एक मनः पूर्वक प्रार्थना
एक मनः पूर्वक प्रार्थना
जगाच्या कोलाहलापासून दूर, एका निर्जन बेटावर, तीन ख्रिश्चन संन्यासी राहत होते. ते त्यांचा बराचसा वेळ परमेश्वराचे चिंतन व परमेश्वराची महिमा गाण्यामध्ये व्यतीत करत असत. त्यांना बायबल मधील स्वर्गातील पिता, परमेश्वराचा पुत्र व पवित्र आत्मा ह्याविषयी वाचन करण्यास’खूप आवडत असे. मनाच्या प्रांजळतेमुळे ते परमेश्वरास एकच प्रार्थना करत,” हे प्रभु, आम्ही तीन आहोत, तू सुद्धा तीन आहेस, आमच्यावर दया कर.” त्यांच्या प्रार्थानेवर परमेश्वर संतुष्ट होता. म्हणून तो त्यांच्या दैनंदिन गरजांची काळजी घेत होता. व त्यांचे रक्षण करत होता. त्यांना जेव्हा भूक लागे, तेव्हा त्यांच्या टेबलावर फळे आणि दूध ठेवलेले आढळे. जेव्हा कडक ऊन वा पाऊस असे, तेव्हा त्यांच्या डोक्यावर छप्पर असे. त्या संतपुरुषांच्या मनात कोणा विषयीही द्वेषभाव नव्हता. ते सर्वांकडे परमेश्वरांची निर्मिती ह्याच भावनेतुन पाहत असल्यामुळे जंगली श्वापदेही त्यांचे मित्र बनली.
एक दिवस समुद्रकिनाऱ्यावरील गावातल्या धर्मोपदेशकाने त्यांच्या विषयी व त्यांच्या साध्यासुध्या प्रार्थानेविषयी ऐकले. धर्मोपदेशकाला वाटले, “त्यांना बायबलचा व प्रभूच्या शिकवणीचा अर्थ समजला नसावा. मलाच तेथे जाऊन त्यांना योग्य दैनंदिन प्रार्थना कशी करावी हे शिकवले पाहिजे.”
एका बोटीने तो धर्मोपदेशक तेथे गेला. त्याने त्या तिघा संन्याशांना सांगितले की, परमेश्वराची कृपा आणि प्रेम प्राप्त करण्यासाठी त्यांची प्रार्थना खूप छोटी आणि साधी आहे. म्हणून त्याने त्या संन्याशांना अनेक प्रार्थना शिकवल्या. शिवाय दररोज सकाळसाठी एक व संध्याकाळसाठी एक अशा लांबलचक प्रार्थनाही शिकवल्या. अंधार पडू लागल्यावर तो धर्मोपदेशक बोटीत बसून, आपल्या गावाकडे निघाला.
बोटीतून थोडेसे अंतर् कापून गेल्यावर त्या बेटावरून अंध्याऱ्या पाण्यावर एक प्रकाशाचा किरण त्यांच्या दिशेने येतांना त्याने पाहिला. त्याने लाटांची लखलखणारी किनार पाहिली. तेव्हा त्याला एक चमत्कारीक दृश्य दिसले.ते तिघे संन्यासी हातात हात घालून त्या लखलखत्या लाटेवरून त्याच्याकडे धावत येताना दिसले. ते बोटापाशी पोहोचले तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले,” हे पित्या! तुम्ही शिवकवलेल्या त्या दीर्घ प्रार्थनेतील काही ओळी आम्ही विसरलो. कृपया ती प्रार्थना पुन्हा म्हणून दाखवा.”
त्या धर्मोपदेशकाची मती गुंग झाली. जीझस समुद्रांच्या लाटांवरून चालतो हे त्याने केवळ ऐकले होते. आता त्याने त्याच्या डोळ्यादेखत त्या संन्याशांना लाटांवरून चालताना पाहिले. “नक्कीच, हे तीघं संन्याशी शुद्ध आत्मे आहेत.” तो त्याच्या मनाशीच म्हणाला “परमेश्वराने त्यांना कृपान्वित करून, त्याच्या स्वतःसारखे बनवले. मी त्यांना काय शिकवू शकणार?”
धर्मोपदेशकाने डोके हलवले व विनम्रतेने म्हणाला, “हे प्रिय बंधुंनो, तुम्ही तुमची छोटीशी प्रार्थना चालू ठेवा. परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे.” खरी प्रार्थना ओठातून नव्हे तर अन्तःकरणातून येते हा धडा तो त्या संन्याशांकडून शिकला.
प्रश्नावली :
- धर्मोपदेशकाची काय चूक होती?
- त्याने संन्याशांकडून कोणता धडा शिकला?
- तुम्ही करत असलेल्या प्रार्थनेचे वर्णन करा. म्ही त्या प्रार्थनेस खरी प्रार्थना म्हणू शकता का? स्पष्ट करा.