पुढील वाचन

Print Friendly, PDF & Email
 पुढील वाचन

श्लोकाचा अर्थ

जो सतत शांत आहे, शेषशायी आहे, ज्याच्या नाभीतून सृजनशक्तीचे कमल फुलले आहे, जो देवाधिदेव आहे, जो विश्वाचा आधार आहे. आकाशाप्रमाणे सर्वव्यापक आहे, मेघांच्या रंगाचा व आकर्षक सौंदर्याचा आहे, लक्ष्मीपती व कमलनेत्र असा तो योगिजनाना ध्यानामध्ये आविर्भूत होतो, जो संसाराची भीती नाहीशी करतो. अशा सर्व विश्वाचा प्रभु असणाऱ्या विष्णूला मी वदन करतो/ करते.

शान्ताकारम

शांत म्हणजे मनाचा समतोल राखणारा, समचित्ताचा. भगवंताच्या चेहऱ्यावर आंतरिक शांती, आनंद, समतोल, कृपा आणि करूणा, सामर्थ्याची व सर्वस्वामित्त्चाची जाणीव ही सर्व प्रकट दिसतात. थोडक्यात, भगवंत म्हणजे शांतीचे मूर्तिमान स्वरूप (सगळ्या देवतांच्या चेहऱ्यावर व आकृतीत हा भाव प्रकट होत असतो).

भुजगशयनम्

सहस्त्रशीर्षाच्या शेषावर शयन करीत असूनही भगवंत शांतीचे साकार स्वरूप आहे. विषारी दात असलेला सर्प, हे दृश्य विश्वाचे प्रतीक आहे. जगात असूनही जगाचे व्हायचे नाही, त्याने बद्ध व्हायचे नाही हे रहस्य आहे. तो विश्वात ओतप्रोत भरलेला असूनही त्याच्या अतीत असतो. तो ज्या सागरात विश्रांती घेतो तो भवसागराचे प्रतीक आहे. (स.स.स. ५, पृ. २२४)

पद्मनाभं

भगवान विष्णूच्या नाभीतून निर्माण झालेल्या कमळाचा हा उल्लेख आहे. ब्रह्मा सृष्टीचा निदर्शक आहे. कमलनाल हे गर्भाच्या नाळेचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आईपासून बालक नाळेतून पोषण प्राप्त करते त्याचप्रमाणे विश्वाधार असलेल्या भगवंताकडून सृष्टी पोसली जाते.

गगनसदृशं 

भगवंत आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे. तो सर्वकाळी, सर्वस्थळी आपल्या मुलांबरोबर असतो. अत्यंत दूर असलेल्या ताऱ्यात आहे तसाच तृणपात्यातही आहे. दुधाच्या प्रत्येक थेंबात असणाऱ्या लोण्याप्रमाणे तो प्रत्येक गोष्टीचा गाभा आहे. हे ज्याला कळले तो निर्भय होतो म्हणून भगवंताला भवभयहर म्हटले आहे. निराशा हा देवाघरी अपराध आहे. तो तुमच्या अंत: करणात असताना तुम्ही आशा का सोडता? म्हणून भगवंत म्हणतो, ‘मी इथे असताना तुम्ही घाबरता कशाला’. नेहमी आनंदी, आशावादी व धैर्यशील, राहा – बाबा.

मेघवर्णं

भगवंताचा नीलवर्ण हा अथाग सागराचा आणि विशाल आकाशाचा रंग आहे. तो अथांग, अपार गोष्टीचे प्रतीक आहे. भगवंताचे रहस्य आपल्या आकलनापलिकडील आहे. (s.s.s. खड ४, पृ. १६८) “कोणीही कितीही दीर्घकाल कोणत्याही साधनेने प्रयत्न केला तरी माझ्या ऐश्वर्याचे रहस्य त्याला कळणार नाही. पूर्ण श्रध्देने, शास्त्राचे सखोल अध्ययन केले तर त्या ऐश्वर्याचे किंचित् दर्शन क्षणकाल घडू शकेल.”

शुभांगं

त्याचे रूप अत्यंत लावण्यमय व आकर्षक असून ते सगळीकडे मांगल्याचा प्रकाश पसरविते. (s.s.s. खड ५. पृ.३२९)

लक्ष्मीकान्तम्

तो सगळ्या संपत्तीचे उगमस्थान आहे. तो विश्वभर्ता आहे.

लक्ष्मी म्हणजे

  1. १. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही जीवनधारणा करणारी पाच, तत्त्वे (पंचमहाभूते).
  2. २. कार्यक्षम इंद्रिये आणि उत्तम आरोग्य यांची संपत्ती.
  3. ३. सद्गुणांची संपत्ती.

भगवंत या पाच तत्वांचा स्वामी आहे. तो सगळ्या सदगुणांचे उगमस्थान आहे. कार्यक्षम शरीर, मन व बुद्धी देणाराही तोच आहे.

कमलनयनम्

कमळाप्रमाणे भगवंतावर परिस्थितीचा परिणाम होत नाही. मग तो कोणत्याही वातावरणात असो, त्याच्या डोळ्याची आणि पायांची कमळाशी तुलना केली आहे. त्याचे कारण हेच आहे. (SSS खंड ५ पृ ७३)

सर्वलोकैकनाथं

सर्व विश्वाचा आधार.

शान्ताकारं भुजगशयनं

परमात्मा सूक्ष्मातिसूक्ष्म परमाणूमध्ये असतो. प्रत्येक गोष्टीत असून तो पूर्णपणे अलिप्त राहातो.

गगनसदृशम्

ती विश्वव्यापक जाणीव (विष्णु) सृष्टीतील सर्व गोष्टींना व्यापून राहाते.

शुभाङ्गम

अति धवल हिमापेक्षाही तो शुद्ध आहे.

लक्ष्मीकान्तं सर्वलोकैकनाथं

ती विश्वव्यापक जाणीव त्रिभुवनाना प्रकाशित करते व त्याचे पोषण करते. (सना. सारथी ८८/३०९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *