गर्वाचे घर खाली
गर्वाचे घर खाली
श्रीकृष्ण आणि अर्जुन एकदा यमुना नदीच्या तीरावरून चालत होते. नदीमुळे कृष्णाच्या मनात बालपणाच्या खेळकर सुखद स्मृति जाग्या झाल्या. अर्जुन मात्र थोड्याच दिवसात कुरुक्षेत्रावर सुरू होणाऱ्या युद्धाविषयी विचार करीत होता. कौरवांचा विचार येताच त्याला रणांगणातील स्वतःच्या शौर्याची व धनुर्धारी म्हणून असलेल्या कौशल्याची जाणीव झाली. ‘या पृथ्वीवर धनुर्विद्येत माझ्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही.’ असे अर्जुन स्वतःशीच म्हणाला. शेजारी वाहणारी यमुना पाहून त्याला असे वाटले की तिच्या विस्तृत पात्रावर तो बाणांचा पूलसुद्धा सहज बांधू शकेल.
नंतर त्याच्या मनात एक विचित्र विचार आला, “म्हणजे रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेला जाताना रामाला जे करता आले नाही ते मला साधू शकेल!” असे अर्जुनाला वाटले.
अर्जुनाच्या अंत:करणात गर्व आणि अहंकाराचा प्रादुर्भाव झाला आहे हे कृष्णाने जाणले, म्हणून कृष्ण म्हणाला “अर्जुना, तू स्वत:शीच हसतो आहेस असं दिसतंय, माझ्या काहीतरी चुकीबद्दल तू हसत नसशील अशी मला आशा आहे.” अर्जुन किंचित् चमकला आणि म्हणाला, “मी हसत होतो हे खरं आहे. पण त्याचं कारण लंकेला जाण्यासाठी वानरांकरवी दगडी पूल स्वत:साठी बांधवून घेणाऱ्या रामाची मला आठवण झाली हे आहे. मी जर तिथे असतो तर डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याच्यासाठी बाणांचा पूल बांधून दिला असता.”
अर्जुनाचा अहंकार कमी करायचा असे कृष्णाने ठरविले. म्हणून त्याने अर्जुनाला समजावून सांगायला सुरवात केली की रामाने पूल बांधला नाही कारण बलाढ्य वानरांच्या सेनेच्या वजनाने तो पूल तात्काळ कोसळला असता. पण अर्जुनाचा अहंकार हे मानायला तयार नव्हता. तो गंभीर स्वरात म्हणाला, “याचा अर्थ वानरांचे वजन पेलू शकेल असा बळकट बाणांचा पूल राम बांधू शकला नाही असा होतो.”
कृष्णाने क्षणभर विचार केला आणि तो हसून म्हणाला, “रामाच्या सैन्यातील बलाढ्य वानरांपैकी एक अद्यापि हयात आहे. तू यमुनेवर पूल बांध. तुझ्या बाणांच्या पुलाचा भक्कमपणा अजमावण्यासाठी मी त्या वानराला बोलावतो.”
अर्जुनाने मोठ्या ताठ्याने कृष्णाचे आव्हान स्वीकारले. अगदी थोड्या वेळात यमुनेच्या दोन्ही तीरांना जोडणारा अर्जुनाचा बाणांचा पूल तयार झाला.
“हनुमंता! लवकर ये” कृष्णाने हाक मारली. ताबडतोब एक उंच वानर कृष्णा समोर प्रकट झाला व कृष्णाच्या चरणांशी नतमस्तक झाला. कृष्णाने त्याला त्या पुलावरून जायला सांगितले. अर्जुनाचा पूल एका वानराच्या वजनाने मोडेल अशी भीती कृष्णाला वाटते आहे हे पाहून त्याला अर्जुन जणू कुचेष्टेने हसला.
त्या वानराने किंचित् साशंकतेने आपला उजवा पाय पुलावर ठेवला. त्याने दुसरा पाय उचलण्यापूर्वीच सबंध पूल धडाधड कोसळला, आता अर्जुनाला हसण्याची वेळ कृष्णावर आली होती. अर्जुन इतका खजील झाला की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व कृष्णाचे पाय धरले, सुयोग्य उपदेश करून कृष्णाने अर्जुनाचे सांत्वन केले. “अर्जुना, नाराज होऊ नकोस,” तो म्हणाला. “या वानरांसाठी बाणांचा पुरेसा बळकट पूल रामालाही बांधता आला नाही. मग तुला तो जमला नाही तर खजील होण्याचं काय कारण? पण हा धडा नित्य लक्षात गर्व व अहंकार यांना कदापिही आपल्या अंत:करणात सिरू देऊर नकोस. वीर पुरूषाचा निश्चित अधःपात घडवून आणणारे हे सर्वात वाईट शत्रू आहेत.”
अर्जुनाने कृष्णाच्या उपदेशाचा लगेच स्वीकार केला. त्यामुळे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाच्या स्थावरील ध्वजावर हनुमंताचे प्रतीक मिळाले व त्याला ‘कपिध्वज’ अशा संज्ञा प्राप्त झाली.
प्रश्न:
- गर्व आणि अहंकार धोकादायक कसे असतात? ते कोणता अपाय करतात?
- कृष्णाने अर्जुनामध्ये कोणता बदल घडवून आणला?
- समजा तुमच्या वर्गात जो विद्यार्थी पहिला येतो तो जर गर्विष्ठ व अहंकारी झाला तर त्याचे काय होईल?