एकलव्य
एकलव्य
गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात शस्त्रविद्येत प्राविण्य मिळवण्यासाठी धृतराष्ट्राचे पुत्र, पंडूचे पुत्र व इतर काही राजपुत्र शिक्षण घेत होते. द्रोणाचार्य यांचा त्या क्षेत्रातील नावलौकिक ऐकून अनेक जणांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र हाताळण्याची कला शिकण्याची इच्छा होती. त्या दरम्याने एक व्यथित करणारी गोष्ट घडली. हिरण्यधनु नावाच्या आदिवासी जमातीच्या राजाचा पुत्र एकलव्य, ह्याला द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकण्याची इच्छा होती.
तो त्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी गुरूंकडे गेला व त्यांना म्हणाला, “आदरणीय गुरुदेव! मला तुमची सेवा करायची आहे आणि तुमच्याकडे शस्त्रविद्या शिकायची आहे. कृपया मला उपकृत करा.”
गुरु त्वरित म्हणाले, “पुत्रा, ह्या राजपुत्रांबरोबर येथे मी तुला शिक्षण देऊ शकत नाही.”
अशा तऱ्हेने एकलव्यासाठी ज्ञानाचे दरवाजे बंद झाले.
त्याला खूप दुःख झाले. त्याला त्यांची असभ्यता आवडली नाही. परंतु तरीही त्यांच्याकडूनच ज्ञान अर्जित करण्याच्या निर्णयावर तो ठाम होता. त्यासाठी तो जंगलात गेला. तेथे त्याने गुरु द्रोणाचार्यांचा मातीचा एक पुतळा बनवला. त्याने गुरूंच्या पुतळ्यास नमन केले आणि तेच आपले गुरु मानून धनुर्विद्या शिकण्यास आरंभ केला. त्याची भक्ती महान होती आणि अशा तऱ्हेने शिक्षण घेत तो निष्णात धनुर्धर बनला.
एक दिवस गुरूंची अनुमती घेऊन; पांडव, कौरव शिकारीसाठी गेले. योजनेत बदल करून ते एकलव्य राहात असलेल्या जंगलात आले. राजपुत्रांबरोबर एक कुत्राही होता.
परंतु तो त्यांच्यापासून विलग होऊन इतस्ततः भटकत होता. अचानक कृष्णवर्णीय एकलव्यास पाहून तो भुंकू लागला. म्हणून त्या आदिवासी राजपुत्राने सात बाणांनी त्या कुत्र्याचे तोंड शिवून टाकले. तो कुत्रा धावतच पांडवांकडे गेला.
“असा कोण आहे ज्याने बाणांच्या सहाय्याने अत्यंत कौशल्याने कुत्र्याचे तोंड शिवले?” असे त्यांच्या मनात आले. तो खात्रीने एक निष्णात धनुर्धर असणार.” अशा तऱ्हेने त्यांनी एकलव्याची प्रशंसा केली. परंतु प्रशंसे पाठोपाठ द्वेष आणि मत्सर आला. ते आता धनुर्धरास शोधू लागले. थोडेसे पुढे गेल्यावर, एकलव्य धनुर्विद्येचा.
सराव करताना आढलला. तू कोण आहेस? असे त्यांनी त्याला विचारले.
तो म्हणाला, “मी हिरण्यधनुचा पुत्र व गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य एकलव्य आहे.”
ते आश्चर्यचकित होऊन गुरूंकडे गेले आणि एकलव्य जे म्हणाला ते सर्व त्यांना कथन केले.
गुरु सुद्धा हे ऐकून अचंबित झाले आणि म्हणाले, “परंतु एकलव्य माझा शिष्य नाही. मी त्याला येथे प्रवेश दिला नाही. “गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनास, ते त्याला सर्वश्रेष्ठ
धनुर्धर बनवतील असे वचन दिले होते आणि येथे एकलव्याने अर्जूनाहून अधिक ज्ञान संपादन केले होते.
“गुरुजी, माझ्याबरोबर इकडे या आणि कृपया खात्री करून घ्या.”
गुरूंची भेट झाल्यावर, एकलाव्याने त्यांना नमन केले, वा त्यांना आज्ञा देण्यास सांगितले. द्रोणांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजवा अंगठा मागितला. क्षणभर ही मागे पुढे न पाहता एकलव्याने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून त्यांना अर्पण केला. आता इथून पुढे कधीही तो धनुष्य बाण हाती घेऊ शकणार नव्हता. एकलव्याची त्याच्या गुरूंवर केवढी भक्ती होती ते त्याच्या निःस्वार्थ त्यागावरून दिसून येते.