शांतिदूत श्रीकृष्णाची शिष्टाई

Print Friendly, PDF & Email
शांतिदूत श्रीकृष्णाची शिष्टाई

युद्धापासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीतोपदेश करून कौरवांशी युद्ध करावयास उद्युक्त केले. यामुळे पुष्कळ लोकांना भगवान श्रीकृष्ण युद्धपिपासू वाटतात. खरे पाहिले तर, कौरवपांडवांचे युद्ध टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न श्रीकृष्णानेच केला. वनवास भोगून परत आल्यावर पांडवाचे बळकावलेले राज्य परत करण्याचे कौरवांनीच नाकारले होते. कौरवांमध्ये पांडवांबद्धल, सर्वत्र, शत्रुत्वाचेच वातावरण होते. कौरवपांडवांमध्ये जर समेट झाला तर हे भीषण महायुद्ध टळेल; तेव्हा हा संहार टाळण्यासाठी आणि दोन्ही पक्षात शांती प्रस्थापित व्हावी, म्हणून एक अखेरचा प्रयत्न करण्यासाठी, धर्मराज आणि सर्व पांडव यांचेतर्फे खास शांतीदूत म्हणून कौरवांच्या दरबारात राजा धृतराष्ट्राकडे जाण्याचे भगवान् श्रीकृष्णाने ठरविले.

हस्तिनापुरकडे प्रयाण करण्यापुर्वी श्रीकृष्णाने पांडवांशी सल्लामसलत केली. त्यांनी आपली मते सांगितली. सात्यकीला घेऊन श्रीकृष्ण हस्तीनापूरला आला. आपल्या डामडौलाचे आणि ऐश्वर्याचे प्रदर्शन करून, श्रीकृष्णाला खुश करावे, या इराद्याने, कौरवांनी बारीकसारीक तपशीलांचा विचार करून, श्रीकृष्णाच्या स्वागताची तयारी केली होती. कर्ण व आपल्या बंधुंसामवेत, स्वत: हस्तिनापूराच्या वेशीवर स्वागत केले. हस्तिनापुरच्या राजप्रासादात निवास करण्याचे आणि कौरवांचा पाहुणचार (भोजनादि) स्वीकारण्याचे पण, त्यांनी श्रीकृष्णाला आमंत्रण दिले. विनम्रतेने श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, “हे कुरुबंधुनो! तुमच्या शत्रूंचा खास दूत म्हणून मी येथे आलो आहे. तत्यानुसार ईप्सितकार्य साध्य झाल्याशिवाय दूताने यजमानाकडे भोजन घेऊ नये” याप्रमाणे बोलून तेथून जवळच असलेल्या विदुराच्या घरी श्रीकृष्ण गेला.

श्रीकृष्णाच्या या अत्यंत अनपेक्षित आगमनामुळे विदुराला सानंद आश्चर्य वाटले. खाली वाकून विदुराने श्रीकृष्णाबद्दलचा पूज्यभाव व्यक्त केला. विदुरासारख्या आपल्या भक्तांच्या घरी रहाणे हे श्रीकृष्णाला फारच रुचले. विदुर श्रीकृष्णाला म्हणाला, “हे प्रभो! शांतिदूत म्हणून येथे येण्याचा आपण वृथा त्रास का घेतलात? कौरव याला लायक नाहीत. तुला तर माहितच आहे की कौरवांना युद्धाची फार खुमखुमी आहे.” मंद स्मित करून श्रीकृष्ण म्हणाला, “प्रिय विदुरा, प्रत्येकाच्या मनात काय आहे ते मी जाणतो. दुर्योधन आणि त्याचे बंधू, समेट करतील अशी माझी अपेक्षाच नाही, वा नव्हती. परंतु मला असे वाटले की मोठा रक्तपात टाळण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे. या दृष्टीने, हा शेवटचा प्रयत्न मी करून पहाणार आहे.”

यानंतर श्रीकृष्णाचे राजा धृतराष्ट्र, दुर्योधन, भीष्म, द्रोण आणि कर्ण यांनी स्वागत करून त्याला बसावयास योग्य आसन दिले. सभोवताली पाहिल्यावर श्रीकृष्णाच्या असे लक्षात आले की अनेक पूजनीय आणि वंदनीय ऋषिमुनींसाठी सुयोग्य आसनव्यवस्था नाही. तेव्हा श्रीकृष्णाने कौरवांना असे सांगितले की या वंद्य ऋषिमुनींच्या आसनांची योग्य ती व्यवस्था झाल्यावरच, मी माझे आसन ग्रहण करीन.” जेव्हा सभेतील सर्व मंडळी बसली, तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या विशेष कामगिरीचे आणि शिष्टाईचे स्वरूप स्पष्ट करण्यास सुरूवात केली. श्रीकृष्ण म्हणाला, या सभेला हजर असलेल्या इतक्या पूज्य व्यक्तीसमोर मी. राजा धृतराष्ट्राला, अतिशय कळकळीची विनंती करत आहे. त्याने पूर्वी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, पांडवांना, त्यांच्या राज्याचा हिस्सा परत करावा. यामुळे अनावश्यक रक्तपात टळेल आणि चिरकाल टिकणारी शांती, सर्वत्र नांदेल.” भीष्म , द्रोण आणि इतर वृद्ध मंडळींनी श्रीकृष्णाच्या द्रीष्टीकोनाला ताबडतोब दुजोरा दिला. दुर्योधनाने मात्र, मोठ्या आवेशाने, राज्यविभाजनाला आपला तीव्र विरोध दर्शविला. अविचारीपणाने, तो एकदम बहकून म्हणाला, “हे कृष्णा, पांडवांना जाऊन सांग की, काहीही झाले तरी तुम्हाला एक इंचभर भूमीदेखील मिळणार नाही. आम्ही युद्धाला तयार आहोत!”

आपल्या पुत्राच्या दुराग्रहामुळे राजा धृतराष्ट्र जरी मनातून सुखावला असला तरी वरकरणी दुर्योधनाला समजुतीचे चार शब्द सांगण्याचा आणि त्याचे मन वळवण्याचा दुबळा प्रयत्न त्याने केला! स्वतः गांधारीने पण दुर्योधनाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला समंजसपणे वागण्यास सांगितले. परंतु कर्ण आणि इतर विश्वासु अनुयायांच्या जोरावर दुर्योधनाने आपले ताठर धोरण सोडले नाही. सरतेशेवटी श्रीकृष्ण म्हणाला, “पांडव दुर्बल असे समजू नका. भीम आणि अर्जुन यांचा महापराक्रम आणि धर्मराजाचा न्यायाधिष्ठित सात्त्विक क्रोध, हे सर्व जगाचा विनाश करायला समर्थ आहेत. परंतु समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी पांडवांना शांती हवी आहे. याचमुळे, मी पुनः एकवार तुम्हा सर्वांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करून तडजोड करावी असे सुचवतो.” सत्तेने धुंद झालेल्या कौरवांच्या बधिर कानांना श्रीकृष्णाचे हे शब्द कसे ऐकू जाणार? उलट, श्रीकृष्णालाच बंदिवान करून तेथे ठेवण्याच कट कौरवांनी रचला. त्यावेळी मात्र, क्षणभर, आपले विराटस्वरूप श्रीकृष्णाने दाखवले. ते पहाण्यासाठी, अंघ राजा धृतराष्ट्राला पण, त्याने काही क्षण दिव्यदृष्टीचा लाभ दिला. भगवान् श्रीकृष्णाच्या या विराट दर्शनाने सर्व कौरव कमालीचे गोंधळून गेले आणि आपापल्या जागी स्तंभित होऊन राहिले.

त्यानंतर, विदुर आणि सात्यकी यांचे सह, श्रीकृष्णाने कौरवांच्या राजसभेतून प्रयाण केले. महायुद्ध टळावे आणि जगात शांती नांदावी यासाठी, भगवान श्रीकृष्णाने, हा शेवटचा प्रयत्न केला होता. अधर्माचे संपूर्ण उच्चाटन करून, धर्माचा विजय साधण्यासाठी कौरवपांडवांचे युद्ध हे अटळ आहे. हे अर्थात, त्याला ज्ञात होतेच!

प्रश्न
  1. कृष्णाच्या हस्तिनापूर भेटीमागे त्याचा मुख्य उद्देश काय होता?
  2. कौरवांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळाला?
  3. आपणच परमेश्वर आहोत हे कृष्णाने त्यांना कशा प्रकारे दाखवून दिले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *