हिंदु धर्म
हिंदु धर्म
हिंदु धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. जैन आणि बौद्ध धर्माची सुरुवात हिंदू धर्मामधूनच झाली असे म्हटले जाते आणि म्हणून त्यांना हिंदुधर्माचे कन्याधर्म म्हणतात.
हिन्दू धर्माचे अधिक योग्य नाव ‘सनातन धर्म’ हे आहे. ‘धर्म’ म्हणजे जो संपूर्ण निर्मितीला आधार देतो, तिला एकत्र ठेवतो, तिचे रक्षण करतो.
सनातन म्हणजे शाश्वत, चिरंतन. चिरंतन आधार असलेली मूल्ये आणि तत्त्वे यांचा अंतर्भाव करणारा धर्म म्हणजेच ‘सनातन धर्म’.
सर्वोच ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या वेदांमध्ये हिंदू धर्माची मुळे दिसतात म्हणून याला ‘वेदांत’ किंवा ‘वैदिक धर्म’ असेही म्हटले जाते. ह्या वेदांत वा वैदिक धर्माने, जीवनयात्रा करताना मनुष्याचे आचरण कसे असावे ह्याविषयी काही पध्दती घालून दिल्या आहेत.
सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना उद्देशून हिन्दू नाव पडले बाबांनी त्यांच्या दैवी स्पशनि ‘हिन्दू’ या शब्दाला आध्यात्मिक अर्थ दिला आहे. ‘हिम्’ म्हणजे हिंसा आणि ‘दू’ म्हणजे खूप लांब किंवा, ‘च्या पासून दूर असणारा. म्हणून जे लोक विचार, शब्द आणि कृती यांत हिंसेपासून दूर असतात त्यांना हिन्दू म्हणतात. ‘अहिंसा परमो धर्मः।’ निर्मितीतील प्रत्येक गोष्ट परमेश्वराने व्यापलेली आहे म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी प्रेम आणि आदर असायला हवा. “ईशावास्यमिद सर्वम्” हे आपल्या धर्माचे मूलतत्त्व आहे.
बाबांच्या स्पष्टीकरणानुसार ‘भारत’ या शब्दाला सुद्धा सखोल अर्थ आहे. ‘भा’ म्हणजे ‘भगवान’ आणि ‘रति’ म्हणजे ‘प्रेम आणि आसक्ती.’ भारत म्हणजे भगवदॄरति. जेथील लोकांचे ईश्वरावर नितान्त प्रेम आहे. असा देश म्हणजे भारत. सर्वभूतमात्रांवर प्रेम आणि ईश्वरावर प्रेम हा हिन्दूत्वाचा गाभा आहे. भारत आणि हिंदू ह्या दोन शब्दांचे एकीकरण म्हणजे हिंदू धर्माचे समग्र सार. धर्माचा वैश्विक मार्ग प्रशस्त करणारा, हिंदू धर्म अत्यंत प्राचीन आणि आदिम धर्म आहे.
- हिंदू धर्माची प्रमुख शिकवण – सर्व नैसर्गिक शक्ती ह्या केवळ दैवत्वारुपाचे म्हणजेच त्याला आवडणाऱ्या रुपाची अभिव्यक्ती आहेत. असे मानले जाते की सूर्य, पृथ्वी, वायु, अग्नि ह्यासारख्या सर्व नैसर्गिक शक्ती, ज्या पृथ्वीवरील जीवनाचे पोषण आणि संहार करतात त्या सर्व शक्ती परमेश्वराची अभिव्यक्ती आहेत. जरी वेगवेगळ्या देवतांची भक्ती केली जाते तरीही परमेश्वर एकच असल्याचे मानले गेले आहे एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति.
- एखाद्याचा अंतरात्मा ही सुद्धा परमेश्वाराची अभिव्यक्ती आणि परमेश्वराचाच एक भाग आहे. जशा बाह्य नैसर्गिक शक्ती दिव्यत्वाची अभिव्यक्ती आहेत त्याचप्रमाणे आपणा सर्वांमध्ये परमेश्वर आत्मरूपाने विद्यमान आहे. मानवी आत्मा हा केवळ एकमात्र सत्याग्नीच्या स्फुल्लिंगासारखा आहे. म्हणून आर्यांनी “तत् त्वं असि’ असे घोषित केले. मनुष्यने भौतिक इच्छांचा त्याग करुन स्वतःला मुक्त करुन परमेश्वारामध्ये विलीन होणे हे मनुष्यधर्माचे ध्येय आहे. आत्म्याला मोक्ष प्राप्ती झाली की तो जीवन मृत्युच्या चक्रतून मुक्त होतो.
- आपल्या पसंतीनुसार परमेश्वराच्या कोणत्याही रूपाची भक्ती करता येते. त्याची रुपे आणि नांवे अनंत आहेत. मनुष्य परमेश्वराच्या कोणत्याही रुपाचे म्हणजेच त्याला आवडणाऱ्या रुपाची (त्याच्या इष्टदेवतेची) भक्ती करु शकतो. सर्वअस्तित्व आणि जीवन ह्यांची एकता. लहान मोठ्या सर्व जीवांमध्ये परमेश्वर विद्यमान आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या प्रेमास आणि आदरभावास पात्र आहे. ” ईशावास्यमिदं सर्वं” ही हिंदुत्वाची प्रमुख संकल्पना आहे.
धर्मग्रंथ आणि प्रस्थानत्रयी
हिन्दुधर्माच्या ग्रथांचे दोन भागात विभाजन होते.
I. श्रुती
श्रुती या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे ‘ऐकलेले’. प्राचीन महर्षीनी चिरंतन सत्यांचे श्रवण केले
व तीच तत्त्वे वेदात आहेत. श्रुती किंवा वेद हा हिंदुधर्माचा पाया आहे. वेद ह्या शब्दाची उत्पत्ती ‘वि द् ‘म्हणजे ज्ञान ह्या मूळ संस्कृत शब्दापासून झाली आहे. वेद हे अनंत होते. परंतु व्यास महर्षीींनी वेदराशींची चार भागात विभागणी करुन ते आपल्या चार शिष्यांना शिकविले.
- ऋग्वेद – पैल
- यजुर्वेद – वैशंवायन
- सामवेद – जैमिनी
- अथर्ववेद – सुमंत
हा प्रत्येक वेद पुन्हा तीन भागात विभागला आहे.
- संहिता (मंत्र)
- ब्राम्हण
- आरण्यके
बहुतांशी उपनिषदे आरण्यकांचा भाग आहेत. वेदाच्या अंतिम भागास उपनिषदे म्हटले जाते. उपनिषदांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते. उपनिषद हे शब्द ‘सद्’ ह्या धातुला ‘उप’ आणि ‘नि’ ही उपपदे लागून तयार झाला आहे. उप म्हणजे जवळ, आणि सद् म्हणजे बसणे. उपनिषद शब्दाचा अर्थ अत्यंत भक्तिभावाने गुरुजवळ बसणे.
महत्त्वाची उपनिषदे – १) ईश, २) केन, ३) कठ, ४) प्रश्न, ५) मुंडक, ६) मांडुक्य, ७) तैत्तिरीय, ८) ऐत्तरेय, ९) छांदोग्य, १०) बृहदारण्यक.
II. स्मृती
हे दुय्यम शास्त्रग्रंथ आहेत ज्यामध्ये
- स्मृती किंवा कायदेसंहिता किंवा धर्मशास्त्रे जी मनु, याज्ञवल्क्य, पराशर आहेत सर्व वर्णांच्या लोकांसाठी कर्तव्ये व सदाचरणाचे नियम त्यात आहेत.
- इतिहास किंवा रामायण व महाभारत ही काव्ये आहेत.
- विष्णूंच्या अवताराच्या कथा इ. असलेली १८ पुराणे आहेत. विष्णुपुराण व भागवतपुराण ही सर्वात महत्त्वाची व लोकप्रिय पुराणे आहेत.
- आगम किंवा पूजा ग्रंथ
- दर्शने किंवा तत्त्वज्ञान पद्धती
हिंदू तत्त्वज्ञानाच्या तीन प्रणाली आहेत.
- द्वैत -(माधवाचार्यांनी दिलेले) ह्या तत्त्वप्रणालीनुसार जीव हा परमेश्वराहून वेगळा आहे. ह्यामध्ये जीव परमेश्वराची आराधना आणि भक्ती करुन आनंद प्राप्त करतो आणि परमेश्वर त्याच्यावर पूर्ण कृपा करतो.
- अद्वैत – (शंकराचार्यांनी दिलेले) ह्या तत्त्वप्रणालीत असे मानले जाते की अखिल विश्व एकच आहे. आणि तो एक, विश्वामध्ये अस्तित्वात असणाऱ्या विविध रुपामधून स्वतःला प्रकट करतो. ह्यामध्ये मुळात असे शिकवले जाते की ते एकच दिव्यत्व प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. दुसऱ्याला दुखवू नका, असे केल्यास ते स्वतःला दुखावल्यासारखे होईल. तुम्ही तुमच्यावर प्रेम करता तसे प्रत्येकावर प्रेम करा.
ते वेदान्त दार्शनाचे श्रेणीबद्ध प्रस्तुतीकरण आहे. सर्व धर्मग्रंथांमध्ये उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे तीन ग्रंथ सर्वात महत्त्वाचे मानले जातात आणि ते अधिकृत आणि सर्वसमावेशक ग्रंथ आहेत त्यांना प्रस्थानत्रय असे म्हटले जाते. ते आपला मार्ग प्रकाशित करतात आणि आपल्याला सुरक्षितपणे भवसागर तर जाण्यास सहाय्य करतात.
हिंदू धर्माचे तत्त्वे आणि धर्मसंहिता
नैतिक शुद्धता आणि नीतिपूर्ण जीवन हे अध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय आवश्यक आहे. मनुष्य जीवनाची चार उद्दीष्टे ऋषींनी सांगितली आहेत. त्यांना ‘चतुर्विध पुरुषार्थ’ म्हणतात.
- धर्म – सदाचरण
- अर्थ – संपत्ती
- काम – इच्छा
- मोक्ष
अर्थाजन करताना (अर्थ)आणि गरजा आणि इच्छांची (काम) परिपूर्ती करताना म्हणजेच अर्थ आणि काम हे पुरुषार्थ करताना धर्माच्या तत्वाचे अनु पालन केले पाहिजे. मोक्ष प्राप्ती हे मनुष्यजन्माचे सर्वोच्च ध्येय आहे मनुष्याने स्मरण ठेवले पाहिजे. अयोग्य मार्गाने म्हणजेच अधर्माने कमावलेले धन ही खरी संपती नव्हे ,अखेरीस ती तुम्हाला दु:खाकडे घेऊन जाते.केवळ धर्माने कमावलेली धनदौलत तुम्हाला खरा आनंद देऊ शकते.
धन आणि हवेल्या ही खरी संपत्ती नाही. चारित्र्य हीच खरी दौलत आहे. धर्माचे आचरण करणाऱ्याचे धर्म रक्षण करतो.
मनुष्याच्या जीवनाच्या चार अवस्थेसाठी (कर्तव्य) आचार संहिता –
- ब्रह्मचर्याश्रमः विद्यार्थीदशा. बालपण आणि तारुण्यातील ही अवस्था मनुष्य जीवनाचा पाया आहे. या अवस्थेमध्ये संस्कृती आणि ज्ञान संपादन करणे, सुचारित्र्याची जडणघडण आणि शारीरिक आरोग्याचा विकास यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- गृहस्थाश्रम: गृहस्थ जीवनावस्था. हया अवस्थेमध्ये केवळ वैयक्तिक प्रगती आणि कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष न पुरवता त्याचबरोबर समाजाच्या प्रगती कडेही लक्ष दिले पाहिजे.
- वानप्रस्थाश्रम: भौतिक जीवनातून निवृत्त होऊन जंगलाकडे प्रस्थान करणे.भौतिक क्रियकलापातून निवृत्त होऊन स्वतः ला आध्यत्मिक क्रियाकलापांमध्ये गुंतवणे.
- संन्यासाश्रम: सर्वसंगपरित्याग
चार वर्ण पूर्वीच्या काळी समाजाच्या सामाईक ‘हितासाठी सहकार त्यावर ‘श्रमविभागणी’ या संकल्पनेवर आधारित वर्णव्यवस्था होती. चार वर्ण –
- ब्राह्मण समाजाचे आध्यात्मिक मार्गदर्शक/पालक – उदा. धर्मगुरु
- क्षत्रिय समाजाचे रक्षक – राजे, सरदार, राजपुत्र.
- वैश्य समाजाच्या व्यापारविषयक गरजा पुरविणारे – उदा. शेतकरी, व्यापारी, दलाल, पशुपालन करणारे.
- शूद्र कामगार वर्ग, श्रमणारे, स्वच्छता करणारे.
प्रत्येक वर्णाचे कर्तव्य समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कोणतेही काम उच्च किंवा नीच मानले जात नव्हते. स्वार्थी लोकांनी अस्पृश्यतेचा प्रघात पाडला. ईश्वराच्या दृष्टीपुढे सर्व समान असतात. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला एक कलंक आहे.
स्वामी म्हणतात, “येथे एकच जात आहे, मानवतेची जात”/p>
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रत्येक कर्तव्य सत्य, धर्म, शांती, प्रेम व अहिंसा या तत्त्वांचे पालन करून केले पाहिजे.
कर्माचा सिद्धांत आणि पुनर्जन्म ची तत्वप्रणाली
कर्माचा सिद्धांत आणि पुनर्जन्म ची तत्वप्रणाली
कर्माचे तीन प्रकार:
- प्रारब्ध कर्म: मनुष्याची जी संचित कर्म असतात त्यापैकी ज्या कर्माची फळ या जन्मात पाप भोगण्यासाठी परिपक्व झालेली असतात त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. ती भोगणे अनिवार्य असते अटळ असते.
- संचित कर्म: मनुष्याने अनेक जन्मात केलेल्या बऱ्या वाईट कर्मांना संचित कर्म म्हणतात. ही कर्मच मनुष्याची वर्तमानातील स्वभाव प्रवृत्ती ठरवतात.
- अगामी (क्रियामान कर्म): वर्तमान जीवनात केली जाणारी कर्म ज्याची फळे भविष्य काळामध्ये आपल्याकडे भोगण्यासाठी येतात.
हे समजावून सांगण्यासाठी पुढे एक दृष्टांत दिला आहे:
धान्य साठवून ठेवलेले कोठार हे संचित कर्माचे म्हणजेच अनेक गतजन्मातील साठवलेल्या कर्माचे प्रतिनिधित्व करते. त्या कोठारातून जेवढे धान्य आपल्याला आता वापरण्यासाठी काढले जाते ते आपल्या वर्तमान जीवनास जबाबदार असणाऱ्या प्रारब्ध कर्माचे प्रतिनिधित्व करते जे धान्य आता पिकते ते आपले क्रियामान कर्म आहे ते कोठारामध्ये टाकल्यावर संचित कर्म बनते.
जर आपण परमेश्वराशी शरणगत होऊन प्रत्येक कर्म परमेश्वराच्या पूजे समान कर्मफलाची अभिलाषा न बाळगता केले तर कर्माचा सिद्धांत आपल्याला लागू होत नाही. या प्रकारच्या कर्माला निष्काम कर्म वा कर्मयोग म्हणतात. अशा प्रकारच्या भक्ताचे परमेश्वर सदैव रक्षण करतो. त्याला त्याच्या जीवनातील दुःखाची कधीही जाणीव होत नाही आणि जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.’इदं न मम’, “ईश्वरार्पणम्” आपल्या सर्व कर्मांच्या बाबतीत आपला असा दृष्टिकोन असायला हवा.
बाबा म्हणतात ” सुख आणि दुःख तुमच्या स्वतःच्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळ आहेत. प्रथम हे सत्य तुम्ही जाणून घ्या. आणि चांगले जीवन आणि मृत्यू पश्चात जीवन प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांगले विचार, चांगलेउच्चार आणि चांगले कर्म यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. जे आपण पेरतो तेच उगवते कमी नाही वा अधिक नाही हे नेहमी ध्यानात ठेवा की तुम्हाला वाईट कर्माच्या कितीही मोठ्या राशी असोत जर तुम्ही प्रामाणिकपणे अंतकरणापासून परमेश्वराची प्रार्थना केलीत तर तुमची सर्व कर्म उन्हाळ्यात वितळणाऱ्या बर्फाप्रमाणे नाहीशी होतील.
म्हणून जर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायला हवी ती म्हणजे परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे.
हिंदू धर्माच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांपैकी अवताराची संकल्पना हे एक वैशिष्ट्य आहे.अवतार ह्या शब्दाची उत्त्पत्ती अवतरण ह्या शब्दापासून झाली आहे.त्याचा अर्थ ‘ येणे ‘ असा आहे.
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो,’जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी (परमेश्वर मानवी रूप धारण करून पुन्हा पुन्हा अवतरतो.धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी पृथ्वीवर येऊन गेलेले सर्व प्रेषित, संत, महात्मे, द्रष्टे ह्यांनाही आपण परमेश्वराचे अवतार म्हणू शकतो. हिंदू धर्मात विष्णूचे दहा अवतार मानले गेले आहेत. –
१. मत्स्य, २. कुर्म, ३. वराह, ४. नरसिंह, ५. वामन, ६. परशुराम,७. श्रीराम, ८. श्रीकृष्ण, ९. बुद्ध, १०. कल्की
बाबा म्हणतात, जेव्हा मुल रडत असते तेव्हा आई खाली वाकून त्याला उचलून घेते त्याचप्रमाणे परमेश्वरास मानवाप्रती असणाऱ्या प्रेम आणि वात्सल्य भावामुळे मानवाला माधव बनविण्यासाठी तो भूतलावर अवतरतो.
पूर्ण अवतारामध्ये आपण ऐश्वर्यम् (सर्व व्यापकत्व, सर्वज्ञता, सर्वशक्तीमानता), ज्ञान ,धर्म ,श्री (समृद्धी आणि महिमा), यशस् (कमी न होणारा नावलौकिक) आणि वैराग्य हे गुणविशेष अनुभवू शकतो.
हिंदू विधी:
विधी व संस्कार सर्व धर्मांमधील मुल वैशिष्ट्ये आहेत. आपले चित्त शुद्ध करण्यास, आपले हृदय निर्मल बनवण्यास व आपली वृत्ती अध्यात्मिक बनवण्यास आपल्याला ते सहाय्य करतात.
- जातकर्म व बालपणी अक्षराभ्यास
- बाल्यावस्थेत उपनयन: उपनयन म्हणजे गायत्री मंत्राच्या दीक्षित चा संस्कार. त्यानंतर गुरु त्याला आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी देण्यासाठी विद्यार्थी म्हणून गुरुकुलात घेऊन जातात.
- तारुण्यात लग्न संस्कार: अग्नीच्या साक्षीने आणि पुरोहितांनी केलेल्या मंत्रोच्चारणात हिंदू विवाह संपन्न होतो. वधू वरा मधील पवित्र बंधनाचा पवित्र अग्नी साक्षीदार असतो. त्यांच्या गृहस्थ सह जीवनाबरोबरच ते अध्यात्मिक मार्गावरील सह यात्रेकरू असून अध्यात्मिक उन्नतीसाठी ते दोघे मिळून प्रयत्न करतात.
प्रत्येक मनुष्याला दररोज संध्यावंदन पंचयज्ञ इत्यादी सारखे काही विधी करावे लागतात.
पंचमहायज्ञ
मनुष्य समाजामध्ये राहतो. दैनंदिन निर्वाहासाठी तो निसर्गावर अवलंबून आहे. जन्म आणि संगोपन यासाठी तो पालकांवर अवलंबून आहे. त्याचे शरीर हवा ,पाणी सूर्यप्रकाश, अन्न आणि हजारो दैनंदिन गरजा ह्या परमेश्वराच्या निर्मितीतील दैवी देणग्या आहेत. मनुष्याला परमेश्वर पालक उपदेशक आणि सह बांधवांप्रती दायित्व आणि कर्तव्य आहे. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि अजानतेपणे निर्मितीला इजा पोचवल्याबद्दल त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी मनुष्याने खाली दिलेले पाच यज्ञ केले पाहिजेत.
पंचमहायज्ञ:
- ब्रह्म वा (ऋषी) यज्ञ : पवित्र धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यामधील ते सांगितलेल्या नियमांचे आचरण करणे
- देवयज्ञ: देवांची व इष्टदेवतेची भक्ती करणे.
- पितृयज्ञ: पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि त्यांच्या आत्म्यास अर्पण करणे. यामध्ये आई-वडिलांची काळजी घेणे, त्यांचे क्षम कुशल पाहणे ह्याचाही समावेश होतो.
- भूतयज्ञ : पशु पक्षांना अन्न व चारा देणे
- मनुष्ययज्ञ: अतिथी व गरजूंचे स्वागत करून त्यांना अन्न देणे.
पूजा विधि
परमेश्वराची जवळीक व संवाद साधण्यासाठी भक्ती आपल्याला सहाय्य करते. सुरुवातीस परमेश्वर आपल्या बाहेर आहे असे समजून आपण त्याची भक्ती करतो. हळूहळू त्यामध्ये बदल घडून आपल्या हृदयात तो स्थित आहे असे मानून आपण त्याची भक्ती करू लागतो आणि त्यानंतर तो सर्वव्यापी परमात्मा आहे या भावनेतून आपण त्याची भक्ती करतो. मूर्तिपूजनात १६ उपचारांनी मूर्तीचे पूजन केले जाते ते षोडशोपचार खालील प्रमाणे.
- ध्यानम्: मनाची एकाग्रता
- आवाहनम्: आवाहन
- सिंहासनम्: त्याला बसण्यासाठी सिंहासन देणे.
- पाद्यम्: चरणांना पाणी देणे.
- अर्घ्यम्: आदरातिथ्य.
- स्नानम्: शुद्ध जलाने स्नान घालणे.
- वस्त्रम्: वस्त्र समर्पित करणे.
- यज्ञोपवितम्: जानवे घालणे.
- चंदनम्:चंदनाचे गंध लावणे.
- पुष्पम्: फुले वाह वाहणे.
- धूपम् : उदबत्ती धूप ओवळणे.
- दीपम् : दिप लावणे.
- नैवेद्यम्: नैवेद्य दाखवणे.
- तांबुम् : तांबूल (विडा) अर्पण करणे.
- निरांजनम्: निरंजन ओवाळणे.
- सुवर्ण पुष्पम् : कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुवर्ण वा एखादी मौल्यवान वस्तू अर्पण करणे.
परमेश्वराच्या सृष्टीतील कणाकणात परमेश्वराला पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये विकसित करण्यास हे उपचार सहाय्य करतात आणि आपले हृदय सर्व व्यापक बनवून परमेश्वराच्या निर्मितीतील प्रत्येक गोष्टीस प्रेम व आदर देण्यास शिकवितात.
हिंदू धर्मातील साधना:
साधना म्हणजे मुक्ती कडे नेणारे मार्ग. साधनेतील प्रमुख मार्ग.
- कर्म मार्ग
- भक्ती मार्ग
- ज्ञानमार्ग
- ध्यान मार्ग
I. कर्मयोग:
स्वतःला हृदयपूर्वक परमेश्वर चरणी शरणागत करून, कर्मफलाची अपेक्षा न ठेवता, प्रत्येक कर्म पूजेसमान करणे ह्याला कर्मयोग म्हणतात. ह्या प्रकारच्या कर्मास निष्काम कर्म म्हणतात. अशा प्रकारच्या भक्ताचे परमेश्वर सदैव रक्षण करतो. व त्याची जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते.
II. भक्ती योग:
आपण आपल्याला प्रिय असणाऱ्या परमेश्वराच्या कोणत्याही नाम आणि रूपाची निवड करून त्याची भक्ती करू शकतो. नवविधा (९)मार्ग खाली दिलेले आहेत
- श्रवणम: परमेश्वराच्या लीलांचे वर्णन करणे. उदा. परीक्षित.
- किर्तनम्: नारादमुनीं सारखे परमेश्वराचे गुणगान करणे.
- विष्ण स्मरणम्: प्रल्हादा सारखे अखंड स्मरण करणे.
- पादसेवनम्: निरंतर परमेश्वराच्या चरणांशी जुडलेल्या लक्ष्मीसारखी परमेश्वराची पादसेवा करणे. त्याच्या संपूर्ण निर्मितीमध्ये आपण त्यांचे रूप पाहून,गरजूंना सहाय्य करून त्यांची सेवा करणे.
- अर्चनम्: भरताने केलेल्या श्रीरामांच्या पादुकांच्या अखंड भक्ती सारखी परमेश्वराची अखंड भक्ती करणे.
- वंदनम्: अक्रूर सारखे परमेश्वराला विनम्र अभिवादन करणे.
- दास्यम्: आपल्या सहबांधवाची विनम्रतेने आणि आदराने सेवा करून
- सख्यम्: अर्जुनाने जसे भगवान श्रीकृष्णाशी मित्रत्वाचे नाते जोडले तसे परमेश्वराची मित्रत्व स्थापित करणे.
- आत्मनिवेदनम्: राधाभावा सारखे स्वतःला पूर्णतः परमेश्वराशी शरणागत करणे.
हनुमानासारखी परमेश्वराची निरंतर सेवा करणे.
III. ज्ञानयोग:
‘तत्वमसी’असे धर्मग्रंथांमध्ये घोषित केले आहे. हे परम सत्य घोषित करणारी चार महावाक्य आहे.
- प्रज्ञानम् ब्रह्म – प्रज्ञान हेच ब्रह्म.
- तत्वमसी – ते ब्रह्म तू आहेस.
- अयमात्मा ब्रह्म – हा आत्मा ब्रह्म आहे.
- अहम् ब्रह्मास्मि – मी ब्रह्म आहे.
पहिली दोन वाक्य गुरूंनी(ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे.) आदेशाद्वारे त्यांच्या शिष्यांसाठी केलेली घोषणा आहे. तिसरे वाक्य शिष्यासाठी आहे. त्यांनी त्यावर चिंतन करावे व अभ्यास करावा. चौथे वाक्य म्हणजे देवत्वाची अनुभूती घेतल्यानंतर शिष्यांनी उद्गारलेले वाक्य होय. हयाला अनुभव वाक्य म्हणतात. आपण परमेश्वर आहोत या सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी ज्ञानमार्ग ध्यान मार्गावर विशेष भर देतो.
याज्ञवल्कय ऋषींनी त्यांची पत्नी मैत्रीयीस सांगितले की महावाक्यांच्या सत्याचा बोध ह्याद्वारे होतो.
- श्रवणम्: महा वाक्यांचे श्रवण करणे.
- मननम्: जे श्रवण केले त्यावर चिंतन करणे.
- निदिध्यासन: सत्याची अनुभूती घेण्यासाठी मन एकाग्र करून त्याचे निरंतर स्मरण करणे.
सत्याचा शोध घेण्याअगोदर आपण आपले हृदय शुद्ध करायला हवे तसेच परमेश्वराला जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना अभ्यासासाठी साधनां चातुष्ट्य सांगितले आहे.
सत्याचा शोध घेण्याअगोदर आपण आपले हृदय शुद्ध करायला हवे तसेच परमेश्वराला जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना अभ्यासासाठी साधनां चातुष्ट्य सांगितले आहे.१. विवेक, २. वैराग्य,३. षडसंपत ४. मुमुक्षत्व. अशा ह्या चार साधना आहेत.
सर्वधर्माचे मूलतत्त्व असणाऱ्या परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला शारीरिक मानसिक भावनिक नैतिक व आध्यात्मिक ह्या सर्व स्तरावर सुसज्य करणे हे ह्या सर्व साधनांचे उद्दिष्ट आहे.
सनातन धर्म सर्वात्म भाव म्हणजे एकात्म भावावर विशेष जोर देतो. मनुष्याने केवळ स्वतःसाठीच नव्हे तर सर्व समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले पाहिजे.’समस्त लोक: सुखिनो भवन्तु,’ही हिंदू धर्माची प्रार्थना आहे. तसेच सर्वे भवन्तु सुखीन:l सर्वे सन्तू निरामय:l सर्वे भद्राणि पश्चन्तू l मा कश्चीत दुःख भाग भवेतl ही दुसरी प्रार्थना आहे. ह्या दोन्हीही प्रार्थनांची संकल्पना सारखीच आहे.
हिंदू धर्म हा सर्वांमध्ये समन्वय राखणारा सहिष्णु धर्म आहे. जो इतरांचा व त्यांच्या मतांचा आदर करतो. तसेच हा धर्म वैश्विक कल्याणाची इच्छा करतो. सारांश सांगायचा तर हिंदू धर्माची प्रमुख तत्वे खालील प्रमाणे.
- प्रत्येकामध्ये परमेश्वर आत्म्याच्या रूपाने विद्यमान आहे. तो एक आत्मा सर्व जिवांना (ब्रह्माशी )परमेश्वराची जोडतो. परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये आणि सर्वत्र विद्यमान आहे.
- सुख आणि दुःख हे दोन्ही आपली स्वतःची निर्मिती आहे आणि हे दोन्ही आपण करीत असलेल्या कर्मांवर आधारित आहे
- जोपर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेतो.
- धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि मानव जातीस सदा चरणाच्या मार्गावर वाटचाल करण्यास मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वर पुन्हा पुन्हा भूतलावर अवतरतो.
- सर्व मार्ग अखेरीस परमेश्वराला जाऊन मिळतात. आत्मसाक्षात्कार हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी धर्म आपल्याला सहाय्य करतो.