लिखित जप
लिखित जप
“लिखित जप” हा एक आध्यात्मिक साधनेचा प्रकार आहे. ज्यामध्ये साधक परमेश्वराचे नाम लिहिण्यात गुंतलेले असतात. संस्कृतमधील ‘लिखित’ शब्दाचा अर्थ ‘लिहिणे’ असा होतो. ‘जप’ म्हणजे परमेश्वराचे नाम लिहिणे म्हणून लिखित जप म्हणजे पुन्हा पुन्हा परमेश्वराचे नाम लिहिणे.
‘लिखित जप’ कसा करावा?
तुमच्या दिनचर्येतील थोडासा वेळ बाजूला काढून, एखाद्या शांत जागी वा देवासमोर थोडा वेळ डोळे मिटून बसावे. परमेश्वराचे चिंतन करून एक दीर्घ श्वास घ्यावा. त्यानंतर डोळे उघडून परमेश्वराचे नाम लिहिण्यास सुरुवात करावी. राम, राम, राम वा ॐ साई राम वा कृष्ण इ. आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहावे. परमेश्वराचे चिंतन करून त्याचे नाम लिहिताना, त्याचे मोठ्या आवाजात उच्चारणही करावे ही त्यामागची संकल्पना आहे. त्याने तुमचे मन, वाणी आणि हात पुनीत होतील “मन, वाणी, आणि कृती ह्या मधील सुसूत्रता तुमच्या विचार, उच्चार आणि आचारामध्ये शुद्धता निर्माण करते.”
स्वामी ह्यावर विशेष भर देतात. “लिखित जपासारखी कोणतीही आध्यात्मिक साधना अंत:करण पूर्वक केली पाहिजे. तरच ती पवित्र आणि दैवी बनते.” स्वामी पुढील मुद्यावर विशेष भर देऊन सांगतात. “आजकाल लोकं त्यांच्या मनामध्ये, मोठ्याने परमेश्वराचे नाम न घेता, व मुखाने मोठ्या आवाजात नाम उच्चारण न करता केवळ परमेश्वराच्या नामाचे लेखन करतात. तुम्ही लिखित जप सुरु केल्यावर प्रथम त्या नामावर मनामध्ये चिंतन करा, ध्यानकरा. मुखाने त्याचा उच्चार करा आणि त्यानंतर तुमच्या हाताने ते नाम पुन्हा पुन्हा लिहा”
[सनातन सारथी, ऑगस्ट १९९५]