नेताजी सुभाष चंद्र बोस

Print Friendly, PDF & Email
नेताजी सुभाष चंद्र बोस

वंश

सुभाष चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी, ओरिसामधील कटक येथे एका बंगाली काश्यप कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या मातेचे नाव प्रभावती देवी आणि पित्याचे नाव जानकीनाथ बोस असे होते. त्यांचे वडील पेशाने वकील होते. त्यांच्या १४ अपत्यांपैकी सुभाषचंद्र ९ वे अपत्य होते. ब्रिटिशांनी जानकीनाथ बोस यांना बहाल केलेली ‘रायबहादूर’ ही पदवी, ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे त्यांनी परत केली आणि सरकारी वकील पदाचा राजीनामाही दिला.

शिक्षण

सुभाषचंद्रांचे सहावी पर्यंतचे शिक्षण कटक येथील एका इंग्रजी शाळेत झाले. त्यानंतर त्यांना रावेनशॉ कॉलेजिएट शाळेमध्ये घालण्यात आले. तेथून ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेले. तेथे त्यांचे थोडेफार शिक्षण झाले. तेथील प्रोफेसर ओटन यांनी भारत विरोधी केलेल्या टीका टिप्पणीने सुभाषचंद्रांची राष्ट्रवादी वृत्ती उफाळून आली आणि त्यांनी प्रोफेसरांवर हल्ला केला. परिणाम स्वरूप त्यांना कॉलेजमधून निष्कासित करण्यात आले. त्यानंतर सुभाषचंद्र स्कॉटिश चर्च कॉलेजमधून बी.ए. झाले. आयसीएस परीक्षा देण्यासाठी ते इंग्लंडला गेले.१९२१ मध्ये,इंग्रजीमध्ये सर्वोच्च गुण आणि गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त करून ते त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. याचा अर्थ आपोआप सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र! परंतु नोकरशाहीचा सदस्य होण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक क्रांतिकारी म्हणून पहिले पाऊल उचलले आणि नोकरीचा राजीनामा दिला. भारतीय नागरी सेवेतून राजीनामा देणारे ते पहिले भारतीय होते. त्यांना असा विश्वास होता, ” सरकारचा शेवट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सरकार मधून बाहेर पडणे.

राष्ट्रासाठी योगदान
  • बोस हे एक कट्टर राष्ट्रवादी होते. तार्किकदृष्ट्या पाहिले तर त्यांच्या राष्ट्रवादाचे पर्यवसन देशप्रेमाच्या आवेशात झाले. त्यांच्या मनात भारताच्या प्रारब्धाविषयी अढळ श्रद्धा विकसित झाली आणि म्हणून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची बाब, त्यांचे आध्यात्मिक ध्येय आणि सत्कारण मानून हाती घेतली. त्यांच्या विचारांमधील भारताचा चेहरा मोहरा हा केवळ एक प्रांत व प्रदेश म्हणून नव्हता तर त्यांच्या दृष्टीने ते एक आध्यात्मिक, सजीव अस्तित्व होते.
  • कोणत्याही देशाला त्याग केल्याशिवाय किंवा युद्ध केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळविणे शक्य नाही असे त्यांचे ठाम मत होते. या ठाम मतामुळे, थेट कृती करण्याच्या आक्रमक रणनीतीकडे ते आकृष्ट झाले.त्यांनी सर्व लोकांना धर्मयुद्धासाठी (चांगल्या कारणासाठी त्याग करणे) सिद्ध होण्यास प्रोत्साहित केले.
  • १९२१ मध्ये राजकारणात उडी घेतल्यापासून ते १९३९ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देईपर्यंत वाढत गेलेली त्यांची लोकप्रियता आणि सार्वजनिक आवाहन यामुळे ब्रिटिशांना धोक्याची सूचना मिळाली. ब्रिटिशांनी लवकरात लवकर संधी साधून त्यांना तुरुंगात टाकले. त्या सर्व घडामोडींनी त्या धाडसी आणि पुरोगामी युवकाच्या आवेशास कोणतीही बाधा पोहोचली नाही. तसेच तो नाउमेदही झाला नाही. त्यांच्या राजकीय कल्पना आणि योजना साकार करण्यासाठी त्यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाची संघटना स्थापन केली. त्यांनी त्यांच्या लिखाणाद्वारेही त्यांचा दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीस परदेशातून समर्थनार्थ तपास
    • बोसांनी स्वतः केलेल्या विश्लेषणातून, ते अशा निष्कर्षाप्रत आले की ब्रिटिशांना भारतातून घालवून देण्यासाठी, भारतीयांचे प्रयत्न पुरेसे नाहीत आणि म्हणून त्यांना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या बाजूने, आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मत जागृत करायचे होते.
    • भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी युरोपातील वेगवेगळ्या देशांची सहानुभूती आणि समर्थन मिळविण्यासाठी त्यांनी त्या देशांशी संबंध प्रस्थापित केले. त्यांनी इटलीतील मुसोलिनी, जर्मनीतील फेल्डर, आयर्लंड मधील डी. व्हॅलेरा
      आणि फ्रान्समधील रोमन रोलांड यांच्या भेटी घेतल्या. एकदा बोस नजर कैदेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात असताना बराच काळ ते तुरुंगात वा नजर कैदेत असल्यामुळे त्यांना भारतातून जास्त काही करणे शक्य होणार नाही म्हणून त्यांनी पलायन करायचे ठरवले.
    • दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने, ते शोधत असलेली, त्यांच्या कार्याला चालना देणारी संधी त्यांना प्राप्त झाली. त्या संधीमुळे भारतातील ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढण्यासाठी शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यांनी सुसज्जित एक फौज स्थापन करणे त्यांना शक्य झाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या त्यांच्या निर्धाराची परिपूर्ती करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय सहाय्याच्या शोधार्थ, त्यांनी युद्धाच्या दरम्यान भारतातून पलायन केले. दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये राहणाऱ्या, सुमारे दोन लाख लोकांचे समर्थन घेणे आणि ब्रिटिश कलोनियल सेनेमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय सैनिकांची भरती करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.
    • पेशावर ते काबुल ते मॉस्को ते बर्लिन, जपान आणि सिंगापूर, नेताजींचा हा प्रवास एक महागाथा आहे. केवळ त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भारताला परकीय राजवटीतून मुक्त करण्याची धगधगती इच्छा ह्यामुळेच खडबडीत डोंगराळ मार्ग, हाडं गोठवून टाकणारी थंड हवा आणि पकडले जाण्याचा मोठा धोका या सर्वांवर ते मात करू शकले.
    • ४ जुलै१९४३ रोजी सिंगापूर येथे त्यांच्या सन्मानार्थ एक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. रासबिहारी बोस यांनी भारतीय स्वातंत्र्य संघाची धुरा नेताजींकडे सोपवली. २५ऑगस्ट १९४३ रोजी, औपचारिकपणे त्यांना भारतीय राष्ट्रीय सेनेच्या सरसेनापतीपदी नियुक्त करण्यात आले.
    • सैनिकांचे वर्तन असे असावे की त्यांचे देश बांधव त्यांना आशीर्वाद देतील आणि त्यांच्या वंशजांना त्यांचा अभिमान वाटेल, हे सांगण्यासाठी नेताजींनी सर्व सैनिकांना बोलावले. भारतीय राष्ट्रीय सेनेने, प्रतिकूल परिस्थितीविषयी निराशा व्यक्त करण्याऐवजी त्याला धैर्याने तोंड देण्यासाठी नेताजींनी त्यांना आत्मविश्वास देऊन प्रेरित केले, “सद्य परिस्थितीत मी तुम्हाला भूक, तहान,उपासमार,सक्तीचे मोर्चे आणि मृत्यू याशिवाय काहीही देऊ शकत नाही परंतु जर तुम्ही माझे अनुसरण केलेत तर मी तुम्हाला विजय आणि स्वातंत्र्याकडे घेऊन जाईन.”
    • अशा तऱ्हेने, त्यांनी त्यांच्या सैनिकांना ग्वाही दिली की ते अंधारात आणि सूर्यप्रकाशात तसेच दुःखात आणि आनंदात, हालअपेष्टात आणि विजयात त्यांच्याबरोबर असतील. ते स्वतः अत्यंत उत्साही होते, त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी, ते खूप कमी झोप घेत असत आणि रात्री उशिरापर्यंत काम करत असत.
    • स्त्रियांची उन्नती आणि त्यांना पुरुषांबरोबर समान दर्जा देणे, याविषयी ते विशेष आग्रही होते. लष्करामध्ये झाशीच्या राणीच्या नावाने स्त्रियांची एक तुकडी उभी करून त्यांनी स्वतः एक उदाहरण पुढे ठेवले. या स्त्रिया पुढे स्वतंत्र भारतामध्ये, योग्य ती भूमिका बजावण्यासाठी तयार होऊ शकतील हे त्यांचे उद्दिष्ट होते.
      ‘जय हिंद’ आणि ‘चलो दिल्ली’ ही भारतीय राष्ट्रीय सेनेची लोकांना जागृत करण्यासाठी दिलेली आरोळी होती.
    नेताजी आणि अध्यात्म
    • ते केवळ पंधरा वर्षाचे असताना, स्वामी विवेकानंदांच्या लेखनाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांच्यामध्ये मानसिक आणि भावनिक स्तरावर मूलगामी आंतरिक परिवर्तन घडून आले. विवेकानंदांनी वेदांत तत्त्वज्ञानावर केलेल्या विज्ञानाधिष्ठित विवरणाने आणि त्यांच्या योगाविषयीच्या कल्पनेने, नेताजींना जीवनामध्ये योग्य दिशा मिळाली. वेदांताद्वारे विज्ञान आणि धर्म यांच्यामध्ये सुसंगत समन्वय साधण्याच्या कार्यासाठी विवेकानंदांनी केलेल्या आजीवन समर्पणातून, नेताजींच्या जिज्ञासेला एक नवीन परिमाण आणि दृष्टी मिळाली. केवळ मानवतेच्या सेवेद्वारे मनुष्याला सखोल आध्यात्मिक ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचा लाभ होऊ शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
    • लक्षावधी देश बांधवांना अशिक्षित उपाशी आणि बेघर पाहणे नेताजींना असह्य होत असे. त्यांच्या भोवताली असणाऱ्या भारतीय लोकांच्या हाल अपेष्टांमुळे, पुढे त्यांच्यामधील क्रांतिकारक भावना अधिक तीव्र झाली आणि त्यांच्याविषयी विचार करताना ते स्वतःलाही विसरून गेले. एकदा एक वृद्ध अशक्त महिला अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये तिच्या घराबाहेर बसली होती. नेताजींचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तिचे दुःख पाहून तिला मदत करण्याचे ठरविले आणि कॉलेजला रेल्वेने जाण्याऐवजी ते तीन मैल अंतर चालून कॉलेजला जाऊ लागले.
      बचतीची ती रक्कम त्यांनी त्या महिलेला दिली. अगणित भारतीयांच्या दुःखामध्ये त्यांना रक्तरंजित भारतमातेचे प्रतिबिंब दिसे. त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, आपल्या रक्ताचा आणि घामाचा शेवटचा थेंब गाळण्यापर्यंत त्यांची तयारी होती.
    • त्यांच्या परमेश्वरावरील अढळ श्रद्धेने, त्यांच्या निकट येणाऱ्या प्रत्येकाला अत्यंत प्रभावीत केले.
      चित्तरंजन दास हे त्यांचे राजकीय गुरु होते तर स्वामी विवेकानंद त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. अनेक वेळा ते रात्री उशिरा कलकत्त्यामधील रामकृष्ण मिशन आश्रमास भेट देत असत. झोपायला जाताना, ते नेहमी भगवद्गीतेची एक छोटीशी प्रत त्यांच्या उशीखाली ठेवत.
    • लहानपणापासूनच त्यांनी समाजासाठी विधायक कार्य करणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कटक येथे शाळेत असतानाच त्यांनी समविचारी वर्ग मित्रांचा गट बनवून खेड्यामधील अशिक्षित लोकांसाठी साक्षरता अभियान राबवले. मित्रांबरोबर ग्रामीण भागात जाऊन ते तेथील गरजू लोकांना मदत करत असत. विद्यार्थी दशेत असताना, कलकत्त्यातही अनाथ लोकांचा सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत ते सामील झाले होते. या संस्थेमधील स्वयंसेवक रिकामी पोती घेऊन अनाथ लोकांसाठी घरोघरी जाऊन तांदूळ व इतर खाद्यपदार्थ गोळा करत असत. घरामधील संपन्न पार्श्वभूमी आणि मानसिक द्वंद्व असूनही कम नशिबी देशबांधवांसाठी भिक्षा मागण्यासाठी ते निर्धाराने पुढे होते. शाळेला सुट्टी लागल्यानंतर ते कटक मध्ये आले तेव्हा त्यांनी कॉलराच्या साथीने गंभीररित्या बाधित झालेल्या खेड्यांना भेट देणे पसंत केले. त्या काळामध्ये कॉलरा हा एक प्राणघातक रोग होता आणि रुग्णाचे नातेवाईकही रुग्णासोबत राहत नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यावरील औषधोपचारांचा जरी शोध लागला असला तरी ती औषधे उपलब्ध नव्हती.
    • त्यांनी त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये पुन्हा पुन्हा, विशेष जोर देऊन घोषित केले की जर भारतीय राष्ट्रीय सेना भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यात यशस्वी झाली तर स्वातंत्र्य लोकांच्या हाती सोपवून ते निवृत्त होतील आणि स्वतःला अध्यात्माकडे वळवून सर्वकाही विसरून जातील.
    नेताजी- एक सच्चा नेता

    त्यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन, बर्लीनमधील त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या उत्तुंग नेतृत्वास मान्यता देणारे, “बोस नेताजी” हे नाव देऊन त्यांचा सन्मान केला.

    त्यांचे राष्ट्रीय घोषवाक्य
    “तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन.”

    भारतातील सर्व भागांमध्ये आणि सर्व धार्मिक गटांमध्ये, नेताजी अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी नेते असल्याचे ओळखून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना गंभीरतेने घेतले. त्यांच्या लोकप्रियतेने धर्माचा अडसरही ओलांडला होता. मुस्लिमही नेताजींच्या नेतृत्वाची प्रशंसा करत होते आणि त्यांना त्यांचे नेतृत्व मान्य होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान मध्ये राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अली जिनाह यांना नेताजींविषयी एवढी श्रद्धा आणि आदर होता की जर नेताजी देशाचे नेतृत्व करणार असतील तर धर्मावर आधारित भारताच्या फाळणीची कल्पना ते सोडून देण्यास तयार होते. भारताच्या पूर्वेकडील राज्यातील मुस्लिम नेत्यांकडून ह्याच भावनेचे पडसाद उमटले.

    सूचित उपक्रम / गुरूंसाठी चर्चा:
    • स्वामी नेताजींविषयी काय म्हणाले?

    कृपया यासाठी श्री सत्यसाई स्पीक्स-४० प्रकरण-१४ – ‘नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे आदर्श गुण’ याचा संदर्भ घ्या.

    • एक सच्चा नेता याविषयी स्वामी काय म्हणतात?

    कृपया श्री एम.के.चिब्बर यांचे ‘ नेतृत्वावरील साईबाबांची महावाक्ये ‘ या पुस्तकाचा संदर्भ घ्यावा.

    • देश प्रेम दिवस म्हणजे काय?

    नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी देश प्रेम दिवस साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: