श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ४)
श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ४)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- त्वन्नामकीर्तनरतास्तव दिव्यनाम
- गायन्ति भक्तिरसपानप्रहृष्टचित्ता:।
- दातुं कृपासहितदर्शनमाशु तेभ्यः
- श्री सत्य साई भगवन् तव सुप्रभातम् ।।
अर्थ
लोक तुमची भजने मोठ्या प्रेमाने गात आहेत व आनंदमय अंतःकरणाने भक्तीच्या अमृताची चव चाखत आहेत.तुमचे दर्शन त्यांच्यावर तात्काळ कृपावर्षाव करो.
हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
स्पष्टीकरण
त्वन्नाम | तुझे नाव |
---|---|
कीर्तन | परमेश्वराचा महिमा गाताना |
रता: | तल्लीन झालेले भक्त |
तव | तुझे |
दिव्य | दैवी |
नाम | नाव |
गायन्ति | गाणे |
भक्तिरसपान | भक्ती रुपी अमृतपान |
प्रहृष्टचित्ता: | ज्यांचे मन अतीव आनंदी झाले आहे ते |
दातुं | देण्यासाठी |
कृपासहित | कृपेसहित |
दर्शनम | दर्शन |
आशु | त्वरित, झटकन् |
तेभ्य | त्यांना (भक्तांना) |
श्री सत्य साई सुप्रभातम (त्वन्नाम…)
स्पष्टीकरण :
या कडव्यात नामसंकीर्तनाच्या साधनेचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. नामसंकीर्तन म्हणजे खऱ्या भक्तिभावाने भगवंताचे गुणगान सामूहिक भक्तियुक्त गायनाने करणे. आपल्या भक्तीच्या माधुर्याचा प्रवाह सातत्याने वाहण्यासाठी अचूक राग व ताल यांचीही मदत होते. आपल्या अंतःकरणातील सर्व ऊर्ध्वगामी सद्वृत्ती व सद् वासना अंकुरित होतात व फुलतात.
आपले साईकृष्ण आणि साईराम किंवा प्रभूच्या कोणत्याही रुपाच्या लीला आणि गुण मोठ्याने गाताना आपल्याला अतिशय आनंदाची अनुभूती येते.
नामसंकीर्तन ही सर्वात सोपी साधना आहे. ती आनंददायक आहे कारण सामूहिक भजनाची सुरावट आपल्या अंत:करणात पवित्र स्पंदने उत्पन्न करते. नामसंकीर्तन आपल्याला आपल्या गुरुंचे चिंतन करायला प्रवृत्त करते.
आधीच्या कडव्यांमध्ये आपल्याला जागृतीचा अनुभव येतो. ज्ञानसूर्य उगवला आहे. गुरुंनी आपल्या प्रेमळ स्पर्शाने अज्ञानाचे काही स्तर दूर केले आहेत व आपल्याला साधना करण्याची प्रेरणा दिली आहे.
या कडव्यात भजनाने आणि प्रभुनामावली गाऊन आपण आपला आध्यात्मिक प्रवास सुरु करतो. आपण आपल्या वृत्ती अंतर्मुख करतो व स्थूल शरीराच्या आत प्रवेश करतो. नामसंकीर्तननाने प्राणमय कोशाकडे वाटचाल करत, आपला श्वास दीर्घ, सावकाश, नियमित व लयबद्ध होतो.
गोष्ट :
१. नामदेव आणि ज्ञानदेव
एकदा नामदेव आणि ज्ञानदेव एका अरण्यातून चालले होते. ते थकले होते व त्यांना खूप तहान लागली होती. त्यांना एक विहीर सापडली. पण तिचे पाणी खूप खोल होते आणि आत उतरायला वाट नव्हती. आता पाणी कसे मिळवायचे?
ज्ञानदेव ज्ञानी होते. त्यांच्या पाशी योगशक्ती असल्याने त्यांनी पक्षाचे रुप घेतले. उडून विहिरीत गेले, पाण्यापाशी पोचले व त्यांनी आपली तहान भागविली.
नामदेवापाशी अशी योगशक्ती नव्हती. पण फक्त प्रभूविषयी प्रगाढ भक्ती होती. तहान लागली असली तरी त्यांचे विचार देवावरच केंद्रित झालेले होते व ते नामस्मरणात रंगून गेले. भगवंताच्या प्रेमाचा मधुरिमा अनुभवास यावा तसे ते भावविष्ट होऊन आनंदमय होऊन गेले होते.
त्या क्षणी विहिरीच्या तळातून पाणी वर आले व ओसंडू लागले. मग नामदेव कोणताही सायास न करता पाणी पिऊन आपली तहान भागवू शकले. ज्ञानी व्यक्तीला स्वसामर्थ्यावर विसंबावे लागले पण भक्तासाठी मात्र पाणी सरळ त्याच्या हातापाशी आले. नाम अत्यंत प्रभावी आहे आणि भक्ताला जे तातडीने हवे असेल ते घेऊन देव स्वतः त्याच्या दाराशी येतो.
२. परिवर्तनाचे स्पष्टीकरण करणारी भ्रमराची व कुमिर कीटकाची गोष्ट सांगा. चिंतनाने तद्रूपता.
एकदा एका भ्रमराने (भुंग्याने) एका कुमिरकीटकाला पकडले आणि लहान तोंडाच्या मातीच्या भांड्यात बंदिस्त करुन ठेवले. मधून मधून तो भ्रमर त्या भांड्यापाशी येत असे आणि दाराजवळ बसून सारखा गुंजारव करीत असे. कोणत्याही क्षणी भ्रमर आपल्यावर हल्ला करील व खाऊन टाकील या कल्पनेने अत्यंत भयभीत झालेला तो कीटक एकाग्रतेने त्या भोकातून भ्रमराकडे एकटक पहात बसे. या कीटकाने सतत, एकाग्रतेने केलेल्या भ्रमराच्या रूपाचा चिंतनाचा परिणाम म्हणून त्याच्यात परिवर्तन होते आणि स्वतःचे मूळ घाणेरडे रुप टाकून देऊन तोही सुंदर भुंग्याचे रूप धारण करतो.
याचप्रमाणे आत्मा किंवा ब्रम्हा यांचे सतत चिंतन केल्याने जीव मर्यादितपणा व अनंतवन्त असण्याचा भाव व स्वतःचे वेगळे, अहंकारपूर्ण व्यक्तिमत्व आहे असा भाव टाकून देतो आणि आत्मस्वातंत्र्य व विश्वात्मक भाव प्राप्त करुन घेतो. त्याचे सर्व सृष्टीशी नाते आहे इतकेच नव्हे तर तादाम्य आहे हे त्याला कळते. इंद्रिये व मन यांच्या मर्यादित, संकुचित दृष्टीच्या ठिकाणी त्याला आत्मदृष्टी प्राप्त होते. आत्मद्रुष्टी म्हणजे विश्वात्मक दृष्टी, विश्वात्मक जाणीव. त्याच्या आचार – विचार – उच्चारात त्याची मूलभूत दिव्यता पूर्णतया प्रकट होते. हा आत्म्याचा विकास आहे व देह – मन – जीव यांच्यात सुसंवाद असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा एकसंधपणा आहे. मनुष्य दिव्य स्थितीला प्राप्त होतो. बाबा म्हणतात त्याप्रमाणे मानव हा माधव बनतो.
३. द्रौपदीची गाढ श्रीकृष्ण भक्ती.
द्रौपदीवर श्रीकृष्णाची जी कृपा होत होती त्यामुळे रुक्मिणी व सत्यभामा आश्चर्यचकित झाल्या होत्या.
एकदा कृष्णाने त्यांना द्रौपदीचे केस विंचरायला सांगितले. तिच्या अपमानाचा बदला घेऊन कौरवांना शासन झाल्याखेरीज केस विंचरणार नाही अशी तिची प्रतिज्ञा असल्यामुळे केस खूप गुंतले होते व केसात जटा झाल्या होत्या. जेव्हा दोन्ही राण्या केस विंचरु लागल्या तेव्हा प्रत्येक केसातून ‘कृष्ण, कृष्ण, कृष्ण’ असा ध्वनी ऐकू आला.
हनुमान विषयी ही असे सांगितले जाते की त्याच्या शरीरावरील रोमारोमातून ‘राम, राम’ असे नाम ऐकू येत असे.
म्हणन आपले प्रिय प्रभु श्री साई यांचे नाम
सर्वदा – नेहमी.
सर्वकालेषु – सर्व वेळी.
सर्वत्र – सर्व स्थळी.
हरिचिंतनम् – देवाचे स्मरण – याप्रमाणे सदैव स्मरणात असावे.