चांगली जीभ आणि वाईट जीभ

Print Friendly, PDF & Email
चांगली जीभ आणि वाईट जीभ

एक राजा होता. एकदा त्याला असे वाटले की त्याच्या प्रजेतील प्रत्येकजण कशाने शहाणा व सुखी होईल ते समजावे. म्हणून त्याने एक प्रदर्शन आयोजित केले. राज्यातील सगळ्या विद्वान माणसांना बोलावून प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतील अशा वस्तू या प्रदर्शनात मांडण्यासाठी त्याने पाचारण केले. राजा स्वतः ते प्रदर्शन पाहायला गेला. तिथे त्याने हारीने मांडून ठेवलेल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या त्यात फुले, फळे, सुंदर वनस्पती, मिठाई, कपडे, पुस्तके, वाद्ये , सुवर्णालंकार , कलात्मक वस्तू इत्यादीचा समावेश होता. पण राजाला यातील एकही गोष्ट प्रत्येकाला सुखी करू शकेल अशी वाटली नाही .शेवटी तो एका मातीच्या रंगीत नमुन्यापाशी आला . ते माणसाचे तोंड होते आणि रस्त्यावरच्या एका दरिद्री, हाड़कुळ्या व भुकेल्या म्हाताऱ्याशी बोलत असलेली त्याची जीभ त्यात दिसत होती. या नमुन्याच्या खाली-“चांगली जीभ “असे दोन शब्द लिहिले होते.

King notices GOOD TONGUE model

राजाला त्या नमुन्यासंबंधी अधिक माहिती हवी होती म्हणून त्या नमुन्याच्या मूर्तिकाराला बोलावणे पाठविण्यात आले. “महाराज”, मूर्तिकार म्हणाला,” या प्रदर्शनातल्या इतर सर्व वस्तू माणसाला काही काळ सुखी करतात पण चांगली जीभ सहानुभूतीचे व प्रेमाचे थोड़े शब्द बोलून इतरांना वर्षानुवर्षे सुखी करू शकते. ती दुःखितांना आशा व उत्साह देते, दुर्बलांना बल व विश्वास देते, अनाथांना सहानुभूती व प्रेम देते. फक्त चांगली जीभच सर्व माणसांना सर्व काळी सुखी करू शकते.” हे बोलणे ऐकून राजा अतिशय खूष झाला आणि त्याने त्या मूर्तिकाराला सोन्याच्या नाण्याची थैली बक्षीस दिली.

काही दिवसांनी राजाला असे कुतूहल उत्पन्न झाले की प्रत्येकाला दुःखी करू शकेल असे काय असेल? म्हणून त्याने दुसरे प्रदर्शन आयोजित केले व देशातील विद्वान् माणसांना बोलावून प्रत्येकाच्या जीवनात दुःख उत्पन्न करतील अशा वस्तू प्रदर्शनात मांडण्यास सांगितले. यावेळी प्रदर्शनाची खोली, काट्या आणि चाबूक, सुऱ्या आणि तलवारी, काटेरी झाडे अन् कडू फळे, दारू आणि विष, भुंकणारी कुत्री नी काव काय करणारे कावळे यासारख्या वस्तू भरून गेली होती पण त्यांच्यापैकी कशातही राजाला.

King notices BAD TONGUE model

त्याच्याप्रश्नाचे संतोषकारक उत्तर मिळाले नाही .शेवटी आधीच्या प्रदर्शनात पाहिलेल्या मातीच्या नमुन्यासारख्या नमुन्यापाशी तो पोेहोचला. पण या वेळी त्या चेहऱ्याचे डोळे विस्फारलेले व लाल होते आणि काळसर जीभ एका दरिद्री हाडकुळ्या, भुकेल्या म्हाताऱ्याला शिव्या देत होती. त्याच्या पायाशी ‘वाईट जीभ ‘असे दोन शब्द लिहिले होते. मूर्तीकाराला बोलावणे गेले. तो आला व त्याने राजाला स्पष्ट केले “महाराज, वाईट जीभ इतरांचे सुख व आनंद नष्ट करते, त्यांच्या आशेचा व धैर्याचा नाश करते आणि त्याना दुःखाच्या डोहात ढकलून देते. ती इतरांच्या अंतःकरणाला अशा जखमा करते की त्या वर्षानुवर्षे भरून येऊ शकत नाहीत.वाईट जीभ हा माणसाचा सर्वात वाईट शत्रु आहे”

राजाने मूर्तिकाराला हिरे माणकांनी भरलेली छानशी थैली दिली. “खरोखर तुझे हे मातीचे चेहरे जो धडा आम्हाला शिकवितात तो या सोन्याच्या थैल्या, रत्न आणि हिरे यांच्या पेक्षा अधिक मोलाचा आहे”. राजा त्याला म्हणाला, “चांगली जीभ म्हणजे प्रत्येकाचा उत्तम मित्र आहे आणि सर्वांच्या सुखाचा साधा सोपा मार्ग आहे”.

प्रश्न:
  1. चांगली जीभ असणाऱ्या माणसाचे वर्णन करा, तो प्रत्येकाला सुखी कसा करू शकतो?
  2. वाईट जीभ असणाऱ्या माणसाचे वर्णन करा. तो प्रत्येकाला दुःखी कसा करू शकतो?
  3. दुसऱ्या माणसाला सुखी करणाऱ्या चांगल्या जिभेचे व दुःखी करणाऱ्या वाईट जिभेचे प्रत्येकी एक उदाहरण द्या
  4. तुमची जीभ नेहमीच चांगली असते का? नसल्यास का? नेहमी चांगली जीभ असण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे असे तुम्हाला वाटते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *