साधेपणा
साधेपणा
सर्व महान लोकांचा पोशाख, भाषा आणि राहणीमान अत्यंत साधे असते. आपला सनातन धर्म ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ ह्यावर विशेष भर देतो. गांधींचा पोशाख कसा होता? राजे, महाराज, गवर्नर, ड्युकस्, डचेसेस् ह्यांची भेट घेताना सुद्धा ते तोच पोशाख घालत असत.
ईश्वरचंद्र सागरांनाही साधे जीवन आवडत असे व ते साधेपणाने जीवन जगले. ते एक सुप्रसिद्ध शिक्षक आणि समाज सुधारक असल्यामुळे त्यांना अनेक सभांना आणि सत्कारार्थ भोजनासाठी निमंत्रित केले जात असे. त्यांना आपल्या पारंपारिक वेशभूषांचा अभिमान असल्याने, एकदा ते त्यांच्या सत्काराप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या मेजवानीसाठी पारंपारिक पोशाख करून गेले. त्यांचा पारंपरिक पोशाख पाहून तेथील दरवान त्यांना आत मध्ये जाऊ देत नव्हता.
विद्यासागर घरी गेले आणि थोड्यावेळाने सुट, टाय असा वेश परिधान करून पुन्हा परत आले. दरवानाने त्यांना ओळखले नाही. “ह्या बाजूने कृपया आत जा सर”. असे दरवान त्यांना म्हणाला.
सर्व अतिथी भोजन करण्यासाठी बसले. सर्वजण विद्यासागरांकडे पहात होते कारण ते मुख्य अतिथी होते व ते एकही पदार्थ खात नव्हते. ते काटा चमच्यांनी प्रत्येक पदार्थ उचलून आपल्या शर्टाला, कोटाला खाऊ घालत होते. “हा काय प्रकार आहे?” बाकीचे सर्व अतिथी आश्चर्याने विचार करू लागले. तेवढ्यात तेथे यजमान आले आणि म्हणाले, “सर तुम्ही जेवण का घेत नाही? तुम्ही असे का करत आहात?” विद्या सागर म्हणाले, “जेव्हा मी प्रथम येथे धोतर घालून आलो तेव्हा मला प्रवेश नाकारला. परंतु जेव्हा मी कपडे बदलून पाश्चात्त्य पोशाख घालून आलो तेव्हा माझे स्वागत करण्यात आले. म्हणून मला असे वाटते की हा पोशाख ह्या भोजनासाठी पात्र आहे, मी नव्हे.” यजमानांना व इतरांना कारण समजले यजमानांनी विद्यासागरांचे दोन्ही हात पकडून त्यांची क्षमा मागितली.
प्रश्न
- दरवानाने विद्यासागरांना प्रवेश का नाकारला?
- त्यानंतर विद्यासागरांनी काय केले?
- इतर अतिथींना आश्चर्य का वाटले?
- विद्यासागरांनी काय उत्तर दिले?
[Source – Stories for Children-II
Published by-Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam ]