पश्य मे पार्थ-पुढील वाचन
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः
नानाविधानि दिव्यानि नानावर्णा कृतीनि च
(अध्याय -११ श्लोक-५)
हे पार्था! आता तू माझी शेकडो-हजारो, नाना प्रकारची, नाना रंगाची अलौकिक, दिव्य रुपे पाहा.
अर्जुनाने भगवान कृष्णाकडे, त्याचे विश्वरूप दर्शन घडवावे अशी प्रार्थना केली.
अर्जुनाचे दुःख जाणून श्रीकृष्ण उत्तरले, “तू माझा महिमा तुझ्या चर्मचक्षूंनी पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो.” त्याला दिव्य दृष्टी प्रदान केल्यानंतर कृष्णाने अर्जुनाला त्याचे विराट स्वरुप दर्शन घडवले.
अर्जुनाने परमेश्वराच्या देहामध्ये अखिल विश्व बघितले. सूर्य,चंद्र,ह्यासारखे स्वर्गीय देह बघितले. पृथ्वी,आप,वायू,तेज आणि आकाश ही पंचतत्त्वे बघितली. तसेच ऋषि मुनी, संत महात्मे व सर्व जीवांना बघितले. हे संपूर्ण विश्व दिव्यत्वाने व्यापलेले आहे. प्रत्येक वस्तु ही दिव्यत्वाचा एक अंश आहे. ह्या असंख्य रुपांनी बनलेल्या विश्वाचे ‘ विश्व विराट ‘ वा ‘विराट पुरुष’ असे वर्णन केले जाते. आपण ह्या बहुमुखी विश्वाकडे पाहतांना, सर्व जीव म्हणजे एक दिव्य अस्तित्व आहे ह्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
प्रत्येक प्राणिमात्रात व प्रत्येक गोष्टीत परमेश्वर विद्यमान आहे; हॉवर्ड मर्फेटनी त्यांच्या ‘मॅन ऑफ मीरॅकल्स’ ह्या पुस्तकामध्ये ह्याचे एक उदाहरण दिले आहे. त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापिठातील बायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. वाय राव यांचा संदर्भ दिला आहे.
एकदा पुट्टपर्तीमध्ये भगवान बाबांनी ग्रेनाइटचा एक तुकडा उचलून डॉ राव ह्यांच्या हातात दिला व विचारले, “ह्यामध्ये काय आहे?” डॉ. रावांनी खडकांमध्ये असणाऱ्या काही खनिजांची नावे सांगितली.
बाबा: “ते नाही. मला ह्याहून सूक्ष्म काय आहे ते सांग.”
डॉ.राव: “अणु, रेणु, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स”
बाबा: “नाही, नाही! त्याहून अधिक सूक्ष्म.”
डॉ.राव: “मला माहित नाही स्वामी.”
बाबांनी तो ग्रेनाइटचा तुकडा त्यांच्या हातातून घेतला व आपल्या बोटांनी वर धरून त्यावर फुंकर घातली. डॉ. राव म्हणतात की तो तुकडा क्षणभरही माझ्या दृष्टीआड झाला नाही तरीही जेव्हा तो तुकडा बाबांनी मला परत दिला तेव्हा त्याचा आयताकृती आकार बदलला होता व तेथे बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची मूर्ती होती. त्या खडकाच्या रंगामधील व रचनेमधील बदल पाहून डॉ. राव आश्चर्यचकीत झाले.
बाबा म्हणाले, “पाहिलस? तुमच्या अणुरेणुंच्या पलीकडे त्या खडकामध्ये परमेश्वर आहे. आणि परमेश्वर म्हणजे माधुर्य आणि आनंद आहे. त्याचा पाय मोडून चाखून बघ.”
डॉ. रावांनी अगदी सहजपणे त्या छोट्याशा मूर्तीचा पाय मोडून तोंडात टाकला आणि ती खडीसाखर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
डॉ, राव म्हणाले की ह्या प्रसंगातून ते जे शिकले ते शब्दाच्या पलीकडचे होते. अधुनिक विज्ञानाच्या तर खूपच पलीकडचे होते. खरोखर आजच्या तार्किक मानवी मनाच्या सर्व मर्यादांच्या पलीकडचे होते.