त्रिमूर्ती म्हणून गुरु
गुरुर्ब्रह्मा – त्यासंबंधी प्रवचने
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुदैवो महेश्वरः
तस्मै श्री गुरवे नमः
“गुरू ब्रह्मा आहे, गुरू विष्णु आहे आणि गुरू महेश्वर आहे. गुरूच तुमचे सर्वकाही आहे.
सर्व दिव्यात्म स्वरूप आहेत. वास्तविक तुम्ही जे काही पाहता ते अन्य काही नसून दिव्य वैश्विक रूप (विश्व विराट स्वरूप) आहे.”
“ गुरू ह्या संज्ञेचा अर्थ जो अज्ञानाचा अंध:कार दूर करतो. ‘गु’ म्हणजे जो गुणातीत आहे आणि ‘रू’ मधून असे सूचित होते की जो रूपातीत, रूपवर्जित आहे. हे केवळ परमेश्वरालाच लागू होते. म्हणून गुरूला ब्रह्मा, विष्णु व शिव असे संबोधले जाते. (हिंदुधर्मातील त्रिमूर्ती) केवळ परमेश्वर खरा गुरु आहे. इतर सर्व महाविद्यालयातील विविध विषयांच्या शिक्षकांप्रमाणेच शिक्षक आहेत. जो शिष्याला त्याचे लक्ष्य (गुरी) उघड करून सांगतो. तो गुरू होय. येथे “गुरी’ हा शब्द आत्मतत्वाच्या संदर्भात आहे.” – [Sathya Sai Baba Discourse: 20th July, 1997]
“गुरू ब्रह्म आहे. तो निर्माता आहे. तसेच तो स्वतःच निर्मितीही आहे. ह्या निर्मितीमध्ये केवळ तोच एक विद्यमान आहे. संपूर्ण विश्व ब्रह्माने व्याप्त आहे. ह्यावरून असे स्पष्ट होते की ज्याने स्वत: निर्मितीचे रूप धारण केले आहे तो गुरू आहे.
गुरू विष्णु आहे. विष्णु कोण आहे? ज्याच्याकडे व्यापकतेचा गुण आहे. तो विष्णु आहे. तोच कर्ता करविता आहे आणि कर्म आहे. विश्व म्हणजे कृती व कर्ता परमेश्वर. कर्म आणि परिणाम ह्यांच्यामागील चैतन्य म्हणजे परमेश्वर. अखिल विश्व हे विष्णुचे रूप आहे. हा विष्णु गुरू आहे.
गुरू महेश्वर आहे. महेश्वर कोण आहे? विश्वातील सर्व जीवांवर ज्याचे नियंत्रण आहे तो महेश्वर, विश्वातील प्रत्येक गोष्टीवर स्वामित्व आहे व विश्वातील सर्व गोष्टींचे तो योग्य पद्धतीने नियमन करतो. सूर्यादय-सूर्यास्त ह्या क्रिया आज्ञेनुसार घडतात. वस्तु, पर्जन्य, दिवस-रात्र हे सर्व त्याच्या आज्ञेनुसार घडते. ज्याच्या आज्ञेनुसार प्रत्येक गोष्ट बिनचूकपणे त्याच्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करते, तो ईश्वर होय. जो केवळ शिकवण देतो तो गुरू नव्हे.
गुरू सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व सर्वव्यापी आहे. तो परमेश्वर आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे कोणताही दोष वा उणीव विरहीत पूर्ण चंद्र, चंद्र म्हणजे अन्य काही नसून मन आहे. जेव्हा मन परिपूर्ण असते तेव्हा ते प्रकाश पसरवते. गुरुंना प्रदक्षिणा घालून व वस्तू अर्पित करून गुरुपौर्णिमा साजरी होत नाही. गुरुंना खरं तर काय समर्पित करायला हवे? गुरुंना आपले प्रेम समर्पित करायला हवे. परमेश्वर सर्वत्र विद्यमान आहे हे जाणणे म्हणजे प्रदक्षिणा. तुम्हाला ह्या संज्ञेचा बोध झाल्यानंतर दररोज गुरुपौर्णिमा आहे. गुरू एकच आहे तो म्हणजे परमेश्वर. त्याच्याशिवाय अन्य कोणीही गुरू नाही. त्या गुरूचे ध्यान करा.” – [Sathya Sai Baba – Divine Discourse: July 14, 1992]
गुण आणि त्रिमुर्ती
ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर या काही रूप असलेल्या व्यक्ती नव्हेत. ही त्रिमूर्ती त्रिगुणांच्या दैवी अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करते. पुराणामध्ये ब्रह्मा विश्वाची निर्मिती करणारा, चार मस्तके असणारा देव असे सांगितले आहे ते बरोबर नाही, चुकीचे आहे. वास्तविक, पाहता त्रिमुर्ती तीन गुणांचे प्रतिनिधित्व करते.
निसर्गामध्ये पाच मूलभूत शक्ती आहेत. भूमी, आप, अग्नी, वायू आणि आकाश. जर तुम्हाला निर्मितीची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर ज्या क्रमाने आपण पंचमहाभूतांचे वर्णन करतो तो क्रम उलटा केला पाहिजे. आकाशपासून सुरुवात करून नंतर वायु, अग्नी, जल व पृथ्वी अशा क्रमाने ही पंचमहाभूते मार्ग निर्मितीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे; दुसरा ब्रह्मा. विष्णु आणि ईश्वर यांचा क्रम निर्मितीशी संबंध लावून पहिला तर तो उलटा केला पाहिजे. म्हणजे ईश्वर, विष्णु, ब्रह्मा या क्रमाने पाहिले पाहिजे.
आता सुरुवातीला असे पाहू या की ईश्वर तत्त्व काय दर्शविते? भगवद् गीता सांगते : “ईश्वरस्सर्वभूतानां हदेशेऽर्जुन तिष्ठति.” (हे अर्जुना ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदयात वास करतो.) म्हणून ईश्वर म्हणजे हृदयाचा स्वामी. तो प्रत्येक जीवमात्राचे हृदय प्रकाशित करतो. म्हणजेच ईश्वराची दिव्य शक्ती प्रत्येकाच्या हृदयात आहे. हृदयाचा स्वामी असल्याने ईश्वराला दिलेले दुसरे नाव म्हणजे आत्मा.
हृदयातून मन प्रकट झाले आहे. मनाचा संबंध विष्णु तत्त्वाशी येतो. विष्णु म्हणजे जो सर्वव्यापी आहे तो. मनही तसेच सर्वव्यापी आहे. “मनोमूलम् इदं जगत्,” असे म्हटले आहे. (मन हे बा विश्वाचे मूळ आहे) मन संपूर्ण विश्वास व्यापते, म्हणून ते विष्णु तत्त्व दर्शविते.
ब्रह्माचे वर्णन नेहमी विष्णुच्या नाभिकमलातून उदय झालेला असे केले जाते. मनामधून वाकशक्ती निर्माण होते. वाक्शक्ती हे ब्रह्माचे मूर्त रूप आहे. म्हणून इतर नावांबरोबर ब्रह्माचे ‘शब्द ब्रह्ममयी’ असेही एक नाव आहे. (शब्द ब्रह्म आहे) अशाप्रकारे ईश्वर विष्णु आणि ब्रह्मा हे हृदव, मन आणि वाक्शक्ती यांची प्रतिके आहेत. या तीन गुणांच्या संयोगातून आत्मा दर्शविला जातो, म्हणून प्रत्येक गुणाचा तीन रूपे धारण केलेला सर्वोच्च गुरू अशा नावाने आदर केला पाहिजे.
सर्वोच्च गुरू
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः
गुरु:साक्षात्परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
या श्लोकास अतिशय गहन आणि सखोल असा गर्भितार्थ आहे. परंतु, त्या अर्थास विपरित रूप दिले गेले आहे. ज्यामध्ये सामान्य शिक्षकाच्या भूमिकेचा स्तर उंचावला आहे. दिव्यत्वाचे खंड केले आहेत आणि श्लोकामधून व्यक्त झालेले एकत्वाचे मूलभूत सत्य या अर्थामध्ये दिसून येत नाही.
गुरुर्ब्रह्मा: या शब्दामध्ये जो ‘ब्रह्मा’ असा उल्लेख आहे तो निर्माता म्हणून नव्हे तर ‘वाकशक्ती’ अशा अर्थाने आहे. गुरुविष्णु मध्ये सर्वव्यापी मनाकडे निर्देश केला आहे. जे सर्व जीवमात्रांमध्ये असते. हे विष्णुतत्त्व आहे.
गुरुदेवो महेश्वरः यामधून हृदयावकाशाकडे निर्देश केला आहे.
गुरुसाक्षात परब्रह्म:म्हणजे वाक्शक्ती, मन आणि हृदय यांच्या एकत्वामधून परमात्मा दर्शविला जातो. ज्याला गुरू म्हणून पूज्य मानले पाहिजे.
गुण आणि विश्व
गुरू भूमिका काय असते? अज्ञानरूपी अंध:काराचा समूळ नाश करणे. जोपर्यंत तीन गुण आहेत तोपर्यंत या अंधारापासून मुक्ती मिळणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती तीन गुणांच्या पलीकडे जाते (गुणातीत होते) तेव्हा ती गुरुतत्त्वास प्राप्त होते आणि जेव्हा व्यक्तीला त्रिगुणांचे एकत्व समजते तेव्हा भगवद गीतेमध्येही सांगितले आहे : “ममात्मा सर्वभूतात्मा” (माझा आत्मा म्हणजे जीवमात्रांमध्ये वास करणारे शुद्ध चैतन्य, ते एकच तत्त्व सर्व जीवांमध्ये वास करते,) “एको वासि सर्वभूते अन्तरात्मा” एकत्वाचे मूलभूत तत्त्व विसरून अनेकत्वाच्या जंजाळात अडकल्यामुळे मनुष्याला शांती मिळत नाही.
तीन गुणांच्या विविध प्रकारच्या कार्यामुळे निर्मिती, पालनपोषण आणि लय या प्रक्रिया घडतात, तोन गुण हे विश्वाचे प्रथम मूळ, विश्वाचा आधार आणि विश्वाचा प्राण आहेत, प्रकृतीमधील प्रकटीकरण आणि परिवर्तन त्याच्यामुळे घडते. तीन गुणांच्या विविध प्रकारांनी आणि वेगवेगळ्या प्रमाणात एकत्रित येण्यामुळे विश्वामध्ये अनंत प्रकारची विविधता दिसते.
त्रिमुर्ती आणि त्यांचे रंग
तीन गुणांना ३ रंग दिले आहेत.
विष्णु सत्व गुणाचे प्रतिनिधित्व करतात असा सर्वसामान्य विश्वास आहे. परंतु हे बरोबर नाही, सत्त्व गुण हा ईश्वराचा गुण आहे. तो मायेवर अवलंबून नसतो. योगनिद्रेच्या अवस्थेमध्ये तो चित्शक्तीला प्राप्त करून घेतो आणि शुद्धात्मा अशा स्वरूपात दिसतो, म्हणून सत्त्व गुण ईश्वरतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा रंग पांढरा असतो.
आवड-निवड यामधून रजोगुण स्वतःला प्रकट करतो, त्याचा संबंध ब्रह्माशी लावला जात असे. परंतु, ते बरोबर नाही. हा विष्णुशी संबंधित असलेला गुण आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेला देव असे विष्णुचे वर्णन केले जाते. विष्णुचे ‘अलंकारस्वरूप’ म्हणजे अलंकारांनी सजविलेला असेही विष्णुचे वर्णन केले जाते. विष्णुचे ‘विश्वंभर’ म्हणजे विश्वाचे रक्षण करणारा, विश्वेश्वर अंमल चालविणारा असेही एक नाव आहे. राजा म्हणून त्याच्यामध्ये ‘रजोगुण आहे..
तिसरा देव म्हणजे ब्रह्मा, ब्रह्माचा संबंध रजोगुणाशी जोडला गेला आहे. हे बरोबर नाही, ब्रह्मा तमोगुणाचे प्रतिनिधित्व करतो. मूर्खता आणि अंध:कार (अज्ञान रूपी अंध:कार) याच्याशी तमोगुणाचा संबंध आहे. ममाकार (माझे आहे ही भावना) आणि अभिमान (मोह) यांनी तो भरला आहे. या दोन प्रबळ इच्छाशक्तीमधून निर्मितीचे योग्य स्पष्टीकरण मिळते. जर मी आणि माझे या भावना नसतील तर निर्मितीची प्रक्रिया पुढे जाणार नाही, ही दोन तमोगुणाची वैशिष्ट्ये आहेत. हा तमोगुण कृष्णवर्णाचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा, लाल आणि काळा हे सर्वात महत्वाचे रंग आहेत. सर्व रंग या तीन रंगांमध्ये मिसळून जातात.
त्याचप्रमाणे जगामध्ये सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी लोक असतात. या रंगांपैकी कुठल्यातरी एका रंगाने त्याचे वेगळेपण दिसून येते.
[Source: २९ जुलै १९८८ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींनी पूर्णचंद्र सभागृहामध्ये दिलेल्या प्रवचनामधून]