बौध्द धर्म
बौध्द धर्म
ख्रिस्तपूर्व 500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने, बुद्ध धर्माची स्थापना केली
गौतम बुद्धाचे जीवन
कपिलवस्तुचा राजा शुध्दोधन आणि राणी मायावतीचा पुत्र लहानपणी सिद्धार्थ गौतम ह्या नावाने ओळखला जात होता. अत्यंत ऐश्वर्यामध्ये तो लहानाचा मोठा झाला. यशोधराशी त्याचा विवाह झाला. त्याला राहुल नावाचा एक पुत्र होता. राजमहलातील सुरक्षित जीवनामुळे तो जगातील दुःखांविषयी अनभिज्ञ होता. एकदा तो महलातून बाहेर गेला असताना एक वृद्ध मनुष्य, एक व्याधिग्रस्त मनुष्य, एक प्रेत आणि एक तपस्वी असे चौघेजण त्याच्या दृष्टीस पडले. बौध्दांमध्ये ‘चार महान दृश्ये’ म्हणून ही ओळखली जातात. ह्या दृश्यांमधून मनुष्याला वार्धक्य, व्याधी आणि मृत्यु अटल आहे ह्याचा त्याला बोध झाला. तपस्व्याला पाहून तो प्रभावित झाला आणि त्यानेही गृहत्याग करण्याचे ठरवले व तो सत्याच्या शोधात जंगलामध्ये निघून गेला.
त्याने संन्याशाचे जीवन जगण्यास सुरुवात केली. त्याने अनेक प्रकारच्या स्वसुखांचा त्याग केला,कडक उपवास केले. एक दिवस मरणासन्न अवस्थेस पोहोचल्यानंतर त्याने एका ग्रामस्थ मुलीकडून थोडासा दूध भात घेतला. ह्या अनुभवानंतर त्याने निष्कर्ष काढला की उपवास, श्वास रोखून धरणे वा वेदनांचा अनुभव घेणे ह्यामधून अत्यंत अल्प आध्यात्मिक लाभ होतो. त्याने संन्यस्त जीवनाचा त्याग केला व त्याऐवजी आनापानसति ध्यानावर (श्वासाविषयी जागरुकता) लक्ष केंद्रित केले. अशा तऱ्हेने, बौद्ध ज्याला मध्यम मार्ग (मध्यमा प्रतिपदा) म्हणतात तो मार्ग शोधला. ज्यांचा अर्थ देहाचे कोडकौतुक व देहाचा छळ ह्या दोन्ही टोकांच्या मधील मध्यम मार्ग.
सात वर्षानंतर, बोधि गया येथे एका बोधिवृक्षाच्या छायेत, ध्यानावस्थेत असताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर लोकं त्यांना बुध्द म्हणजेच आत्मज्ञानी असे संबोधू लागले. त्यानंतर बुध्दांनी अनेक ठिकाणी प्रवास करून उच्च नीच, राजपुत्र-शेतकरी अशा समाजातील विविध स्तरातील लक्षावधी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला. त्यांनी त्यांचे उर्वरित जीवन धर्माचे शिक्षण देण्यात व्यतीत केले.
४५ वर्ष त्यांनी, लोकांना दानातील सौंदर्य, वैराग्यातील आनंद, साधे जीवन जगण्यासाठीची प्राथमिक गरज आणि करुणेने ओतप्रोत भरलेले ह्रदय हे शिकवले. वयाच्या ८० व्या वर्षी, कुशीनगर येथे त्यांचे परिनिर्वाण झाले. बुध्दांच्या जीवनातील तीन महत्त्वाचे प्रसंग- त्यांचा जन्म, आत्मज्ञान आणि परिनिर्वाण हे वैशाख महिन्यातील पौर्णिमेशी संबंधित आहेत. बौद्धांच्या कॅलेंडरमधील हा सर्वात पवित्र दिवस आहे. त्यानंतर लवकरच आशिया खंडातील काही भागातील लोकांनी एक धर्म म्हणून बौध्द धर्माचा स्वीकार केला व त्याचे अनुसरण केले
बौद्ध धर्म
बौद्ध धर्माची चार प्रमुख तत्वे –
- सर्व दुःखम् – सर्व दुःखमय आहे.
- सर्व क्षणिकम् – सर्व क्षणभंगुर आहे
- सर्वमन्तम् – सर्व काही शून्य आहे
- निर्माण शान्तम् – निर्वाण म्हणजे शान्ती.
बुद्धाने सांगितलेली चार आर्यसत्ये
- जीवन दुःखमय आहे.
- इच्छा व वासना हे दुःखाचे मूळ कारण आहे.
- दुःखांचा अंत होण्यासाठी इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
- इच्छांचा नाश करण्यासाठी अष्टांगमार्ग स्वीकारला पाहिजे.
निर्वाणाचा अष्टांग मार्ग.
- सम्यक दृष्टी किंवा आकलन चार आर्यन सत्यांचे
- सम्यक संकल्प
- सम्यक वचन
- सम्यक आचरण
- सम्यक उपजीविका
- सम्यक प्रयत्न
- सम्यक चिंतन
- सम्यक ध्यान
बुद्धाने सामान्य माणसाला आचरणाचे पाच नियम (पंचशील) घालून दिले.
- अहिंसा – कोणत्याही जीवास इजा पोहोचवू नका.
- सत्य कधीही असत्य बोलू नका.
- अस्तेय – कधीही चोरी करु नका.
- इंद्रिय सुखामध्ये रमू नका.
- मद्यपान करु नका.
आपल्या शिकवणीमध्ये बुद्धाने ईश्वर किंवा आत्मा यांचा निर्देश केलेला नाही. सर्व क्रियांना प्रवृत्त करणारे मन आणि ज्यातून भावना उत्पन्न होतात असे शब्द. मनुष्याचे मन, भावना, शब्द आणि वृत्ती ह्यांच्यामध्ये शुध्दता विकसित केली पाहिजे. ह्यावर त्यांचा विशेष भर होता.
भारतामध्ये, बौध्द धर्म त्याच्या मातृधर्मात म्हणजेच हिंदूधर्मात अंतर्भूत आहे. हिंदूंनी भगवन विष्णूचा ९वा अवतार म्हणून बुद्धाचा स्वीकार केला आहे. इतर देशामध्येही बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे. आणि आज तो अनेक पूर्व आशियाई देशांमधील अनेक लोकांचा धर्म आहे.
प्रार्थना
बुद्धं सरणं गच्छामि।
(मी बुद्धाला शरण जातो)
धम्मं सरणं गच्छामि।
(मी धर्माला शरण जातो.)
संघऺ सरणं गच्छामि।
(मी संघाला शरण जातो)
धर्म चक्र
हे बौद्धांचे चिन्ह आहे. ह्या चक्रास आठ आरे आहेत. जे बौद्धांच्या आठ तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात आणि वर्तुळ, धर्माच्या पूर्णत्वाचे प्रतिक आहे.
बौद्ध धर्माचा प्रमुख ग्रंथ – पाली त्रिपिटक
पाली त्रिपिटक – ( त्रि चा अर्थ तीन आणि पिटकचा अर्थ पेटारे) ह्या ग्रंथात-
- विनय पिटक, जो अनुशासनाच्या नियमांचा पेटारा आहे. बौध्द भिक्षु आणि साध्वी ह्यांच्यासाठी हे नियम आहेत. हे नियम का आणि कसे संस्थापित केले गेले आणि त्याविषयीच्या आधारभूत साहित्याचे स्पष्टीकरण ह्यामध्ये दिले आहे.
- सुत्तपिटक – ह्यामध्ये गौतम बुद्धाचे महत्त्वपूर्ण उपदेश आहेत.
- अभिधम्मपिटक – ह्यामध्ये गौतम बुद्धांच्या शिकवणीचे स्पष्टीकरण दिले आहे.