प्राणिमात्रावर दया करा – १
प्राणिमात्रावर दया करा – १
छोट्यामोठ्या सर्व वस्तूंवर जो उत्कट प्रेम करू शकतो तोच सर्वोत्तम प्रार्थना करतो. कारण जो देव आपल्यावर प्रेम करतो तोच देव् सर्वांना निर्माण करतो आणि सगळ्यांवर प्रेम करतो. सर्व थोर व्यक्तींनी प्राण्यांवर प्रेम व दया केलेली आहे. दोन थोर माणसांची उदाहरणे. या विषयात लक्षणीय आहेत. दक्षिण भारतातील श्री रमण महर्षी आणि ब्रिटीश शास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन.
श्री रमण महर्षी केवळ जवळच्या व दूरच्या भक्तांनाच नव्हे तर पशुपक्षांनासुध्दा आकर्षित करीत असे. त्यांचा आश्रय म्हणजे कुत्री, गाई, माकड, खारी, मोर आणि इतरही अनेक पशुपक्ष्यांचे घरे होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या लोका इतकेच प्रेम आणि लक्ष ते या प्राण्यांकडे देत असत. कोणत्याही प्राण्यांचा ते नपुसकिलिंगात उल्लेख करीत नसत. तर नेहमी ‘ते’ किंवा ‘ती’ असे म्हणत असत. “आज पोरांना जेवायला दिल का रे?” अशी मोठया प्रेमाने ते कुत्र्यांविषयी चौकशी करत, आश्रमातला नित्य नियमच होता की जेवणाच्या वेळी आधी कुत्र्यांना खाऊ घातले जात असे, मग भिकारी आणि शेवटी भक्तांचे जेवण होत असे.
एकदा एक माकडीण आपले पिल्लू घेऊन महर्षीपाशी आली. भक्तमंडळी तिला हाकलून देण्याचा प्रयत्न करू लागली कारण तिच्यामुळे प्रार्थनामंदिराची स्थिती बिघडेल असे त्यांना वाटले. पण महर्षी म्हणाले, “तिला येऊ द्या, तिला अडवू नका, ती तुमच्याप्रमाणेच आपली मुलगी मला दाखवायला आणि आशीर्वाद मागायला माझ्याकडे आली आहे.” आश्रमात एक गाय होती, महषींनी तिचे नाव लक्ष्मी ठेवले होते. भक्तांच्या मेळाव्यात इतर कोणाकडेही लक्ष न देता ती सरळ महर्षिपाशी जात ऐसे. त्यांनी तिच्यासाठी केळी किंवा इतर फळे तयार ठेवली असतील याची तिला खात्री असे. आश्रमाताल्या सगळ्यांची ती आवडती झाली होती. लक्ष्मीने तीन वासरांना महर्षींच्या जयंतीध्या दिवशी जन्म दिला होता.
लक्ष्मी म्हातारी झाली, आजारी पडली, तिचा अंतकाळ जवळ आलेला दिसू लागला. त्याच क्षणी महर्षी तिच्यापाशी आले, “माते, मी तुझ्यापाशी बसायला हवे काय? असे म्हणून ते तिच्या शेजारी बसले. तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले. एक हात तिच्या मस्तकावर ठेवला. आणि दुसऱ्या हातांनी तिला थोपटू लागले. त्यानंतर थोडयाच वेळात लक्ष्मीने शांतपणे देह ठेवला. मनुष्याच्या करतात त्या सर्व और्ध्वदेहिक क्रिया केल्यानंतर आश्रमाच्या आवारात एक हरिण, एक गाय व एक कुत्रा यांच्या समाधीशेजारी तिला पुरण्यात आले.
तिच्या समाधीवर एक चौकोनी दगड बसविण्यात आला आणि त्यावर लक्ष्मी सारखी दिसणारी गाईची मूर्ती बसविण्यात आली.
महर्षींचे प्राण्यांविषयी दया प्रेम आणि आदर हे असे होते.
प्रश्न:
- रमण महर्षींनी या उदाहरणाने भक्तांना काय शिकवले?
- हे प्राणी मरण पावल्यायर त्यांच्या समाध्या का बांधल्या गेल्या?
- माणसांच्या प्राण्यांविषयी प्रेमाचे तुम्ही वाचलेले, ऐकलेले किंवा पाहिलेले उदाहरण तपशीलवार लिहा.