शंकराचार्यांचे जीवन

Print Friendly, PDF & Email
शंकराचार्यांचे जीवन

मध्य केरळातील कालडी नावाच्या खेड्यात आठव्या शतकाच्या शेवटी शंकराचार्यांचा जन्म झाला. शिवगुरू व आर्याम्बा या धर्मशील नंबुद्री ब्राह्मण दांपत्याचे ते एकुलते एक पुत्र होते. या दांपत्याने त्रिचुर येथील वृषभाचलेश्वर मंदिरातील भगवान शंकरांच्या दीर्घकाल केलेल्या प्रार्थनांचे फलित म्हणून त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. ते असामान्य बुद्धी असलेले मूल होते, त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी वेदाभ्यास पूर्ण केला. ते लहान असतानाच त्यांचे वडील वारले आणि त्यांच्या मातेने वत्सलतेने त्यांचे संगोपन केले; कारण आता तोच एकमेव त्यांना दुःखपरिहार करणारा आधार उरला होता. मुलाच्या ठिकाणी सर्वसंगत्यागाच्या वृत्तीची लक्षणे दिसत होती,

त्यामुळे ती माता अस्वस्थ झाली होती. तथापि ज्या दैवी कार्यासाठी त्या महान बुद्धिमंताचा जन्म झाला होता ते कार्य तर सिद्धीला जायलाच हवे होते. आणि म्हणून शंकराला ऐहिक बंधनातून मुक्त करण्यासाठी कोणतातरी चमत्कारच घडायला हवा होता. एकदा हा मुलगा जवळच्या पूर्णा नदीत स्नान करीत असताना आणि त्याची आई काठावर उभी असताना एका मगरीने मुलाचा पाय धरला आणि ती त्याला खोल पाण्यात ओढून नेऊ लागली. मुत्यूजवळ येऊन ठेपल्यावर शंकराने आईजवळ संन्यास घेण्याची परवानगी मागितली; कारण प्रत्येक हिंदूने मृत्यूपूर्वी या चतुर्थाश्रमात प्रवेश करणे अपेक्षित होते. अशा अवघड परिस्थितीत आपत्संन्यास हा संन्यासाचा प्रकार तेव्हा अगदी प्रचलित होता. मोठ्या नाखुशीने आर्याम्बाने संमती दिली आणि काय नवल! अगदी अनाकलनीयपणाने त्या मगरीने मुलाला सोडून दिले! हा बालसंन्यासी नदीतून बाहेर आल्यावर त्याने परिव्राजक (भ्रमंती करणारा संन्यासी) व्हायचे ठरविले आणि लवकरच त्याने आपले गाव सोडले. तत्पूर्वी त्याने आपल्या आईचे सांत्वन केले आणि तिला आश्वासन दिले की तिच्या अंतकाली तो तिच्यापाशी असेल आणि तिची उत्तरक्रियाही तोच पार पाडील अशा तऱ्हेने जेव्हा बहुतेक मुलांनी आपली क्षुल्लक खेळणीसुद्धा सोडलेली नसतात अशा आठ वर्षांच्या अगदी अल्प वयात शंकराचार्य आपल्या दैवी कार्यासाठी निघाले

कालडी सोडल्यानंतर हा बालसंन्यासी पंडित गुरूच्या शोधार्थ दक्षिण भारतात भ्रमण करून शेवटी नर्मदेच्या तीरावर पोचला. तिथे त्यांना गोविंद भगवत्पाद भेटले. प्रख्यात माण्डूक्यकारिका लिहिणाऱ्या महान गौडपादांचे ते प्रसिद्ध शिष्य होते. गोविंद भगवत्पादांनी या बालसंन्याशाचा आनंदाने शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्याला त्यांनी वेदान्ताच्या गुंतागुंतीची ओळख करून दिली. सुमारे सात वर्षानंतर जेव्हा शंकरांचे वेदान्ताचे अध्ययन व साधना पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना विद्वत्ता व अध्यात्म यांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्राचीन नगरीला, काशीला जावयास सांगितले, आणि तिथून ब्रह्मसूत्रे, उपनिषदे व भगवद्गीता यांच्यावर भाष्यग्रंथ लिहून अद्वैत वेदान्ताचा संदेश करायला सांगितले. गुरूंच्या आज्ञेनुसार ते काशीला गेले आणि तिथे थोड्याच वेळात वेदान्त तत्त्वज्ञानाचे सर्वात महान कैवारी म्हणून ते स्थिर झाले. त्यांनी अनेक वादविवादांत जय मिळवला आणि त्यांच्याकडे मोठ्या संख्येने शिष्य येऊ लागले, पद्मपाद, हस्तामलक व तोटक हे त्यात प्रमुख होते. अशा तऱ्हेने सुमारे सोळा वर्षांच्या वयास त्या काळाच्या बौद्धिक व आध्यात्मिक चळवळींचे केंद्रस्थान असलेल्या वाराणसी नगरीत महान तत्त्वज्ञ म्हणून शंकराचार्य स्थिरपद झाले.

वेदांत तत्त्वज्ञानाचा अजिंक्य कैवारी म्हणून काशीत आपले बस्तान बसविल्यानंतर शंकराचार्य या विशाल देशात दिग्विजयासाठी यात्रेला निघाले. ते ब्रह्मसूत्रभाष्य लिहीत असताना महर्षी वेदव्यासांनी त्यांना साक्षात दर्शन दिले होते व यासंबंधी विशिष्ट सूचना दिल्या होत्या. ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी तत्कालीन तत्त्वज्ञान-प्रणालींच्या प्रसिद्ध नेत्यांना वादात जिंकले आणि अद्वैत वेदान्ताला दृढमूल केले. त्यांची प्रचंड व्यत्पत्ती, वादनिपुणता व आध्यात्मिक यथार्थज्ञान यांच्यापुढे कोणी उभाच राहू शकत नसे. या वादविवादांमधील महत्त्वाचा वादविवाद कर्मकांडाचा अति कट्टर पाठीराखा असलेल्या कुमारिल भट्टांचा शिष्य मंडनमिश्र याच्याशी गाठ पडली तेव्हा घडून आला. त्या वेळी हिंदुधर्मावर वैदिक कर्मकांडाचा खूपच प्रभाव होता आणि त्याचे कारण कुमारिल भट्ट मंडनमिश्र यांच्यासारखे तत्त्वचिंतक धार्मिक अधि कारी होते. ज्ञानकांडातील सत्ये प्रस्थापित करण्यासाठी या दोन अलौकिक बुद्धिमतांचा पराभव करणे व त्यांना आपलेसे करणे शंकराचार्यांना भाग होते. त्या वेळी कुमारिल भट्ट तुषाग्निसेवनाने अग्निप्रवेश करण्याच्या बेतात होते. या विधीमुळे आत्म्याची प्रकृतीच्या बंधातून कायमची सुटका होते अशी समजूत प्रसृत होती. त्यामुळे कुमारिल भट्ट शंकराचार्यांशी वाद करण्यास असमर्थ होते म्हणून त्यांनी या वेदान्त्याला आपला शिष्य मंडनमिश्र याची गाठ घेण्यास सुचविले व मंडनमिश्राची सुविद्य पत्नी उभयभारती हिला परीक्षक नेमून वाद करण्यास सांगितले. कित्येक दिवसांच्या चर्चेनंतर मंडनमिश्राने पराभव पत्करला.

वादविवादाची अट अशी होती की, जो पराभूत होईल तो जेत्याचा शिष्य होईल आणि त्याच्या जीवनपद्धतीचा स्वीकार करील. त्यामुळे मंडनमित्र संन्यासी झाला आणि त्याला सुरेश्वर असे नाव देण्यात आले. या विजयामुळे शंकराचार्यांच्या आध्यात्मिक यशाला नवीन प्रेरणा मिळाली. चुकीच्या तत्त्वप्रणालींचे खंडन करीत आणि त्या काळी

धर्माच्या नावाखाली प्रचलित असलेल्या आक्षेपार्ह प्रथा शुद्ध करीत श्रीशंकराचार्य व त्यांचे शिष्य यांनी सारी भूमी पादाक्रांत केली. त्यांनी दक्षिणेत शृंगेरीला, उत्तरेत बद्रीला, पश्चिमेत द्वारकेला व पूर्वेकडे जगन्नाथपुरीला असे चार ठिकाणी मठही स्थापन केले. त्यांनी कांचीलाही कामकोटी मठ म्हणून माहीत असलेला मठ स्थापन केला असे म्हणतात. त्यांनी हिमाच्छादित पर्वतराजी, अरण्ये व नद्या किंवा समुद्रकिनारे यांच्या नैसर्गिक परिसरातील सौंदर्यासाठी या स्थळांची निवड केली होती. जिथे पृथ्वी व आकाश भेटतात आणि माणसाचे विचार उदात्त पातळीवर उन्नत करतात अशी ही ठिकाणे होती, त्यांनी मठपती म्हणून शृंगेरीत सुरेश्वराचार्य, द्वारकेत श्रीपद्मपाद, बद्रीत श्रीतोटक व पुरीत श्रीहस्तामलक यांची नेमणूक केली. या मठांची स्थापना श्रीशंकराचार्यांनी भारताचे भौतिक व आध्यात्मिक एकत्व स्पष्टपणे जाणले होते असे दर्शविते. त्या काळी सुसंकृत भारताची बोलीभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेत त्यांनी लिखाण केले. कारण देशातील साऱ्या बुद्धिमंतांना तेच आवडणे शक्य होते.

शृंगेरीत बराच काळ राहिल्यानंतर ते घाईघाईने कालडी येथील आपल्या वंशपरंपरागत घरात आसन्नमरण मातेच्या बिछान्यापाशी गेले. आणि शिव व विष्णू यांच्या स्तुतिपर स्तोत्रांचे मधुर स्वर गुंजत असताना तिचा आत्मा ‘प्रकाशाच्या अमृतमय प्रदेशात’ त्वरेने धाडून दिला. कर्मठ नातलगांच्या विरोधाला न जुमानता आपल्या घराच्या मागे नदीच्या काठावर त्यांनी मातेच्या देहाचे दहन केले व त्यानंतर ते स्थान तीर्थस्थान म्हणून पवित्र मानले गेले.

ज्यांच्या भोवती लोकांच्या सांस्कृतिक परंपरा गोळा झालेल्या आहेत त्या सर्व पवित्र मंदिरांना त्यांनी भेट दिली, तिथले पूजाविधी शुद्ध केले. आणि कांचीचे कामाक्षीमंदिर, बद्रीचे नरनारायणमंदिर आणि नेपाळमधील गुह्येश्वरीमंदिर इत्यादी अनेक ठिकाणी श्रीचक्रांची स्थापना केली.

या परमहंस परिव्राजकाचार्यांनी आपल्या विजयी यात्रेवर काश्मीरमधील महान पंडितांना जिंकून कळस चढविला. (तेव्हा माहीत असलेल्या) सर्व विद्याशाखांवरील निर्विवाद प्रभुत्व आणि त्यांची विद्वत्ता यांच्या जगन्मान्यतेची खूण म्हणून ते ‘सर्वज्ञपीठावर’ आरूढ झाले. नेपाळला त्यांनी दिलेल्या शेवटच्या भेटीत त्यांना श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि तिथून ते केदारनाथला गेले व तिथे वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ते मर्त्य अस्तित्वातून गुप्त झाले असे सांगतात. केदारनाथमंदिरापासून जवळच असलेली एक जागा त्यांच्या अदृश्य होण्याची जागा म्हणून सांगितली जाते. (तथापि एका मताप्रमाणे ते पवित्र कांचीतील कामाक्षीमातेमध्ये विलीन झाले आणि अशा तऱ्हेने त्यांनी आपली ऐहिक कारकीर्द संपविली.)

शंकराचार्यांनी उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाच्या तर्कशुद्ध व शास्त्रीय विवेचनाने हिंदुप्रासाद केला. त्यामुळे आधुनिक काळापर्यंत इतिहासाच्या चढ – उतारांमध्ये सनातन धर्म सर्व तऱ्हेच्या आव्हानांना तोंड देऊ शकला. त्यांचे भारतीय तत्वज्ञानाला योगदान इतके चिरकालिक आहे की नंतर सर्व तत्त्ववेत्त्यांनी एक तर त्यांचे खंडण करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशांमध्ये भारतीय तत्त्वज्ञान हे नेहमीच शंकराचार्यांच्या अद्वैतशी एकरूप मानले गेले आहे.

शंकराचार्य हे महान ऋषिसंस्कृतीचे होते. त्या संस्कृतीचे ते सर्वश्रेष्ठ विवेचक होते. त्यांचा संदेश हा आशा व आशावाद यांचा संदेश आहे. ते म्हणतात की, मानव ही अंतिम स्थिती नाही, परिपूर्ण निर्मिती नाही. त्याच्यापाशी देवी क्षमता आहे. जाणीवपूर्वक उत्क्रांतीद्वारा तिचा शोध लावावा लागतो. अद्वैत असे सांगते की, शांती परिपूर्णता व आनंद यांचे साम्राज्य आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत आहे. आपल्याला ते जाणून घेतलेच पाहिजे. त्यांचे नावच सुचविते (शं करोति शंकर: | जो कल्याण करतो तो शंकर) त्याप्रमाणे शंकराचार्य मानवजातीच्या महान कल्याण कर्त्यांपैकी एक होते. कारण त्यांनी वेदांचे सार असणारे आणि अद्वैत वेदान्त स्पष्ट करून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *