दीपावलीचे महत्व
दीपावलीचे महत्व
प्रकाशामयता हे विजयाचे चिन्ह आहे. आनंदी जीवनाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर केलेली मात -मिळविलेता विजय प्रकाशमयता दर्शवितो. आपला आनंद प्रकट करण्याची एक पध्दत दिवे उजळणे ही आहे. दीपावली उत्सवाच्या उद्गमाविषयी (मूळ निर्मितीबद्दल) आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या विचारधारा प्रचलित आहेत. उत्तर हिंदुस्थानात अशी एक कथा सांगितली जाते की आपला दीर्घकालीन वनवास संपवून व राक्षस कुळाचा उच्छेद करून प्रभु राम, सीता व लक्ष्मण यांचे विजयी पुनरागमन अयोध्येला झाले. याबद्दल हा उत्सव साजरा केला जातो. भारताच्या अन्य काही भागात या उत्सवाचा संबंध श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्यासह नरकासुर नावाच्या राक्षसाचा निःपात केला या घटनेशी जोडलेला आहे. तर आणखी काही भागात असुरराज बलीचे गर्वहरण करुन वामनाने (प्रभूने) त्याला दिलेले वरदान ही घटना दीपोत्सवाने साजरी करावी असे समजतात.
पण या सर्वात लोकप्रिय व अर्थपूर्ण धडा शिकविणारी आख्यायिका नरकासुर आणि त्याचा पाडाव यासंबंधीही आहे. या दैत्याचे नावच सांगते की नरकासुर नरकाकडे नेणाऱ्या मार्गाचा पाठपुरावा करणार होता. सगळे दुर्गुण आणि पापे यांचा तो आश्रयदता होता म्हणून प्रत्यक्ष त्याच्या मातेने,, पृथ्वीने , त्याचा आणि त्याच्या दुष्ट असुर टोळीचा नाश करण्यासाठी, प्रभूची प्रार्थना केली
लोकं या दिवशी भल्या पहाटेच – सूर्योदयाच्या कितीतरी अगोदर उठतात आणि असुरांचे अंधकारव्याप्त काळे दिवस संपलेले आहेत सुचविण्यासाठी पूर्ण घरभर व रस्त्यावर दिवे लावतात. ते पहाटेच अभ्यंगस्नान करतात. नवे कपडे परिधान करतात, फटाके आणि भुईनळयांच्या भोवती नाचतात आणि आनंद साजरा करतात
नरकासुर हे मानवाला खाली खेचणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतीक आहे आणि त्याच्यावर मिळवलेला विजय दीपावली साजरा करते. त्याच्या राजधानीचे नावच त्याच्या मधील मूलभूत दोष प्रकट करते. प्राग्ज्योतिषपुर– प्राग्ज्योतिषपुर म्हणजे जेथे लोकांना अनादी प्रकाशाची म्हणजेच आत्म्याच्या वैभवाची जाणीव नाही अशी नगरी. तेथील नागरिकांना देहावर, इंद्रियांवर, अहंभावा वर कामनांवर, वासनांवर आणि त्यातून उदभवणान्या भावनांवर विश्वास असतो. नरकासुर हा पृथ्वीमातेचा पुत्र, त्याच आईची मुले म्हणजे पृथ्वीवरील आपण मानव, त्यामुळे आपल्यातही, नरकासुरप्रमाणे अधोगामी, त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आहेत. म्हणून नरकासुराची ही कथा सर्व मानवजातीला आव्हान व इशारा देणारीही आहे.
प्रभूने या असुराचा व त्याच्या टोळीचा नाश केला. त्यावेळी त्याची सत्यशक्ती त्याच्यापाशी होती ही सत्य घटना आपल्याला अर्थपूर्ण धडा शिकविते की सत्य हे पापावर मात करण्यासाठी उत्तम शस्त्र आहे. कृष्ण हे प्रेमतत्त्व असून सत्य ही त्याची छाया आहे. दोन्ही अविभाज्य व परस्परपूर्वक आहेत.
उत्तर हिंदुस्थानात लोकप्रिय असलेल्या दीपावलीच्या कथेत गहन अर्थ भरला आहे. अयोध्या म्हणजे असे शहर की जे शत्रूकडून कधीच काबीज केले जात नाही म्हणजे साक्षात आत्मा. पण चौदा वर्षे ती नगरी अंधकार व्याप्त होती कारण त्या नगरीत राम नव्हता. राम वनवासाला गेला होता. राम म्हणजे जे आनंद देते ते आणि आत्म्यापेक्षा अधिक आनंददायक काहीच नसते म्हणूनच एखाद्याचा उल्लेख करतांना आपण आत्माराम असे म्हणतो, आपण कधीही आत्मकृष्ण किंवा आत्मशिव असे म्हणत नाहीत तर नेहमी आत्मारामच म्हणतो.जेव्हा राम उपस्थित नसतो तेव्हा आनंद लुप्त होतो. म्हणून जेव्हा राम परत अयोध्येला आला खरोखर अयोध्येचा पुनर्जन्म झाला आणि अत्यानंदाचा उत्स्फुर्त असा उत्सव झाला. अयोध्येच्या राजवाड्यात सीतेने दीप प्रज्वलित केला आणि अयोध्येच्या लाखो लोकांच्या अत: करणात आनंद पसरविला, सीता ही रामाची छाया आहे. ती साक्षात शांती आहे. राम म्हणजे धर्म आणि सीता म्हणजे शांती. जेव्हा राज्यात परत आले तेव्हा दीपोत्सव झाला.
