या कुन्देन्दु श्लोका – पुढील वाचन

Print Friendly, PDF & Email

या कुन्देन्दु श्लोका – पुढील वाचन

सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे. जो कोणी आचार – विचार – उच्चाराची शुचिता जोपासतो आणि आपले मन निर्मळ व अंत:करण शुध्द ठेवतो त्याच्यावर देवी सरस्वती कृपा करते.

संस्कृत साहित्याचा राजा असलेल्या कवी कालिदासाची ही गोष्ट आहे, कालिदास हा जन्मत:च हुषार नव्हता, तरी राजाने त्याचे आपल्या कन्येशी थाटामाटाने लग्न लावून दिले.

राजकन्या मात्र फारच विद्वान व बुद्धिमान होती, ती तिच्या नवऱ्याबरोबर अजिबात सुखी नव्हती. तरीही तिने त्याला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला; शेवटी एके दिवशी तिने त्याचा तीव्र शब्दात अपमान केला. कालिदास खूपच दुखावला गेला आणि परत कधीही न येण्याचा निश्चय करून त्याच क्षणी तो घर सोडून निघून गेला.

तो सरळ बाहेर असलेल्या सरस्वतीच्या मंदिरात गेला. देवीच्या पायावर मस्तक टेकून तो म्हणाला, “हे माते! माझ्यासारख्या निरूपयोगी प्राण्याला तू कशाला जन्माला घातलंस? तू मला थोडे तरी ज्ञान का दिले नाही? या अशा क्षुद्र जीवनाचा काय उपयोग? त्यापेक्षा तू माझे प्राण हरण केले तर बरे!” असे म्हणून त्याने आपली तलवार उपसली आणि आता तो तलवारीने आपले मस्तक उडवणार, तोच देवी सरस्वती साक्षात् त्याच्या समोर अवतरली. त्याचा प्रामाणिकपणा आणि शुचिता पाहून तिचे हृदय हेलावले आणि देवी सरस्वतीने त्याला ज्ञानाचे व शहाणपणाचे वरदान दिले. मग देवी त्याला म्हणाली, “वत्सा! येथून पुढे तू कालिदास म्हणून प्रख्यात होशील आणि तू सतत माझीच सेवा करीत राहशील.

जा! सगळे तुझा सन्मान करोत” आणि त्या क्षणापासून जगाला एक अत्यंत विद्वान् व्यक्ती मिळाली ती म्हणजे कवी कालिदास! जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला संस्कृतमध्ये प्रश्न केला “अस्ति कश्चित् वाग्विशेष:”? आणि उत्तर म्हणून कालिदासाने स्वत:ची काव्यरचनाच म्हणून दाखवायला सुरूवात केली. तिच्या प्रश्नातील प्रत्येक शब्दाची सुरवात होईल अशी रचना करून त्याने तीन -मोठी काव्येच रचली. अशारीतीने संस्कृत साहित्याला कुमारसंभव, मेघदूतम्, रघुवंशम् अशा महाकाव्य यांचा लाभ झाला. यावरून दिसून येतं की देवी सरस्वतीला तिच्या भक्तांविषयी मातृभाव असतो. ती त्यांना ज्ञानाचे वरदान देते व त्यांच्या मनाचा बधीरपणा दूर करते.

[Illustrations by Sree Darshine. H, Sri Sathya Sai Balvikas Student.]
[श्री सत्य साई गुरु मार्गदर्शिका – गट १]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *