माता द्रौपदी
माता द्रौपदी
सर्वलोकांनी ज्याचा कित्ता गिरवाया, अशाप्रकारचे अत्यंत नीतिमान जीवन, पांडवांनी, आचरणात आणले होते. सनातन धर्मात प्रतिपादन केलेल्या आदर्श तत्त्वप्रणालीला अनुसरून ते वागत असत. पांडव हे सदाचरण, शौर्य आणि पावित्र्य यांचे जणू काही मुर्तस्वरूपच होते! ते सर्वजण भगवान् श्रीकृष्णाचे एकनिष्ठ भक्त होते.जीवनात येणाऱ्या कोणत्याही भल्याबुऱ्या प्रसंगी त्याना भगवान् श्रीकृष्णाकडून यथोचित मार्गदर्शन मिळत असे. असीम सहनशीलता, शांती आणि चिकाटी हे त्या सर्व बंधुमधील चटकन लक्षात येणारे असे गुणविशेष होते. पांडवांची पत्नी द्रौपदी ही अत्यंत सद्गुणी स्त्री होती. या बाबतीत आपल्या पतीपेक्षा कोणत्याही प्रकारे ती किंचितही उणी नव्हती.
महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या अश्वत्थाम्याने, पांडवांच्या सर्व मुलांची (उपपांडवाची) रात्रीच्या वेळी त्यांच्या शिबिरात घुसून, ते निद्रितावस्थेमध्येच असताना अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र होता. गुरु द्रोणाचार्य यांनीच कौरव-पांडवांना धनुर्विद्येचे शिक्षण दिले होते आणि निष्णात धनुर्धर अर्जुन, हा तर त्यांचाच पट्टशिष्य होता.
निद्रितावस्थेत असलेल्या शत्रूची हत्या करणे हे अत्यंत बीभत्स आणि राक्षसी कृत्य अवस्थाम्याने केले होते! आपल्या सर्व मुलांच्या क्रूर हत्येचे वृत्त समजताच सर्व पांडव अत्यंत शोकाकुल झाले. ही अत्यंत भीषण घटन द्रौपदीला कशी कळवावी हेच त्यांना उमगेना! अश्वत्थाम्याला जिवंत पकडावे, त्याला द्रौपदीसमोर प्रथम आणून उभा करावा आणि त्याने केलेल्या या अत्यं दुष्ट कृत्याबद्दल त्याला कोणती शिक्षा द्यावयाची, ते सर्व द्रौपदीनेच ठरवावे, हेच योग्य होईल असे पांडवांना वाटले.
क्रोधाने अनावर झालेल्या आणि सूडभावनेने पेटलेल्या भीमाने, अश्वत्थाम्याला, द्रोपदीपुढे आणून हजर केले, आणि मोठ्याने गर्जना करुन म्हणाला, “ हे, द्रौपदी, तुझ्या सर्व मुलांची अत्यंत निर्दयपणे कत्तल करणाऱ्या अश्वत्थाम्याला येथे आणले आहे! या दुष्ट कृत्याबद्दल, जी शिक्षा तुला योग्य वाटेल त्याला ठोठाव!”
हे सर्व होईपर्यंत, द्रौपदीला आपल्या सर्व मुलांच्या भीषण हत्येची बातमी समजली होतीच. अत्यंत शोकाकुल होऊन, ती विलाप करत होती! तिचे अतीव दुःख पाहून आणि आक्रोश ऐकून, तेथे असणाऱ्या सर्वांचीच अंत:करणे अगदी कळवळून गेली. शोकमग्न अवस्थेत असलेल्या, तिचे सांत्वन करायला पण धजावेना!
जेव्हा अबत्थाम्याला पकडून द्रौपदीच्या समोर आणण्यात आले, तेव्हा विलक्षण संयमाने तिने स्वतःला सावरले! अश्वत्थाम्याकडे क्षणभर कारुण्यपूर्ण नजरेने बघून, अत्यंत दुःखित मनाने त्याचेशी बोलू लागली तेव्हा खुनी अश्वत्थाम्याचे अत्यंत कठोर हृदय सुद्धा हेलावले! हळू स्वरात आणि मोठ्या कष्टाने त्याला म्हणाली, “माझ्या मुलांनी तुझा असा काय अपराध केला होता की, ज्यामुळे, ती गाढ निद्रेत असताना तू त्यांची कत्तल केलीस! तू तर गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आणि त्यामुळे माझ्या मुलांना तू गुरुसारखाच! माझ्या या निष्पाप आणि कोवळ्या मुलांना अत्यंत क्रूरपणे मारण्याचे दुष्ट कृत्य तू कशासाठी केलेस? माझ्या मुलांनी तुझी कोणत्याही प्रकारे आगळीक केली नसताना असे दुष्ट कृत्य करणे तुला शोभले का?”
द्रौपदी, अश्वत्थाम्याशी ज्या गंभीर स्वरात बोलत होती ते ऐकून भीम आणि अर्जुन यांची अस्वस्थता वाढू लागली होती! द्रौपदीचे बोलणे ऐकून भीमाला तर नवलच वाटले. सर्व मुलांच्या हत्येमुळे, द्रौपदीला वेडतर लागले नाहीना असेही भीमाला क्षणभर वाटले! ज्या मातेची सर्व मुले मारली गेली आहेत, त्या मुलांचा जो खुनी आहे, अशा इसमाशी, समोरासमोर बोलताना द्रौपदीच्या अंत:करणातील मातृत्व इतक्या संयमाने कसे बोलू शकले, हेच त्यांना समजेना ! शोकातिरेक आणि क्रोध यांमुळे पांडवांना तर वाटत होते की, अश्वत्थाम्याचा तेथेच वध करावा यापासून द्रौपदीनेच पांडवांना परावृत्त केलेला अबत्थाम्याच्या दिशेने चाल करण्यापासून थोपविले. त्यानंतर अत्यंत सद्गदित स्वरात ती जे शब्द बोलली, त्याबद्दल तेथे हजर असणाऱ्यांना खूप आश्चर्य तर वाटलेच पण अषत्याम्यासारखा शत्रू (जो देहाने जिवंत होता ) पण मनाने मृत झाल्यासारखाच झाला! द्रौपदीच्या हृदयातील ‘मातृत्व’ जागृत झाले होते. आणि अश्वत्थाम्याला कोणती शिक्षा योग्य ठरेल, त्या निर्णयाबद्दल त्याने मार्गदर्शन केले होते! द्रौपदीने विवेकाने निर्णय घेतला. पुत्रवियोगाचे दुःख किती तीव्र असते, याची तिला जाणीव असल्याने, अश्वत्थाम्याच्या मातेला होणाऱ्या दुःखाची कल्पनाच तिला सहन होईना! विद्ध अंत:करणाने आणि कष्टाने ती भीमाला म्हणाली, “हे भीमा, कृपा करून अश्वत्थाम्याचा वध करु नकोस! गुरु द्रोणाचार्यांच्या मृत्यूमुळे अश्वत्थाम्याची माता, ‘कृपी’ ही आधीच अत्यंत शोकाकुल अवस्थेत आहे. अश्वत्थाम्याला मारले तर त्याची शिक्षा त्याच्या निरपराध मातेला भोगावयास लागणार आहे! माझ्या निष्पाप मुलांच्या हत्येमुळे जसे माझे हृदय आक्रंदन करत आहे, तसेच त्या बिचारीचे होईल! ज्यायोगे त्या निरपराधी मातेचे दु:ख वाढेल असे कोणतेही कृत्य आपण करू नये, या भूतलावर रानावनात त्याला एकट्यालाच मोकळे सोडून द्या आणि त्याने केलेल्या दुष्ट कृत्याचे प्रायश्चित्त त्याचे त्यालाच भोगू द्या!”
त्यानंतर ती भीमाला म्हणाली, ‘जो गुरुपुत्र आहे, जो भयग्रस्त आहे, जो आश्रयासाठी आलेला आहे, जो गाढ निद्रेत आहे, जो मद्याच्या धुंदीमुळे भानावर नाही अशांचा वध करणे प्रशस्त नव्हे!’
धर्मसंरक्षण आणि सदाचार यांच्या परिपालनासाठी ही महान् साध्वी द्रौपदी, आपल्या पतींच्या विचारप्रणालीला वेळप्रसंगी मोठ्या धैर्याने विरोध करुन. त्यांची समजूत काढत असे. आपल्या वागण्यामुळे निरपराधी लोकाना दुःख होऊ नये अशीच तिची या प्रसंगी धारणा होती. यामुळेच जरी अश्वत्थाम्याने सैतानी वृत्तीने निर्घृणपणे उपपांडवांची हत्या केली होती, तरी तिच्यातील ‘मातृत्वाने’ अश्वत्थाम्याला क्षमा केली!
Narration: Ms. Sai Sruthi S.V.
[Sri Sathya Sai Balvikas Alumna]