गुरुवायुर
गुरुवायुर- दक्षिणेकडील द्वारका
कृष्णावतारात जसे वसुदेव देवकीस श्री महाविष्णुंचे दर्शन घडवले तसे गुरुवायुरप्पनची मूर्ती म्हणजे श्री महाविष्णुंचे संपूर्ण प्रकटीकरण होय. ऋषि कश्यप आणि अदिती ह्यांनी वासुदेव देवकी म्हणून जन्म घेतला. परमेश्वराने लागोपाठ तिसऱ्या वेळी त्यांच्या पोटी जन्म घेतला.
गुरुवायुरच्या प्रतिमेचे प्रथम पूजन स्वतः नारायणानेच केले व त्यानंतर ती ब्रह्मास दिली. आणि ह्या देवतेच्या कृपेने ब्रह्मदेव सृष्टीच्या निर्मितीचे कार्य करू शकला. ही तीच मूर्ती आहे जिची वासुदेव देवकीनी उपासना केली आणि जेव्हा कृष्ण द्वारकेचा राजा बनला तेव्हा त्याने मंदिर बांधून ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
द्वापरयुगाच्या अखेरीस, कृष्णाने उध्दवाला सांगितले की त्याच्या अवताराचा उद्देश आता पूर्ण झाला आहे आणि आता लवकरच तो वैंकुंठगमन करेल. कलियुगात जगावर येणाऱ्या दुर्दैवी परिस्थितीचा विचार करून उध्दव दुःखात बुडून गेला. तथापि परमेश्वराने त्याला दिलासा देत म्हटले की तो स्वतः मूर्तीमध्ये प्रकट होऊन भक्तांवर कृपेचा वर्षाव करेल. त्याने उध्दवास, येऊ घातलेल्या प्रलय काळात त्या मूर्तीचे रक्षण करून, देवगुरु बृहस्पतींशी सल्लामसलत करून पवित्र क्षेत्री त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असे सांगितले.
त्यानुसार बृहस्पती आणि वसुदेवांनी त्या मूर्तीची जवाबदारी स्वीकारली व तिच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी सर्वत्र पुण्यभूमीचा शोध घेतला. वाटेत त्यांची परशुरामांशी गाठ पडली जे नारदांच्या सांगण्यानुसार त्याच मूर्तीचा शोध घेत होते. ते कमलपुष्पांनी भरून गेलेल्या एका सुंदर जलाशयापाशी आले. जलाशयाच्या एका बाजूला त्यांच्या स्वागतासाठी शिव पार्वती उभे होते. नारायणाच्या मूर्तीसाठी, अनेक वर्षांपूर्वीच हे स्थान चिन्हांकित करण्यात आले आहे असे सांगून शिवांनी त्या मूर्तीवर पवित्र जल शिंपडले आणि आदरांजली अर्पित करुन ते गुरु आणि वायुस म्हणाले, “तुम्ही दोघं मिळून ह्याची प्रतिष्ठापना करा आणि तुम्ही ह्या पवित्र मंदिराचे संस्थापक आहात म्हणून हे स्थान गुरुवायुर ह्या नावाने ओळखले जाईल.” एवढे बोलून शिवपार्वती जलाशयाच्या दुसऱ्या तीरावर गेले. आजही गुरुवायुर मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले शिवमंदिर ह्याच्या सत्यतेचा पुरावा देते.
गुरुवायुरच्या मूर्तीतच त्याच्या दिव्यत्वाचा महिमा आहे. जगाला आकृष्ट करणारे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले चतुर्भुज कृष्णाचे मनमोहक रुप आहे ते. कंठामधील तुलसीमालेने व मोत्याचा हाराने अलंकृत झालेली ही मूर्ती तेजोमय आणि अलौकिक दिसते. भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या देवतांमध्ये गुरुवायुरप्पनचे नाव सहजच मनामध्ये येते.
ईश्वराला जे शरण जातात त्या सर्वांच्या प्रार्थनेला ईश्वर कसे प्रत्युत्तर देतो या बाबत एक गोष्ट सांगितली जाते. एका माणसाला पायाचा अर्धांगवायू झाला होता. तो बरा होण्याची आशा डॉक्टरांनी सोडून दिली होती. तेव्हा त्याने श्री गुरूवायूरप्पनचा आसरा घेतला. त्याचवेळी दुसरा एक गरीब मनुष्य ईश्वराच्या प्रार्थनेने संपत्ती मिळावी म्हणून तेथे आला होता. अर्धांगवायू झालेल्या माणसाने आपली पैशाची थैली असलेली पिशवी नदीकाठावर ठेवली होती आणि त्याने नदीत बुडी मारण्यासाठी झेप घेतली. जेव्हा गरीब माणसाने ती पैशाची पिशवी पाहिली. तेव्हा अजिबात वेळ न घालवता त्याने ती पळवण्याचा प्रयत्न केला. त्या लुळ्या माणसाने जेव्हा हे पाहिले तेव्हा लगेच उडी मारून तो बाहेर आला आणि त्या चोरामागे धावला. त्यावेळी त्याच्या हेही लक्षात आले नाही की तो दोन्ही पायांवर धवत होता. नंतर त्याने आवाज ऐकला – “आनंदी रहा! तुझी प्रार्थना फळास आली आहे आणि त्याचीही !”
त्याच्याकडे आकृष्ट झालेल्या स्वार्थी आणि लोभी लोकांनासुध्दा त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या लोकांना सत्ता आणि धन ह्यांची लालसा असते ज्याची ते त्याच्याकडे मागणी करतात ते ही अखेरीस अन्य काही न मागता त्याच्या कृपेची मागणी करतात. परमेश्वराने सांगितले आहे की ४ प्रकारचे भक्त त्याच्याकडे येतात-आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. मनाला मोहिनी घालणारा तो, सरतेशेवटी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ‘ज्ञानी’ बनवतो.
[Source – Stories for Children – II ]
[Published by – Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]