सत्याची सर्वज्ञता

Print Friendly, PDF & Email

सत्याची सर्वज्ञता

रंजल्या गांजल्यांना मदत करत असल्यामुळे सत्याने उरवकोंडा गावातील सामान्यांच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले होते. एकदा एक मुस्लिम मनुष्य आपल्या घोड्याचा कसून शोध घेत होता. त्याचा घोडा रस्ता चुकून भलतीकडे गेला असावा वा कोणी चोरला असावा. तो घोडा त्याच्या उपजीविकेचा एक मात्र स्त्रोत होता. घोडागाडीमधून सामानाची ने आण करून तो त्याचा चरितार्थ चालवत असे. त्याच्या शोधार्थ त्याने भौवतालचा मैलभर परिसर पालथा घालता. परंतु घोडा न मिळाल्यामुळे तो अत्यंत हताश झाला. त्याला कोणीतरी सत्याविषयी सांगितले.

त्या मनुष्याने ताबडतोब सत्याला शोधले व आपली कहाणी सांगितली. सत्याने त्याला लगेचच गावापासून दीड मैलावर असलेल्या वृक्षवाटिकेत जाण्यास सांगितले. तो तेथे गेला आणि त्याने त्याचा घोडा एकटाच तेथे चरत असलेला पाहिला. त्याच्या हरवण्यामुळे झालेल्या गोंधळाशी त्याचा काही संबंध नव्हता! हे दयाळू कृत्याने त्या भागातील मुस्लीम समाजातील लोकांच्या मनास स्पर्शून गेले. व त्यानंतर घोडागाडीचे चालक सत्याला पाहुन गाडी थांबवत व सत्याला शाळेत जाण्यासाठी वा शाळेतून येण्यासाठी आपल्या गाडीत बसवून घेउन जात लोकांच्या काही मौल्यवान वस्तु हरवल्या की वारंवार ते सत्याकडे जात असत. कारण त्याची अंतर्दृष्टी ती वस्तु शोधून देईल हे त्यांना माहीत होते.

एका शिक्षकांचे पेन हरवले होते आणि ज्यानी कोणी ते घेतले होते त्याचे नांव उघड करावे अशी त्यांनी सत्याला विनंती केली. सत्याने त्यांच्या नोकराचे नांव घेतले. नोकर विश्वासू आहे असे शिक्षकांना वाटत होते. व त्याच्या खोलीमध्येही पेन सापडले नाही. त्यामुळे त्यांचा सत्याच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. तथापि सत्या मात्र त्यावर ठाम होता. त्याने सांगितले की नोकराने ते पेन अनंतपूरमध्ये शिकत असलेल्या मुलाला पाठवले आहे. तुम्ही ते पडताळून पाहा. वडील अशिक्षित होते. पत्र लिहिण्यास वडिलांना लेखनिकाची गरज होती. लेखनिकाने नेहमीच्या पद्धतीने मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली व वडिलांनी पाठवलेले पेन व्यवस्थित चालते ना ते विचारले! ते पेन महागडे असल्याने ते काळजीपूर्वक सांभाळावे, चोरीला जाऊ शकते. असा सल्लाही वडिलांनी दिला. पत्र पाकिटामध्ये घालून रवाना झाले. चार दिवसात मुलाचे उत्तर आले. त्यामध्ये पेन उत्तम प्रकारे चालते आहे व काळजीपूर्वक सांभाळतो आहे! असे लिहिले होते.

अशा तऱ्हेने सत्याची सर्वज्ञता सिद्ध झाली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: