संतांची शिकवण

Print Friendly, PDF & Email
संतांची शिकवण

संतांचा आणि ऋषींचा प्रत्येक देशात आदर केला जातो कारण ते अगदी साध्या, सोप्या पद्धतीने आपल्याला मोठमोठी सत्ये शिकवतात. ते आपल्याला खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवितात.

A devotee sees Ramana Maharshi pinning the leaves.

रमणमहर्षि हे दक्षिण भारतातील महर्षींपैकी एक होते. भारतातील सर्व ठिकाणांहून व इतरही देशातून भक्त त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येत असत, एके दिवशी एका भक्ताने महर्षींना पलाशाच्या पानांच्या, चोयट्यांच्या सहाय्याने पत्रावळी बनविताना पाहिले. आश्रमामध्ये भोजनासाठी पत्रावळी वापरल्या जात असत. जवळच उभा असलेला एक तरुण भक्त महर्षींना म्हणाला, “भगवान, आपण पाने एकत्र टोचत आहात. हे अनावश्यक काम असून त्यात आपला वेळ वाया जात आहे असे नाही का आपल्याला वाटत?”

रमणमहर्षी हसले आणि म्हणाले, “बाळा, चांगल्या हेतूने केलेल्या कोणत्याही कामात वेळेचा अपव्यय होत नसतो आणि अर्थातच ते योग्य तऱ्हेने केलेले असावे लागते. जे काम तुम्ही करता त्या प्रत्येक कर्मातून तुम्ही काहीतरी उपयुक्त शिकू शकता. उदाहरणार्थ, हे पत्रावळी बनविण्याचेच कर्म पाहा, जेव्हा या पानांचा उपयोग भुकेलेल्यांना अन्न देण्यासाठी केला जातो तेव्हा त्या पानांना महत्त्व प्राप्त होते, एकदा जेवण इाले की मग ती फेकून देण्यास पात्र ठरतात. “त्याच प्रमाने आपले शरीर जेव्हा आपण जीवन चांगले जगण्यासाठी आणि गरजूंची सेवा करण्यासाठी वापरतो तेव्हा महत्त्वाचे ठरते. केवळ स्वतःसाठी जगणारा मनुष्य जरी शंभर वर्षे जगला तरी तो त्याचे जीवन वाया घालवतो, तो शेळ्यामेंढ्यांपेक्षा फारसा वेगळा नाही, त्याही जगतात, खातात, वाढतात, आणखी एके दिवशी स्वयंपाकघराच्या जवळ काही तांदुळाचे दाणे पडलेले रमणमहर्षींनी पाहिले, ते ताबडतोब खाली बसले व त्यांनी एक एक तांदूळ गोळा करायला सुरवात केली. महर्षी काय करत आहेत ते पाहण्यासाठी काही भक्त त्यांच्या भोवती जमले, देवासाठी घरदार, सर्वस्व सोडून दिलेले महर्षी तांदुळाच्या थोड्या दाण्यांची इतकी पर्वा करीत आहेत यावर त्यांचा विश्वासच बसेना, त्यांच्यापैकी एकजण म्हणाला देखील, “भगवान आपल्या स्वयंपाकघरात तांदुळाची पुष्कळ पोती आहेत, या थोड्या दाण्यांसाठी आपण इतका त्रास कशाला घेता?

Ramana Maharshi picking the grains of rice fallen down

महर्षींनी वर पाहिले व ते म्हणाले, “तुम्हाला फक्त हे थोडे दाणे दिसत आहेत. पण त्या दाण्याच्या आत काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. शेत नांगरून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याचे काबाडकष्ट, समुद्राचे पाणी, सूर्याची उष्णता, ढग आणि पाऊस, थंड हवा आणि उबदार ऊन, मृदुभुमी आणि भाताच्या रोपातील चैतन्य हे सारे या दाण्यांमध्ये आहे. जर हे सर्व तुम्हाला नीट आकलन झाले तर या प्रत्येक दाण्यामध्ये तुम्हाला देवाचा हात दिसेल. म्हणून त्यांचा पायाखाली चुराडा करू नका. तुम्हाला ते खायचे नसतील तर पक्ष्यांना द्या.”

आनंदी आणि उपयुक्त जीवन जगण्याचा मार्ग संत आपल्याला अशा त-हेने शिकवीत असतात. ज्यांना संतमहात्म्यांची संगति लाभते ते खरोखरच भाग्यवान् आहेत.

प्रश्न:
  1. इतर माणसांपेक्षा संतांचे वेगळेपण कसे असते?
  2. संतांचा सगळे आदर का करतात?
  3. तुम्ही ज्यांना पाहिलेले आहे अथवा ज्यांच्याविषयी वाचलेले अथवा ऐकलेले आहे अशा कोणत्याही संतांविषयी माहिती लिहा.
  4. त्यांच्यापासून तुम्ही काही शिकलात काय?
  5. रमणमहर्षी मते जीवन केव्हा उपयुक्त ठरते? आणि वेळेचा अपव्यय केव्हा होतो?
  6. प्रत्येक दाण्यामध्ये आपण देवाचा हात कसा पहायचा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: