स्वामी दयानन्द सरस्वतीं
स्वामी दयानन्द सरस्वतींच्या जीवनातील प्रसंग.
खूप पूर्वी काठियावाड (गुजरात) मधील मोरवी राज्यातील तंकार शहरात कारशन लालजी नावाचे एक ब्राह्मण राहत होते. इ. स. १८२५ मध्ये त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव मूलशंकर होते. तो आठ वर्षाचा झाल्यावर त्याचे मौंजीबंधन केले. तो गायत्री मंत्र शिकला. त्याची स्मरणशक्ती तीव्र होती. चौदा वर्षांचा होईपर्यंत, अत्यंत निष्ठेने त्याने अनेक वेदमंत्र मुखोद्गत केले. ते शिवाचे उपासक होते. त्याच्या वडिलांनी त्याला धार्मिक विधी आणि शिवाचे प्रतीक असणाऱ्या शिवलिंगाच्या भक्तीची विधिवत दीक्षा दिली. मूलशंकर चौदा वर्षांचा होईपर्यंत त्याचे शिवोपासनेचे शिक्षण पूर्ण झाले.
शिवरात्रीचा दिवस उजाडला. मंदिर दिव्यांनी सुशोभित करण्यातआले होते. मूलशंकरचे वडील आणि सर्व भक्तमंडळी पूजा करण्यासाठी आणि रात्रभर जागरण करण्यासाठी मंदिरात गोळा झाली होती. जरी प्रौढ व्यक्ती झोपी गेल्या तरी मुले जागी होती. जेव्हा सर्वत्र शांतता होती तेव्हा एक गोष्ट त्याच्या नजरेस पडली, एक उंदीर शिवाच्या प्रतीकाच्या येथून मिठाई आणि इतर अर्पण केलेल्या वस्तु बाहेर काढत होता आणि त्या प्रतिमेवर फिरून ती प्रदूषित करत होता. ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले, त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली. “हा कैलास निवासी,जो आपल्या धार्मिक समजूतीनुसार चालणे, खाणे,पीणे, झोपणे अशा सर्व दैहिक क्रिया करतो आणि हातामध्ये त्रिशूल धारण करतो मग त्या छोट्याशा उंदराने केलेल्या अनादरापासून तो स्वतःचे रक्षण करु शकत नाही का?” त्याने वडीलधाऱ्यांना हा प्रश्न विचारला पण त्याला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. हा प्रसंग त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. महादेव आणि प्रतिमा (लिंग) हे एकच आहेत ह्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
१६ वर्षाचा असतांना, तो त्याच्या एका मित्राच्या घरी नृत्योत्सव साजरा करण्यासाठी गेला. तो त्याच्यासाठी संस्मरणीय दिवस ठरला. मित्राकडे असतानाच त्याच्या बहिणीला काॕलऱ्याचा संसर्ग झाल्याची बातमी आली. तो घरी परतला व त्यानंतर चार तासाने त्याच्या बहिणीस मृत्यु आला. तो अत्यंत भयभीत होऊन, तिच्या मृतदेहाच्या बाजूस उभा होता. एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झालेला पाहणे हा त्याच्यासाठी पहिलाच प्रसंग होता. “एक दिवस मलासुद्धा मृत्यु येईल का?” असा विचार त्याच्या मनात आला. तो १८ वर्षांचा असताना, त्याचे काका मृत्यु पावले. ह्या दोन दुःखद प्रसंगांनी, त्याच्या मनात, मानवी जीवनाच्या वास्तवाविषयी गैरसमज निर्माण केले. “मृत्यु म्हणजे काय?” ह्यावर तो चिंतन करु लागला. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मृत्यु येतो का? त्यातून मनुष्य सवतःची सुटका करुन घेऊ शकतो का? जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करुन घेण्यासाठी कोणता मार्ग आहे?” जग अस्थिर आहे, अशाश्वतआहे. भौतिक जीवनात,जगण्यासाठी वा आस्था दाखवण्यासाठी कोणतीही गोष्ट महत्त्वपूर्ण नाही. त्याच्या मनात भौतिक गोष्टींविषयी वैराग्यभाव निर्माण झाला. मृत्युच्या थंड निर्दयी हातांपासून सुटका करुन घेण्याच्या मार्गांविषयी तो विचार करु लागला. त्याला मोक्षप्राप्तीची, आत्मसाक्षात्काराची आस लागली.
[Source- Stories for Children – II]
Published by- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam