मन्मना भव – पुढील वाचन

Print Friendly, PDF & Email
मन्मना भव – पुढील वाचन

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्करु
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः

(अध्याय ९ श्लोक – ३४)

तुझे विचार माझ्यावर स्थिर ठेव. माझी भक्ति कर. माझे पूजन कर. मला वंदन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे निमग्न झाल्याने, मत्परायण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील.

जेथे कृष्ण लहानाचा मोठा झाला, त्या वृन्दावनामधील नंदाच्या घरी गोपिका संध्याकाळी जात असत आणि कृष्णाच्या घरी लावलेल्या दिव्याच्या ज्योतीने त्यांचे दिवे प्रज्वलित करुन घेत असत. ह्या मंगल दिव्याच्या ज्योतीने त्यांचे दिवे प्रज्वलित केल्याने, ती मंगलता त्या त्यांच्याबरोबर घरी नेत असल्याची भावना त्यांच्या मनात असायची.

एक दिवस, एका गोपिकेला कृष्णाच्या घरातील दिव्याच्या ज्योतीने तिचा दिवा प्रज्वलित करून घेण्यास बराच वेळ लागला. तिची प्रतीक्षा करणाऱ्या इतर गोपी अस्वस्थ झाल्या आणि तिला घाई करू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून यशोदा बाहेर आली. आणि तिने पाहिले की ती गोपी डोळे मिटून तेथे उभी होती व तिची बोटं त्या दिव्याच्या ज्योतीने भाजली होती. तिला भोवतालची शुध्द नव्हती. जेव्हा तिला भानावर आणले तेव्हा त्या ज्योतीमध्ये तिने कृष्णाला पाहिल्याचे सांगितले. त्या दृश्याने तिला एवढा परमानंद दिला की तिला तिची बोटं ज्योतीवर धरल्याचे व ती भाजल्याचेही भान नव्हते. तिला यत्किंचितही वेदना जाणवत नव्हत्या.

अशी ही गोपींची एकाग्र भक्ती.

बाबा म्हणतात, “प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयात, आत्म्याच्या रुपाने परमेश्वर वास करतो. जर तुमचा ह्यावर विश्वास असेल आणि जर तुम्ही तुमचे जीवन ह्या विश्वासाच्या आधारावर निर्देशित केलेत तर ते तुमच्यासाठी पुरेसे ध्यान आहे. ह्या विश्वासाला धक्का पोहोचणार नाही वा तडा जाणार नाही हे तुम्ही पाहिले पाहिजे. त्याची कास सोडू नका. त्या विश्वासाचा अभ्यास करा. तुमच्या विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये त्याचा विनियोग करा.”

परमेश्वर सर्वांमध्ये विद्यमान आहे ह्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे तरच आपण “सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांची सेवा करा” ह्या बाबांच्या वचनाचे अनुसरण करू शकू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: