दिव्य मार्गदर्शन

Print Friendly, PDF & Email
दिव्य मार्गदर्शन

बालविकासच्या लहान मुलांच्या वर्गात, इतर धर्माच्या मुलांसाठी, मुलांच्या मनात गोंधळ निर्माण न करता, इतर धर्मांची विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये शिकवावी. वेगवेगळ्या धर्मांचे धार्मिक विधी आणि त्यांच्या प्रथा बाह्यस्वरूपी एक दुसऱ्यापेक्षा संपूर्णंपणे भिन्न भासत असतील, तथापि सर्व धर्मांची प्राथमिक आणि मूलभूत तत्त्वे ही एकच आहेत. या मुलांच्या कोवळ्या मनाला त्यांच्या आणि इतर धर्मातील बाह्यतः दिसणारा फरक सुसंवादाने समजून घेण्याची क्षमता नसते. म्हणूनच आपण इतर धर्मांविषयी अधिक सखोल माहिती देण्याची आवश्यकता नाही. त्यांना फक्त सर्व धर्मांमध्ये समान असलेली प्राथमिक मूलभूत तत्त्वे आणि त्याची विस्तृत वैशिष्ट्ये यांचे ढोबळ वर्णन करावे.

सर्व धर्मांमधे प्रार्थनेचे महत्त्व, पूजेची आवश्यकता, मानवाचे बंधुत्व आणि देवाचे पितृत्व हे तत्त्व, सर्व प्राणिमात्रांप्रती प्रेम जोपासणे ही समान वैशिष्ट्ये आहेत. खरोखरीच, प्रत्येक धर्माने या वैदिक मूल्यांचे यथार्थ समर्थन केले आहे. हे धर्म म्हणजे एकाच उद्दिष्ट किंवा ध्येयाप्रत नेणारे निरनिराळे मार्ग आहेत. मुद्दे स्पष्ट करण्यासाठी दिलेल्या या उपमा आहेत. जसे अलंकारांना वेगवेगळी नावे, रुपे असतील, परंतु ते सर्व बनवले तो धातू एकच आहे, तो म्हणजे, सोने. गायी कदाचित भिन्न रंगाच्या असतील, तथापि त्या सर्वांचे दूध सारखेच असते. त्याचप्रमाणे लोकांनी परिधान केलेल्या कपड्यांची नावे आणि प्रकार वेगळे असतील, परंतु ते सर्व कपडे कापडापासून बनले आहेत, हे सत्य आहे.

कपड्यांचा आकार आणि प्रकार वेगवेगळा असू शकतो, उदा.पैन्ट, शर्ट, बुशकोट, गाऊन अथवा साडी, प्रत्येकजण जसे घालेल ते, परंतु मूळ कापड एकच आहे ज्याच्यापासून सर्व कपडे बनले गेले. त्याचप्रमाणे हिंदूंची पूजा करण्याची पद्धत ही वेदांवर आधारित परंपरांची आहे; मुस्लिम क़ुराणात सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करतात आणि ख्रिश्चन, बायबलमधे लिहिल्याप्रमाणे प्रार्थना करतात. शेवटी, आपण सर्व परमेश्वराच्या कृपेसाठी प्रयत्न करतो, फक्त निरनिराळ्या धर्मात पूजेची पध्दत बाह्य स्वरुपात भिन्न आहे.

मूलभूतपणे, सर्व धर्मांची शिकवण एकच आहे, प्रेम, करुणा (मानवाचे बंधुत्व आणि देवाचे पितृत्व). माणसाने सर्वांना समान वागवावे आणि सर्वांवर सारखेच प्रेम करावे, असे सर्व धर्मात शिकवतात. ते सर्व सहनशीलतेच्या गुणाला महत्त्व देतात. ही शिकवण वेद, बायबल, कुराणमधे समान आहे, झरतृष्टानेही धर्मात शिकवले आहे की प्रार्थना जीवनात अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे आपले मन वाईट सवयींपासून मुक्त होते आणि मन शुध्द होते. आपले सर्व दुर्गुण अग्नीमधे जळून जायला हवेत. आणि तेच खरे यज्ञार्पण होय. चांगले विचार, चांगले उच्चार आणि चांगले आचरण हे खऱ्या धार्मिक जीवनाची मुख्य संहिता आहे, यावर त्याने भर दिला. उपनिषदांप्रमाणेच बुध्दानेसुध्दा म्हटले आहे की, हे जग आणि जीवन दुःखमय आहे. ‘सर्वं दुःखं’ आणि त्यांनी आठ कलमी संहितेद्वारा शांतीचा मार्ग शिकवला.

अशारीतीने जरी दृष्टिकोन, प्रथा, विधी इ. भिन्न असल्या तरी सर्व धर्म तेच मूळ सत्य शिकवतात. केवळ आपला मानसिक दृष्टिकोन भिन्न असल्याने आपण वेगळेपण पाहतो. समानता आणि सर्वधर्म समभाव ही मूलभूत समज मुलांमध्ये रुजवून त्यांच्या हृदयात स्वतःच्या धर्माविषयी गाढ प्रेम निर्माण करून इतर धर्मांविषयी आदर बाळगण्यास शिकवायला हवे.

भिन्नता, तिरस्कार, असहिष्णुता इ. गोष्टींचा मुलांच्या मनात प्रवेश होऊ देऊ नये. आणि ते असलेच तर ते काढून टाकायला हवेत, कारण देवाचे प्रेषित आणि संतमहात्म्यांनी मानवाच्या उन्नतीसाठी आणि त्याला मूल्ये व आध्यात्मिक सत्य शिकवण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला आहे. जरी प्रत्येकाने काळाची गरज, भौगोलिक परिस्थिती, त्या वेळच्या लोकांची स्थिती आणि इतर काही आकस्मिक कारणांवर अवलंबून निरनिराळ्या पैलूंवर भर दिला असेल, तरीही मूलभूत शिकवण समान आहे. जर ही मूलभूत मूल्ये लहान मुलांच्या कोवळया मनांवर बालविकासच्या वयोगटांमध्ये उतरवली, त्यांचे पालनपोषण करून वृध्दींगत केली, तर मुलांची दृष्टी उदार होईल आणि सर्वधर्म समभावावरती त्यांचा दृढ विश्वास बसेल.

अर्थात, सर्वत्र किंवा सर्व बालविकास वर्गांमधे इतर धर्मांची मुले असतील असे नाही. परंतु जिथे जिथे अशी शक्यता असेल, तेथील मुख्य गुरुंनी त्या विशिष्ट धर्माचा अभ्यास करून त्यांना व्यवस्थित शिकवावे.

डिव्हाईन गाईडलाईन्स टु बालविकास (बालविकास गुरु परिषद -१९७९ )- मधून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *