नरसी मेहता

Print Friendly, PDF & Email
नरसी मेहता

नरसी मेहता हे भारतातील सर्वश्रेष्ठ संतांपैकी एक होते. गुजरात राज्यातील भावनगरमधील तळोजा नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. ते लहान असतानाच त्यांचे आईवडील वारले.

त्यांची भावजय त्यांच्याशी अतिशय वाईट वागत असे. त्यांना आणि त्यांच्या बायको व मुलांना फारसे खायला देत नसे. त्यांना स्वत:चे घरही नव्हते. वनात गायी राखून परत यायला उशीर झाला तर त्यांना जेवायलाही मिळत नसे. भावजयीच्या सतत टोचून बोलण्यामुळे आणि भांडणामुळे त्यांना बायको व मुलांना झालेले दुःख सहन होत नव्हते. त्यामुळे एक दिवस ते अरण्यात निघून गेले.

जंगलात त्यांना एक शिवलिंग दिसले. त्याला त्यांनी घट्ट मिठी मारली. त्यांचे कढत अश्रू शिवलिंगावर पडले. त्यांनी भगवान शंकराला सांगितले की एकतर मला मारून टाक नाहीतर आयुष्याचा अर्थ तरी दाखव, आपल्या खऱ्या भवतासाठी भगवान् तेथे प्रकट झाले आणि इच्छेप्रमाणे कोणताही एक वर मागण्यास सांगितले. पण नरसीला या विश्वाच्या स्वामीचे फक्त दर्शन हवे होते. भगवान शंकरांनी त्याला सांगितले की स्वर्गासम असलेल्या गोलोकातील श्रीकृष्णाची ‘रासलीला’ पाहणे हा सर्वात श्रेष्ठ आणि आनंददायक वर आहे.

अशा रीतीने भगवान शंकरांनी नरसी मेहताला त्या स्वर्गीय निळ्यासावळ्या मोहक कृष्णाच्या दर्शनासाठी नेले. त्याचा आनंदाचा अंश असलेली राधा त्याच्या जवळच होती. श्रीकृष्णाच्या बासरीच्या स्वर्गीय संगीताच्या तालावर गोपी नृत्य करीत होत्या. सर्वोच प्रेम, सुख आणि आनंद यांचा त्यांना अनुभव आला. कृष्णाने नरसीना पृथ्वीवर परत जाण्यासाठी आणि कृष्ण अवतारात अत्यंत स्पष्ट दिसणाऱ्या परम प्रेमाचा संदेश पृथ्वीवर प्रसृत करण्यासाठी आशीर्वाद दिले. नंतर कृष्णाने नरसीला सांगितले की माझे तुझ्या हृदयात सतत अस्तित्व असेल. मग त्याने नरसीला एक पिवळे रेशमी वस्त्र आणि रासलीलेत नरसीनी वाजवलेल्या झांजा दिल्या. त्यानंतर कृष्ण आणि भगवान शंकर दोघेही अंतर्धान पावले.

पृथ्वीवरील त्या जंगलात एकटाच असल्याचे नरसीला जाणवले. त्याला दिसले की त्याच्या अंगाभोवती पिवळे रेशमी वस्त्र होते आणि शेजारी झांजा व कृष्णाची एक मूर्तीही होती. जेव्हा नरसी आपल्या भावाच्या घरी परतले तेव्हा सर्वजण त्यांना हसले. जेव्हा त्यांनी सांगितले की कृष्णाने ते वस्त्र, झांजा गोलोकात मला दिल्या आहेत, तेव्हा सर्वांनी त्यांचा उपहास केला आणि त्यांच्या भावजयीने त्या सर्वाना घरातून हकलून दिले.

नरसी व त्याचे कुटुंबीय गावाच्या बाहेर आले. त्यांना तळ्याच्या काठी एक शाकारलेले जुने घर दिसले. त्यांना खायला प्यायला काही नव्हते. कामही नव्हते म्हणून नरसी दिवसभर देवाचे नामस्मरण करीत असत. ईश्वरावरील त्यांचा पूर्ण भरवसा पाहून, भक्ताच्या गरजा भागवण्यासाठी कृष्णाने अक्रूराला पाठवले. अक्रूर नरसींकडे आला. त्याने त्यांना आशीर्वाद दिले कृष्णाच्या लीला सांगितल्या.

या महान संताच्या आयुष्यात अनेक प्रसंग आहेत की त्यातून त्यांची भगवान् कृष्णाबद्दलची प्रगाढ भक्ती दिसून येते. गळ्यातल्या हाराबद्दलचा एक प्रसंग तर हृदयस्पर्शी आहे. राममंडलिक या राजाने नरसीला तुरुंगात टाकले आणि धमकी दिली की देवाने त्याला तुरुंगात हार दिला तर मी त्याला खरा भक्त म्हणून मानीन नाहीतर दुसऱ्या दिवशीच त्याचे डोके उडवीन, मेहताने रात्रभर अगदी हृदयातून गाणी गायिली. आपल्या गीतातून तो भगवंताला म्हणाला “हे भगवान! तू माझ्या कर्माकडे पाहू नकोस, कारण तुला तुझे ‘पतितपावन’ हे विशेषण गमवावे लागेल, तू मला सोडून देण्याचा प्रयत्न केलास तर तुला तसे करताच येणार नाही कारण लोक तुलाच हसतील आणि तुझीच टवाळी करतील.

तरीही देव येण्याचे लक्षण दिसेना! नंतर ते मोठ्याने देवाला म्हणाला, “देवा, तुझे मन एका हारामध्ये का अडकले आहे? जर तू मला हार दिलास तर तुझीच कीर्ती पसरेल.

मी तुझ्या वैभवाचे गान करीत होतो पण तू जर संकटाच्या वेळी भक्ताचे रक्षण केले नाहीस तर या पुढे कोणीही तुझी प्रार्थना करणार नाही आणि कोणीही तुझ्या वैभवाचे गान करणार नाही. मी मरणाला भीत नाही पण तुझी मात्र अपकीर्ती होईल.” शेवटी देवही त्याच्या भक्तीने हेलावला आणि आकाशातून त्याच्या गळ्यात हार पडला.

दुसऱ्या एका प्रसंगाने त्यांची ईश्वराच्या बाबतीत समर्पणवृत्ती आणि श्रद्धा दिसून येते. त्यांच्या मुलीचे तिच्या बालपणीच वसंतराव यांच्याशी लग्न ठरले होते. तिला पतीच्या घरी आणण्यासाठी नरसीकडे एक पुरोहित पाठवण्यात आला. सासरकडील सर्व मंडळीना दागदागीने आणि उंची वस्ने भेट म्हणून देण्याची पद्धत होती. परंतु नरसीला ते काही शक्य नव्हते. त्याने पुरोहिताला थोडावेळ थांबण्यास सांगितले. इकडे नरसी रात्रभर भजन म्हणत आणि आवश्यक त्या वस्तू देऊन त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी ईश्वराची आळवणी करीत बसला. भक्त त्याच्या संकटाच्या वेळी देवाला विनवतो आणि देवही ती कळकळीची मागणी पुरी करायला चुकत नाही. आता तो पुरोहित जाण्याच्या विचारात होता तोच देव भक्तापुढे प्रकटला आणि आवश्यक त्या सर्व गोष्टी त्याने पुरवल्या. लग्नाचे वऱ्हाड आनंदात परतले. पण नरसी मात्र ईश्वराच्या प्रेमात रंगून गेले होते. त्या प्रेमळ, दयाळू परमेश्वराने, भक्ताने जेव्हा जेव्हा हाक दिली तेव्हा त्याचे रक्षण केले. नरसीनी शेकडो गीते रचली, कीर्तने केली आणि ते अत्यानंदाने नाचले सुद्धा! कलियुगात प्रेमभक्ती ईश्वराकडे नेते ही शिकवण त्यांनी दिली. देवाचे नाव घेण्यातील महत्त्व त्यांनी पटवून दिले आणि प्रेमभावाची शिकवण दिली. त्यांनी रचलेल्या प्रेरणादायी गीताचा – वैष्णव जन तो तेणे कहिये – गांधीजींवर खूप प्रभाव पडला आणि त्यांना आयुष्यात प्रेरणा मिळाली.

[Illustrations by A. Priyadarshini, Sri Sathya Sai Balvikas Student.]
[Source: Stories for Children II, Published by Sri Sathya Sai Books & Publications, PN]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *