बालपणीच्या कथा – ६
बालपणीच्या कथा – ६
सत्याने हायस्कूल चे शिक्षण घ्यावे अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. म्हणून सत्याने त्याचा मोठा भाऊ शेषम राजु ह्यांच्याबरोबर कमलापूरला जावे असे ठरवण्यात आले. सत्या शांत आणि सद्वर्तनी मुलगा असल्यामुळे लवकरच तो कमलापूरच्या हायस्कूल मधील शिक्षकांचा लाडका विद्यार्थी बनला.
त्या शाळेतील स्काऊटचे गुरुजी सत्याला त्यांच्या तुकडीमध्ये घेण्यासाठी उत्सुक होते. इतर मुलांप्रमाणे सत्यानेही स्काऊट मध्ये दाखल व्हावे ह्यासाठी त्याचे मन वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सत्याकडे कपड्यांची फक्त एकच जोडी होती. एक सदरा व एक जोडी पॅन्ट व तो ते अत्यंत काळजीपूर्वक वापरत होता. रोज शाळेतून घरी आल्यानंतर तो पंचा गुंडाळुन कपडे धुवून टाकत असे. त्यानंतर पितळ्याच्या पातेलीत पेटवलेले कोळसे घालून तो त्या कपड्यांना इस्त्री करत असे. इस्त्री ची रेघ राहण्यासाठी तो ते कपडे रात्रभर जड पत्र्याचा ट्रंकेखाली ठेवत असे. त्यामुळे त्याचे कपडे नेहमीच स्वछ आणि नीटनेटके दिसत.
पुष्पगिरीमध्ये भरणाऱ्या जत्रेसाठी व पशुमेळ्यासाठी स्काऊटच्या संघाला जावे लागत असे. तेथे ते लोकांना पेय जल देणे, ते ठिकाण स्वच्छ ठेवणे व हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करणे अशी हितकारी कामे करत असत. प्रत्येक मुलास १२ रुपये अशी त्या शिबिराची फी होती. ज्या दिवशी संघ जायला निघाला त्यादिवशी, सत्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे पोटदुखीचे कारण सांगून सत्या मागे राहिला. जेव्हा बाकीची मुले बसने गेली तेव्हा तो उठला व नऊ मैल चालून पुष्पगिरीला पोहोचला. सत्याने स्वतःचे आदर्श उदाहरण वर्गमित्रांपुढे ठेवून त्यांना निःस्वार्थ सेवेसाठी प्रेरित केले. सत्याच्या रमेश नावाच्या मित्राला सत्याकडे स्काऊटचा गणवेश नसल्याचे माहित होते व त्याला एक गणवेश भेट देण्याची त्याची इच्छा होती. तथापि सत्याने रमेशची भेट स्वीकारली नाही. अशा भेटी देण्याने त्यांच्या मैत्रीमध्ये बाधा येईल. खरी मैत्री म्हणजे हृदयाचे हृदयाशी नाते! मैत्री भौतिक वस्तूंच्या देवाणघेवाणीवर आधारित नसावी असेही सत्याने त्याला समजावून सांगितले.
परतण्याची वेळ आल्यावर सत्या हळूच त्या शिबिरातून निसटला व पुन्हा पूर्ण अंतर चालत आला. कोणालाही कानोकान खबर नव्हती. आपण पाहतो की अशा तऱ्हेने स्वामी त्यांच्या बालपणापासूनच समाजातील दुर्गुणांचा नाश करणे व सद्गुणांचे पोषण करणे ह्या कार्यासाठी समर्पित होते. शेषमराजूनी उरवकोंडा हायस्कूलमध्ये तेलुगुच्या शिक्षकाची नोकरी स्वीकारली तेव्हा सत्याही त्यांच्याबरोबर तेथे गेला. शाळेतील प्रत्येक शिक्षकाची सत्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा होती. त्यांच्यापैकी काहीना कुतूहलापोटी तर काहींना पूज्यभावनेतून अधिक जाणून घ्यायचे होते.
सत्याने लवकरच केवळ शाळेतील सर्वांनाच नव्हे तर उरवकोंड्यातील सर्वांना त्याच्याकडे आकृष्ट करून घेतले. वर्ग सुरु होण्याआगोदर त्यानेच सकाळची प्रार्थना सुरु केली व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांना नेमून दिलेले कार्य उत्तम प्रकारे करण्यास प्रेरित केले. संगीत, वाङमय व नाट्य क्षेत्रातील सत्याच्या विशेष कौशल्याने लवकरच शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. नाट्यक्षेत्राची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनी सत्याला एक नाटक लिहिण्याची विंनंती केली. सत्याने अतिशय उत्साहाने ती कामगिरी हाती घेतली व “चेप्पिनात्सु चेस्तार?” ह्या नावाचे नाटक लिहिले. त्याचा अर्थ “कृती शब्दांचे अनुसरण करतात का ?” ह्या नाटकास मोठे यश मिळाले. त्या शीर्षकातून ध्वनित होणारी संकल्पना अशी आहे की मनुष्याने इतरांना दिलेल्या उपदेशाचे, तो स्वतः अनुसरण करण्यात कसूर करतो. १२ वर्षाच्या सत्याने नाटकातील प्रमुख भूमिका स्वतःकडे ठेवली व उत्तम अभिनयाने त्यांच्या सहाध्यायांच्या, शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या मनावर हे ठसवले की बोलायचे एक आणि करायचे दुसरेच ही निव्वळ दांभिकता आहे. ह्या नाट्याने वडीलधाऱ्यांचे डोळे उघडले आणि त्याने सच्च्या ज्ञानाप्रती असणारे सत्याचे दूरदर्शित्व व आस्था उघड झाली.
[Source : Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]