पाणी – १
पाणी – १
ओळख:
पाणी म्हणजे जणू परमेश्वराच्या निर्मितीतील अमृत. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. ते माणूस, प्राणी आणि वनस्पती या सर्वांच्या जीवनासाठी आवश्यक आहे. भारतात, आपण सर्व नद्यांना माता म्हणतो – जसे गंगा माता, गोदावरी माता, कावेरी माता इ. आपण त्यांची देवता म्हणून पूजा करतो. गंगा मातेची रोज आरती केली जाते. अशाप्रकारे,या नद्या आपल्याला जीवनरक्षक पाणी मिळवून देतात; म्हणून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. माणूस त्याच्या स्वार्थामुळे, या नद्या शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्याची काळजी घेत नाही. आपण सर्व घाण नद्यांमधे फेकतो. नद्यांजवळ असलेले कारखाने, त्यांचा दूषित कचरा नद्यांमधे सोडतात. त्यामुळे ते पाणी मानवाच्या वापरासाठी अयोग्य होते. तसेच, निसर्गाचे संतुलन बिघडते. आपणही आपल्या दैनंदिन कामासाठी पाण्याचा वापर गरजेपेक्षा जास्त करतो. निसर्गसुद्धा आपल्याला कुठे पूर, तर कुठे दुष्काळरूपात शिक्षा देतो.
गुणधर्म:
पाण्याचे चार गुणधर्म आहेत. ध्वनी, स्पर्श, रूप आणि चव. सतत वाहणे हा सुद्धा त्याचा एक गुणधर्म आहे. रिकामे न बसता सतत काम करत राहणे, इतरांना मदत करून निसर्गाचा समतोल राखणे हे आपण पाण्यापासून शिकायला हवे. पाणी नेहमी वरच्या पातळीवरून खाली वाहते. जितक्या उंचीवरून ते पडेल, तितकी त्याची शक्ती जास्त असते. वीज निर्मितीत पाणी मदत करते. खालच्या पातळीवर वाहताना ते संकोचत नाही. तसेच आपण अहंकार न बाळगता गरीब लोकांवर प्रेम व्यक्त करायला हवे. पाणी प्यायल्यावर, तसेच आंघोळ केल्यावर आपल्याला अंतर्बाह्य थंडावा मिळतो. वाहते पाणी घाण घेऊन जाते आणि परिसर साफ आणि स्वच्छ करते.
गोष्ट:
एक तापट स्त्री होती. क्षुल्लक गोष्टींनीपण ती चिडत असे. शांत झाल्यावर तिला पश्चात्ताप होत असे, परंतु ती क्रोध आवरू शकत नसे.
एकदा एक साधू तिच्या घरी आले. ती महिला म्हणाली, “महाराज, मी खूप दुःखी आहे. मला खूप लवकर राग येतो. माझी ही सवय कशी जाईल? मला काही उपाय सांगा.”
साधू महाराज म्हणाले, “काळजी करू नकोस. माझ्याकडे क्रोधावर खूप चांगले औषध आहे. मी उद्या ते घेऊन येईन.” दुसऱ्या दिवशी साधू महाराज बाटलीत औषध घेऊन तिच्या घरी आले. तिला देऊन ते म्हणाले, “मी सात दिवसांनी येईन.” महिलेने औषध घेण्यास सुरुवात केली. राग आला की ती बाटलीतून घोट घोट घेत असे.
शब्द दिल्याप्रमाणे, सात दिवसांनी साधू महाराज परिणाम बघायला आले. महिला त्यांच्या पायाशी लोळण घेत म्हणाली, “महाराज, तुम्ही मला वाचवलंत. तुम्ही असे औषध दिलेत की माझा राग दूर पळून गेला. कृपा करून ते काय औषध होते ते सांगा.”
साधू महाराज म्हणाले, “मुली, त्या बाटलीत दुसरे काही नसून फक्त पाणी होते. पाणी मनाला आणि हृदयाला थंडावा देते. त्यामुळे तुझा क्रोध दूर झाला.”
सुविचार-:
जसे पाणी तहान शमवते आणि पृथ्वी अन्याय सहन करते, तसेच मी सदाचरणी आणि सहनशील व्हावे.
स्तब्ध बैठक
मुलांना नदीकाठी घेऊन जा. त्यांना शांत बसून विशाल पाण्याकडे बघण्यास सांगा. असा विचार करा:
- वाहणारे पाणी किती स्वच्छ आहे.
- वाहणारे पाणी किती सुंदर आहे.
- शुद्ध, स्वच्छ आणि थंड पाण्याची चव.
- ह्या पाण्याने आजूबाजूला उगवलेल्या हिरवळीचा आणि थंड पाण्यावरून वाहणाऱ्या गार हवेचा आनंद.
- माझे मन शांती आणि प्रेमाने भरून गेले आहे, ते सर्वांवर भरभरून प्रेम वाटत आहे. ते माझे, तुझे, उच्च, नीच असा विचारही करत नाही.
उपक्रम:
खालील प्रश्नांवर मुलांनी एकत्रपणे चर्चा करा आणि त्यांची उत्तरे द्या:
- <liकोणते फळ आहे ज्याच्या इंग्रजी नावात (water) शब्द आहे?
- पाण्याची तीन निरनिराळ्या भाषेतील नावे शोधून काढा.
- पाणी तीन अवस्थांमध्ये असते. बर्फ …… या अवस्थेत आणि वाफ …… या अवस्थेत.
- पाणी न पिता उंट खूप अंतर कसे चालतात?
- शरीरातून जास्त प्रमाणात पाणी निघून गेले तर त्याचा परिणाम ……