समयसूचकता

Print Friendly, PDF & Email
समयसूचकता

घराला आग लागली, वेगाने धावणारी गाडी झाडावर आदळली, किंवा एखादे बालक विहिरामध्ये पडले, अशा बातम्या आपण वरचेवर ऐकतो. जेव्हा असे अपघात घडल्याचे समजते तेव्हा सर्वजण अपघात स्थळी धाव घेतात. परंतु त्यातील अनेक जण ते पाहून एवढे भयभीत होतात, चिंतित होतात की शांत डोक्याने विचार करून तात्काळ कृती करून, जीवितहानी व मालमत्तेची हानी टाळली जाईल ह्यासाठी त्यांचा त्यांचा काही उपयोग नसतो. ह्या शांतपणे विचार करून त्यावर तात्काळ कृती करण्याच्या क्षमतेस ‘समयसूचकता’ म्हणतात.
Boys playing cricket

समयसूचक व्यक्ती केवळ धोक्याच्या प्रसंगीच नव्हे तर दुष्काळ, महापूर आणि युद्धाच्या वेळीही अत्यंत सहाय्याकारी ठरतात. काही व्यक्ती समयसूचकता कशी विकसित करतात? वस्तुतः ते बाळपणापासूनच ते मनाला शिस्त लावण्यास सुरुवात करतात. जेव्हा जेव्हा ते एखाद्या समस्येस सामोरे जातात, तेव्हा ते त्यांच्या मनास विचलित वा संभ्रमित होऊ देत नाहीत. त्याऐवजी ते शांत डोक्याने व हुशारीने ताबडतोब त्यासाठी आवश्यक कृती करतात.

येथे एका चलाख मुलाचे उदाहरण देत आहे. त्याची समयसूचकता सर्व मुलांना ही क्षमता विकसित करण्यास प्रोत्साहित करेल.

Ball fell into a hole of a tree

अलाहाबादच्या एक मोठ्या उद्यानात काही मुले बॅटबॉल खेळत होती. एका मुलाने पूर्ण ताकद लावून बॅटने बॉल जोरात मारला. तो वजनाला हलका असणारा टेनिस बॉल असल्यामुळे खूप उंच गेला व खाली येऊन वडाच्या झाडाच्या पोकळीत जाऊन पडला. सर्वांनी तो बॉल बाहेर काढायचा आटोकाट प्रयत्न केला परंतु कोणाचाच हात त्या सुकलेल्या फांदीच्या तळाशी पोहचू शकत नसल्याने सर्व प्रयत्न असफल झाले. एक सद्गृहस्थ तेथून जात असतांना त्यांनी त्या मुलांची घालमेल पाहून बॉल काढायचा प्रयत्न केला परंतु तोही असफल ठरला. ज्याने तो बॉल जोरात मारला, त्या मुलाला सर्व जण दोष देऊ लागले. त्यांच्या बोचऱ्या शब्दांनी त्याचे मन दुखावले व तो रडू लागला.

Intelligent lad paring water to bring up the ball

तेवढ्यात उद्यानातून चालत जाणाऱ्या एका चुणचुणीत मुलाने त्या मुलाला रडताना पाहिले. तो त्या मुलांकडे आला. मुलांनी जे घडले ते त्याला सांगितले.”त्या काकांनी सुध्दा बॉल काढायचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही तो काढता आला नाही. “असे त्या रडणाऱ्या मुलाने सांगितले. त्यावर त्या चलाख मुलाने त्याच्या पाठीवर थोपटत म्हटले,” काळजी करू नकोस. मी तुम्हाला बॉल काढून देतो. मला फक्त एक बादली पाणी आणून द्या.

“एक मुलगा धावतच माळ्याकडे जाऊन एक बादली पाणी घेऊन आला. त्या हुशार मुलाने त्या झाडाच्या पोकळीमध्ये पाणी ओतण्यास सुरुवात केली. लवकरच पाणी वरती आले व त्याबरोबर वजनाला हलका असणारा बॉल पृष्ठभागावर आला. ताबडतोब एका मुलाने तो उचलला व आनंदाने,” हिप हिप हुर्ये” असे म्हणत बॉल ऊंच हवेत उडवला. सर्वजण आनंदाने आरोळी ठोकत सामील झाले. उत्साही चेहऱ्यांनी त्यांचा खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी मैदानाकडे धावले.

तो चलाख मुलगा कोण होता असे तुम्हाला वाटते? ते जवाहरलाल नेहरु होते.

प्रश्नावली:
  1. समयसूचकता म्हणजे काय?ती कशी विकसित करता येते.?
  2. तुम्ही कधी कठीण प्रसंगात समयसूचकता दाखवली आहे का? असल्यास कधी आणि कशी?
  3. एखादा काल्पनिक अपघाताचा प्रसंग डोळ्यासमोर आणा व तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात असे समजून, त्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी तुम्ही कशी समयसूचकता दाखवाल ते लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *