हनुमान संजीवनी घेऊन येतो
हनुमान संजीवनी घेऊन येतो
वानरांनी लंकेमध्ये घातलेला धुमाकूळ पाहून रावणाचा पुत्र मेघनाद अत्यंत क्रोधित झाला. मेघनाद एक ख्यातनाम योद्धा होता. वानरांनी जेव्हा त्याला त्याच्या धनुष्याला प्रत्यंचा लावताना पाहिले तेव्हा त्यांचा धीर सुटला . लक्ष्मण आणि मेघनाद ह्यांच्यामध्ये घनघोर युध्द झाले. मेघनादाने, ब्रह्मदेवाने त्याला दिलेल्या महाशक्तीशाली ‘शक्ती’ अस्त्राचा वापर करून लक्ष्मणाच्या हृदयाचा वेध घेतला. लक्ष्मणाची शुद्ध हरपली व तो खाली कोसळला.
हनुमान त्याला उचलून रामाकडे घेऊन गेला. हनुमानाने, लंकेतील राजवैद्य सुषेणास त्याच्या घरासकट उचलून रामासमोर आणले. हिमालयाच्या बाजूला असणाऱ्या संजीवनी टेकडीवर एक विशिष्ठ जीवनदायी वनस्पती उपलब्ध असल्याचे सुषेणाने सांगितले.
लक्ष्मणाचे प्राणरक्षणासाठी ती वनस्पती आणणे गरजेचे होते. हनुमान तात्काळ द्रोण पर्वतराजीकडे निघाला व वनस्पतीच्या शोधार्थ संजीवनी टेकडीपाशी पोहोचला. त्या टेकडीवर विविध प्रकारच्या वनस्पती होत्या. त्यामुळे त्याला ती विशिष्ठ वनस्पती शोधता आली नाही. म्हणून त्याने ती टेकडी उचलून आपल्या तळहातावर घेतली व तो आकाशमार्गे निघाला.
गुरुंनी मुलांना हे सांगावे की हनुमान केवल बलश्रेष्ठ नव्हता तर त्याच्याकडे बुद्धीचातुर्य व समयसूचकताही होती. जेव्हा त्याला त्या टेकडीवरील विशिष्ठ वनस्पती ओळखता आली नाही तेव्हा तो हातपाय गाळून बसला नाही व काळ हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे त्याने वेळ व्यर्थ न घालवता तात्काळ संपूर्ण टेकडीच लंकेला घेऊन जाण्याचा पर्यायी उपाय शोधला.
त्याने घेतलेल्या ह्या शीघ्र निर्णयामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले व त्याला प्रभु रामाचे आशीर्वाद प्राप्त झाले. आपण जेव्हा एखाद्या समस्येमध्ये अडकतो तेव्हा निर्णयाप्रत न येता वेळ वाया घालवणे टाळले पाहिजे. परमेश्वराची प्रार्थना करून ताबडतोब पर्यायी मार्गाचा शोध घेतला पाहिजे.
पुढील अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत. काळाचा अपव्यय म्हणजे जीवनाचा अपव्यय.
हनुमान लंकेला पोहोचल्यावर, सुषेणाने ताबडतोब त्याला हवी असलेली औषधी वनस्पती गोळा करून त्याची मात्रा लक्ष्मणास दिली. लक्ष्मणाला शुध्द आली. रामाला अतीव आनंद झाला. त्याने लक्ष्मणास आलिंगन दिले. रामाने सुषेणास आशीर्वाद देत म्हटले की त्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या कोणत्याही संकटापासून तो त्याला संरक्षण देईल.
गुरुंनी मुलांना सांगावे की चांगल्या कर्माचे नेहमीच चांगले फळ मिळते आणि आपण केलेले प्रत्येक चांगले कर्म स्वामींना आनंद देते.
खलील अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर ठसवावीत मानवसेवा हीच माधवसेवा/ मानवास आनंद देणे म्हणजेच परमेश्वरास आनंद देणे.