तीन उत्तम गोष्टी
तीन उत्तम गोष्टी
एक राजा होता, तो त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना तीन प्रश्न विचारत असे. त्यातील पहिला प्रश्न सर्वात उत्तम व्यक्ती कोण? दुसरा प्रश्न सर्वात उत्तम वेळ कोणती? आणि तिसरा प्रश्न सर्व कर्मापैकी सर्वात उत्तम कर्म कोणते? तीन प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची राजाला अत्यंत उत्सुकता होती .
एक दिवस राजा जंगलात गेला आणि तेथील डोंगराळ भागात फिरत असताना, एक आश्रम त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तेथे थोडा विश्राम करायचा होता म्हणून तो त्या आश्रमात गेला. तेथे एक साधु रोपांना पाणी घालत होता. राजाला पाहुन साधुने त्याला थोडी फळे व गार पाणी दिले. त्याचवेळी दुसऱ्या साधूने सर्वांगाला जखमा झालेल्या एका व्यक्तीस आश्रमात आणले. त्या व्यक्तीस पाहिल्यावर पहिल्या साधुने त्वरित त्याच्याकडे येऊन त्याच्या जखमा स्वच्छ केल्या आणि जखमा बऱ्या करणाऱ्या काही औषधी वनस्पती दिल्या. तो साधु त्या व्यक्तीशी अत्यंत मधुर शब्दामध्ये संभाषण करत होता. त्या व्यक्तीसाठी ते शब्द दिलासादायक होते. राजाला त्यांच्या प्रती कृतज्ञ भाव व्यक्त करून त्यांची रजा घ्यायची होती. साधुने राजाला आशीर्वाद दिले. राजाच्या मनात ते तीन प्रश्न पिंगा घालत होते. तो साधु तीन प्रश्नावर काही प्रकाश टाकू शकेल का हे त्याला पाहायचे होते. साधु म्हणाला आश्रमात घडलेल्या या प्रसंगाचा राजा साक्षी होता, त्याच्या कर्मामध्ये त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सामावलेली होती. साधुने सांगितले की राजा आश्रमात प्रवेश करत असताना साधु रोपांना पाणी घालत होता ते त्याचे कर्तव्य होते त्यावेळी राजाला आत येताना पाहुन, त्याने ते कर्तव्य सोडून तो राजाकडे आला आणि त्याला फळे व पाणी दिले ‘अतिथी देवो भव’ या पारंपारिक प्रथेनुसार त्याने राजाचे स्वागत केले. राजाची तृष्णा आणि थकवा दूर करत असताना, एक जखमी व्यक्ती आश्रमात आली आणि साधुने राजाचे आतिथ्य करण्याचे सोडून त्या जखमी व्यक्तीकडे गेला व त्याची सेवा करू लागला. जो कोणी तुमच्याकडे सेवा घेण्याच्या अपेक्षेने वा उद्देशाने येतो, तो यावेळी सर्वात उत्तम व्यक्ती होय. त्याची सेवा करून जे काही समाधान तुम्ही त्याला देऊ शकता ते सर्वात उत्तम कर्म होय. ज्यामध्ये तुम्ही काही करू शकता असा वर्तमान हा सर्वात पवित्र काळ आहे.
प्रश्न
- राजाने विचारलेले तीन प्रश्न कोणते?
- राजाने साधुच्या आश्रमात काय पाहिले?
- राजाच्या प्रश्नांना साधुने कशी उत्तरे दिली?
[स्त्रोत- stories for children, part 2
प्रकाशक- SSSBPT Prashanti Nilayam]