महात्मा गांधी

Print Friendly, PDF & Email
महात्मा गांधी

वंश

मोहनदास करमचंद गांधींचा जन्म २ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला मोहनचे वडील करमचंद गांधी काबा गांधी या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. सुरुवातीला त्यांचे वडील पोरबंदर चे दिवाण होते आणि त्यानंतर ते राजकोटचे दिवाण बनले.

शिक्षण

मोहनदासांचे पूर्व प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे झाले, राजकोट येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले त्यानंतर माध्यमिक शाळेतून ते मॅट्रिक झाले आणि त्यांनी भावनगरच्या सामलदास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, १८८५ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या वडिलांच्या स्नेह्यांनी असे सुचवले की जर मोहनदासांना राज्यसेवेत त्यांच्या वडिलांच्या जागी काम करायचे असेल तर ते इंग्लंडला जाऊन तीन वर्षाचा बॅरिस्टरचा कोर्स करू शकतात.

गांधींना ती कल्पना आवडली. त्यांनी मांसाहार करू नये मद्यपान करू नये आणि अनैतिक जीवन जगू नये अशी त्यांच्या आईने त्यांना शपथ घातली. ती शपथ घेऊनच गांधीजी इंग्लंडला जाण्यासाठी जहाजावर चढले. कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते पुन्हा भारतात परतले.

सुरुवातीच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग
  • एकदा त्यांनी श्रावण बाळाची गोष्ट वाचली. ज्यामध्ये श्रावण बाळ त्याच्या वृद्ध आणि अंध माता पित्यांना दोन कावडींमध्ये बसवून ती कावड खांद्यावर घेऊन जात होता.
    वृद्ध माता पित्यांविषयी असणारी त्याची भक्ती मोहनच्या हृदयाला स्पर्शून गेली. श्रावण बाळाप्रमाणे आपल्या माता-पित्यांची सेवा करण्याचा त्यांने संकल्प केला.
  • एकदा मोहननी हरिश्चंद्राच्या जीवनावरील नाटक बघितले ज्यामध्ये तो सत्याचे समर्थन करण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग करतो आणि सर्व प्रकारचे दुःख सोसतो. ह्या नाटकाने मोहनचे अंत:करण हेलावून गेले. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. त्यांनी निर्धार केला की हरिश्चंद्रासारखे कधीही सत्याचा मार्गावरून ढळायचे नाही आणि त्याच्यासारखे सदैव सत्यवादी आणि प्रामाणिक राहायचे. गांधींची आई पुतळीबाई दररोज कोकिळा व्रत करत असत. व्रताचे विधी आटोपल्यानंतर, न्याहरीच्या आधी त्या कोकिळेची साद ऐकण्यासाठी प्रतीक्षा करत.
    कोकिळेचे सुरेल गान ऐकल्याशिवाय त्या अन्नाला स्पर्शही करत नसत. एक दिवस त्या खिडकीमध्ये बसून कोकिळेच्या आवाजाची दीर्घकाळ प्रतीक्षा करत होत्या परंतु कोकिळेची कुठेही चाहूल नव्हती. लहानग्या मोहनने आपल्या आईला त्रास होतोय हे जाणले. त्याच क्षणी त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो घराबाहेर गेला व त्याने कोकिळेच्या आवाजाची नक्कल केली. धावतच घरामध्ये येऊन तो आईला म्हणाला, ” आई कोकिळेने साद घातली आहे आता तू जेवण करू शकतेस.” गांधींची आई अनेक वर्ष हे व्रत करत असल्यामुळेआपल्या मुलाचा खोडसाळपणा त्यांचा लगेचच लक्षात आला. अतिव दुःखाने त्यांनी आपल्या मुलाच्या गालावर चपराक दिली आणि त्या आक्रोश करू लागल्या, ” हे परमेश्वरा!मी असे कोणते पाप केले की असा पापी आणि खोटे बोलणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला.” त्यांचे विदिर्ण अंत:करण आणि अश्रूपूर्ण डोळे पाहून मोहनला गहिवरून आले. त्याच दिवशी त्यांने आईला वचन दिले,” आज पासून मी पुन्हा कधीही खोटे बोलणार नाही. माझ्या आईचे कोमल अंत:करण दुखावले जाईल असे मी काहीही करणार नाही.” अशा प्रकारे त्यांची सत्याची गाथा सुरू झाली
  • बालपणी गांधी खूप भित्रे होते. त्यांना त्यांच्या घरातील अंधाऱ्या ठिकाणी जाण्याची सुद्धा भीती वाटे. त्यांना भुतेखेते चोर आणि सापांची खूप भीती वाटे. एकदा त्यांच्या घरातील रंभा नावाची नोकराणी त्यांना म्हणाली,” तू एवढा का भीतोस? रामाचे स्मरण कर! राम सदैव तुझे रक्षण करतील. जो रामाचे स्मरण करतो त्याला कधीही भीतीचा सामना करावा लागत नाही.” त्या शब्दांनी ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी रामनाम घेण्यास सुरुवात केली.
  • राजकोट मध्ये राहत असताना, त्यांचे पारशी आणि मुस्लिम मित्र त्यांच्या घरी वारंवार येत असत आणि त्यांच्या धर्मातील चांगल्या गोष्टींविषयी गांधींशी ते चर्चा करत असत. या चर्चेमधून, त्यांच्या मनात सर्व धर्मांविषयी प्रेम जागृत झाले.
  • एकदा त्यांच्या शाळेमध्ये एक इन्स्पेक्टर भेट देण्यासाठी आले मुलांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी काही शब्द त्यांना लिहिण्यास सांगितले. मोहनला त्या शब्दांमधील एका शब्दाचे योग्य स्पेलिंग लिहिता येत नव्हते. त्याच्या शिक्षकांनी त्याला शेजारच्या मुलाच्या पाटीवरील स्पेलिंग पाहून लिहिण्यास सांगितले परंतु मोहनला कोणालाही फसवणे आवडत नसल्यामुळे मोहनने तसे केले नाही. परिणाम स्वरूप मोहन सोडून इतर सर्व मुलांनी सर्व शब्दांचे योग्य स्पेलिंग लिहिले. वर्ग झाल्यानंतर शिक्षक मोहनला रागवले. मोहन अत्यंत व्यथित झाला परंतु खोल अंतरंगात त्याला माहीत होते की त्याने जे केले ते योग्य होते.
  • एकदा मोहनच्या एका मित्राने त्याची खात्री पटवून दिली की ब्रिटिश लोक मांसाहारी आहेत आणि त्यातून त्यांना शक्ती मिळते म्हणून ते भारतावर राज्य करू शकतात. हे ऐकल्यावर त्यांनी शाकाहारी कुटुंबातील असूनही, देशभक्तीच्या कारणास्तव, गुप्तपणे मांसाहारी पदार्थाची चव घेतली. एक तुकडा चावल्याननंतर त्यांना असे वाटले की जणू काही जिवंत मेंढी त्यांच्या आत मध्ये विव्हळत आहे. ते खोटं बोलण्याचा आणि पालकांना फसवण्याचा विरुद्ध होते म्हणून अखेरीस त्यांनी मांसाला स्पर्श न करण्याचे ठरविले.
देशासाठी योगदान
चंपारण आणि खेडा सत्याग्रह

गरीब शेतकऱ्यांच्या विनंतीवरून गांधीजी चंपारणला गेले. तेथील गरीब स्थानिक शेतकऱ्यांना, ब्रिटिश सक्तीने त्यांच्या जमिनीच्या १५% भागामध्ये नीळ उत्पादन करायला लावत आणि उरलेल्या जमिनीवर लावलेल्या धान्यामधील काही भाग ते भाड्याच्या स्वरूपात त्यांच्याकडून घेत असत याशिवाय त्यांनी त्यांच्यावर जाचक करही लादला होता.त्यावेळेस गुजरात मधील खेडा गावामध्येसुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. गांधीजींनी गावकऱ्यांना हाताशी धरून गावामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी गावांमध्ये स्वच्छता करणे, शाळा,हॉस्पिटल बांधणे इत्यादी कार्यें हाती घेतली. गावांमधील प्रमुख व्यक्तींना समाजातील अनेक जाचक प्रघातांच्या विरोधात निषेध नोंदवण्यास प्रवृत्त केले.अराजकता निर्माण करण्याच्या आरोपाखाली ब्रिटिशांनी गांधींना अटक केली. तथापि पोलीस स्टेशनच्या बाहेर शेकडो लोकांनी जमा होऊन निषेध नोंदवला. त्यांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली कोर्टाने नाखुशीने त्यांची मागणी मान्य केली. ह्या आंदोलनादरम्यान लोकं त्यांना ‘बापू’ म्हणून संबोधू लागले.

असहकाराची चळवळ

अहिंसक मार्गाने निषेध व्यक्त करणाऱ्या राष्ट्रव्यापी चळवळींपैकी असहकाराची चळवळ ही पहिली चळवळ गांधींनी सुरू केली. भारतामध्ये गांधींच्या कालखंडात ही चळवळ अधिकृतरित्या सुरू झाली. त्या चळवळीमधून शैक्षणिक संस्थांवर, परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला आणि लोकांनी त्यांच्या सरकारी नोकऱ्या आणि पदव्यांचा त्याग केला.

सविनय कायदेभंग चळवळ

सविनय कायदेभंग चळवळ ही गांधींनी सुरू केलेली अजून एक अहिंसक मार्गाने निषेध व्यक्त करणारी चळवळ होय. सर्व बाबींमधील पाठिंबा काढून घेऊन ब्रिटिश राजवट संपुष्टात आणणे हे या चळवळीचे ध्येय होते. जमीन महसूल, मिठावरील कर, लष्करी खर्चामध्ये कपात आणि विदेशी कपड्यांवरील कर इत्यादी गोष्टींच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

चले जाव आंदोलन

ऑगस्ट 1942 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली “चले जाव” आंदोलनाची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांशी वाटाघाटी कराव्यात हे त्या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. भारताला त्वरित स्वातंत्र्य मिळावे यासाठी रणशिंग फुंकण्यात आले. आणि त्याचे घोषवाक्य होते “जिंकू किंवा मरु.” तथापि गांधींच्या भाषणानंतर लगेचच नेत्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्या नेत्यांची सुटका करण्यासाठी गांधींनी, त्यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीची पर्वा न करता २१ दिवसाचे उपोषण सुरू केले त्यामुळे ब्रिटिशांना नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी लागली.

भारताचे स्वातंत्र्य

चले जाव”चळवळी नंतर स्वातंत्र्य लढा अधिकच तीव्र झाला. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी संपूर्ण भारत एकवटला. पूर्ण स्वराज्या विषयीच्या भावनांचा आक्रोश तीव्र झाला. अनेकांनी केलेला त्याग आणि प्रयत्नांमुळे १५ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य लाभले.

राष्ट्रपिता

भारतामध्ये महात्मा गांधीजींना आदराने राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. स्वतंत्र भारताची घटना तयार होण्याच्या खूप आधी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी प्रदान करण्यात आली. कस्तुरबांच्या निधनानंतर,नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना पाठवलेल्या शोकसंदेशात पहिल्यांदा असा उल्लेख केला.

महात्मा गांधी आणि अध्यात्म
  • महात्मा गांधी धर्म,अध्यात्म, नीतिमत्ता आणि नीतीतत्त्वांना मानत होते. तसेच वास्तविक जीवनातील सर्व क्रियाकलाप मग ते वैयक्तिक असो वा सामाजिक, आत्मसाक्षाकाराच्या शोधाशी जोडलेले असावेत असेही ते मानत.
    त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातील प्रस्तावनेत म्हटले आहे: “मला काय प्राप्त करायचे आहे… तीस वर्षांपासून मी ज्यासाठी तळमळतो आहे आणि प्रयत्नशील आहे ते म्हणजे आत्मसाक्षात्कार, परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन, मोक्षप्राप्ती होय.”
  • गांधींविषयी आईन्स्टाईनने म्हटले आहे, “असा हाडामासाचा मनुष्य पृथ्वीतलावर वावरतोय, अशा गोष्टींवर लोकं क्वचितच विश्वास ठेवतात.”
  • गांधीजी अत्यंत शिस्तबद्ध होते, विशेषतः वेळ,पैसा आणि कागद यांच्या अपव्ययाच्या ते पूर्णतः विरोधात होते. कागदाच्या बाबतीत उदाहरण द्यायचे तर छोटासा कागदाचा तुकडाही ते नोंदी करण्यासाठी जपून ठेवत. पैशाचा संदर्भात सांगायचे तर ते नेहमी तृतीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत. वेळेच्या संदर्भात सांगायचे तर त्यांचे नेहमी कमरेला अडकवलेल्या पॉकेट घड्याळाकडे लक्ष असायचे.
  • भारतातील गरिबातील गरीब लोकांना स्वीकारार्ह होईल असा पोशाख गांधीजी करत होते तसेच लोकांनी खादीचा वापर करावा यासाठी प्रसार करत होते.
  • आठवड्यातून एक दिवस गांधीजी मौन पाळत होते. मौन पाळल्याने त्यांना आंतरिक शांती प्राप्त झालीआणि मौनाने त्यांना उत्तम श्रोता बनवले.
  • गीतेमध्ये कृष्ण म्हणतो की देहत्याग करताना मनुष्याच्या ओठांवर परमेश्वराचे नाम असायला हवे आणि गांधींनी नेमके तेच केले.दोनदा “हे राम”म्हणत ते खाली कोसळले. नामस्मरण विषयी त्यांची दृढ प्रतिबद्धता व्यक्त करताना त्यांनी एकदा म्हटले, “माझा श्वास कदाचित थांबेल परंतु माझे नामस्मरण थांबणार नाही.”
  • स्वामी नेहमी म्हणतात, “गुरूंची आज्ञा पाळा. तुमची आंतरिक जाणीव तुमचा गुरु आहे.” गांधी नेहमी नेमक्या याच गोष्टींचे पालन करत.त्याचे उदाहरण म्हणजे, १९२० साली गांधींनी जेव्हा असहकाराच्या चळवळीची सुरुवात केली तेव्हा त्यांनी तो लढा पूर्णतः अहिंसक असेल अशी कल्पना केली होती परंतु सत्याग्रह सुरू करण्याच्या दरम्यान, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या काही जहाल मतवादी लोकांनी चौरी चौरा पोलीस स्टेशनवर हल्ला करून ती इमारत पेटवून दिली आणि त्यामध्ये अनेक पोलीस जळून मृत्युमुखी पडले. या घडलेल्या प्रसंगाने गांधी अत्यंत उद्विग्न झाले. त्यांनी ताबडतोब असहकाराची चळवळ मागे घेतली आणि स्वतः प्रायश्चित्त घेण्यासाठी उपोषणास सुरुवात केली. गांधींनी अनेकदा असे करून घोषित केले की त्यांनी ती विशिष्ट मोहीम सुरू करून खूप मोठी घोडचूक केली होती.
  • विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की गांधींचा राजकीय संघर्ष त्यांच्यासाठी आध्यात्मिक प्रवास बनला. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. एकदा ब्रिटिशांनी लादलेल्या, गरिबांसाठी अत्यंत जाचक ठरलेल्या, मिठावरील दंडात्मक कराच्या विरोधात गांधीजींनी आंदोलन करायचे ठरविले. त्यांनी सुरू केलेले ते आंदोलन मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखले जाते. लोकांनी समुद्रकिनाऱ्यावरती चालत जावे तेथील थोडेसे पाणी घेऊन त्याचे बाष्पीभवन करून मीठ बनवावे असा गांधींनी आदेश दिला. ही विरोधाची निशाणी होती आणि घोषणाही होती की समुद्र ही ईश्वरी देणगी आहे मनुष्याला त्यावर कर लादून संपत्ती गोळा करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यानुसार एका विशिष्ट दिवशी भारतातील सर्व किनार पट्ट्यांवरील समुद्रकिनाऱ्यांवर निषेध यात्रा आयोजित करण्यात आल्या. गुजरात मधील दांडी गावातून गांधींनी स्वतः त्यांच्या नेतृत्वाखाली एक निषेध यात्रा काढली जी दांडी यात्रा म्हणून ओळखली जाते.
  • दांडी यात्रेच्या सुरुवातीस, त्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी एक भाषण दिले होते. त्या भाषणामध्ये त्यांनी, साधनांचे आणि समाप्तीचे महत्त्व या मुद्द्यांकडे लोकांचे लक्ष वेधले. त्या दरम्यान, अनेक लोकं, अंतिम उद्दिष्ट चांगले आहे ह्या पार्श्वभूमीवर, बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत होते. साधने आणि अखेर हे दोन्हीही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि दोन्ही चांगले असायला हवे, हे तत्त्व गांधीनी योग्य रितीने धरून ठेवले होते. यावर विशेष भर देताना त्यांनी,कृष्णाची तुलना योग्य अखेरीशी आणि अर्जुनाची तुलना पवित्र साधनांशी करून, गीतेतील शेवटचा श्लोक उद्धृत केला. गांधींनी घोषित केले की जेथे कृष्ण आणि अर्जुन दोघेही उपस्थित आहेत तेथे विजय निश्चित आहे. व्यावहारिक दृष्टीने याचा अर्थ असा आहे की साधने आणि अखेर दोन्ही चांगले असायला हवे.
  • १४ ऑगस्ट१९४७ रोजी पाकिस्तानचा जन्म झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी,भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला. या ऐतिहासिक दिवसाच्या आदल्या दिवशी, उत्तर भारतात सर्वत्र हिंसक दंगली झाल्या. वास्तविक, त्यानंतरही काही काळ हिंसा चालू होती. १५ ऑगस्ट रोजी, लोकं ज्या क्षणाची दीर्घकाल आतुरतेने वाट पाहत होते, त्या समारंभाचा भारतामध्ये सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात होता परंतु गांधी या उत्सवाच्या जवळपासही नव्हते. ते बंगालमधील नौखालीला, तेथील हिंसक अत्याचारांची परिस्थिती हाताळण्यासाठी गेले होते. सत्तरी पार केल्यानंतरही गांधी गावागावातून पदयात्रा काढून दुःखितांना सांत्वना देत होते.
  • राजकारणातही गीता कशी लागू होते हे गांधीजींनी दाखवून दिले. गीतेत म्हटले आहे की मनुष्याने कोणाचाही द्वेष करू नये. परमेश्वराच्या या आज्ञेचे गांधीजींनी अत्यंत काटेकोरपणे पालन केले. त्यांनी नेहमीच अत्यंत ठामपणे असे सांगितले की त्यांचे भांडण ब्रिटिश लोकांशी नसून केवळ ब्रिटिश साम्राज्यवादाशी आहे. जेव्हा ते गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले तेव्हा त्यांनी आवर्जून लँकेशायरला भेट दिली आणि तेथील गिरणी कामगारांसाठी भाषण दिले. कशासाठी? या भेटीमागे एक रंजक कथा आहे.
  • एक सर्वसामान्य भारतीय मनुष्य धोती परिधान करतो हे सर्वांना माहीत आहे. पूर्वीच्या काळी भारतीय विणकर गावकऱ्यांनी तयार केलेल्या सुतापासून धोती बनवत असत. भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर, तेथे धोतीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांनी भारतामध्ये धोती विकण्यासाठी, लँकेशायरमध्ये धोतीच्या उत्पादनसाठी अनेक गिरण्या सुरू केल्या. तलम दर्जा आणि आक्रमक विपणन कला ह्यामुळे अक्षरशः लाखो भारतीयांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन गमावले. गांधी तेथे आले आणि त्यांनी एक शक्तिशाली चळवळ उभी केली. लोकांनी केवळ भारतीय बनावटीच्या धोती खरेदी कराव्यात असा त्यांनी विशेष आग्रह धरला. आता ब्रिटिश कापड उद्योग बंद करण्याची वेळ आली होती. लँकेशायर मधील नोकरी गमावलेले गिरणी कामगार गांधींचा द्वेष करू लागले. म्हणून गांधींनी आवर्जून लँकेशायरला भेट देण्याचे ठरविले. तेथे जाऊन तेथील गिरणी कामगारांना वस्तुस्थिती समजावून सांगावी ज्यायोगे गांधींच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष वा कोणतीही वैयक्तिक नकारात्मक भावना नाही हे त्यांना समजेल हा त्यांचा हेतू होता.
  • बुद्धिवंत लोकं काहीवेळा जरी गांधींच्या मताशी सहमत नसले तरी त्यांच्या मनात गांधींविषयी आदराची भावना होती.याचे उदाहरण द्यायचे तर, एकदा राजद्रोह्याच्या गुन्ह्याखाली गांधींना कैदी म्हणून ब्रिटिश न्यायाधीशाच्या समोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायाधीश उत्स्फूर्तपणे खुर्चीतून उठून उभे राहिले.
  • गांधी ‘महात्मा’ म्हणून जन्मास आले नाहीत परंतु एक दिवस त्यांनी अत्यंत निर्धारपूर्वक सत्याची कास धरण्याचे ठरविले. तो क्षण त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. याच कारणासाठी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राला ‘माझे सत्याचे प्रयोग’ असे शीर्षक दिले. 1920 साली रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली.
  • महात्मा गांधींच्या शब्दात-” जेव्हा मी संशयाने पछाडला जातो, जेव्हा नैराश्य मला घेरुन टाकते, जेव्हा क्षितीजावर मला आशेचा एकही किरण दिसत नाही तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळून मला दिलासा देणारा एक श्लोक शोधतो आणि ह्या प्रतिकूलतेच्या गर्तेतून त्वरित बाहेर पडून, माझ्या मुखावर हास्य विलसते.”
गुरूंना वाचनासाठी सूचित पुस्तक
  • माझे सत्याचे प्रयोग – महात्मा गांधींचे आत्मचरित्र

(विविध पुस्तके,लेख,भाषणे आणि रेडिओ साईच्या संकेतस्थळावरून हा मजकूर संग्रहित करण्यात आला आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *