गणेश तत्त्वाचा अर्थ

Print Friendly, PDF & Email
गणेश तत्त्वाचा अर्थ

प्रेमस्वरूपलारा! जो दिव्यत्व आणि तो-एकच आहेत हे जाणतो तो खरा ज्ञानी होय.

सर्व भारतीय सण , उत्सव अत्यंत पवित्र असतात आणि त्यांना खोल आध्यात्मिक अर्थ असतो. हे सर्व उत्सव यंत्रवत रितीने साजरे करु नयेत. भारतीय लोकं विघ्नेश्वरास ” हे पार्वतीतनय ! गणनायक”असे संबोधित करतात. ही पार्वती कोण आहे? पार्वती आणि गणपतीमध्ये काय नाते आहे? साधारणतः लोकं चौकश्या करत नाहीत. पार्वती ही गणपतीची माता समजली जाते. त्यांच्यामध्ये असलेले मूलभूत ऐक्य कोणी जाणत नाही. पार्वती आणि गणपती कोठे वास करतात? ते बाह्य जगतात का जन्मतःच ते प्रत्येक मनुष्यामध्ये विद्यमान असतात. सत्य हे आहे की ते दोघेही सर्वव्यापी आहेत. आणि एकात्मभावाचा संदेश देतात.

‘गणपती-नावाच अर्थ’

गणपती नावाचा अर्थ काय आहे? ‘गण’ कोठे आहेत? त्यांचे रूप कसे असते? जेव्हा तुम्ही ह्याचा शोध घेता तेव्हा, ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये हीच गणं असल्याचे तुमच्या लक्षात येते. मन ह्या दहा इंद्रियांचा स्वामी आहे. मनाहून वरच्या स्तरावर असणाऱ्या बुध्दीकडे तारतम्य भावाची निसर्गदत्त शक्ती असते. दहा इन्द्रिये, मन आणि बुद्धी मिळून गण बनतात.

गण ह्या शब्दातील ‘ग’ हे अक्षर बुद्धीसाठी आहे. ‘ण’ हे अक्षर विज्ञान म्हणजे उच्च ज्ञान त्यासाठी आहे. गणपती हा बुद्धी आणि उच्च ज्ञानाचा देव आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, “बुध्दी आणि उच्च ज्ञान बाह्य जगतात आहे का ते मनुष्याच्या आतमध्ये आहे?” ह्याचे उत्तर असे की ‘तो’ प्रत्येक मनुष्यामध्ये विद्यमान आहे. त्याला बाह्य जगतामध्ये शोधण्याची गरज नाही. बुध्दी आणि ज्ञानाच्या रुपामध्ये गणपती प्रत्येक मनुष्यामध्ये वास करतो. गणपतीचे ‘पार्वतीतनय’ म्हणून वर्णन केले जाते. ही पार्वती कोण आहे? पार्वती पृथ्वीमातेचे द्योतक आहे. प्रत्येकजण पृथ्वीमातेचे लेकरू आहे. पार्वतीतनय शब्दाचा अर्थ आहे, गणपती , जो सर्व गणांचा नायक आहे, तो पार्वतीचा (जो दिव्य शक्तीचे प्रतिक आहे) पुत्र आहे. पार्वती आणि गणपती ह्यांची भक्ती पुरातन काळापासून आहे. ऋगवेदामध्ये गणपतीची अनेक ठिकाणी स्तुती केलेली आढळते. ह्यावरून गणपती हा वेदांइतकाच प्राचीन असल्याचे स्पष्ट होते.

वेद आणि उपनिषदे, दोन्हीमध्ये गणपतीचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. महानारायण उपनिषदामध्ये, गणपतीला उद्देशून अनेक प्रार्थना आहेत. त्याचबरोबर तैत्तिरीय उपनिषदातही त्याला उद्देशून प्रार्थना आहेत. महानारायण उपनिषदामध्ये गणपती गायत्री मंत्राचाहि समावेश आहे. गणपतीचे विनायक हे ही एक नांव आहे कारण तो सर्वश्रेष्ठ स्वामी आहे. तो सर्वशक्तिमान आणि स्वयंपूर्ण आहे. विनायक तत्त्वातील सुप्त अर्थ जाणून न घेताच लोकं केवळ त्याचे बाह्य रुप पाहतात व सांसारिक दृष्टिकोनातून त्याची भक्ति करतात.

जीवनाची पूर्णतः जाणीव म्हणजे विद्या होय.

विनायक कोणत्या स्वरुपात मनुष्याच्या अन्तर्यामी विद्यमान असतो? तो आत्म्याच्या स्वरुपात वास करतो. आत्म्याचा कोणीही स्वामी नाही. मन इंद्रियांचा स्वामी आहे. इंद्र इंद्रियांचा स्वामी आहे. इंद्र स्वर्गलोकाचा अधिपती आहे अशी लोकांची समजूत आहे. परंतु मनाचा स्वामी असल्याने तो प्रत्येकामध्ये वास करतो. बुद्धी जी मनाची स्वामिनी आहे, ती मूर्तिमंत ज्ञान आहे. ह्या ज्ञानाला कशा प्रकारची जाणीव आहे?. नित्य एकात्मतेची जाणीव ती कधीही बदलत नाही, अविकारी आहे. ती कधीही कमी-जास्त होत नाही. त्याला विज्ञान म्हणतात. दुर्दैवाने, आज विज्ञान आणि शास्त्र एकच मानले जाते. शास्त्र म्हणजे विज्ञान नव्हे. शास्त्र हे इंद्रियगोचर (इन्द्रियांना दिसणारे) ज्ञान आहे. ते सप्रमाण सिद्ध करण्याच्या क्षमतेवर आधारित आहे.

आज विध्यार्थी शैक्षणिक अभ्यासात यश मिळावे ह्यासाठी व विद्वत्ता विकसित करण्यासाठी गणेशाची भक्ती करतात. वास्तविक ह्या अभ्यासक्रमातून जे काही शिकले जाते, त्याला शिक्षण म्हणता येईल. परंतु ह्याला विद्या म्हणता येणार नाही. ज्यामध्ये सखोल, गर्भितार्थ सामावला आहे, त्यास विद्या ही संज्ञा वापरणे म्हणजे भाषेचा गैरवापर केल्या सारखे आहे. जीवाच्या शरीरातील प्रत्येक पेशीला सचेतन करणाऱ्या शक्तीची जाणीव म्हणजे विद्या होय. ह्या जाणीवेद्वारेच मनुष्य त्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंतच्या जीवनातील घटनांच्या अर्थाविषयी शिकतो. ह्या दृष्टिकोनातून विद्या ही एक जीवनशैली आहे असे म्हणता येईल. तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट विधेचाच भाग आहे. ती जीवनाची पूर्ण जाणीव आहे. ती प्रत्येक गोष्टीचे पूर्णत्वाने आकलन करते अशा प्रकारच्या ह्या पूर्ण ज्ञानासाठी तुम्ही विनायकाची प्रार्थना केली पाहिजे. पदव्या संपादन केल्याने विद्या प्राप्त होत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत अमंगलाचा त्याग कसा करावा हे तुम्हाला ज्ञान असणे हीच विद्या होय. मानवाचे संपूर्ण जीवन एक निरंतर शिकण्याची प्रक्रिया आहे असे मानले पाहिजे. ह्या भावनेतून जो ज्ञान संपादन चालू ठेवतो तो खरा विद्यार्थी होय. विद्यार्थी म्हणजे विद्या + अर्थी म्हणजेच विद्येचा शोध घेणारा. हे ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान वा इंद्रियगोचर विश्वाचे ज्ञान नसून आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. आत्मज्ञान सर्वोच्च ज्ञान आहे. गीतेमध्ये घोषित केले आहे, “अध्यात्म विद्या विध्यानां (सर्व विद्यांमध्ये मी अध्यात्म विद्या आहे). हे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचे खरे ध्येय आहे. तो गुरु तुमच्या न्तर्यामीच आहे. विनायक तत्त्व हे प्रत्येकामध्ये आहे.

विनायकाला समर्पण

हिंदूंमध्ये अशी प्रथा आहे की गयेला गेल्यावर, फळं आणि भाज्यांमधील आपल्याला सर्वात प्रिय असलेली भाजी व फळाचा त्याग करतात. परंतु आजच्या आधुनिक काळात प्रथेचा अशा तऱ्हेने विपर्यास केला आहे की ते त्यांना आवडत नसलेल्या भाजीचा वा फळाचा त्याग करतात. ह्या संदर्भात एक पौराणिक गोष्ट आहे ज्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा कशी सुरु झाली हे सांगितले आहे. एकदा पार्वती आणि परमेश्वर पट (चौरस) खेळत होते. नंदीश्वर (परमेश्वराचे वाहन)त्यांचा पंच होता. ईश्वर खेळामध्ये हारला असूनही नंदीने त्याला विजयी घोषित केले. त्याच्या ह्या पक्षपाती निर्णयाने क्रोधित होऊन पार्वतीने त्याला तो असाध्य व्याधीने पीडीत होईल असा शाप दिला. नंदीने पार्वतीकडे क्षमायाचना केली व त्याने परमेश्वराला अनुकूल निर्णय का दिला हे स्पष्ट केले. तो म्हणाला, “परमेश्वर माझे स्वामी आहेत व त्यांची सेवा करणे हे ह्या दासाचे कर्तव्य आहे”. पार्वतीच्याहृदयास पाझर फुटला व ती नंदीला म्हणाली,”माझा पुत्र गणपती ह्यास जर तू अत्यंत प्रिय असलेली समर्पित केलीस तर तू ह्या शापातून मुक्त होशील.” नंदीने त्यावर क्षणभर विचार करुन, त्याने त्याला अत्यंत प्रिय असलेले हिरवे गवत तो गणपतीला समर्पित करेल असे घोषित केले. तेव्हापासून गणेश उत्सवात इतर वस्तुंबरोबर गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा पडली.

मनुष्याच्या दृष्टीने निरुपयोगी व क्षुल्ल्क असणाऱ्या अनेक गोष्टींचा गणपती स्वीकार करतो. विनायकाच्या अनेक नावांपैकी ‘अर्कद्रोणप्रिय’ हे एक त्यांचे नांव आहे. (ज्याला द्रोणपुष्पी आणि रवईची फुले प्रिय आहेत. मनुष्याला ती फुले फारशी उपयुक्त वाटत नाहीत), विनायकाला वाहण्याच्या इतर वस्तुंमध्ये एका विशेष प्रकारच्या गवताचा समावेश आहे. त्याच्याशी संबंधित ही गोष्ट आहे.

ईश्वर भोला शंकर म्हणून का ओळखला जातो? कोणे एके काळी गजासूर नावाचा एक असूर होता. त्याने तपश्चर्या केली. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन ईश्वाराने त्याला इच्छित वर दिला. ईश्वरास प्रसन्न करूँ घेणे अत्यंत सोपे आहे म्हणून त्याला भोला शंकर म्हणतात. भक्तावर प्रसन्न झाला की तो त्याला हवे असलेले वरदान देतो. त्यामुळे कधीकधी तो पेचप्रसंगात सापडतो. जसे त्यानेभस्मासूरास वर दिला होता की भस्मासूर् ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल तो भस्मसात होईल. तो वर मिळताक्षणीच भस्मासूराने त्याच्या शक्तीची चाचणी घेण्यासाठी शिवाच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला.

शिवाने गजासूरास कोणता वर दिला? तो वर असा होता की सतत त्याच्या समोर अग्नि प्रज्वलित असावा म्हणजे कोणीही त्याच्या जवळ येण्याचे धाडस करणार नाही. शिवाने त्याला तो वर दिला. गजासुराने त्याचे तप सुरु ठेवले. शिव अधून मधून त्याच्यापुढे प्रकट होत असत. एकदा शिवाने त्याला काय हवे असे विचारले. तो असूर म्हणाला, “तुम्ही माझ्या उदरात राहावे अशी माझी इच्छा आहे…” शिवाने तसा वर दिला व स्वतः त्याच्या उदरात वास करू लागले. पार्वतीने शिवाचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. शेवटचा उपाय म्हणून ती तिचे बंधु भगवान विष्णुंकडे गेली आणि आपल्या पतीचा ठावठिकाणा शोधावा अशी त्यांना विनंती केली. सर्वज्ञ प्रभूंनी तिला ग्वाही देत म्हटले, “घाबरू नकोस तुझा पती भोला शंकर आहे. भक्तांच्या इच्छेनुसार वर देण्यास तो तत्पर असतो. त्याच्या परिणामांचा विचार न करता तो वर देऊन टाकतो. मला अशी शंका आहे की तो कोणत्यातरी डचणीत सापडला असावा. काय घडले आहे , ते मी शोधून काढतो.”

विनायकाला गजासूराचे मस्तक कसे मिळाले

विष्णु, ज विश्वनाटयाचे सूत्रधार आहेत. ते एक नाटिका रंगमंचावर आणतात. ते नंदीला, नृत्य करणारा बैल बनवून गजासूरासमोर आणतात व स्वतः पावा वाजवणाऱ्याची भूमिका करतात. ते पावा वाजवतात व बैल नृत्य करतो. बैलाचे नृत्य पाहुन गजासूर अत्यंत आनंदीत होतो. तो (विष्णुंना) पावा वाजवणाऱ्यास काय हवे असे विचारतो. त्यावर पावा वादक म्हणतो, “मी जे मागेन ते तु मला देशील का?” गजासूर म्हणतो, “माझ्याकडून तुला काय हवे? तु जे मागशील ते मी तुला देईन”. पावा वादक म्हणतो,” तसे असेल तर, तु तुझ्या उदरात वास करणाऱ्या शिवाला मुक्त कर”. गजासूरास तो वादक अन्य कोणी नसून विष्णु आहेत हे लक्षात येते कारण शिव त्याच्या उदरात वास करत असायचे रहस्य विष्णुंनाच ज्ञात असते. तो विष्णुच्या चरणी लोटांगण घालतो. शिवाची उदरातून मुक्तता करतो. व त्यांच्याकडे वरदान देण्यासाठी प्रार्थना करतो, “मला तुमच्याकडून अनेक वर प्राप्त झाले आहेत. माझी आता अखेरची विनंती आहे की माझ्या मृत्युनंतर माझ्या मस्तकाचे पूजन करून सर्वांनी माझी स्मृती जपावी.” शिव त्याच्या पुत्रास तेथे आणतो व गजासूराचे मस्तक तो पुत्राच्या धड़ास लावतो.

तेव्हापासून भारतामध्ये, कोणत्याही मंगल समारंभाचा आरंभ गणेशाच्या पूजनाने करण्याची प्रथा पडली. शिवाने गजासूरास दिलेल्या वराची ही निष्पत्ती होती. गजमुख गणपतीची भक्तीचा गर्भित अर्थ काय आहे? हत्ती हे शक्ती आणि विशालता ह्यांचे प्रतिक आहे. हत्तीचा पाय हा कोणत्याही प्राण्यापेक्षा मोठा असतो. हत्ती घनदाट जंगलातूनही त्याचा मार्ग बनवू शकतो ह्यामधून इतरांना मार्ग दर्शवणारा नेतृत्व गुण निर्देशित होतो. हत्ती अत्यंत बुद्धीमान असतो. हत्ती त्याच्या निष्ठा व कृतज्ञ भाव ह्या गुणांसाठी परिचित आहे. कोणत्याही परिस्थितीत तो त्याच्या मालकास विसरत नाही. एवढेच नव्हे तर त्याच्या अखेरच्या क्षणी, जर त्याने मालकाचा आवाज ऐकला तर तो डोळे उघडून पाहतो. तो त्याच्या मालकासाठी प्राणत्यागही करतो. हे सर्व धडे मनुष्याने हत्तीपासून शिकले पाहिजेत. कृतज्ञतेविना बुद्धीमत्ता मूल्यरहित आहे. प्रत्येकाने त्याला सहाय्य करणाऱ्याप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे.

गणपतीला अर्पित केलेल्या वाफवलेल्या पदार्थाच्या नैवेद्याचा गर्भितार्थ

गणेश भक्तीमध्ये काही रहस्ये दडलेली आहेत ती लक्षात घेतली पाहिजेत. भारतीय लोकं गणेशास काही विशिष्ठ पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. हे पदार्थ वाफेवर शिजवले जातात. तांदुळाचे पीठ, गुळ व तीळ ह्यापासून गोळे तयार करून ती वाफेवर शिजवतात. आयुर्वेदामध्ये रोगनिवारक गुण धर्मासाठी ह्या खाद्यपदार्थास उच्च स्थान दिल आहे. त्यातील गूळ हा घटक विविध रोगांवरील उपाय आहे. तीळांमुळे धमन्या शुद्ध होतात. तसेच तीळांनी दृष्टि सुधारते. गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या ह्या खाद्य पदार्थांमध्ये आरोग्य प्रदान करणारे गुण धर्म आहेत. हा त्याचा गर्भितार्थ आहे. वाफवलेले अन्न पचनास अत्यंत हलके असते. हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाफवलेल्या इडल्या दिल्या जातात. त्यांना तेलकट पदार्थ दिले जात नाहीत. पचनास अत्यंत हलक्या असल्यामुळे त्यांना इडल्या दिल्या जातात.

थोडक्यात सांगायचे झाले तर, विनायक तत्त्व, आरोग्य, आनंद, शांती, ज्ञान, समृद्धी आणि इतर अनेक गोष्टींचे प्रतिक आहे. दुर्दैवाने अनेक लोकं ह्या सत्याविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या भोवतालच्या प्रदूषणात वाढ करणारी एखादी मातीची मूर्ती आणून तिचे यंत्रवत पूजन करण्यातच लोकं धन्यता मानतात. परमेश्वरास प्रिय असणाऱ्या गोष्टीच आपण त्याला अर्पण केल्या पाहिजेत. हेच पार्वतीने नन्दीश्वरास बजावून सांगितले. ती त्याला म्हणाली, जे तुला प्रिय आहे आणि ज्याने माझा पुत्र प्रसन्न होईल ते तु त्याला अर्पण कर. विनायकास प्रिय असणाऱ्या गोष्टी समर्पित करण्यासाठी विनायक उत्सवाची रचना केली आहे. विनायक उत्सव साजरा करण्या पाठीमागे त्याला प्रिय असणाऱ्या गोष्टींचे समर्पण करणे हा उद्देश आहे.

उंदीराचे प्रतिक

विनायकाविषयी अजून एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे त्याचे वाहन मूषक (उंदीर). उंदीर हे कशाचे प्रतिनिधित्व करतो? तो अंधाराचे प्रतिनिधित्व करतो. जो अज्ञानाचे प्रतिक आहे. उंदीर अंधारामध्ये फिरतो. गणपती अज्ञानाच्या अंधःकारावर नियंत्रण ठेवतो असे मानले जाते.

उंदीर हा त्याच्या वासनेच्या प्रबल इन्द्रियासाठी (गंध) ओळखला जातो. वस्तुमधून येणाऱ्या गंधाचा माग काढत उंदीर त्या वस्तुप्रत जातो. मानवतेशी संबंधित वासनेचा गर्भितार्थ म्हणजे ते त्यांचा पूर्वजन्मांधून घेऊन आलेला वारसा. ह्या वासना म्हणजे मनुष्याच्या वर्तमान जीवनातील कर्मांचा लेखा जोखा. त्याही इच्छा सूचित करतात. त्यामध्ये अंतर्भूत असलेला अर्थ आणि इच्छा जाणून न घेता, लोकं आश्चर्य करतात की हा उंदीरासारखा छोटासा प्राणी विशालकाय विनायकाचे वाहन कसे काय बनू शकतो. विनायक ज्ञानाने अज्ञानावर आणि निरहंकाराने इच्छांवर मिळवलेला विजय सूचित करतो. एकदा विनायक आणि त्याचा धाकटा बंधु सुब्रमण्य ह्यांच्यामध्ये,कोण पृथ्वी प्रदक्षिणा प्रथम पूर्ण करतो अशी शर्यत लागली. विनायक अत्यंत बुद्धीमान आणि त्याच्याकडे विलक्षण विवेकशक्ती होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या स्वार्थापासून पूर्णतः मुक्त असतो. हां एक सर्वश्रेष्ठ दैवी गुण आहे. दिव्यत्व जे काही करते त्यामध्ये स्वार्थाचा लवलेशही नसतो. फार थोड्या लोकांना परमेश्वराच्या खऱ्या प्रेमाचा बोध होतो. त्यांना हे लक्षात येत नाही की त्यांचे प्रेम, त्यांना जे प्रिय आहे त्याच्या आसक्तीवर वा त्यांना आकर्षण असणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्याचा नेहमीच्या सवयीवर, वा मूलतः त्या वस्तूमध्ये नसून त्यांच्या व्यक्तिगत वासनांवर (जय पूर्व संस्कारावरील तीव्र इच्छांवर पायाभूत) आधारीत आहे.

विवेकानंदाचा शोध

एकाच प्रसंगावर वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रियांचे निरिक्षण करून विवेकानंदांनी हे सत्य शोधून काढले. एक मनुष्य मद्य पिऊन रस्त्याच्या कडेला पडलेला पाहुन, दोन चोर जे स्वतःही मद्य प्यायले होते, ते म्हणाले की तो मनुष्य त्यांच्यासारखाच चोर असेल. रात्री चोरीच्या मोहिमेनंतर मद्य प्यायला असेल. एका फेपरे (फिट) येणाऱ्या मनुष्याला वाटले की त्याला फेपरे येऊन तो पडला असेल. एका साधूला त्या बेशुद्ध अवस्थेतील मनुष्याला पाहुन असे वाटले की तो कदाचित योगी असून, निर्विकल्प समाधी अवस्थेत असेल आणि असे समजून त्याने आदराने त्याचे पाय चेपण्यास सुरुवात केली. अशा ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असे दर्शवतात की मनुष्य एखाद्या गोष्टीची पारख. ती वस्तुतः जशी आहे त्यावरून करत नाही तर त्याचे स्वतःचे भाव आणि अनुभव ह्यावरून करतो. विवेकानंदांना असे जाणवले की स्वामी रामकृष्णाच्या उच्च आध्यात्मिक स्थानाविषयी त्यांच्या मनातील साशंक भाव हे त्यांच्या स्वतःच्या चुकीच्या विचारांची परिणती आहे. त्याचा परमहंसाच्या गुणांशी काहीही संबंध नाही. रामकृष्णांमध्ये कोणतेही दोष नसून दोष त्याच्या स्वतःच्या भावनांमध्ये आहेत हे त्याच्या लक्षात आले. रामकृष्णांपासून दूर गेल्याचा त्यांना पश्चाताप झाला व त्यांच्या ह्या घोडचुकीची मातेकडे कबुली दिली. रामकृष्णांकडे परत जाण्यासाठी मातेने अनुमती द्यावी म्हणून त्यांनी तिच्याकडे प्रार्थना केली. मातेने त्यांना त्यांच्या मनाच्या कलानुसार कृती करण्याची संमती दिली. मनुष्याचे स्वच्छंदी विचार, त्याच्या मनात दिव्यत्वाविषयी शंका आणि संभ्रम निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात हे विवेकानंदाच्या लक्षात आले. दिव्यत्व, कलंक आणि उणीवा ह्यांच्या पलीकडे असते म्हणून परमेश्वराचे निष्कलंक, परिपूर्ण, निर्गुण, निराकार असे वर्णन केले जाते. गणपतीचे अप्रमेय (सर्वश्रेष्ठ आणि सर्वसमावेशक) असे वर्णन केले जाते. म्हणून त्याची कोणत्याही प्रकारे भक्ति करता येते.

प्रार्थना आणि कसोट्या

स्वामींनी तुम्हाला सर्व मंगल प्रदान करावे अशी चित्तीबाबुंनी त्यांच्या आगोदरच्या भाषणात, त्यांना विनंती केली. चांगले जीवन व्यतीत करण्यासाठी तुम्हाला सद्गुण, सद्विचार व शक्ती प्रदान करावी. स्वामींकडून आपल्याला मिळणाऱ्या लाभांविषयी ते बोलत राहिले परंतु त्यांनी स्वामींना काय समर्पित केले ह्याविषयी ते काहीही बोलले नाहीत. परमेश्वर तुम्हाला हवी असलेली कोणतीही गोष्ट देण्यासाठी तयार असतो परंतु ती प्राप्त होण्यासाठी तुम्ही पात्र असले पाहिजे; जशी एखादी व्यक्ती बँकेत जमा केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंतच रक्कम काढू शकते, तोच नियम परमेश्वराकडून काही प्राप्त करण्यासाठी लागू होतो. तुम्ही परमेश्वराकडे ज्या प्रमाणात जमा केले आहे, त्यावर ते अवलंबून असते. आणि त्यानंतरच त्याच्या प्रार्थनांचा धनादेश वटतो.

तुमच्या प्रार्थना परमेष्वराप्र्त पोहोचण्यासाठी तुम्हाला ‘श्रध्देचा’ स्टँप लावला पाहिजे. व प्रेमाचा पत्ता घातला पाहिजे. जर तुमच्या हाथी श्रद्धा आणि प्रेम असेल तर तुम्ही त्याच्यापासून कितीही दूर अंतरावर असलात तरी तुमच्या प्रार्थना परमेश्वाराप्रत पोहोचतील. परमेश्वराप्रती असलेले तुमचे प्रेम शुद्ध व निर्मल असले पाहिजे. परमेश्वराच्या कसोट्यांसाठी तुम्ही स्वतःला सिद्ध ठेवले पाहिजे. जेवढ्या लवकर तुम्ही ह्या कसोट्यांमध्ये उत्तीर्ण व्हाल तेवढे तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या निकट आलेले पाहाल. ह्या कसोट्यां मधून पार झाल्याशिवाय आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत जाण्यासाठी परिक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते हे विद्यार्थी जाणतातच.

जीवनामध्ये, जगातील क्षणभंगुर गोष्टीविषयी तुम्हाला किती आसक्ती आहे आणि परमेश्वरासाठी तुमच्या मनात किती व्याकुळता आहे ह्याची कसोटी घेतली जाते. जर तुमचे परमेश्वराप्रती नाममात्र प्रेम असेल आणि भौतिक गोष्टींप्रती अतोनात प्रेम असेल, तुम्ही परमेश्वराच्या कृपावर्षावाची अपेक्षा कशी करू शकता? (स्वामी जयदेवाचे एक गीत गातात त्यामध्ये ते मनुष्याला बजावून सांगतात की मनुष्य त्याच्या व्यवसायासाठी व कुटुंबासाठी जेवढा वेळ खर्च करतो त्याच्या किमान अंश मात्र वेळ त्याने त्या परमेश्वराच्या चिंतनासाठी दिला पाहिजे,जो मृत्युसमयी त्यांची मुक्तता करण्यासाठी येईल) मनुष्य भौतिक गोष्टींच्या विचारांमध्ये तासंतास वाया घालवतो,त्यातील काही क्षण जर त्याने परमेश्वराच्या चिंतनात व्यतीत केले तर ते किती कल्याणकारी होईल. ह्या सत्यावर त्याने श्रद्धा विकसित केली पाहिजे. त्यांचा स्वतःवर जसा विश्वास असतो, तसाच परमेश्वरावरही असला पाहिजे. ही एक महानतेची निषाणी आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, त्याचा परमेश्वरावर विश्वास कसा असणार? तुमचा विश्वास क्षणभंगुर, तात्पुरत्या गोष्टींकडून शाश्वत, कधीही न बदलणाऱ्या सत्याकडे वळवा.

श्रद्धेचे सामर्थ्य

ख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगातून श्रद्धेचे सामर्थ्य दर्शवले आहे. एकदा एक अंध मनुष्य जीझसकडे आला व त्याने प्रार्थना केली. “प्रभु! माझी दृष्टी मला परत मिळवून द्या! जींझसने विचारले,” मी तुला दृष्टी परत मिळवून देऊ शकतो ह्याविषयी तुझ्या मनात अढळ विश्वास आहे का? “हो प्रभु!” त्यावर जीझस म्हणाला,” तसे असेल तर मग उघड डोळे आणि पाहा.” त्या अंध मनुष्याने डोळे उघडले व त्याला दृष्टि परत मिळाली. त्याप्रमाणे लोकं स्वामींकडे काही न काहीतरी देण्यासाठी प्रार्थना करतात. तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे सामर्थ्य माझ्याकडे आहे असा तुम्हाला विश्वास आहे का? माझा प्रतिसाद तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. विवेकानंदासारख्या व्यक्तिसही रामकृष्ण परमहंसाच्या संतत्वाबद्द्ल शंका होत्या. अशा शंखाखोर व्यक्ती नेहमीच असतात. रामकृष्णांना धनसंपत्तीचे वावडे आहे का ह्याची परिक्षा करण्यासाठी विवेकनंदांनी एकदा त्यांच्या उशीखाली काही सोन्याची नाणी ठेवली. रामकृष्ण गादीवर पाठ ठेवताक्षणीच त्यांना असे वाटले की आपण काट्यांच्या गादीवर झोपलो आहोत. तात्काळ विवेकानंदांना, आपल्या शंका किती निराधार आहेत हे लक्षात आले. त्यांना वाटले की त्या महात्म्यांची उंची गाठण्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःच्या आत्म्यास उन्नत करणे जरूरीचे आहे. आजकालचे लोकं अशा मनुष्यासारखे आहेत. जो जमिनीवर आहे आणि ज्याला आकाशात उडणाऱ्या विमानातील पायलटला पाहण्याची इच्छा आहे. जर त्याला पायलटला पाहायचे असेल तर त्याने स्वतः विमानात बसणे हा एकमेव मार्ग आहे. परमेश्वराची अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला परमेश्वराची दृष्टी प्राप्त करण्याची उत्कट इच्छा असायला हवी. आदर्श आणि आनंदी जीवनाकडे नेणारा तो एक मार्ग आहे. केवळ इन्द्रियांवरील नियंत्रण मनुष्याला, त्याचे मन ईश्वराभिमुख करण्यास सहाय्य करते.गणपती इंद्रियांचा स्वामी असल्यामुळे मनाला ईश्वराभिमुख करण्याच्या हेतुने गणपतीची भक्ती केली पाहिजे. जर तुम्हाला आनंदी, संकटे, अडचणींराहित जीवन जगायचे असेल तर तुम्ही विघ्नहर्त्या गणपतीची प्रार्थना केली पाहिजे. तुम्हाला कोणालाही मंदिरात जाण्याची गरज नाही. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात बुद्धी आणि विद्येच्या रुपाने विघ्नेश्वर वास करतो. जर तुम्ही निसर्गतः लाभलेल्या बुद्धी आणि विद्येचा उचित वापर केलात तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल.लोकांनी पुरुष आणि प्रकृति ह्यांचा अतूट संयोग आणि ह्या एकत्व भावावर आधारभूत त्यांचे जीवन जाणले पाहिजे. मानवी स्वभाव म्हणजे देह आणि चैतन्याचा संगम आहे. अध्यात्मात पहिले पाऊल टाकताना मनुष्याने आत्मनिरीक्षण करण्यास आरंभ केला पाहिजे. तरच त्याला सत्याचे आकलन होऊ शकेल. सर्वजण इतरांची निर्भत्सना करण्यासाठी तत्पर असतात. परंतु आत्मपरिक्षण मात्र कोणीही करत नाही. जो मनुष्य स्वतःचे परिक्षण करून त्याच्या चुकांसाठी प्रायश्चित घेण्यास तयार असतो तोच इतरांची पारख करण्यास पात्र असतो.

गणपती उत्सव १० दिवस का साजरा केला जातो.

विद्यार्थांनो! तुमच्यामध्ये जी जाणीव आहे, आत्मतत्त्व आहे ते तुमचे मार्गदर्शक आहे जे तुमच्या दिव्यत्वाचे प्रतिनिधित्व करते, हे तुम्ही जाणून घ्या. इन्द्रियांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी इंद्रियांचा स्वामी, गणपती तुमचा मार्गदर्शक व्हायला हवा. एक संकल्पना अशी आहे की एका इन्द्रियावर प्रभुत्व मिळवण्यासाठी एक दिवस समर्पित केला पाहिजे. विद्यार्थी आणि भक्तजन ह्यांनी इन्द्रियांवर नियंत्रण मिळवणे अत्यंत सोपे आहे हे जाणून घ्यावे. नकारात्मक भाव उद्भवल्यास त्यांना ओजन न देता सकारात्मक गुणांचा अंगिकार करणे अत्यंत जरूरीचे आहे. उदा. बुध्दाने असूराच्या क्रोधाचा त्याच्या प्रेमाने सामना करून त्याच्यामध्ये परिवर्तन घडवले. आज अनेक विद्यार्थी नैराश्याने ग्रस्त आहेत व संभ्रमित मनोवस्थेत आहेत. कारण त्यांच्यामध्ये आत्मविश्वाचा अभाव आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये परमेश्वराप्रती पूर्ण श्रद्धा असते, तेव्हा तेथे नैराश्याला थारा नसतो. विद्यार्थांनो! विनायक चतुर्थी सारख्या उत्सवातून मिळणाऱ्या बाह्य संतोषावर आता विचार करण्याची गरज आहे. विनायकाची भक्ती, जिचा तुमच्यावर दीर्घकाळ सुप्रभाव राहू शकतो, तिचा गर्भितार्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सूक्ष्म आत्मतत्त्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, अचेतन मूर्तीची भक्ती, त्या आत्मतत्त्वाचे चिंतन करण्यास प्रवृत्त करते. ह्या प्रक्रियेद्वारे आत्मसाक्षात्कार घडतो. तुमच्या अंतरंगात जीता जागता परमेश्वर विद्यमान आहे हे जाणून घेऊन त्यानुसार आचरण करा. ज्याला बुध्दी आणि विद्या ह्यांचे मार्गदर्शन लागले आहे. अशा आदर्श व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो शालेय अभ्यासासह आध्यात्मिक साधना आणि परमेश्वरास प्रिय असणाऱ्या , मित संभाषण। दुष्टभाव, घृणा आणि सर्व कुविचारांना त्याग आणि इच्छांवर नियंत्रण ह्यासारख्या कर्मांमध्ये मग्न राहिलात तर जीवन फलीत होईल.

साई कुलवंत हॉलमध्ये दि. ७-१०-१९९७ रोजी झालेल्या प्रवचनामधून

जेव्हा स्वच्छ सूर्य प्रकाश असतो तेव्हा परमेश्वराकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा प्रकाश नसतो, तेव्हाच त्याची गरज भासते., तो हवा असतो. भक्ति, स्थल, काल आणि परिस्थिती ह्यापासून अबाधित राहून,टिकून राहिली पाहिजे. आणि बहरली पाहिजे.-बाबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *