वृक्ष
वृक्ष
मुलांनो! डोळे बंद करा आणि ‘हु’-‘हा’ असं तीन वेळा म्हणा. आता तुम्ही ताजेतवाने झालात! कल्पना करा की तुम्ही एका बागेमध्ये आहात. ती सुंदर फुले पहा आणि तुमच्या अवतीभवती बागडणारी सुंदर फुलपाखरे पहा. आजूबाजूला सर्वत्र कसे हिरवेगार आहे. या! या भव्य वृक्षाखाली थोडा वेळ बसू या.
या मजबूत वृक्षाची मोठी आणि जाड-जाड मुळे पहा. ही मुळे वृक्षाला पाणी आणि क्षार पोहोचवतात. फळा-फुलांनी आणि पानांनी डवरलेल्या या फांद्या पहा. हा वृक्ष आपल्याला तळपत्या सूर्यापासून सावली देत आहे. पक्षांनी या वृक्षावर घरटी बांधली आहेत आणि आनंदाने त्यांचा किलबिलाट चालू आहे. वृक्षाची हिरवीगर पाने वाऱ्याच्या झुळुकीबरोबर जणू नाचत आहेत. वृक्षावरून पडलेली ही फळे पहा. पक्षी आणि खारी ही पडलेली फळे मजेत खात आहेत. हा वृक्ष अगदी मजबूत आहे आणि नम्र आहे. हा वृक्ष आपला प्रिय मित्र आहे. आपण त्याला मिठी मारू या.
वृक्षांकडे पाहून आपण आपल्यामध्ये प्रेमाचे संवर्धन केले पाहिजे. पेपर आणि पेन्सिली अशा वस्तू बनविण्यासाठी वृक्षतोड होते. विद्यार्थी या नात्याने पेपर आणि पेन्सिली यांचा योग्य तो वापर करणे, काहीही वाया न घालविणे हा आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्याचा उत्तम उपाय आहे. आपण आपले प्रेम या सर्व झाडांना, सर्व प्राणिमात्रांना आणि संपूर्ण विश्वाला देऊ.
आता आपण आपल्या वर्गात परत येऊ या. स्वतःच्या जागेवर बसा आणि हळूहळू डोळे उघडा!
वृक्ष पक्षांना, प्राण्यांना आणि माणसांना खाण्यासाठी फळे देतात. वृक्षांसारखे बना आणि सर्वांची निःस्वार्थ वृत्तीने सेवा करा.
उपक्रम:
गुरूंनी मुलांना वृक्षाचे चित्र काढण्यास सांगावे.
[ उगम:- अर्ली स्टेप्स टु सेल्फ डिस्कव्हरी स्टेप -2-, श्री सत्यसाई शिक्षण संस्था (भारत), धर्मक्षेत्र, मुंबई]