. हवा – २
हवा- २
“मुलांनो! आपण खेळाने सुरवात करू या. तुम्ही तुमचे नाक आणि तोंड हाताने बंद करायचे आहे. कोण जास्त वेळ बसू शकतो?” (मुलांचे भाव निरीक्षण करा) “कोणत्या घटकामुळे आपण क्षणभरही बसू शकलो नाही? कोण सांगेल? होय. ही आहे हवा. तहान लागली, परंतु पाणी नसेल तरी आपण काही दिवस जगू शकतो. आपल्याला भूक लागली, पण खायला काही नसले तरी आपण काही दिवस जगू शकतो. परंतु हवेशिवाय जीवनाची कल्पनाही करता येणार नाही.”
- “कोणी निर्माण केली हवा? कोणी शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर? नाही. साक्षात् परमेश्वरने आपल्यावरील प्रेमामुळे हवा निर्माण केली.”
- हवा वापरण्यासाठी आपण काही कर देतो का? आपण वीज, पाणी वापराचे पैसे भरतो. परंतु हवेसाठी नाही. ती विनामूल्य आहे – देवाची देणगी. म्हणूनच आपल्यावर केलेल्या या कृपेसाठी, आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत.
प्रार्थना:
चला, आपण वायू देवाची प्रार्थना करू या:
“नमस्ते वायो, त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि
त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि
ऋतं वदिष्यामि, सत्यं वदिष्यामि
ओम शांतिः शांतिः शांतिः (वैदिक प्रार्थना)”
“हे वायुदेवा! तू सर्वोच्च सत्य आहेस,
आम्ही तुझ्या दिव्यत्वाला नतमस्तक आहोत.
आम्हाला सामर्थ्य, बुद्धी आणि
संतुलित श्वासासाठी आशिर्वाद दे.”
गोष्ट:
हनुमान कसा शक्तिवान झाला माहित आहे? आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी हनुमानाचे पिता कोण हे सांगू शकाल का? होय. वायुदेव.
तो प्रसंग वर्णन करा, जन्मानंतर हनुमान भूक लागल्यामुळे कसा उंच झेप घेऊन सूर्याला खाण्यासाठी जातो. त्याला वाटते, ते पिकलेले फळच आहे. तो सूर्याला गिळतो. याचा परिणाम असा होतो की सर्व सृष्टीत अंधार होतो. देवता त्याला सूर्याला तोंडातून बाहेर काढण्याची विनंती करतात. लहान हनुमानाला काही ते पटत नाही. इंद्राला राग येतो आणि तो त्या लहान बाळावर वज्र फेकतो. त्यामुळे त्याच्या पाठीच्या कण्याचे तुकडे होतात. हे कळल्यावर वायुदेवाला खूप राग येतो आणि तो सृष्टीतून अलग होऊन वाहण्याचे थांबवतो. मग काय होतं? सर्व प्राणी जळू लागतात, तापमान वाढते. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आणि सर्व देव वायुदेवाकडे धाव घेतात आणि सृष्टीच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात. वायुदेव सर्वांना त्यांची शक्ती त्याच्या मुलाला देऊन शक्तिवान बनवण्यास सांगतात. सर्व दैवी शक्तींच्या आशिर्वादांमुळे छोट्या बाळाला खूप शक्ती, बुद्धी आणि अंतःप्रेरणा प्राप्त होते. तेव्हांपासून त्याचे नाव हनुमान असे झाले.
प्रश्न:
- वायुदेवांनी हवा थांबवल्यावर काय झाले?
- हवा नसेल तर काय होईल?
- मासे, पाण्यातील प्राणी हवेशिवाय जगू शकतात? (नाही. ते पण पाण्यातून हवा घेतात.)
- झाडे हवेशिवाय जगू शकतात? (नाही. ते पण पानातून हवा घेतात.)
वर्तुळाचा खेळ:
सहा वर्तुळे बनवा, पृथ्वी, जल, अग्नी, जंगल, पक्षी आणि पोकळी. ६ मुले सर्व वर्तुळांच्या भोवती फिरतील. संगीत चालू असेल. संगीत थांबल्यावर मुलांनी प्रत्येकी एका वर्तुळात उभे रहायचे आहे. ज्या वर्तुळात ते असतील, त्याप्रमाणे त्यांनी कृती करायची आहे.
पृथ्वी- नाचणारा माणूस;
जल- पोहोणारा मासा.
पक्षी- उडणारा पक्षी
जंगल- हेलकावे घेणारे झाड
अग्नी- ज्वाला
पोकळी- मृत शरीर
पोकळीत उभा असलेला मुलगा खेळातून बाद होईल. आता हवेचे गुणधर्म दाखवण्यासाठी काही प्रश्न विचारा.
- हवा दिसते का?
नाही, तिला रूप नाही. - हवेला चव आहे का?
नाही, तिला चव नाही. - हवेला गंध आहे का?
नाही, ती एखाद्या वस्तू किंवा वायूचा गंध तिच्या बरोबर घेऊन जाते. - हवेचा आवाज येतो का?
नाही, तिच्या वेगानुसार ती आवाज निर्माण करते. - हवेला स्पर्श करू शकता का?
होय, आपल्याला हवेचा सुखद स्पर्श जाणवतो.
सकाळी आणि संध्याकाळी थंडगार वाऱ्यात फिरताना तुम्हाला कसे वाटते? आपल्याला ताजेतवाने, उत्साही आणि आनंदी वाटते. अशाप्रकारे ध्वनी आणि स्पर्श हे हवेचे गुणधर्म आहेत.
गोष्ट:
डॉली नावाची एक लहानशी चिमणी होती. तिच्या पंखात खूप ताकद होती. तिने एकदा निरनिराळ्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद घेत जगाची सफर करायचे ठरवले. सकाळी लवकर उठून ती निघाली. सगळीकडे स्वच्छ हवा होती. ती गाणी गात, झाडे, फुले, फळे बघत आनंदात मजेत उडत होती. मधेच एका ठिकाणी ती झाडावर थांबली, फळे खाल्ली, नदीचे पाणी प्यायली, थोडा आराम केला आणि पुन्हा प्रवासाला निघाली. तिने खूप मैल अंतर कापले होते.
अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अशक्त वाटल्याने ती जमिनीकडे येऊ लागली. तिचे डोळे चुरचुरायला लागले. कालव्याचे पाणी अतिशय घाण होते. नाईलाजाने तिने त्या घाण पाण्यानेच डोळे धुतले. थोडा आराम करण्यासाठी ती इकडे तिकडे झाड शोधू लागली. खूप वेळ शोधल्यावर तिला एक छोटेसे झाड दिसले. तिला थोडासा आराम करायचा होता. काही वेळानी ती विचार करू लागली, की असे का बरे झाले? मी कुठे आहे? तिथे फक्त उंच इमारती होत्या, झाडे नव्हती. मग तिला एक कारखाना दिसला. त्यातून खूप धूर निघून हवेत पसरत होता. रस्त्यावर शेकडो गाड्या धूर सोडीत धावत होत्या. ती घाबरून गेली.
परमेश्वराने दिलेली हवेची देणगी माणसाने त्याच्या राक्षसी वृत्तीने कशी दूषित केली, याचे डॉलीला खूप वाईट वाटले. तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. जड अंतःकरणाने ती तिच्या गावात परत गेली. तिने सर्व मित्र मैत्रिणींना बोलवले. त्या सर्वांनी झाडांचे महत्त्व, वायूचे प्रदूषण, शुद्ध हवेची शरीराला आणि मनाला असलेली गरज यावर चर्चा केली. त्यांनी निरनिराळ्या झाडांच्या बिया गोळा केल्या.
त्यानंतर ते सर्व पक्षी शहराकडे उडत निघाले. त्यांनी त्या बिया शहरात सर्वत्र टाकल्या. त्यांनी कर्तव्य केले, याचा त्यांना आनंद झाला. एक वर्षानंतर डॉली पुन्हा त्या शहरात आली. तिथे खूप झाडे वाऱ्याने डोलत होती. आता तिचे डोळे चुरचुरले नाहीत, तिचा श्वास गुदमरला नाही. ती आनंदाने नाचू, गाऊ लागली –
“स्वच्छ हवा, शुद्ध हवा, निकोप हवा, दैवी शक्ती.”
प्रश्न मंजुषा:
मुलांना काय समजले आहे हे जाणून घ्यायला आपण काही प्रश्न विचारू शकतो.
- प्रश्न – हवा दूषित झाल्यावर काय होते? (तापमान वाढते)
- प्रश्न – हवा दूषित होण्याचे कारण काय? (कारखाने आणि वाहनांचा धूर, जंगलतोड)
- प्रश्न – हवेचे प्रदूषण कसे नियंत्रित करावे? (रोपांची लागवड, धुराचे हवेत जाण्यावर नियंत्रण)
- प्रश्न – शुद्ध हवेचे महत्त्व काय? (आपल्याला शक्ती देते, ताजेतवाने करते)
कल्पनाचित्र:
“चला आता बाहेर फिरायला जायला तयार व्हा. कुठे जाऊया बर? आपण बागेत जाऊ या. तिथे खूप हिरवळ आहे . चहुकडे सुंदर फुले आहेत, त्यांचा सुगंध दरवळत असतो. स्वच्छ थंडगार हवा शरीराला स्पर्श करून जाते आणि मन प्रसन्न होते. चला तर, जाऊ या. डोळे बंद करा. ताठ बसा. ही रम्य सकाळ आहे अशी कल्पना करा.
तीन ॐ म्हणा. (थोडा वेळ शांतता. त्यानंतर गुरु हलकेच बोलतील)
“मुलांनो, सावकाश उभे रहा. एक रंग बनवा. वर सूर्याकडे पहा. उगवता सूर्य किती सुंदर दिसतो आहे! हवा कशी थंडगार आहे! शरीराला स्पर्श करून जाते आहे. किती शांती आहे! थोडे थांबा. बस येते आहे. तिला जाऊ द्या. अरेरे! किती धूर. नाक बंद करा. हा धूर शरीराला घातक असतो. ठीक आहे, आता रस्ता ओलांडा.
पहा किती सुंदर बाग आहे! एका रांगेत बागेत प्रवेश करा. किती स्वच्छ हवा! आत जाऊन बागेत धावा. (थोडा वेळ थांबा) आता तुम्हाला गरम वाटतंय, घाम आला आहे. थोडा वेळ त्या झाडाखाली आराम करा. आता कसे वाटते? आता पुन्हा तुम्ही वाऱ्याच्या गार झुळुकेचा आनंद घेत आहांत. वारा तुमचा घाम शोषून घेत आहे. झाडे पहा. वाऱ्याच्या गतीबरोबर कशी झोके घेत आहेत. अहाहा! किती गोड सुगंध! हवा तिच्या बरोबर फुलांचा सुगंध आपल्याकडे आणते आहे.
आता परत जाण्याची वेळ झाली. झाडांचे, फुलांचे, सूर्याचे आभार माना. हवेचे विशेष आभार माना. सावकाश चला. आता आपण आपल्या वर्गाजवळ आलो. बूट काढून सावकाश आत चला. तुमच्या जागेवर बसा. (थोडा वेळ शांतता)
आता सर्वजण म्हणूया, ‘ॐ शांतिः शांतिः शांतिः’