मानवसेवा हीच माधवसेवा
मानवसेवा हीच माधवसेवा
अब्राहम लिंकन इ.स. १८६१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाले. सगळ्या देशात तो दयाळू अंतःकरणाचा सद्गृहस्थ व सत्य-न्यायप्रेमी म्हणून विख्यात होता.
अगदी लहान असतानाही त्याला गरजू किया अडचणीत असलेल्या माणसांना मदत करायला व त्यांची सेवा करायला आवडत असे. तो राष्ट्राध्यक्ष असताना एकदा आपल्या मित्रांबरोबर नित्याप्रमाणे फिरायला गेला. घरी परत येताना त्याला त्याच्यामागे खोगीर घातलेला पण स्वार नसलेला एक घोडा दिसला. अब्राहमने आपल्या मित्राजवळ तो घोडा कुणाचा आहे हे कोणाला माहीत आहे काय आणि तो असा चमत्कारिक स्थितीत का फिरत असेल अशी चौकशी केली त्या मित्रांना माहीत असलेल्या एका माणसाचा तो घोडा असावा अशी त्यांना शंका आली. “तो दारुड्या आहे, ते म्हणाले “तो वाटेत कुठेतरी घोड्यावरून पडला असावा.
सगळ्यांनी परत जाऊन त्याला शोधून काढावे असे अब्राहमने सुचविले. “आपण कशाला जायचं?” ते मित्र म्हणाले, “अंधार पडू लागला आहे. आपण घाई करू या. आधीच उशीर झाला आहे. त्या दारुड्याला चांगला धडा शिकू दे. ते पुढे चालू लागले. पण अब्राहम सामील झाला नाही तो परत फिरला आणि म्हणाला,”मग मला माफ करा. तुम्ही अवश्य घरी जा. पण मला अस वाटतं, त्या माणसाला मदतीची जरुर आहे तो पडला असेल आणि कदाचित त्याला गंभीर दुखापत झाली असेल.” त्याचे मित्र घरी गेले आणि अब्राहम मात्र उलट्या दिशेने रस्त्यात त्या दुर्दैवी माणसाचा शोध घेत चालत राहिला. काही अंतर चालल्यानंतर तो दारुड्या रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेला त्याला दिसला.
अब्राहमने त्याला थोडेसे सावध केले व मोठ्या कष्टाने त्याला स्वतःच्या घरी आणले. दारुड्याला घरात आणल्याबद्दल अब्राहमच्या घरातले सर्व लोक रागावले पण त्यांच्या कठोर शब्दांकडे त्याने मुळीच लक्ष दिले नाही. तो शांतपणे त्यांना म्हणाला.,” हे पाहा, तो झिंगलेला असेल पण तोही आपल्यासारखाच माणूस आहे. त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.” – अब्राहम त्या दारुडयाला मोरीत घेऊन गेला व काही वेळ हजाऱ्यातून (शॉवरमधून) त्याच्यावर थंड पाण्याचा शिडकावा केला. तो पूर्ण सावध झाल्यानंतर अब्राहमने त्याला जेवायला घातले. मग त्याला त्याने घरी जाऊ दिले.
अब्राहमचा विश्वास होता की प्रेमपूर्वक केलेली मानव सेवा हीच माधवसेवा असते. अमेरिकन लोक काळ्या निग्रोंना गुलामांप्रमाणे राबायला लावीत. हे पाहून त्याला दुःख होत असे आणि म्हणून ही गुलामगिरी थांबविण्यासाठी तो आपल्याच देशबांधवांशी लढला आणि शेवटी निग्रोंना त्याने स्वातंत्र्य मिळवून दिले. निग्रो आणि पुष्कळ अमेरिकन लोकसुद्धा म्हणूनच असे म्हणत असत, “स्वर्गामध्ये देव आणि पृथ्वीवर अब्राहम लिंकन हे दोनच आमचे पाठीराखा आहेत.”
प्रश्न:
- संकटात असलेल्या एखाद्या माणसाला तुम्ही कधी मदत केली आहे अथवा त्याची सेवा केली आहे काय? जर केली असेल तर ती मदत कोणती व तुमचा अनुभव कसा होता?
- लिंकनवर देशबांधवांचे इतके प्रेम का होते?
- प्राणिमात्रांना मदत करणारा व सहृदय असा दुसरा कोणी थोर पुरुष तुम्हाला तुम्हाला माहित आहे काय? जर माहीत असेल तर त्याच्यासंबंधी लिहा.