कर्ण – एक निष्ठावान चारित्र्य असलेले व्यक्तिमत्त्व

Print Friendly, PDF & Email

कर्ण – एक निष्ठावान चारित्र्य असलेले व्यक्तिमत्त्व

महाभारताच्या महाकाव्यात अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व आहेत. परंतु कर्णाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत उच्चपदावर आहे. त्याच्याकडे अनेक अनुकरणीय सद्गुण होते.

अंग देशाचा राजा कर्ण दानशूर म्हणून सुप्रसिध्द झाला. कोणीही त्याच्याकडे कोणतीही गोष्ट मागण्यासाठी आला तर तो कधीही ‘नाही’ म्हणत नव्हता. कर्ण अर्जुनाचा तुल्यबळ स्पर्धक होऊ शकतो, असा इंद्राचा अंदाज असल्याने त्याने एक योजना आखली. तो ब्राह्मणाचा वेश घेऊन कर्णाकडे गेला.

ब्राह्मणाला पाहून कर्ण त्याच्या आसनावरून उठला व त्याला नमन केले. तो ब्राह्मण नसून इंद्र असल्याचे कर्णाला माहित होते. “हे आदरणीय ब्राह्मणा, मी तुमच्यासाठी काय करु शकतो?” कर्णाने विचारले. ब्राह्मण म्हणाला, “हे अंगराज मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या दानशूरतेविषयी मी खूप ऐकले आहे. मी एक गरीब ब्राह्मण आहे. मी तुझ्याकडे काही मागण्यासाठी आलो आहे.”

अदल्या रात्री, कर्णाला एक स्वप्न पडले. त्यामध्ये सूर्यदेवाने त्याला इंद्राची भेट व त्याचा हेतू ह्याविषयी इशारा दिला होता. परंतु दानाच्या बाबतीत कर्णाच्या मनात अन्य कोणताही विचार नसे. त्यामुळे तो अभिवादन करुन इंद्राला म्हणाला, “तुम्ही इंद्रदेव आहात हे मी जाणतो. अर्जुनाला लाभ व्हावा म्हणून तुम्ही माझी कवच कुंडले काढून घेण्यासाठी आला आहात. परंतु माझे शब्द मी मागे घेणार नाही. तुम्हाला जे हवे, ते मी देईन.”

इंद्राने कोणत्याही विवादात न पडता करणाकडे कवच कुंडले मागितली. कर्णानेही जराही विचार न करता त्वरित त्याची कवच कुंडले कापून दिली. कवच कुंडले काढून दिल्याने त्याची अर्धी शक्ती कमी होणार हे माहीत असूनही त्याने ती इंद्रास दिली. इंद्राने प्रसन्न होऊन त्यास एक शक्तिशाली बाण दिला. त्याची विशेषता अशी होती की त्या बाणाचा ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जाईल ती व्यक्ती जीवित राहणार नाही. परंतु त्या बाणाचा वापर एकाच व्यक्तीवर आणि फक्त एकदाच करता येईल.

दुर्योधन ज्याने कर्णाला अंगदेशाचा राजा बनवून प्रतिष्ठा करुन दिली व अंगराज ही उपाधी बहाल केली त्या जिवलग मित्रावर कर्णाचे अत्यंत प्रेम होते. म्हणून कोणत्याही प्रसंगात दुर्योधनाला भरभरुन सहयोग देण्याचे त्याने ठरवले. धृतराष्ट्राच्या दरबारात जाऊन कृष्णाने केलेल्या शिष्टाईस यश आले नाही. त्यानंतर कृष्णाने कर्णाला कौरवांच्या गोटातून विलग करण्याची योजना आखली. हस्तिनापूर सोडण्याआगोदर तो कर्णाच्या महलात गेला.

कर्णाने त्याचे अत्यंत आदरभावाने स्वागत केले. बसण्यासाठी उच्च आसन दिले. कृष्ण आनंद व्यक्त करुन त्याला उद्देशून म्हणाला, “हे प्रिय बंधु!” त्याचे हे शब्द ऐकून कर्णाला तात्काळ त्यामध्ये काहीतरी जाणवले. परंतु त्याने ते मनातच ठेवले व कृष्णाच्या आपुलकीच्या शब्दांना प्रतिसाद देत त्याने त्याच्या भेटीचे कारण विचारले. तो म्हणाला, “मी तुझी काही सेवा करु शकतो का?” कृष्ण म्हणाला, “हे प्रिय बंधो, मी तुझ्यामधील महान गुण जाणतो. म्हणून मी तुझ्याशी व्यक्तिगत बोलणी करण्यासाठी आलो आहे. प्रिय कर्णा, मी तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी आलो आहे, ज्याची तुला कदाचित माहिती नसेल.” ते कोणते कर्तव्य आहे? असे कर्णाने विचारल्यावर कृष्ण म्हणाला, “आता मी तुला अत्तापर्यंत दडवून ठेवलेले एक रहस्य सांगणार आहे. खरं सांगायचं तर तू कुंतीचा पुत्र आहेस. सूर्यदेवाच्या कृपेने तुझा जन्म झाला. परंतु बदनामीच्या भीतीने, तिने तान्हेपणीच तुला गंगा नदीमध्ये सोडून दिले. एक सारथी व त्याची पत्नी राधा ह्यांनी तुला पाहिले आणि घरी आणले. त्यांनीच तुला लहानाचा मोठा केला. आता तुला सत्य ज्ञात होण्याची वेळ आली आहे. ते जाणल्यावर तू तुझ्या खऱ्या लहान भावांच्या म्हणजे पांडवांच्या गोटात सामील झाले पाहिजे. पांडव सदाचरणी आहेत आणि कौरव अन्यायकारी आहेत हे तू जाणतोस. तू प्रामाणिक व्यक्ती आहेस हे मला चांगलं माहिती आहे. तू अधर्माची बाजू सोडून धर्माच्या बाजूस ये. तसे केले तर तू तुझ्या मातेस, कुंतीसही आनंद देशील.”

परंतु कर्णाची स्वतःची आचार संहिता होती. तो म्हणाला, “हे कृष्णा, तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस आणि तुला माहित नाही असा कोणताही धर्म नाही. माझी सांप्रत स्थिती व उच्च पद ह्यासाठी मी दुर्योधनाचा ऋणी आहे. ह्याशिवाय तो माझा जिवलग मित्र आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी, मी त्याची साथ सोडली तर तो अत्यंत दुःखी होईल.” कृष्ण त्याला प्रलोभित करण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, “कर्णा, तुला माहिती आहे, धर्मराज आणि त्याचे चार बंधू, आनंदाने तुला मोठा बंधू म्हणून स्वीकार करतील व तुझा राज्याभिषेक करतील. “परंतु कर्ण त्या प्रलोभनास बळी पडला नाही. तो म्हणाला, “मी माझ्या कर्तव्याचा त्याग करु शकत नाही. आगामी युद्धामध्ये ज्याला माझी नितांत गरज आहे, अशा माझ्या हितकर्त्याला व त्याच्या पक्षाला मी सोडू शकत नाही. मला क्षमा कर. मी कदाचित असफल होईन वा मला मृत्यू येईल. परंतु माझ्या व्यक्तिगत गौरव आणि आनंदासाठी मी कौरवांचा पक्ष सोडणार नाही. अखेरीस, पांडवांचा विजय होईल हे मी जाणतो परंतु त्यामुळे माझा निर्णय मी बदलणार नाही.”

आता कर्णाला अधिक आमिष दाखवणे व्यर्थ आहे हे कृष्णाने ओळखले व त्याची रजा घेतली. काही दिवस गेल्यानंतर कुंती स्वतः कर्णाकडे आली व त्याने कौरवांना सोडून पांडवांकडे यावे ह्यासाठी आर्जव केली. परंतु कर्ण त्याच्या निर्णयावर ठाम होता. तथापि त्याने त्याच्या आईला एक वरदान दिले की आगामी युध्दात तो पांडवांपैकी केवळ एका पांडवाला मारेल म्हणजे कुंतीचे पाच पुत्र जीवित असतील.

प्रश्न:

  1. इंद्राने त्याचा पुत्र अर्जुनाच्या हितासाठी कोणती योजना आखली?
  2. कृष्णाने कर्णाला कसे प्रलोभित केले?
  3. कर्णाकडे कोणती महान गुणवत्ता होती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: