श्रीमंत असला की मोठा, गरीब असला की छोटा मानला जातो. म्हणूनच, एकच व्यक्ती मोठी तसेच छोटी असते. समान विचारसरणी विकसित करा, मग सर्वकाही तुमच्यासाठी चांगले होईल. एखाद्याने तुम्हाला मारले तरी, तुम्ही असा विचार करावा, मला मारणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून परमेश्वरच आहे. माझ्यात काही दोष आहे म्हणूनच परमेश्वराने मला मारले. या देहानी काहीतरी चूक केली. त्यामुळे त्याला शिक्षा मिळायलाच हवी.
आपण जे करतो ते आपल्याजवळ पुन्हा प्रतिक्रीया, प्रतिबिंब आणि प्रतिध्वनी रूपात परत येते. आपण जे अनुभवतो ते आपल्याच कर्माचे परिणाम असतात. ते परमेश्वराने दिले नसतात. भगवंत आनंदाशिवाय दुसरे काही देत नाही. आनंदाची अनुभूती घेतल्यावर जे देतो त्याच्यावर टीका करू नका. सुख आणि दुःख दोन्ही तुमच्या स्वतःच्या कृतींची प्रतिबिंबे होत. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो याचा अर्थ परमेश्वर स्वतःवर प्रेम करतो.
परमेश्वराचे गुणविशेष काही नाहीत. परमेश्वराला क्रोध, द्वेष, मत्सर आणि ढोंगीपणा हे दुर्गुण नाहीत. नाही तुम्हाला हे दुर्गुण देवाकडून मिळाले. हे सर्व तुम्हीच स्वतःनी निर्माण केलेत. त्यामुळे तुमच्या भ्रमातून बाहेर या. जर तुम्ही, “माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही.” असा विनाकारण विचार करीत बसाल तर तुम्ही स्वतःला फसवत रहाल. तुमच्या इच्छा कमी करा. मग तुम्हाला अती सामान उचलण्याची आवश्यकता राहणार नाही. तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल.
आत्मतत्त्व ओळखा
जर तुमचे परमेश्वरावर खरोखरीच प्रेम असेल तर नेहमी त्याचे चिंतन करा. तुम्हाला राम आवडत असेल, तर रामाचे चिंतन करा. त्याचप्रमाणे, जर तुम्ही कृष्ण भगवानाची निवड केली असेल, तर त्याचे मनन करा. तथापि, नेहमी लक्षात असू द्या की राम आणि कृष्ण बाह्यरुपात नाहीत. राम तुमच्या हृदयात आहे, कृष्ण तुमच्या हृदयात आहे. रामाचे जे रूप निवडाल, त्या रूपावर डोळे बंद करून चिंतन करा. ते रूप नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर येईल. शेवटी तुमच्या लक्षात येईल, “राम आणि कृष्ण मी माझ्यापासून भिन्न मानले, हा माझा भ्रम होता. खरे तर, मीच राम आहे, मीच कृष्ण आहे.” तुम्ही रामावर चिंतन केलेत की तुमच्या विचारांचे प्रतिबिंब म्हणून तुम्ही ते रूप पाहता. तसेच, तुम्ही कृष्णाचा विचार केलात की तुम्हाला कृष्णरूप दिसते. तुमच्या भ्रमामुळे तुम्हाला राम आणि कृष्ण भिन्न भासतात. रामाला कोणी पाहिले? कृष्णाला कोणी पाहिले? पवित्र ग्रंथांमधील वर्णनाच्या आधारे चित्रकार रवि वर्माने राम आणि कृष्णाची चित्रे काढली. ती फक्त चित्रे आहेत; ती सत्य दर्शवत नाहीत.
सर्वजण परमेश्वरास राम, कृष्ण, गोविंद इ. त्यांच्या आवडीप्रमाणे हाक मारू शकतात आणि त्याच्या विशिष्ठ नाम, रुपावर चिंतन करतात. यात काहीच गैर नाही. मी तुम्हाला यात काही बदल करायला सांगत नाही. तथापि तुमची दृढ श्रद्धा असायला हवी, “मी परमेश्वर आहे, माझा आत्मा परमेश्वर आहे.” आत्म्याला काही आकार नाही. त्याला केवळ नाव आहे. प्रत्येकामधे आत्मा सूर्यासारखा तळपतो. तो फक्त निर्मळ हृदयात दिसू शकतो. अशुध्द हृदयात तो नाही दिसू शकणार. या सत्याचा प्रसार करण्यासाठी अनेक अवतार आले. दैवी अवतार येतात ते काही स्वतःसाठी येत नाहीत तर सत्याचे ज्ञान सर्वांना देण्यासाठी येतात. त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करा आणि आत्मतत्त्व समजून घ्या. वेदान्तात घोषित केले आहे की फक्त आत्मा हेच सत्य आहे.
पाण्यामुळे लाटा निर्माण होतात. पाणी नसेल तर लाटा असू शकत नाहीत. तसेच, आत्म्याविना रूप असू शकत नाही. तुम्ही आत्म्यावार चिंतन करा आणि ‘ॐ नमो नारायण, ॐ नमो नारायण, ॐ नमो नारायण’ असा मंत्र जप करा. जर तुम्हाला पूर्ण मंत्र जप करायला जमत नसेल तर फक्त ‘ॐ’ चा जप करा, कारण ॐ मधे सर्व काही स्थित आहे. ॐ म्हणजे प्रणव (आदिकालापासून असलेला ध्वनी) उपनिषदात त्याला आत्मा असे संबोधले आहे. तैतिरीय उपनिषद हे प्रामुख्याने आत्म तत्त्वाविषयी आहे. रामायण, भागवत आणि महाभारतामधे हेच सत्य अवतारांच्या गोष्टींमार्फत स्पष्ट केले आहे. सर्व काही तुमच्यामध्ये आहे. संपूर्ण सृष्टी एक आहे. तुमचा भ्रम सोडा आणि नावारूपाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा.
नाव आणि रूप अविभाज्य आहेत.तुम्ही ‘साई राम, साई राम, साई राम’ असा जप करता. मला ‘साई राम’ हे नाव दिल आहे. मी काही या नावाने जन्माला आलो नाही. तसेच राम आणि कृष्णाला त्यांच्या पालकांनी ती नावे दिली. ते त्या नावांनी जन्मले नाहीत. रामाने येऊन म्हटले का, “मी राम आहे.” नाही,नाही तो दशरथाचा पुत्र होता त्याचे राम असे नाव ठेवले.
दशरथ शब्दाचा अर्थ काय? याचा अर्थ दहा इंद्रियांनी युक्त असा मानवी देहरूपी रथ. तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. जेव्हा तुमच्या इंद्रियांवर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल तेव्हा इतर कशाची आवश्यकता भासणार नाही. तुम्ही स्वतःला विसरून जाल. तुम्हाला तुमच्या शरीराची विस्मृती होईल. मन हे देह आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवते. शरीर आणि इंद्रिये तात्पुरते आहे. मन सुध्दा विनाश पावते. आपण म्हणतो, “मन, मन, मन”. कुठे आहे मन? मनाचे स्वरुप काय आहे? त्याला काही आकार नाही. मन म्हणजे माया होय. या पातळीवर चौकसबुद्धी दाखवा आणि जाणून घ्या की परमेश्वर एक आहे. हेच एकमेव सत्य आहे. बाकी सर्व माया होय. सिनेमा पाहताना पडद्यावर तुम्ही अनेक दृश्ये पाहता. तुम्ही सीतेचा रामाशी विवाह होताना पाहता. रावण सीतेचे अपहरण करते, राम रावणाशी युध्दास सज्ज होतो, रामाचे अनेक मित्र युध्दात सहभागी होतात इ. तथापि, ही सर्व चित्रे असतात. हे सत्य स्वरूपात घडत नसते. अनेक लोक नाहीत. सर्व एकच आहेत. एकम् सत्– तुम्ही सत्याचे अनुसरण केलेत की त्यातून धर्म (सदाचरण) प्रकट होतो . जेव्हा सत्य आणि धर्म (सदाचरण) एकत्र येतील, तेव्हा शांती प्रकट होईल. जिथे शांती, तिथे आनंद. घन आणि ऋण भार एकत्र आले की वीज निर्माण होते.
शांतीतून प्रेम प्रकट होते. शांतीचा अभाव असेल तर प्रेम असू शकत नाही. आपल्यात प्रेम प्रकट होते तेव्हा आपल्याला सर्व आपलेच वाटतात. सर्व आपलीच रुपे आहेत. सर्व एक आहे. सर्वांशी समान वागा. हे सत्य जाणण्याचा प्रयत्न करा. वारा सुरु झाला की सुकी पाने उडून जातात, पण ओली पाने नव्हे. ती फांद्यांवर राहतात. तुमची मानवता सुक्या पानांसारखी नसावी, जी वाऱ्याबरोबर उडून जाईल. सर्व काही दैवी गूढ आहे.
प्रभू रामाच्या कथा मनोरंजक आहेत,
त्या त्रिलोकातील सर्व लोकांचे जीवन शुध्द करतात,
त्या कोयत्याप्रमाणे भौतिक आसक्तीचे वेल कापून टाकतात .
त्या चांगल्या मित्राप्रमाणे तुमच्या संकटकाळी मदत करतात.
त्या अरण्यात तप करणाऱ्या ऋषीमुनींचा आधार आहेत. (तेलगू काव्य)
दृढ भक्ती विकसित करा
कुत्रा जसा स्वतःच्या प्रतिबिंबाने भ्रमित होतो, तसे तुमच्या मनाचे होऊ देऊ नका. अनेक सगळ्या आरशांमधे दिसणाऱ्या प्रतिबिंबांना तो खूप कुत्रे समजतो. तथापि कुत्रे जास्त नसतात. तुम्ही कुत्र्याला कुत्रा समजता, परंतु परमेश्वर त्याच्यातही आहे. कंपनांशिवाय कुत्रापण जगू शकत नाही. ही कंपने काय असतात? ही जीवनाची कंपने असतात. ह्या जीव तत्त्वामुळे कुत्रा खातो आणि हालचाल करतो. “तो परका आहे, हा श्रीमंत माणूस आहे, तो भिकारी आहे,” अशाप्रकारची भिन्नता करू नका.
सर्व एक आहेत. सर्वांमधे एकता पहा. तेव्हाच तुमची भक्ती खरी दृढ होईल. नाहीतर तुम्हाला खाचखळगे आणि अडथळे येतील. तुमची भक्ती क्षणोक्षणी डळमळीत होत राहील. खूप लोकं स्वतःला भक्त समजतात. जोपर्यंत त्यांची परमेश्वरावर श्रध्दा असते, तोपर्यंत त्यांची भक्ती स्थिर असते. जेव्हा भक्ती डगमगते, त्यांची मने पण डळमळतात. खरी श्रध्दा कोणत्याही परिस्थितीत डळमळीत होत नाही. काहीही झाले तरी, अगदी तुमचे तुकडे झाले तरीही तुमची भक्ती डळमळीत होता कामा नये.
ही खरी दृढ़, न डगमगणारी, अबाधित भक्ती. अशी दृढ़ निःस्वार्थ भक्ती विकसित करा.
हीच येशूची सुध्दा शिकवण आहे. परमेश्वर एक आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्हाला वैयक्तिक अहंकार सोडून द्यायला हवा. सूळ ह्याचेच प्रतिक आहे. तुमची श्रध्दा सोडून देऊ नका. तिला घट्ट पकडून ठेवा. मग तुम्हाला तिची खरी ओळख समजेल. मनुष्य हा मानवता स्थापित करण्यासाठी जन्माला आला आहे, त्याचा विध्वंस करण्यासाठी नव्हे. सत्य,धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ही मानवी मूल्ये अंगिकारा. जेव्हा सत्याला धर्माची जोड मिळते, तेव्हा शांती आणि प्रेम तिथे जन्म घेते. प्रेमाने सर्व एकत्र येतात. रागाच्या भरात तुम्ही तुमच्या मुलाचा जीव घ्याल का? नाही, नाही. तुम्ही त्याला रागवाल, परंतु त्याला इजा होऊ देणार नाही. तसेच, तुमच्या मनात प्रेम असले की तुम्ही सर्वांना स्वतःचे मानाल. सर्व स्त्रियांना स्वतःची माता आणि भगिनी समजा.
सहिष्णुता हे भारताच्या पवित्र भूमीचे खरे सौंदर्य आहे. जेव्हा तुम्ही ज्या स्त्रीशी विवाह करता तेव्हाच तुम्ही तिला तुमची पत्नी म्हणता, नाहीतर, सर्व स्त्रिया ह्या तुमच्या आई,बहिणींसमान असतात. तसेच, सर्व पुरुष हे तुमच्या भावासमान असतात. परमेश्वर एक आहे, केवळ तोच एक पुरुष आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी पुरुष नाही. एकदा गोपिका कृष्णाच्या घरी त्याला भेटायला आल्या. जेव्हा त्या घरात प्रवेश करू लागल्या, तसे शिपाई त्यांना म्हणाला की कोणीही स्त्री या घरात प्रवेश करु शकत नाही. गोपिकांनी त्याला विचारले, “तुम्ही कसे इथे आहात?” तो उत्तरला, “मी पुरुष आहे.” गोपिका म्हणाल्या, “तुम्ही फक्त पुरुषाचे वस्त्र घातले म्हणून स्वतःला पुरुष म्हणू शकत नाही. पंच महाभूते आणि पंच तत्त्व जी तुमच्यामध्ये आहेत तीच आमच्यातही आहेत. केवळ तुम्ही पुरुषांचे वस्त्र परिधान केलेत आणि आम्ही स्त्रियांचे वस्त्र घातले, इतकाच काय तो आपल्यात फरक. तुमच्यात आणि आमच्यात तेच देवत्व अस्तित्वात आहे. खरं तर, फक्त कृष्ण हाच पुरुष आणि इतर सर्व महिला आहेत.
परमेश्वरावर प्रेम करणे हे जीवनाचे मुख्य उदिष्ट.
आज ही समानता आणि एकत्व जगातून नाहीसे झाले आहे. एकत्वाच्या अभावामुळे आपण दिव्यत्व पाहू शकत नाही. त्याचबरोबर तिरस्कारही वाढला आहे. आज प्रेमाच्या अभावामुळे जगावर भेदभाव आणि तंटे यांची पकड आहे. आज मनुष्य स्वतःची मानवताही विसरला आहे. सर्वप्रथम, हे समजून घ्या की तुम्ही मूलतः दिव्य आहात. जेव्हा तुम्ही म्हणता, “मी मानव आहे आणि तो परमेश्वर आहे,” तेव्हा तुम्ही द्वैत मानता. जिथे दोन वेगळे आहेत, तिथे तिसरे पण जागा घेईल, ते म्हणजे मन. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे विनाशाला जाता. पतीला पती म्हणून वागणूक द्यायला हवी,तसेच पत्नीला पत्नी म्हणून. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडायला हवे. कर्तव्य म्हणजे एक विशिष्ट काम. काहीतरी काम करणे हे काही मानवजातीचे कर्तव्य नव्हे. कर्तव्याचा अर्थ निष्काम कर्म. स्वार्थी (SELFISH) व्यक्ती माशापेक्षा (FISH) वाईट. मासा (FISH) स्वार्थी (SELFISH) माणसापेक्षा चांगला. म्हणूनच स्वार्थीपणाला जागा देऊ नका. स्वार्थीपणा सोडल्यावरच तुम्ही स्वतःला ओळखाल. जर इन्द्रियांचे गुलाम झालात तर तुम्ही स्वार्थी रहाल. म्हणून स्वार्थीपणा सोडून द्या. सर्वांना मदत करा. मी रामनवमीच्या दिवशी म्हणालो की परमेश्वर एक आहे. जगात सर्वत्र भिन्नता दिसते. खरं तर मानव हा परमेश्वरच आहे. या सत्याची श्रध्दा विकसित करा. तुमची श्रध्दा तसूभरही डळमळीत होऊ देऊ नका. श्रध्दा ढळली तर तुम्ही परमेश्वराला मुकाल. तुम्हाला काहीही झाले तरी स्वार्थी होऊ नका. अशा रितीने तुम्ही आचरण केलेत की तुम्ही दिव्यत्व अनुभवाल. मग राम, कृष्ण, ईश्वर आणि विष्णु हे निरनिराळे आहेत हा संभ्रम राहणार नाही. राम आणि कृष्ण ही नावं आपण दिली आहेत. खरं तर सर्व नावे आपणच दिली आहेत. सर्वजण परमेश्वरापासून बनले आहेत. परमेश्वर एक आहे, दोन नव्हे. अगदी आजपासूनच सर्व भेदाभेद दूर सारण्याचा प्रयत्न करा. परमेश्वरावर प्रेम केलेत की त्याची पूजा करा आणि त्याचे अनुसरण करा. हाच तुमच्या जीवनाचा खरा उद्देश आणि हेच मुख्य ध्येय आहे.
[२९ एप्रिल २००९ साली साई श्रुती, कोडाईकानल इथे झालेल्या भगवानांच्या दिव्य संदेशातून]