दृश्य
आई: चला आता आपण मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी मिठाई, फळं आणि फुलं विकत घेऊ या. देवाच्या कृपेने तुम्ही पुढच्या यत्तेत जात आहात.
(सर्व खरेदी करून ते मंदिराच्या प्रवेशद्वाराशी पोहचतच होते तेवढ्यात एक गरीब स्त्री तिच्या मुलाबरोबर त्यांच्या जवळ आली.)
रवी : अरे! लांब हो. तिकडे जा. आम्ही हे देवाला अर्पण करण्यासाठी आणले आहे.
(ती गरीब स्त्री तेथेच उभी राहिली. )
अजित : तू अजून इथेच उभी आहेस? आई, ते आपल्या फळांकडेच पाहत आहेत. त्यांना इथून जायला सांग ना.
दोघं : सकाळपासून आम्ही काही खाल्लेल नाही. आई, आम्हाला खूप भूक लागली आहे.
आई : ही फळं घ्या.
दोघं : देव तुझं भलं करो आई!
(ते दोघं फळं घेऊन तेथून जातात)
अजित : आई तू हे काय केलस? आपण मंदिरामध्ये देण्यासाठी फळं आणली होती ना आणि ती तू त्यांनाच देऊन टाकलीस. आणि भीक मागण्याची त्यांची सवयच झालीय.
रवी : आपण आपला शब्द पाळला नाही म्हणून देव आता आपल्यावर रागवेल.
आई : नाही रवी, उलट तो आपल्यावर प्रसन्न होईल.
रवी : प्रसन्न होईल? कसा? मला नाही तसं वाटत!
आई : जर आपण ही फळं त्यांना न देता देवाला दिली असती तर ते देवाला आवडले नसते.
अजित : पण असं कसं?
आई : समज तू रवीला न देता आईस्क्रीम खाल्लेस तर ते मला आवडेल का?
अजित : नाही. त्यासाठी तू आम्हाला रागवायचीस.
आई : बरोबर. देवाचेही तसच आहे. शिवाय ते दोघं खूप भुकेलेले दिसत होते. लक्षात ठेवा! परमेश्वर प्रत्येकामध्ये वास करतो... प्रत्येकामध्ये परमेश्वराला पाहा!
रवी आणि अजित : खरं आहे आई! प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराला कसं पाहायचं हे आता आम्हाला समजले.