ॐ नमो भगवते भजन- उपक्रम

Print Friendly, PDF & Email
ॐ नमो भगवते भजन- उपक्रम
उपक्रम- नाटयीकरण

गुरू मार्कंडेय, प्रल्हाद, ध्रुव यांची कथा सांगू शकतात. मुलांना नाटयीकरण करण्यास सांगा. मुले स्वतःहून संवाद लिहू शकतात. त्यांना स्वतःच वर्ण, प्रॉप्स, सेट इत्यादी ठरवायचे आहेत.

ध्रुवाची कथा

 

राजा उत्तानपाद हा मनुचा प्रथम पुत्र होता. त्याला सुनिती (नैतिक मूल्ये) आणि सुरुची (सुरेख) नावाच्या दोन राण्या होत्या. सुनीतीला एक पुत्र होता . त्याचे नांव ध्रुव होते व सुरुचीच्या पुत्राचे नांव उत्तम होते.

एक दिवस उत्तम त्याच्या पित्याच्या मांडीवर खेळत होता. ते पाहुन ध्रुवानेही पिताच्या मांडीवर खेळण्याची इच्छा बोलून दाखवली. सुरुचीचा स्वभाव गर्विष्ठ आणि मत्सरी होता. तिने ध्रुवास म्हटले, “तू महाराजांचा ज्येष्ठ पुत्र असशील परंतु त्यांची मर्जी प्राप्त करण्याकरता आणि त्यांच्या मांडीवर खेळण्याकरता तुला तप करुन वर मिळवावा लागेल आणि माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल”.

ते ऐकून ध्रुवाला खूप दुःख झाले. पाणावलेल्या डोळ्याने त्याने त्याच्या पित्याकडे पाहिले. सुरुची उत्तानपादाची आवडती राणी असल्यामुळे, तिच्यावर नाखुशी न दर्शवता तो काहीच बोलला नाही.

ध्रुव जरी पाचच वर्षाचा असला तरी स्वभावाने अत्यंत संवेदनशील होता. त्याने त्याच्या मातेकडे धाव घेतली. त्या उदात्त मनाच्या मातेने मृदु, मधुर शब्दांनी त्याचे सांत्वन केले व त्याला म्हणाली, “दुःख करू नकोस, माझ्या बाळा, परमेश्वर न्यायी आहे. प्रत्येकाला त्याच्या चांगल्या, वाईट कर्मांचा हिशोब द्यावा लागतो. तिच्यावर क्रोधित होण्यापेक्षा तिच्याविषयी मनात दयाभाव बाळग. एक गोष्ट मात्र तिने तुला सत्य सांगितली की तपद्वारे आणि नारायणाच्या कृपेने कोणतीही गोष्ट शक्य आहे. “हां नारायण कोण आहे व तो कोठे सापडेल?”

सुनीतीने त्याला सांगितले, “जे सर्व संग परित्याग करून ह्या प्रभुच्या चरणी आसरा घेतात”, त्यांच्या दुःखाचे निवारण करून तो त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. परंतु तो सहजासहजी प्राप्त होत नाही. दीर्घकाळ कठोर तप करून, योगीजनांनी उत्कट भक्तिद्वारे, तो त्यांच्या हृदयामध्ये असल्याचे जाणले.

ध्रुवाने वेळ वाया न दवडता, परमेश्वराच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन ,आक्रोश करत तो जंगलात गेला. त्याचा आक्रोश नारदांच्या कानावर पड़ला व त्यांनी त्या बालकाची भेट घेतली. त्या बालकाची तळमळ, व्याकुळता, हृदयामध्ये किती प्रामाणिकता आहे ह्याची त्यांना कसोटी घ्यायची होती. ते ध्रुवास म्हणाले, “हे बालका, परमेश्वराचा शोध घेण्यासाठी तू अजून खूप लहान आहेस. तो सहज प्राप्त होत नाही. घरी परत जा. कृतार्थ जीवन जग आणि वृद्धावस्थेत जेव्हा तुझी सर्व कर्तव्ये पूर्ण होतील तेव्हा परमेश्वराचे ध्यान कर.” ध्रुवाने हात जोडून, अत्यंत आदरपूर्वक त्यांना उत्तर दिले, माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे. मला परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

बालकाचा दृढ़ निश्चय पाहुन नारद प्रसन्न झाले व त्यांनी ॐ नमो भगवते वासुदेवाय ह्या द्वादशाक्षरी मंत्राची त्याला दीक्षा दिली. त्यानी त्याला सर्व विचारांपासून मनाला मुक्त करून, त्या मंत्रावर अखंड ध्यान केल्याने ध्यानामध्ये परमेश्वराचे दर्शन होऊ शकते असे सांगितले. ध्यानामध्ये यमुनेचा तीर पाहिल्यानंतर ध्रुवाने मधुवनम येथे यमुनेच्या तीरी कठोर तप करण्यास सुरुवात केली. त्याने कडक उपास केले आणि दीर्घकाळ समाधी अवस्थेत राहु लागला. त्याचे कठोर तप पाहुन सहा महिन्यानंतर परमेश्वरालाच त्याला भेटण्याची उत्कंठा लागली.

परमेष्वर गरुडावर आरूढ होऊन निघाला व ध्रुवासमोर उभा ठाकला. साक्षात परमेश्वराला समोर उभा पाहुन लहानगा ध्रुव स्तंभित झाला, अवाक झाला. त्याने परमेश्वरास साष्टांग नमस्कार घातला. परमेश्वराने हसून हातातील शंकाने ध्रुवाच्या गालास स्पर्श केला. ध्रुवाचे अंतःकरण आनंदाने गहिवरले व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की त्याने नेहमी परमेश्वराच्या अस्तित्वाचा आनंद लुटावा. व निरंतर प्रभु चरणाच्या चिंतनात निमग्न राहावे.

नारायणाने त्याला हां वर दिला व सांगितले, “तू तुझ्या मातापित्यांकडे परत जा व तुझे भुतलावरील दिलेला कालखंड संपेपर्यंत राज्य कर”. त्यानंतर तू स्वर्गीय लोकात प्रवेश करशील. तेथे तुला तुझे शास्वत स्थान मिळेल. ते ध्रुव नक्षत्र म्हणून ओळखले जाईल. काही काळानंतर लोक तुझ्याकडून मार्गदर्शन घेतील.

ध्रुवाने परमेश्वराची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्याने त्याच्या पिताच्या पश्चात उत्तम राज्य कारभार केला. अखेरीस, बाळपणातील दिव्य अनुभवाची पुन्हा प्रचिती घेण्यासाठी त्याने हिमालयातील बद्रिकाश्रमात वास्तव्य केले. तेथे गहिरे ध्यान करण्यात दिवस व्यतीत केले. जेव्हा मर्त्य देहाचा त्याग करण्याची वेळ आली तेव्हा त्याने एक दिव्य दृश्य पाहिले- विष्णुच्या दोन द्वारपालकांसह एक तेजोमय रथ उभा होता. ते दोघं ध्रुवाला ‘ध्रुव नक्षत्र’ हे स्थान प्राप्त करून देण्यासाठी विष्णुलोकात घेऊन गेले. हे सर्वांसाठी मार्गदर्शक नक्षत्र बनले आहे.

मार्कंडेयाची कथा

खूप पूर्वी मृखंडु नावाचे ऋषि होऊन गेले. ते एका जंगलामध्ये आपली पत्नी मायावती हिच्यासह झोपडी बांधून वास्तव्य करत होते. त्यांच्या परिने ते आनंदी जीवन जगत होते. परंतु त्यांना संतान नव्हते. त्यानी शिवाची भक्ती आणि प्रार्थना केली. परंतु ती निष्फळ ठरली. त्यानंतर त्यांनी तप करण्यासाठी घराचा त्याग केला व ते पर्वतावर गेले. तेथे त्यांनी काही वर्ष तप केले. त्यांच्या तपाने शिव प्रसन्न झाले व त्यांच्या समोर उभे राहिले. प्रभुने त्यांना काय हवे हे सांगण्यास सांगितले. मृखंडु विनम्रतेने त्यांच्यासमोर वाकून म्हणाले की ते जीवनात आनंदी आहेत परंतु जीवनाच्या परिपूर्णतेसाठी त्यांना एक अपत्य हवे आहे. त्यावर शिव हसून म्हणाले,”तुला एक मंदमती पुत्र आवडेल का जो शंभर वर्ष जागेल? ऋषि उत्तरले, “हे प्रभु, मला उत्तम आणि दयाळू पुत्र हवा मग तो अल्पायुषी असला तरी चालेल”. शिवांनी मृखंडुंना ‘तथास्तु’ म्हटले व ते अंतर्धान पावले.

काही काळांनी त्यांच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले. त्यांनी त्याचे नांव मार्कंडेय ठेवले. मार्कंडेय अतिशय उत्तम बालक होता. तो त्याचे मित्र, पालक व प्रभु ह्यांच्यावर खूप प्रेम करत होता. तो जेव्हा १६ वर्षाचा व्हायला आला तेव्हा त्याने त्याच्या मातेला सतत अश्रू ढाळताना पाहिले त्याने तिच्या दुःखाचे कारण विचारले. ती उत्तरली की भगवान शिवाने त्याला १६ वर्षाचे अल्पायुष्य प्रदान केल्याने ती दुःखी होती.

ते ऐकल्यानंतर भगवान शिवांची प्रार्थना करण्यासाठी मार्कंडेयाने घराचा त्याग केला. शिवलिंगास मिठी घालून तो प्रार्थनेमध्ये निमग्न होऊन बसला. मृत्युदेवता यमाने मार्कंडेयास घेऊन येण्यासाठी आपले दूत पाठवले. त्यांनी त्याला तेथून ओढून नेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. यमराज स्वतः तेथे आले. परंतु त्यांनाही त्या शिवलिंगास आलिंगन दिलेल्या त्या छोट्या भक्तास मृत्युपाशात बांधणे शक्य झाले नाही. जर गळफास टाकायचा असेल तर यमराजांना तो शिवलिंगाभोवतीही टाकावा लागला असता. त्या लिंगापासून भक्तास कोणीही विलग करू शकले नाही. भगवान शिव मार्कंडेयाच्या निःस्सीम ,अढळ भक्तीने प्रसन्न होऊन तेथे प्रकट झाले व त्याला अमरत्वाचे वरदान दिले. मार्कंडेय मृत्यंजय बनले त्यांच्या प्रगाढ व अढळ श्रद्धेने त्यांनी मृत्युवर विजय मिळवला व ते चिरंजीवी बनले.

प्रल्हादाची गोष्ट

हिरण्यकशपू हा दैत्यांचा राजा होता. देवांचा आणि त्यांचा जन्म एकाच पालकांच्या पोटी झाला असूनही दैत्य नेहमी देवांशी युद्ध करत असत मनुष्याने यज्ञामध्ये समर्पित केलेल्या वस्तूंमध्ये दैत्यांना वाटा मिळत नसे. तसेच विश्वाच्या राज्यकारभारात व त्यातील मार्गदर्शन करण्यातही त्यांना सहभागी होता येत नसे. परंतु कधी कधी ते अधिक बलवान ठरत व देवांना स्वर्गातून हुसकवून लावत व त्यांचे सिंहासन बळकावून काही काळ राज्य करत. देव विश्वव्यापी विश्व नियंत्याकडे धाव घेऊन प्रार्थना करत व तो ह्या पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सहाय्य करत असे. दैत्यांना पळवून लावून पुनः एकदा देवांना राज्याचा ताबा मिळे. दैत्यांचा राजा हिरण्यकशपू देवांवर विजय मिळवून तो स्वर्गातील सिंहासनावर विराजमान झाला व त्रिलोकाधिआपती बनला. मधल्या विश्वात मानवजात व पशुपक्षी ह्यांचा वास होता, स्वर्गलोकात देवदेवतांचा वास होता व खालच्या म्हणजे पाताळ लोकात दैत्यांचा वास होता.

हिरण्यकशपू त्या तिन्ही लोकांचा स्वामी बनला. त्याने स्वतःला विश्वेश्वर म्हणून घोषित केले आणि देव म्हणून केवळ त्याचेच पूजन केले पाहिजे असा हुकुमही जारी केला व कोणीही , कोठेही त्या सर्वशक्तीमान विष्णुची भक्ति न करता, इथून पुढे केवळ त्याचीच भक्ती करावी हे ही बजावून सांगितले.

हिरण्यकशपूला प्रल्हाद नावाचा एक पुत्र होता. झाले असे की त्याच्या अर्भकावस्थे पासूनच परमेश्वराचा भक्त होता. त्याने बालावस्थेतच हे दर्शवले. दैत्यराजास भय वाटू लागले की ज्या अमंगल गोष्टीस त्याला विश्वातून हुसकून लावायचे होते ते अमंगल त्याच्या स्वतःच्या कुटुंबात अंकुरत होते. त्यावर उपाय म्हणून त्याने शंड व अम्रक नावाचे दोन शिक्षक त्याच्या पुत्रासाठी नेमले. ते दोघे अत्यंत कडक शिस्तीचे होते. व त्यांना असा हुकुम देण्यात आला होता की प्रल्हादाच्या कानावर कधीही विष्णुचे नांव पडणार नाही. ह्याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. ते शिक्षक प्रल्हादास त्यांच्या घरी घेऊन गेले. तेथे त्याच्या वयाच्या मुलांबरोबर प्रल्हादाचे शिक्षण सुरु झाले. परंतु छोटा प्रल्हाद पुस्तकातून अभ्यास करण्या ऐवजी सर्व वेळ इतर मुलांना विष्णुभक्ती कशी करावी शिकवत असे. जेव्हा शिक्षकांना हे समजले तेव्हा शक्तिशाली हिरण्यकशपू काय करेल ह्या भीतीने त्यांना ग्रासले. त्यांनी प्रल्हादास विष्णुची भक्ती करण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रल्हादाने एकवेळ त्याचा श्वासोच्छवास थांबवला असता परंतु त्याची शिकवण आणि विष्णु भक्ती थांबवली नाही. शिक्षकांनी आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी, हे भयानक सत्य राजाच्या कानावर घातले की त्यांचा पुत्र एकटाच विष्णुभक्ती करत नसून इतर मुलांनाही विष्णुची भक्ती कशी करायची हे शिकवून बिघडवत आहे. हे वृत्त कळल्यावर राजा अत्यंत क्रोधित झाला व त्याने पुत्रास आपल्या समोर हजर करण्याचा हुकुम दिला. त्याने सौम्य शब्दात विष्णुभक्ती करू नये ह्यासाठी प्रल्हादाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने विष्णु भक्ती न करता राजाची भक्ती करावी हे ही शिकवले. परंतु सर्व व्यर्थ ठरले. बालकाने पुन्हा पुन्हा घोषित केले भक्ती करण्यासाठी विश्वव्यापी विश्वेश्वर’ विष्णु हा एकमेव परमेश्वर आहे. विष्णुच्या कृपेमुळेच राजा ह्या सिंहासनावर दीर्घकाळ विराजमान आहे.

राजाच्या क्रोधास पारावार उरला नाही व त्याने त्या बालकास तात्काळ ठार मारण्याचा आदेश दिला. दैत्यांनी अणुकुचीदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. परंतु प्रल्हादाचे मन विष्णुंमध्ये एवढे निमग्न झाले होते की त्याला अजिबात वेदना जाणवल्या नाहीत.

त्याच्या पित्यानी, राजानी जेव्हा हे पाहिले, तेव्हा तो ही भयभीत झाला. त्याच्यामधील असूरी भाव जागृत झाले, त्या बालकास ठार मारण्यासाठी विविध अघोरी उपाय त्याने शोधून काढले.

त्याने त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्याचे आदेश दिले. तो क्रोधित हत्ती लोखंडाची वीट चिरडून टाकू शकला असता परंतु त्याला बालकाचा देह चिरडून टाकणे शक्य झाले नाही.

त्यानंतर राजाने त्याला उभ्या कड्यावरून फेकून देण्याचा हुकुम दिला. त्या हुकुमाचीही अंमलबजावणी करण्यात आली परंतु प्रल्हादाच्या हृदयात विष्णु वास करत असल्यामुळे, प्रल्हाद गवतावर अलगदपणे पडणाऱ्या फुलासारखा अलगद खाली आला.

त्यानंतर जहर, अग्नि, उपासमार, विहिरीत ढकलून देणे, जादूटोणा, आणि इतर प्रकारांनी त्या बालकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व व्यर्थ ठरले. ज्याच्या हृदयामध्ये विष्णूचा वास होता, त्यास कोणतीही इजा पोहचवू शकले नाही.

अखेरीस, राजाने पाताळ लोकातील एका बलशाली सर्पाने त्या बालकास बांधून समुद्राच्या तळाशी फेकले जेथे प्रचंड पर्वताचे एकावर एक थर जमा होणार होते. म्हणजे जरी तात्काळ नाही तरी काही काळांनी त्याला मृत्यु आला असता. राजाने त्याला त्याच्या दुःखासमवेत तेथे सोडण्यास सांगितले. अशा परिस्थितीतही बालकाने प्रिय विष्णुंची प्रार्थना सुरुच ठेवली, “हे विश्वेश्वरा! तुला माझा नमस्कार असो! तू सौन्दर्यमूर्ती विष्णु!” विष्णुचे आशा तऱ्हेने चिंतन आणि ध्यान करत असताना त्याला विष्णु त्याच्या समीप असल्यासारखे वाटु लागले. एवढेच नव्हे तर तो त्याच्या अंतरात्म्यातच सामावला आहे व त्यानंतर तो स्वतःच विष्णु आहे , तोच सर्वकाही आहे,सर्वत्र आहे असे त्याला जाणवू लागले.

हिरण्यकशपूच्या शत्रूची, विष्णुची परिपूर्ण भक्ती करणाऱ्या मुलापासून सुटका करून घेण्यासाठी सर्व विनाशकारी साधने निष्प्रभ ठरली ही भयानक गोष्ट जेव्हा त्याच्या लक्षात आली तेव्हा त्याला काय करावे हेच समजत नव्हते. राजाने त्या मुलाला पुन्हा एकदा समोर बोलावले व सौम्य शब्दात उपदेश करून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रल्हादाने तेच उत्तर दिले. तथापि वाढत्या वयाबरोबर आणि पुढील प्रशिक्षणाने त्याचा हा बालहट्ट नाहिसा होईल अशा विचाराने त्याने पुन्हा प्रल्हादास शिक्षकांच्या हाती सोपवले त्यांना त्याला राजाची कर्तव्ये शिकवण्यास सांगितले. परंतु प्रह्लादास त्या शिकवणीमध्ये रुची नव्हती. तो त्याच्या सहाध्यायी मुलांना भगवान विष्णूुच्या भक्तीचा मार्ग दर्शवण्यात आपला वेळ व्यतीत करत असे.

जेव्हा त्याच्या पित्यास हे समजले तेव्हा ते क्रुध्द झाले, त्यांनी प्रल्हादास बोलावले व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली व विष्णुंविषयी अपशब्द उच्चारले. तथापि प्रल्हादाने हेच ठामपणे सांगितले की विष्णु हेच विश्वेश्वर आहेत, अनादी अनंत, सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी आहेत. ज्याची भक्ती करावी असे ते एकमेव आहेत.

हे ऐकून राजा क्रोधाने बेभान झाला व म्हणाला,” हे दुष्टा,जर तुझा विष्णु सर्वव्यापी परमेश्वर आहे तर त्या पलीकडच्या खांबामध्ये त्याचे अस्तित्व का नाही?” तो त्या खांबामध्येही विद्यमान असल्याचे प्रल्हादाने नम्रपणे सांगितले. राजा मोठ्या आवाजात म्हणाला,” जर तसे असेल तर त्याने तुझा बचाव करावा, मी ह्या तलवरीने तुला मारणार आहे.” एवढे बोलून राजा तलवार हातात घेऊन त्याच्याकडे धावला. व त्याने खांबांवर एक जोरदार प्रहार केला. तत्क्षणी मेघगर्जनेसारखा गडगडाट ऐकू आला आणि काय आश्चर्य! त्या खांबामधून विष्णु नरसिंह अवतारात प्रकट झाले. अर्ध सिंह, अर्ध नर! भयभीत झालेले दैत्य दाही दिशांना पळाले. परंतु हिरण्यकशपूने त्यांच्याशी लढत दिली आणि अखेरीस त्याच्यावर मात करून विष्णुने त्याचा वध केला.

त्यानंतर देवदेवता स्वर्गातून भूतलावर आले व विष्णुंचे स्तुतीगान केले. प्रल्हादानेही त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले व त्यानेही भक्तीभावाने त्याला स्फुरलेले उत्कृष्ट स्तुतीगान केले. त्याने दिव्य वाणी ऐकली, “प्रल्हादा, माग तुला काय हवे ते माग. तू माझा अत्यंत प्रिय बालक आहेस. म्हणून तू तुला हवे ते माग. “गहिवरलेल्या स्वरात प्रल्हाद उत्तरला.” प्रभु तुमचे दर्शन झाले, आता माला काय अजुन हवे? हे प्रभु मला भौतिक वा स्वर्गीय वरदांनाची प्रलोभने दाखवू नका.”पुन्हा ती दिव्यवाणी म्हणाली, “तरीही माझ्या प्रिय पुत्रा, तू काहीतरी माग” त्यावर प्रल्हाद म्हणाला,”प्रभु! अज्ञानी लोकांना जे भौतिक गोष्टीसाठी अतीव प्रेम असते तसे प्रेम माझ्या हृदयात तुझ्याप्रती असू दे . मला तेवढेच तीव्र प्रेम तुझ्यासाठी असू दे. परंतु ते केवळ प्रेमाखातर असू दे.

त्यावर परमेश्वर म्हणाला, “प्रल्हादा , जरी माझ्या निःस्सीम भक्तांना कधीही कशाची इच्छा नसते. परंतु येथे वा येथून पुढे माझ्या आज्ञेनुसार ह्या सांप्रत कालचक्राच्या अखेरपर्यंत तू ह्या विश्वाच्या कृपाप्रसादाचा आनंद घे. तुझे चित्त माझ्यावर केंद्रित करून पुण्यशील, धार्मिक कार्ये कर आणि हा देह त्यागल्यानंतर तुला माझी प्राप्ती होईल. “प्रल्हादाला असा आशीर्वाद देऊन विष्णु अंतर्धान पावले. त्यानंतर ब्रह्मा व इतर देवदेवतांनी प्रल्हादास दैत्यांच्या सिंहासनावर स्थापित केले व ते आपापल्या लोकात परतले.

[Reference : http://www.ramakrishnavivekananda.info/vivekananda/volume_4/lectures_and_discourses/the_story_of_prahlada.htm]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *