इस्लाम

Print Friendly, PDF & Email
इस्लाम

इस्लाम धर्मपंथ प्रेषित महंमदाने स्थापन केला. इस्लाम म्हणजे “शरणागती ” किंवा ” नम्रता”

इ. स . ५७० मध्ये ज्यावेळी मक्केत महंमदाचा जन्म झाला त्यावेळी अरेबियात अशांत स्थिती होती. देश अनेक जमाती आणि कुळांमध्ये विभागला गेला होता, आणि ते सतत एकमेकांशी भांडत असत. मोहम्मदचे पिता त्याच्या जन्माच्या दोन महिने आधीच इहलोक सोडून गेले होते. तो ६ वर्षाचा असतानाच त्याची आई अमीन मृत्यू पावली. त्याचे आजोबा व नंतर त्याचा चुलता तलीब यांनी त्याचे संगोपन केले.

मोहम्मदला शालेय शिक्षण मिळाले नाही. त्याला नेहमी काकांच्या मेढया चरायला वनात घेऊन जावे लागे. तो इतका प्रामाणिक, सरळ आणि सत्यवादी होता की लोक त्याला ‘अल-अमिन’ म्हणजे विश्वासार्ह म्हणून संबोधत.

वयाचा २५ व्या वर्षी खदिजा नावाच्या श्रीमंत विधवेशी त्याचे लग्न झाले.पण लग्नानंतर त्याने आपल्या व्यवसायाकडे फारसे लक्ष दिले नाही.प्रार्थना व ध्यान करण्यासाठी तो माऊंट हिरा पर्वतातील जाऊ लागला. वयाच्या ४०व्या वर्षापासून त्याला दिव्य साक्षात्कार होऊ लागले. त्याला देवदूत गेब्रियल याने सांगितले की परमेश्वराने त्याला ऐक्य आणि परमेश्वराचे सार्वभौमत्व, तसेच लोकांना नैतिक अधःपतनातून उन्नत करण्यासाठी त्याचा दूत म्हणून निवडला आहे.

जसा तो गावकऱ्यांच्या मूर्ती पूजा आणि अंधश्रध्देचा विरोध करु लागला, तसे मक्केच्या लोकांनी त्याचा छळ सुरु केला. आणि त्याला वेडा, जादूगार ठरवले. छळ असह्य झाल्याने त्याने मदिनाला प्रयाण केले. तिथे लोकांनी त्याचे स्वागत केले. अनेकांनी त्याचा नवीन धर्म स्वीकारला.

मोहम्मदची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि आता तो त्या शहराचा आणि शक्तिशाली जमिनीचा राजा झाला होता. त्याने मक्केकडे मोर्चा नेला आणि रक्तपाताविना मक्का जिंकली. ६३२ ए.डी.ला तीर्थक्षेत्र करुन मक्केला परतल्यावर तो आजारी पडला आणि त्याने शेवटचा श्वास घेतला.

मोहम्मदने पेटवलेली ज्योत संपूर्ण जगभर प्रसारित झाली आणि इस्लाम हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक झाला. आज जगात त्याचे ७०० दशलक्ष अनुयायी आहेत.

मोहम्मदचे संपूर्ण जीवन हे साधेपणा आणि लोकसेवेचे अद्वितीय उदाहरण होय. शिष्टाचार आणि करुणा, साधेपणा आणि नम्रता, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा हे त्याचे प्रमुख स्वभावविशेष. त्याचे शिष्टाचार आनंददायी असल्याने त्याला खूप मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळाले, ज्यांनी त्याच्यावर प्रेम आणि भक्ती केली. त्याने जे शिकवले त्याचे अनुसरणही केले.

पवित्र कुराण आणि हादिस

कुराण हा इस्लामचा पवित्र ग्रंथ आहे. गॅब्रियल या देवदूताकडून तो महंमदास मिळाला. सुरुवातीच्या काही भागात प्रेषित आणि देवदूत हे प्रथमवचनी बोलतात, बाकी सर्वत्र बोलणारा देव आहे. अरबी भाषेत ‘कुराण’ म्हणजे ‘पठण’. त्याची शिकवण लोकांसाठी मार्गदर्शक दीप, प्रेरणादायी आणि श्रद्धाळूंना योग्य मार्गदर्शक आहे. ते माणसाला स्वतःचे आचरण कसे असावे हे सांगत. ‘मुस्लिम’ शब्दाचा अर्थ “श्रद्धाळू” असा आहे.

वेदांप्रमाणे कुराणही मौखिक परंपरेने चालत आले. पण महंमदाच्या मृत्यूनंतर ३० प्रकरणात ते लिहून काढले गेले.

उपदेश

सर्वांचा निर्माता, पोषणकर्ता, एक अल्ला सर्वश्रेष्ठ असून केवळ तोच पूजनीय आहे. तो सर्वज्ञ, सर्वशक्तीमान, सर्वव्यापी, क्षमाशील आणि अत्यंत दयाळू आहे. अल्लाची पूजा करणे म्हणजे त्याचावर प्रेम करणे, त्याला समजणे,त्याचे उपदेश व नियम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पाळणे आणि मानवाची सेवा करूनच अल्लाची सेवा करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. जो देवावर, अंतिम-दिन, देवदूत, तत्ववेत्ते यांच्यावर विश्वास ठेवतो, गरजूंना जो आपली संपत्ती देतो, दासांना जो मुक्त करतो. निष्ठेने प्रार्थना करतो, जो दानधर्म करतो. जो दुःखात व प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखतो तो खरा सदाचरणी. जे प्रामाणिक व पापभीरू असतात ते असे असतात.

  1. एकाच देव (अल्ला) आहे आणि महंमद हा त्याचा दूत आहे. आपल्या बऱ्या वाईट कर्मबद्धल प्रत्येकजण स्वतः जबाबदार आहे. या ‘अखेरच्या न्यायावर’ इस्लामचा विश्वास आहे. प्रत्येकाने केलेल्या भौतिक कर्माचे फळ त्याला भोगावे लागते.
  2. मुस्लिमाने दिवसभरात पाच वेळा प्रार्थना करायलाच हवी. पहाटे, मध्यान्ही, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री. ते एकटे अथवा समूहाने प्रार्थना करु शकतात. ते मोहम्मदाचे जन्मस्थान, मक्केकडे तोंड करतात.
  3. रमझानच्या पवित्र महिन्यात त्यांनी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत उपवास करायलाच हवा. रमझान, अथवा चंद्र वर्षाचा ९वा पवित्र महिना हा पवित्र मानला जातो कारण परमात्म्याने संत मोहम्मदला क़ुराणचे श्लोक रामझानच्या काळात प्रथम सांगितले.
  4. मुस्लिमाने झकत (गरीबास दान) दिले पाहिजे. झकत देणे हे पूजा कार्य समजले जाते कारण एखाद्यास भौतिक संपन्नता प्राप्त होते त्यासाठी परमात्म्याजवळ कृतज्ञता व्यक्त करावयास हवी.
  5. शक्य असेल तर आयुष्यात एकदा तरी ‘हज’ (मक्का) यात्रा केली पाहिजे.

या शिवाय शेजाऱ्यांवर प्रेम, मनाची उदारता, मद्यनिषेध या गोष्टीही त्याने पाळल्या पाहिजेत. अल्लाला शरणागती व शांती ही इस्लामची प्रमुख तत्त्वे आहेत. ‘अस्सलाम आलेकुम ‘ (शांती असो) व ‘ व आलेकुम अस्सलाम ‘ (तुम्हालाही शांती ) हे एकमेकांना भेटल्यावर म्हणतात. आपण देवाचे आहोत व त्याच्याकडेच परतणार आहोत हे जाणले पाहिजे व देवाला आयुष्य अर्पण केले पाहिजे. अशी विनवणी कुराण मनुष्याला करते.

मक्का येथील काबा हा तेथील मस्जिदच्या अंगणात ठेवलेला दगड आहे. तो भरजरी काळ्या वस्त्राने झाकलेला असतो. या वस्त्रावर कुराणमधील श्लोक लिहिलेले आहेत.

चंद्रकोर आणि चांदणी हे इस्लाम संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. पाच कोनांची चांदणी म्हणजे इस्लामचे पाच खांब समजले जातात. मुस्लिम चंद्र वर्षामध्ये चंद्रकोरीचे केंद्रीय कार्य आहे. चंद्रकोर,रामझानच्या उपवासाची सुरुवात आणि शेवटही दर्शवते.

सूफी पंथ

सूफी पंथाचे मूळ इस्लाम मध्ये आहे. ईश्वरावरील प्रेमाचा हा धर्म आहे. अनेक बाबतीत हिंदू धर्माशी याचे साधर्म्य आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे असे ते मानतात. ते कोणालाही नाकारत नाहीत आणि कोणाचाही द्वेष करत नाहीत, अगदी नास्तिकाला देखील ! त्यांच्यासाठी सर्वकाही परमेश्वर आहे. भारतातील हिंदु – मुसलमानांमध्ये एकी करण्याचा प्रयत्न सूफी संतांनी केला आहे. १. बाबा फरीद गुंजशकर , २. निजामुद्दीन औकिया , ३. बाणा नुरुद्दीन हे काही प्रसद्धि सूफी संत आहेत. सर्व धर्म मूलतः एक असल्याचे हे संत सांगतात.

निष्कर्ष

परमेश्वर करत असलेल्या मानवजातीच्या कल्याणप्रद सोहळ्यामध्ये सर्व धर्म विविध शक्तींच्या रूपात कार्यरत आहेत. ते एकमेकांचे विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत.

धर्म कोणताही असो म्हणजेच मुक्ती प्राप्त करण्यास मदत हाच त्याचा उद्देश असतो.

‘परमेश्वराचे पितृत्व व मनुष्याचे बंधुत्त्व’ हाच सर्व धर्मांचा मूलभूत उपदेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: