गांधीजी
गांधीजी
१
जेव्हा मी एप्रिल १९३६ मध्ये वर्ध्यातील मगनवाडी येथे गांधीजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझा पूर्णतः भ्रमनिरास झाला. परंतु मी निराश झाल्यामुळे नव्हे तर माझ्या अपेक्षेपेक्षा गांधीजी खूप वेगळे असल्यामुळे. इतरांसारखीच माझीही अशी समजूत होती की महात्मा म्हणजे मर्यादित बोलणारे, नेहमी गंभीर असणारे असे असणार. परंतु माझ्या पहिल्या व्यक्तिगत भेटीत मी आश्चर्यचकित झालो. ते अत्यंत उदात्त व्यक्ती आहेत असे माझ्या लक्षात आले. त्यांची ओघवती वाणी, बुद्धिचातुर्याने आणि विनोदाने नटलेली होती, आनंददायी होती.
” माझ्यासाठी येथे तुम्ही काय काम करु शकाल?” गांधीजींनी विचारले.
“बापूजी, मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. कृपया मला आदेश द्या!”
“तुम्ही नुकतेच इंग्लंडहून परत आल्याचे मला माहित आहे आणि तुम्ही वाङ्ग्मयीन काम चांगले करु शकता हे ही मी जाणतो परंतु मी तुम्हाला ते काम देणार नाही. तुम्हाला चरख्याचे तंत्रज्ञान माहित आहे का? येथे माझा जो हा चरखा आहे तो बिघडला आहे. तुम्हाला तो दुरुस्त करता येईल का?”
“मला चरख्याविषयी काहीच माहित नाही. मला आगोदर त्याचे तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागेल.”
” मग तुमचे सर्व शिक्षण व्यर्थच नव्हे का? एक हिन्दुस्तानी म्हण आहे, ‘खाक छानना’ म्हणजे तुमचे शिक्षण वाळु चालण्यासारखे आहे..” गांधीजी हसत हसत म्हणाले.
मी ही हसून प्रतिसाद दिला, “मी मान्य करतो बापूजी.”
“मग ठीक आहे. मी तुम्हाला अगदी खऱ्या अर्थाने तेच काम देतो. चर खणून शौचालये बनवण्यासाठी चांगली वाळू चाळायची आहे. ह्या कामात तुम्ही श्री. एम. एस. ना सहाय्य का नाही करत?”
२
“मी हे काम आनंदाने करेन. मी खूप बागकाम केले असल्याने हे काम माझ्यासाठी नवीन नाही.” मी त्वरीत उत्तर दिले.
“ठीक आहे.” गांधीजी हसून म्हणाले. आणि पुढे काही महिने दर रविवारी मी हे काम केले.
३
गेल्या वर्षी गांधीजींनी दोनदा माझ्या वर्ध्याच्या घरी मुक्कामास येण्याची कृपा केली. जेव्हा ते डिसेंबर १९४४ मध्ये पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा त्या रात्री झोपताना त्यांनी ३ उशा वापरल्या. त्यानंतर पुढच्या वेळी ते फेब्रुवारी १९४५ मध्ये आले तेव्हा त्यांनी उशांचा वापर पूर्णपणे बंद केल्याचे मला आढळले.
“बापूजी तुम्ही आता उशांचा वापर बंद का केलात?” मी थोडस चाचरत त्यांना विचारले.
“मी एकदा वाचले होते की शवासन केल्याने शांत झोप लागते म्हणून मी शवासनाचा पवित्रा घेऊन प्रयोग करतोय.” गांधीजी म्हणाले.
“बापूजी तुमचे जीवन प्रयोगांनी पूर्ण भरलेले आहे. वृद्धापकाळात, तुम्ही आता इतर गोष्टींवर प्रयोग करु नयेत. तुमची तब्ब्येत आता खूप नाजुक झाली आहे. आणि अशा प्रयोगांसाठी मौल्यवान आहे”.
“अरे नाही! माझे जीवनच एक प्रयोग आहे. माझ्या मृत्युबरोबरच ह्या प्रयोगांची समाप्ती होईल.” गांधीजी हसून म्हणाले.
४
गेल्या वर्षी गांधीजी बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. तेव्हा दोन तृतीय श्रेणीतील कंपार्टमेंट त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींसाठी आरक्षित करण्यात आले होते. गांधीजींना दोन कंपार्टमेंटची गरज नसल्याचे जाणवले. ते सर्वजण एकाच कंपार्टमेंटमध्ये आरामात सामावले जाऊ शकत होते म्हणून त्यांनी कनु गांधींना बोलावून एक कंपार्टमेंट रिकामा करण्यास सांगितला.
“परंतु बापूजी आपण दोन्ही कंपार्टमेंट आरक्षित केले आहेत व रेल्वेकडे त्याचे पैसेही भरले आहेत.”
“ते महत्त्वाचे नाही. गरीब आणि उपासमार झालेल्या लक्षावधी लोकांची सेवा करण्यासाठी आपण बंगालला जातोय. गाडीमध्ये सुखसोयींचा आनंद घेणे आपल्याला शोभत नाही. शिवाय, तृतीय श्रेणीच्या इतर डब्यांमधील घुसमटून टाकणारी गर्दी तुम्ही पाहिली नाहीत का? अशा परिस्थितीत आपण आवश्यकतेपेक्षा अधिक जागा वापरणे योग्य नाही. आजकालच्या दिवसांमध्ये ‘तृतीय श्रेणीतील ‘ एवढी जागा आरक्षित करुन प्रवास करणे म्हणजे गुन्हेगारी स्वरुपाचा विनोदच होईल.” गांधीजी म्हणाले.
त्यापुढे कोणतेही वाद विवाद न होता, सर्व मंडळी एका कंपार्टमेंटमध्ये एकत्र बसली व दुसरा कंपार्टमेंट इतर प्रवाशांसाठी रिकामा करुन दिला आणि त्यानंतर गांधीजी निवांत होऊन निद्राधीन झाले.