“कृष्ण या शब्दाचा अर्थ देखील आकृष्ट करून आनंद देणारा” असा आहे. देवाचे हे वैशिष्ट्य आहे की तो लोहचुंबकाप्रमाणे जीवांना जिथून ते आले तिथे खेचून नेतो.
प्रत्येक घराची आकृती स्पष्ट करणाऱ्या दिव्यांच्या ओळी आणि दारावर लटकवल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या दिव्यांच्या माळा यांच्यामागील प्रतिकात्मकताही मोठी प्रत्ययकारी आहे. सगळे दिवे एका मूळ दिव्यावरून लावलेले असतात. तसे लाखो वैयक्तिक जीव हे जीवनाच्या एक मूलस्त्रोतापासून आलेले असतात. प्रत्येक जण आदिम परमज्योतिपासून प्रज्वलित केलेली ज्योती आहे. एका मुख्य दिव्याच्या ज्योतीवर जरी लाखो दिवे लावले तरी त्या मूळ दिव्याचे तेज कमी होत नाही वा त्याची प्रकाश देण्याची शक्ती कमी होत नाही. अशा रितीने दिव्य तत्त्वाचा धडा दीपावली शिकवते. जिच्यापासून तुमच्या वैयक्तिया ज्योतीला सामर्थ्य व प्रकाश मिळाला आहे त्या परमज्योतीचे ध्यान करा. त्या शाश्वत वैदिक ज्वालेची तुम्ही एका ठिणगी आहात हे लक्षात आले की तुम्हाला अंधःकाराकडून नेले जाते.
आख्यायिका:
उत्तर हिंदुस्थानात हा दिवस राम वनवासातून परत आल्यानंतर त्यांना राज्याभिषेक करण्यात आला तो दिवस मानला जातो. दुसऱ्या आख्यायिके नुसार श्रीकृष्ण सत्यभामा सह जाऊन युद्धात या दिवशी नरकासुराचा वध केला असे सांगितले आहे. नरकासुर हा जुलुमी राजा होता. संत महात्मे आणि वडीलधारे यांच्याबद्दल त्याला अजिबात आदर नव्हता. त्याला नवनवीन प्रदेश जिंकण्याची हाव होती. तो सर्रास लूटमार व दरोडेखोरी करीत असे. तो बायकांना पळवून नेत असे त्याला त्याच्या गुन्ह्यांबद्दल व पापांबद्दल बिलकुल पश्चाताप नसे. म्हणूनच जेव्हा सज्जनांनी भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली व रक्षणाची विनवणी केली तेव्हा त्याने नरकासुराच्या राज्यावर चढाई केली आणि त्या दैत्याचा वध करण्याची सूचना सत्यभामेला केली. त्याच्या नगरीचे नाव प्रागज्योतिषपुर होते आणि तो स्वतः पृथ्वीचा पुत्र होता. नरकासुराच्या आख्यायिकेचा अर्थ
नरकासुर हा आत्म्याच्या वैभवाच्या अज्ञानाचे प्रतीक आहे त्यामुळे माणसाला देह म्हणजे मी (तो स्वतः) असे वाटते. त्यामुळे तो सतत या शरीराच्या गरजा पूर्ण करण्याचा आणि त्याच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा माणसाचे शारीरिक बल, आर्थिक शक्ती, बौद्धिक विद्वत्ता आणि राजकीय वर्चस्व या गोष्टी वाढ़तात पण आध्यात्मिक संपती वाढत नाही तेव्हा तो समजाला धोकादायक बनतो आणि स्वत:लाही संकटात लोटतो. एक प्रकारे स्वतःच्या आप्तेष्टांना व शेजाऱ्यांना तो नरकच होतो. तो फक्त अनेकता पाहतो पण एकता त्याला दिसत नाही. चकाकणाऱ्या वैविध्यामुळे तो वैयक्तिक आवडीच्या प्रतिगामी मार्गाकडे ओढला जातो. अशा माणसांना मार्ग दाखवणारा प्रकाश नसतो ते अंधारात चाचपडत असतात पण आपण अंधारात आहोत, हेही त्यांना समजत नाही, त्यामुळे ते प्रकाशाची मागणी करीत नाहीत त्यांना प्रकाशाची जाणीवच नसते.
इतके मूलभूत व खोल गेलेले अज्ञान केवळ सत्याच्या प्रकाझोतानेच नष्ट होते प्रत्येक
व्यक्तीमध्ये कामना व लोभ, देष व मत्सर गर्व व भपकेबाजपणा या रुपांनी दानवशक्ती
उफाळत असतात. जपध्यानादी आध्यात्मिक साधनाच या ज्वाला शमवू शकते, हा वणवा विझवू शकते. नरकासुर म्हणजे या साऱ्या दुर्गुणांचा साकार स्वरूप आहे. कारण या सर्वांचा सामूहिक परिणाम माणसाला नरकाकडे नेतो; म्हणून त्याचा नाश या दिवशी आपण साजरा करतो. (सत्य साई स्पीक्स खंड पाचवा पृ १११)
गर्भितार्थ:
जीर्ण झालेले पूर्वग्रह आणि आवडीनिवडी टाकून देणे, प्रेम आणि परस्पर आदरभाव या सवयी लावून घेणे आपल्या आप्तेष्टांविषयी व सर्व जाती व पंथातील बंधुभागिनीविषयी प्रेमभावाला उजाळा देणे आणि हृदयाच्या दारावर मैत्री व बंधुभाव यांची तोरणे बांधणे या गोष्टीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. त्यामुळेच हा उत्सव खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि सफल होईल. भपका आणि मौजमजा करण्याला संधी असे त्याचे स्वरूप राहणार नाही.
दीपः
दिवा हा केवळ सत्याच्या ज्ञानाचे प्रतीक नाही. सर्व प्रकारच्या विविधतेमधून आणि वैचित्रामध्येही.
प्रकाशणाऱ्या एकमेव आत्म्याचेही तो प्रतीक आहे. जसे एका दिव्यापासून हजारो दिवे लावता येतात आणि हजारोंनी त्यापासून प्रकाश मिळविला तरी जसा तो तसाच तेजस्वी राहतो त्याच प्रमाणे आत्मासुध्दा जीवांना प्रकाशित करतो आणि त्यांच्याद्वारे प्रकट होतो. तरीही त्याच्या मूळ प्रकाशमयतेत यत्किंचितही उणेपणा येत नाही.
तमसो मा ज्योतिर्गमय
हे प्रभो! मला अंधः काराकडून प्रकाशाकडे ने. अज्ञानाच्या अंधपणातून सत्याच्या दर्शनाप्रत मला घेऊन जा, कारण मन आणि सत्य तिथे प्रतिबिंबित झालेले दिसेल. प्रत्येकाने प्रथम जगण्यायोग्य आणि प्रयत्न करण्यायोग्य काय आहे याचा निर्णय करायला हवा. त्यासाठी याच मार्गाने वाटचाल केलेल्या ज्येष्ठ मंडळीची भेट घेऊन माणसाने त्यांच्याशी संवाद करावयास हया. त्यांच्या उदाहरणाने स्फूर्ती घेऊन ते जे सुचवतील त्याचे परिपूर्ण विश्वासाने आचरण करण्यास हवे. स्वतःला साध्य झालेल्या गोष्टींचा वापर इतरांच्या हितासाठी जो करीत नाही तो नरकासुर बनतो. धनलक्ष्मी पूजन एखाद्याला संपत्ती प्राप्त झाली तर एखाद्या विश्वस्ताप्रमाणे त्याने तिचा आदर ठेवला पाहिजे आणि तिचा वापर समाजाच्या गरजपूर्तीसाठी केला पाहिजे, स्वतःचे माहात्म्य वाढविण्यासाठी नव्हे.
[सनातन सारथी. १९८३, पृ २९७]
दीपावली प्रकाश व प्रेम यांचा धडा शिकवीते
फ़क्त प्रेमच प्रकाश देऊ शकते. प्रकाश पसरतो आणि अन्य ठिकाणांहून येणाऱ्या प्रकाशात मिसळून जातो. त्याला सीमा अथवा आवडीनिवडी नसतात. बाहेर या, व्यापक व्हा. विस्तृत व्हा, ‘माझे -तुझे, ‘त्याचे-त्यांचे, जाती आणि पंथ यांच्या सीमा एका असीम प्रेम प्रवाहात विसर्जित करून टाका. साऱ्या पारमार्थिक साधनेचे हेच पर्यवसान आहे. जेव्हा प्रेमाचा दीप प्रकाशतो’ तेव्हा देवाचा आविष्कार होतो. देव आविर्भूत होतो, त्यामुळेच तो दीप शुध्द व प्रखर असा तेवत ठेवा, तेथे देव सतत राहतो. इतरांना तुमच्या दिव्यावर त्यांचे दिवे लावू द्या. देव यासाठी तुमच्यावर कृपा वर्षाव करतो.
[सत्यसाई स्पीक्स खंड’ ५.पृ . ३४६]
“सेवेच्या उदरात प्रेमाचा जन्म होतो”
[सत्य साई स्पीक्स खंड ५ पृ २९२]
“माझी अशी अपेक्षा आहे की, मेजवान्या झोडून आणि फटाक्याच्या दणक्याने भोवतालच्या परिसराची शांती बिघडवून नव्हे तर शांतपणे दिवे लावून आणि प्रेमाने मूकसेवा करून तुम्ही दीपावली साजरी करावी“
[सत्यसाई स्पीक्स ,खंड ७ पृ . ३४८]