राधेच्या  भक्तीबद्दल स्वामी

Print Friendly, PDF & Email
राधेच्या  भक्तीबद्दल स्वामी

गोपींची भक्ती शुध्द आणि निस्वार्थ होती. त्यांची भक्ती अविचल दृढ़ आणि स्थिर होती. राधा या सर्वांमध्ये वेगळी आणि लक्षवेधी गोपी होती. ती कृष्णाबरोबर एकरूप झाली होती, त्याच्याशी तादात्म्य पावली होती. राधेला फक्त कृष्ण- तृष्णा होती. परमेश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा किंवा तृष्णा. तिला ऐहिक इच्छा नव्हत्या, लोकतृष्णा नव्हती.

एकदा कृष्ण रुक्मिणी बरोबर आपल्या रथातून जवळपासच्या एके ठिकाणी गेला. गावातील सर्व रहिवासी गोळा झाले. आणि त्यांनी त्यांचे अत्यंत हर्षभरित मनाने जंगी स्वागत केले. कृष्ण आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे गुंग होऊन एकटक पहात आहे हे रुक्मिणीच्या लक्षात आले. त्या व्यक्तीची दृष्टीदेखील कृष्णावर खिळून होती. सावकाश आणि मृदु शब्दांमध्ये कृष्ण म्हणाला, “रुक्मिणी! तू राधेला ओळखतेस? ती माझी उत्कट भक्त आहे.” हे ऐकून रुक्मिणी रथातून उतरली आणि धावतच राधेजवळ गेली. थोडा वेळ हसत खेळत बोलल्यानंतर रुक्मिणीने राधेला द्वारकेला त्यांच्या राजवाड्यात येऊन तिच्याबरोबर काही काळ व्यतीत करण्याचे आमंत्रण दिले त्या प्रमाणे राधा दुसऱ्या दिवशी द्वारकेला गेली. मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन रुक्मिणीने राधेचे स्वागत केले आणि तिला घेऊन ती राजवाड्यात आली. कृष्णाबद्दल बोलत,त्यांच्या वैभावाचा महिमा गात राधा राजवाड्यात रुक्मिणीबरोबर काही वेळ बसली. भगवान कृष्णाच्या अनुभवांचा त्यांना मिळालेला आनंद त्या दोघी एकमेकींमध्ये वाटून घेऊ लागल्या. रुक्मिणीने राधेला गरम गरम दूध दिले कारण तिला वाटले राधा गरम दूध हळू हळू, एक एक घोट करत घेईल आणि मग ती कृष्णाबद्दल अजून काही वेळ बोलत राहील. परंतु राधेने ते पेलाभर गरम दूध एका घोटात पिऊन टाकले. त्यानंतर त्यांचे बोलणे तसेच पुढे थोड़ा वेळ चालू राहिले. आणि नंतर राधा तिच्या गावी परतली.

संध्याकाळी अतिशय दमून – भागून कृष्ण घरी परतला. तो रुक्मिणीला म्हणाला, “रुक्मिणी अतिशय दमलोय आणि माझ्या पावलांना भाजल्याच्या वेदना होत आहेत. आणि त्या मला आता सहन होत नाहीत.” रुक्मिणीने पाहिले तर तिला कृष्णाच्या पावलांवर फोड आलेले दिसले, तिला आश्चर्य वाटले की असे कसे आणि केव्हा झाले? कृष्ण म्हणाला,” रुक्मिणीतुझे आमंत्रण स्वीकारून राधा जेव्हा आज दुपारी तुला भेटायला आली तेव्हा तू तिला खूप गरम दूध दिलेस नं? राधेने ते सारे दूध एका घोटात पिऊन टाकले. तिच्या हृदयामध्ये माझ्या चरणांचे स्थान आहे आणि ते एवढे गरम दूध माझ्या पावलांवर सांडले. आणि त्या ठिकाणी खूप आग होत आहे आणि तुला तेथे फोड़ आलेले दिसत आहेत.” ही होती राधेच्या भक्तीची उंची.

एकदा राधेच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एका गोपीने तिला यमुनेवरून पाणी आणण्यासाठी छिद्रे असलेला माठ दिला. राधेच्या ते लक्षात आले नाही. घडा नदीच्या पाण्यात बुडविताना तिच्या मुखातून चिरंतर कृष्णाचे नांव येत होते. तिने उच्चारलेल्या कृष्णाच्या प्रत्येक पवित्र आणि अनमोल नामाबरोबर एक एक छिद्र मातीने भरून गेले. घड्यातून पाणी गळले नाही आणि पाण्याने पूर्ण भरलेला घडा घेऊन राधा घरी आली. अशी होती तिच्या भक्तीची उंची!

राधा ह्या शब्दामधील ‘रा’-या अक्षरातील “र” हे राधाचे निर्देशक आहे तर ‘आ’ म्हणजे आधार, यामधील ध हे धारेचे किंवा एका अविरत प्रवाहाचे निर्देशक आहे तर “आ” म्हणजे आराधना.
एखाद्या धारेप्रमाणे तिची भक्ती निरंतर होती. दृढ़निश्चयी होती. ज्याप्रमाणे राधेच्या मुखी सदैव कृष्णाचे नाम असायचे त्याचप्रमाणे कृष्णादेखील सतत राधेचा विचार करत असायचा. भक्त आणि त्याचा/तिचा वैयक्तिक देव यांच्यामधील दुवा किंवा जवळीक ही अशी असते.

[Source: Satyopanishad – Upanishad Of Sri Sathya Sai – Part 26]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *