एकनाथ

Print Friendly, PDF & Email
एकनाथ

महाराष्ट्रातील पैठण या गावी एकनाथांचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे वडील मृत्यू पावले. तसेच त्यांच्या लहानपणीच त्यांची आई देवाघरी गेली. त्यांचे आजी आजोबा अत्यंत धार्मिक आणि पापभीरु होते. त्यांनी एकनाथांना अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले. बालवयात त्यांनी रामायण, भागवत तसेच पुराणातील कथा पूर्ण एकाग्रचित्ताने ऐकल्या होत्या. त्यामुळे कित्येकदा ते अत्यंत सूक्ष्म, निर्णायक प्रश्न विचारत असत.

मोठे झाल्यावर त्यांना गुरुंची आवश्यकता भासू लागली. एका रात्री एकचित्त होऊन प्रभूची स्तुती ऐकत असता, अंतर्यामी एक आवाज सांगत होता, की देवगढला जनार्दन पंतांकडे दीक्षा घेण्यास जावे. त्याप्रमाणे त्यांनी देवगढचा प्रवास केला. तिथे त्यांनी मनोभावे गुरुंची सेवा केली. गुरुंनी त्यांना त्यांच्या कचेरीत लेखनिकाचे काम दिले, जे एकनाथांनी दक्षतेने सांभाळले.

एक दिवस त्यांना हिशोबात एक लहानशी चूक आढळली. काही पैसे हिशोबात कमी दिसत होते. हिशोब पडताळून पहाण्यास ते बसले. सात तास एकाग्र होऊन शोधल्यावर त्यांना चूक सापडली. त्यांना इतका आनंद झाला की ते अत्यानंदाने घरभर नाचू, गाऊ लागले. गुरु जागे झाले. त्यांनी एकनाथांना परमानंदाच्या अवस्थेत पाहिले. त्यांनी एकनाथांना अत्यानंदाचे कारण विचारले. कारण कळल्यावर त्यांच्या लक्षात आले की आता एकनाथ दीक्षा देण्यास पात्र आहेत. मग गुरुजींनी त्यांना सांगितले की, “जर भौतिक हिशोबावर लक्ष केंद्रित केल्यावर तुला काही पैसे मिळवून देतात, तर मग त्या एकाग्रतेचा थोडाच भाग जर परमेश्वरावर केंद्रित केलास तर तुझे जीवन उजळून निघेल. म्हणून भौतिक जग, जे अशाश्वत आहे, त्याच्याकडून तू परमेश्वर जो शाश्वत आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित कर.” एकनाथांना गुरुंनी आध्यात्मिकतेची दिक्षा दिली.

दीक्षाप्राप्तीनंतर त्यांनी मार्कंडेय ऋषींच्या तपोवनाजवळ तपोसाधना केली. त्यांनी श्रीकृष्णावर ध्यानधारणा केली. त्यांना प्रभूने दर्शन दिले. त्या काळात, एक साप त्यांच्या देहावरून सरपटत राहिला परंतु तो एकनाथांना चावू शकला नाही. एकनाथांच्या संपर्कात येऊन सर्प दंशशक्ती हरवून बसला.

ध्यानसाधना पूर्ण झाल्यावर, गुरुंच्या परवानगीने एकनाथ वृन्दावन, प्रयाग, बद्री तसेच इतर ठिकाणी तीर्थयात्रेस गेले. त्यांनी गंगा, यमुना, गोदावरी या पवित्र नद्यांमध्ये स्नान केले. १३ वर्षांच्या दीर्घकालाने तीर्थक्षेत्रांहून परतल्यावर गुरु आज्ञेनुसार त्याने गिरिजा नावाच्या मुलीशी विवाह केला. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात तिने त्यांची साथ दिली.

एकनाथांच्या जीवनात अनेक घटना घडल्या, ज्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्या. एक युवा म्हणून एकनाथ अत्यंत मवाळ व सोशिक वृत्तीचे होते. कशानेही ते क्रोधित होऊ शकत नसत. एका माणसास एकनाथांचा तिरस्कार वाटत असे. त्यांना राग यावा म्हणून तो १०८ वेळा त्यांच्या अंगावर थुंकला, परंतु एकनाथांनी त्यांचा संयम ढळू न देता प्रत्येकवेळी गोदावरीस्नान केले. शेवटी, त्यांचा तिरस्कार करणाऱ्या माणसाने त्यांच्या पायाशी लोळण घालून, पश्चात्तापाने क्षमायाचना केली.

आपला महत्त्वाचा शत्रू , क्रोध, याच्यावर एकनाथांनी पूर्णपणे विजय मिळवला होता. एक दुष्ट माणूस बराच वेळ एकनाथांना अपशब्द बोलून त्यांची निंदा करीत होता. परंतु ते त्याला एक शब्दही बोलले नाहीत. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो माणूस बोलून बोलून थकल्यावर एकनाथ म्हणाले, “महाशय, मला वाटते, एवढ्या मोठ्या प्रवचनानंतर तुम्ही दमला असाल. माझ्या पत्नीने भोजन बनवले आहे. कृपया माझ्या सोबत भोजनाचा आस्वाद घ्या.” त्या गृहस्थाचा संत एकनाथांच्या मनाच्या समतोलपणावर विश्वासच बसेना. गिरिजा जेवण वाढायला आल्यावर त्या व्यक्तीने एकनाथांच्या क्रोधाचा उद्वेग करण्याचा शेवटचा प्रयत्न केला. तो गिरिजाच्या पाठीवर उडी मारून बसला. तथापि त्या धार्मिक स्त्रीने केवळ मंदस्मित केले. एकनाथ म्हणाले, “सरळ अभी राहू नकोस बरं ! सरळ झालीस तर बाळ पडेल ना!” ती म्हणाली, “हो, हो! मला ठाऊक आहे! आपला मुलगा लहान असतानाअसाच खेळ खेळत असे.” त्या माणसाला काय वाटले असेल आणि स्वतःच्या मूर्खपणाला किती दोष दिला असेल याची तुम्ही कल्पना करु शकता. त्याने संतांच्या आणि संतपत्नीच्या चरणांवर अक्षरशः लोळण घातली.

एकनाथांनी साध्या, सोप्या मराठीत लोकांना शिकवण दिली. विद्वान पंडितांच्या प्रवचनांना लोक उपस्थित न राहिल्याने ते नाराज होऊ लागले. एकनाथांची लोकप्रियता सहन न होऊन, त्यांनी एकनाथांची निर्भर्त्सना केली आणि सर्वतोपरी त्यांची निंदा केली. एकनाथ फक्त इतकेच म्हणाले, “निंदक हा सर्वतोपरी पूजनीय आहे. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तेच माझी पापं धुतील. हे तर जणू गंगा माता दाराशी आली आहे. मी त्यांच्यावर कसा बरे रागावेन? त्यांच्याशिवाय माझी पाप कशी बरं धुतली जातील?

परमेश्वर केवळ मंदिरात नाही तर सर्वत्र, प्रत्येकाच्या हृदयात वास करतो, यावर त्यांचा विश्वास होता. पवित्र गंगाजल कमंडळातून घेऊन जेव्हा ते प्रयागहून रामेश्वरास जात होते, तेव्हा त्यांना वाटेत एक गाढव तहानेने व्याकुळ मरताना आढळले. त्यांना त्या गाढवाची अत्यंत दया आली. त्यानी कमंडलूतील सर्व गंगाजल गाढवाच्या तोंडात ओतले. गाढवाचे प्राण वाचले परंतु त्यांच्या सहचाऱ्यांनी त्यांना मूर्ख ठरवले. एकनाथ इतकेच म्हणाले, “तहानलेल्या गाढवाला पाणी पाजून मी रामेश्वरावर अभिषेकाचे पुण्य प्राप्त केले आहे. मला खात्री आहे की प्रभू श्रीरामांना माझ्या या कृत्याचा नक्कीच आनंद झाला असेल.” त्यांनी त्यांच्या सहचाऱ्यांना हेच शिकवले की प्रभू केवळ मंदिरातच नसतो, तर प्रत्येक जीवजंतूत राहतो.

[Illustrations by T. Reshma, Sri Sathya Sai Balvikas Alumina]
[Source: Stories for Children-II, Sri Sathya Sai Books & Publications, PN]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *