बालपणीच्या कथा – १
बालपणीच्या कथा-१
आताच नव्हे तर तेव्हासुद्धा, स्वामी निःस्वार्थ प्रेम व अहिंसा तत्त्वाची शिकवण देत असत. कोडंम्माराजुंचा मुलगा व त्यांची एक मुलगी एकत्र राहत असल्यामुळे सत्या २० मुलांमध्ये वाढला. जेव्हा बुक्कापट्टणमच्या बाजारातून शिंपी मुलांचे कपडे शिवण्यासाठी विविध प्रकारची रंगीत कापडे घेऊन घरी येत असे तेव्हा आपल्या पसंतीचे कापड निवडण्यासाठी मुले धावत जात असत परंतु सत्या मात्र एका बाजूला उभा राही आणि त्याच्या आईने त्याला त्याच्या पसंतीचे कापड निवडायला सांगितले की तो म्हणे,” प्रत्येकाला आपल्या आवडीचे कापड घेऊ दे मग जे उरेल ते माझ्यासाठी चांगलेच असेल.”
एक दिवस सत्या शाळेतून घरी जात असताना, त्याचे काही वर्गमित्र, ज्यांना सत्याच्या चांगल्या गुणांचा मत्सर वाटत होता त्यांनी सत्याला चिखलात फेकले. त्यांनी त्याचा सदरा फाडला आणि त्याचे पाय धरून त्याला फरफटत नेले. परंतु सत्या शांत होता. त्याच्या वर्गमित्रांनी सत्याला अशा पद्धतीने वागणूक दिली तरी त्याने कधीही तक्रार केली नाही वा कोणालाही ह्याविषयी सांगितले नाही. त्याच्या पालकांनाही हे त्याच्या मित्रांकडून कळले.
एकादशी उत्सवाच्या दिवशी चित्रावती नदीच्या तीरावर बैलगाड्यांची शर्यती लावण्याची प्रथा होती. त्या बैलांना चाबुकाने मारून वा त्यांच्या शेपट्या पिरघळून जोरात पळवले जात असे. सत्या त्याच्या मित्रांना त्या शर्यती पाहण्याची अनुमती देत नसे. तो त्याच्या मित्रांना असेही सांगत असे की त्यांनी त्यांच्या वडिलांकडे, बैलांना चाबकाने मारू नये ह्यासाठी आग्रह धरला पाहिजे. अनेक वर्षे लोटल्यानंतर काही भक्त प्रशांति निलयम मधून, बैल गाडीने परत जात होते. नदीच्या तीरावरून पलीकडे जाण्याअगोदर स्वामींनी त्यांना परत बोलावले व म्हणाले, “हे पाहा, नदीपात्रातील वाळूवरून तुमची गाडी पलीकडे जाण्याअगोदर तुम्ही सर्वजण खाली उतरा आणि चालत जा. बैलांना तुम्हा सर्वांचे वजन पेलत वाळूवरून ओढत नेऊ नका. समजल का?” त्या काळात कोंबड्यांची झुंजही खेड्यांमधून सर्रास लावली जात असे. एक छोटा चाकू त्या कोंबड्यांच्या पायाला लावला जाई आणि त्यांना एकमेकांशी झुंजण्यास भाग पाडले जाई. जो पर्यंत त्यातला एक कोंबडा मृत्युमुखी पडत नाही तो पर्यंत ही झुंज चालत असे. ह्या प्रक्रियेत दुसरा कोंबडाही गंभीर जखमी होत असे. अशा खेळांचा सत्या तीव्र निषेध करून म्हणत असे, “चांगल्या कर्मांमध्ये चढाओढ करा अशा क्रूर कर्मांमध्ये नको.”