ध्यान करण्यासाठी एक रूप

Print Friendly, PDF & Email
ध्यान करण्यासाठी एक रूप

आपण आपले प्रिय स्वामी भगवान श्री सत्य साईं बाबा यांच्या अभयहस्त मुद्रेमधील उभ्या असलेल्या रूपावर ध्यान करू या. आपल्या प्रिय स्वामींच्या मस्तकाभोवती तेजोमण्डलाप्रमाणे असणाऱ्या मुलायम केशसंभारावर चित्त एकाग्र करा. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे असलेल्या आणि त्यावर निळसर ढगांची छटा असावी अशा त्यांच्या चेहऱ्याकडे पहा. ताऱ्यांप्रमाणे चमकणारे, अद्वितीय, आकर्षक असे त्यांचे डोळे, दॄष्टि पडल्यावर थेट तुमच्या हृदयात पाहतात आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करतात. ते पहा, मनाला भुरळ घालणाऱ्या सुखावणाऱ्या हास्याने ते आपले स्वागत करत आहेत. त्यांचे मजबूत खांदे पहा, हे खांदे समस्त भुवनांचे ओझे धारण करतात, हे खांदे भक्तांच्या मार्गातील विनाशकारी गोष्टी थोपवून धरु शकतात. त्यांचा उजवा हात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उंचावला आहे आणि तो अभयमुद्रे मध्ये आहे. “अभय” म्हणजे” भिऊ नका” कारण आपले स्वामी म्हणतात, “मी येथे असताना, भय ते कशाचे?” होय, आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, आपले रक्षण करण्यासाठी, ते सदैव आपल्याबरोबर असतात. ते सर्वांचे आश्रयस्थान आणि दयेचा असीम सागर आहेत. ऐका बरं! तुम्हाला ऐकू येतोय तो मार्गदर्शन करणारा बाबांचा मधुर आवाज जो तुमच्या कानात घुमतोय! ते म्हणत आहेत, “कुकर्मापासून दूर रहा, सदाचरण व सत्कर्मे यांपासून कधी ढळू नका. सत्य प्रेम सर्व जीवांच्याप्रति अहिंसेची भावना, सहना सहिष्णुता आणि संयम हे दैवी गुण आहेत ज्यामुळे शांती, आनंद आणि पावित्र्य यांचे संवर्धन होते आणि त्यांचा प्रसार होतो. त्यांचे दिव्य चरण घट्ट पकडून ठेवा. आता नतमस्तक होऊन आपले मस्तक आपण त्यांच्या त्या चरणकमलांवर ठेवू या आणि प्रार्थना करुया, “हे अखिल विश्वाच्या नाथा, आम्हाला तू इतकी शक्ती प्रदान कर की ज्या हातांनी तुझे हे कमलचरण धरले आहेत त्या हातांची पकड़ कधीही कुठल्याही परिस्थितीत सुटू देऊ नकोस. हे मस्तक जे तुझ्या इच्छेपुढे झुकले आहे, ते या भौतिक जगतातल्या अधम गोष्टींपुढे कधीही नमणार नाही. हे डोळे ज्यांची दॄष्टि तुझ्या चरणांवर पडली आहे, ती दॄष्टि नेहमी तिथेच स्थिरावेल. ओ स्वामी! कृपया आमच्या रिक्त हृदयात वास करा आणि ते तुमचे निवास स्थान बनवा म्हणजे तेथे वाहत येणारे सर्व तुमच्या अस्तित्वामुळे शुद्ध, निर्मळ होईल, आणि मग मी जे काही पाहीन मी जे काही बोलेन, जे काही ऐकेन आणि मी जे काही करेन ते सर्व सत्यं, शिवं सुन्दरं असेल.

  • हे परमेश्वरा, आमच्या मनात आणि आमच्या विचारात रहा,
  • हे परमेश्वरा, आमच्या डोळ्यांमध्ये आणि आमच्या दृष्टीमध्ये रहा,
  • हे परमेश्वरा, आमच्या कर्णेन्द्रियांमध्ये आणि आमच्या श्रवणामध्ये रहा,
  • हे परमेश्वरा, आमच्या मुखात आणि आमच्या वाणीमध्ये रहा,
  • हे परमेश्वरा, आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या कामनांमध्ये वास कर,
  • हे परमेश्वरा, आमच्या देहामध्ये आणि आमच्या कृतीमध्ये वास कर.

आम्हाला तुझी खरी आणि शुद्ध अशी मुले बनव म्हणजे आम्ही सर्वांमध्ये तुझे दर्शन करू शकू, तेव्हाच आम्हाला हे विश्व तुझी किर्ती आणि तुझे वैभव यांनी भरून गेलेले दिसेल, तेव्हा आम्हाला एकही शत्रू नसेल. आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही -कारण इतर जण हे दुसरे नसून तुझे स्वरुप असतील आणि आम्हीही आम्ही नसून तुझे स्वरूप असू. हे परमेश्वरा तू आमचा आहेस आणि आम्ही तुझे आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: